कमलनाथः इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा

१६ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ९ मिनिटं


मध्य प्रदेशात काठावर बहुमत मिळवलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडायला तीन दिवस लागले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुण तुर्क ज्योतिरादित्य सिंधिया यांना वेटिंगला ठेवत पेशाने उद्योगपती असलेल्या अनुभवी कमलनाथ यांना संधी दिली. काँग्रेस घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या कमलनाथ यांची मुख्यमंत्री पदाचं प्रोडक्ट बनण्याची गोष्ट.

आणीबाणी आली आणि तिशीतल्या संजय गांधींच्या हातात अनिर्बंध सत्ता आली. लोकशाहीचा गळा निर्दयपणे घोटला गेला. त्यामागचे अन्यायाने माखलेले हात संजय गांधींचेच होते. पण कानून के हात सत्तेच्या हातांपेक्षा मोठेच ठरले. आणीबाणी संपली. काँग्रेस निवडणूक हरली आणि संजय गांधी तुरुंगात गेले. 

आपला वारसदार असलेल्या तरण्याबांड मुलाला आपल्यासमोरच तुरुंगात जावं लागतंय. तिथं त्याच्या जीवाचं काही भलंबुरं होईल, याची चिंता इंदिरा गांधींना सतावत होती. त्याचवेळी संजय गांधींचा एक शाळासोबत मदतीला धावून आला. आपला दोस्त जेलमधे एकटाच राहू नये म्हणून त्याने चक्क कोर्टातच जजची कुरापत काढली. कोर्टाने त्या तरुणालाही सात दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दोन मित्र तिहार जेलमधे एकत्र आले. संजय गांधींचा तो दोस्त म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही, तर मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ होते. 

संजय गांधींशी शाळेतली दोस्ती

दोस्तीसाठी कायपण, अशा कमलनाथ यांच्या या धाडसाने इंदिरा गांधी भारावून गेल्या. कमलनाथ इंदिरा गांधींच्या गुडबुक्समधे कायमस्वरुपी जाऊन बसले. या घटनेनेच कमलनाथ यांची राजकारणात एंट्री झाली. आणीबाणीनंतर गांधी कुटुंबावर टीका होत होती. काँग्रेस पक्षाचे बुरे दिन सुरू होते. यावेळी कोणताही राजकीय वारसा नसलेल्या कमलनाथ यांनी निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामागे केवळ संजय गांधींचा आग्रह होता. 

महाराष्ट्राच्या बॉर्डरला लागून असलेल्या आदिवासीबहुल छिंदवाडा लोकसभा मतदारासंघातून काँग्रेसने कमलनाथ यांना उमेदवारी दिली. वयाच्या ३५ व्या वर्षीच १९८० मधे सातव्या लोकसभेत ते निवडून आले. एका व्यापाऱ्याच्या घरात वाढलेल्या मुलाचा वयाच्या सत्तरीत मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा हा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे.

यूपीच्या बरेलीत मूळ असलेल्या कमलनाथ यांच्या आजोबांनी आपलं अख्ख कुटुंब कोलकात्याला हलवलं. तिथं ते सोन्याचा धंदा करायचे. नंतर त्यांचे वडील महेंद्रनाथ कानपूरला आले. तिथेच कमलनाथ यांचा जन्म झाला. तिथे कमलनाथ यांनी कायद्याची डिग्री घेतली. कोलकात्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून कॉमर्समधे ग्रॅज्यूएट झाले.

नऊ वेळा खासदार

छिंदवाड्याच्या लोकांनी या माणसाला भरभरून प्रेम दिलं. एकाच सीटवरून पहिल्यांदा खासदार झालेले कमलनाथ सध्याच्या लोकसभेतले सगळ्यात जेष्ठ सदस्य आहेत. एक अपवाद वगळता सलग नऊ वेळा खासदार होण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. या ४० वर्षांच्या कारकीर्दीत ते केंद्रात अनेकदा मंत्री झाले. वेगवेगळ्या संसदीय समित्यांवर काम केलं. कमलनाथ २००० सालापासून सलग १८ वर्षं काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीत सरचिटणीस आहेत. 

उत्तर प्रदेशच्या कानपुरात जन्मलेल्या कमलनाथ यांचं देहराडूनच्या डून स्कूलमधे शालेय शिक्षण झालं. तिथंच त्यांची क्लासमेट असलेल्या संजय गांधींशी ओळख झाली. तिथे संजय गांधींचे अनेक क्लासमेट असतील पण सोबत राहिले कमलनाथ. ते निव्वळ सोबतच राहिले नाही तर त्यांनी दोस्तीही निभावली. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या अकाली मृत्यूने कमलनाथ काही काळ एकाकी पडले होते. मात्र काही काळातच त्यांचं हे एकाकीपण संपलं. राजीव गांधींसोबतच सोनियांचेही ते विश्वासू बनले. एवढंच नाही तर राहुल गांधींनी आपल्या घराण्याशी संबंध असलेल्या कमलनाथ यांच्या सल्ल्यानेच सॉफ्ट हिंदूत्वाची आयडिया अमलात आणलीय.

२०१२ ची गोष्ट आहे. यूपीए सरकारने रिटेल क्षेत्र एफडीआय अर्थात थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला. याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला. संसदेतही चर्चा झाली. त्यावेळी काँग्रेस पक्षाने सरकारची भूमिका मांडण्यासाठी व्यापारी असलेल्या कमलनाथ यांना तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या मदतीला दिलं होतं. कमलनाथ यांनी मोठ्या सफाईदारपणे आपल्याला दिलेली ही भूमिका पार पाडली.

देशाच्या राजकारणातून थेट राज्यात

सुरवातीपासूनच देशाच्या राजकारणात असलेले कमलनाथ एका संकटाच्या काळात मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. एकापाठोपाठ एक राज्यातून काँग्रेस सत्तेबाहेर फेकली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिलेला. एमपीत सलग १५ वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर होती. विधानसभेची निवडणूक सातेक महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसने गेल्या एप्रिलमधे कमलनाथ यांच्यावर विश्वास टाकत काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं.

कमलनाथ यांच्याआधी राहुल गांधीचे तरुण विश्वासू असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा होती. १५ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसला ज्योतिरादित्य यांनी तरुणांमधे लोकप्रियता मिळवून दिली. पण ते काही काँग्रेसचा राज्यातला चेहरा बनू शकले नाहीत. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासारखी राज्यभर ओळख असलेला व्यक्ती काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष म्हणून हवा होता.

दुसरीकडे पक्षाला आर्थिक चणचणीचाही सामना करावा लागत होता. १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपला फाईट द्यायचं तर हातात पैसा पाहिजे. केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीचा सारा ओघ भाजपकडे वळला. त्यामुळे विरोधी पक्षांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावं लागतंय. काँग्रेसचा राज्यातला पार्टी फंडच संपल्यात जमा होता, अशा बातम्याही आल्या.

पार्टी फंड जमवणारा माणूस

पक्षासाठी पैसा आणण्याची क्षमता ज्योतिरादित्य यांच्यात नाही, हे आतापर्यंत कळालं होतं. निवडणुकीच्या तोंडावरच व्यापारी राजकारणी असलेल्या कमलनाथ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्याने आपले सगळे संबंध वापरून पक्षाला आर्थिक पातळीवर सत्ताधारी भाजपविरोधात लढण्याच्या लायकीचं बनवलं.  
 
व्यापारी घरातून आलेले कमलनाथ स्वतः एक नावाजलेले बिझनेसमन आहेत. रियल इस्टेट, एविएशन, हॉस्पिटॅलिटी आणि शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचं बिझनेस साम्राज्य पसरलेलंय. देशातली सर्वोच्च व्यवस्थापन संस्था असलेल्या गाजियाबादच्या आयएमटीचे ते डायरेक्टर आहेत. कमलनाथ दोन डझनहून अधिक कंपन्यांचे मालक आहेत.

मनमोहन सिंह यांच्या कॅबिनेटमधे तर ते सगळ्या श्रीमंत मंत्री होते. २०११ मधे केंद्रीय मंत्री असताना कमलनाथ यांनी आपल्याकडे २.७३ अब्ज डॉलर एवढी संपत्ती असल्याची घोषणा केली होती. राजकारणात बिझी असल्यामुळे नकुलनाथ आणि बकुलनाथ या आपल्या दोन मुलांवर त्यांनी धंद्याची सगळी जबाबदारी सोपवलीय.

आरएसएसच्या बालेकिल्ल्यात सॉफ्ट हिंदुत्व

पैशाला आर्थिक चणचणीतून दूर करण्यासोबतच कमलनाथ यांनी पहिली गोष्टी केली ती म्हणजे, मध्य प्रदेशातला काँग्रेसचा चेहरा बदलला. स्वतःच्या छिंदवाडा मतदारसंघात १०१ फूट उंचीची हनूमान मूर्ती उभारणाऱ्या कमलनाथ यांनी मोठ्या खूबीने राज्यात सॉफ्ट हिंदुत्वाचा चाल खेळली. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला तसंच हिंदुत्वाच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली.

याआधी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी नर्मदा परिक्रमा करून काँग्रेससाठी जमीन भुसभुशीत केली होती. याला कमलनाथ यांनी मंदिर पॉलिटिक्सची जोड दिली. राज्यातल्या २३० पैकी १०९ जागांवर आठ धर्मस्थळांचा प्रभाव आहे. हे कमलनाथ यांच्या व्यापारी नजरेने हेरलं. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांना प्रचार मोहिमेदरम्यान मंदिरांची वारी घडवून आणली. प्रतिकांच्या राजकारणासोबतच काँग्रेसने एमपीत सगळ्या ग्रामपंचायतींमधे गोशाळा सुरू करण्याचं आश्वासन दिलं. जुन्या मंदिरांच्या संवर्धनाची घोषणा केली.

पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचं कौशल्य

राज्यात काँग्रेस गेल्या अनेक दशकांपासून अंतर्गत गटबाजीत अडकलीय. या गटबाजीमुळेच सलग १५ वर्षांपासून काँग्रेसचा भाजपच्या हातून दारूण पराभव होतोय. खत्री पंजाबी या व्यापारी जातीत जन्मलेल्या कमलनाथ यांचा प्लस पॉइंट म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा हातखंडा. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह असो की ज्योतिरादित्य सिंधिया की सुरेश पचौरी या सगळ्यांमधे कमलनाथ यांनी ताळमेळ साधत सगळ्यांना एकजूट ठेवलं.

शिवराज सिंह चौहान सरकारला चॅलेंज देणं सोप्प काम नव्हतं. मंदिर पॉलिटिक्ससोबतच विकासाचं राजकारणही करावं लागणार होतं. काँग्रेसने इथं सत्तेत आल्यावर १० दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं. कमलनाथ यांनी काँग्रेसचा जाहीरनामा लोकांपर्यंत पोचवला. आणि या सगळ्यांचा रिझल्ट आता जनतेसमोर आलाय. १५ वर्षांनी काँग्रेसची सत्तावापसी झालीय.

प्रचाराच्या काळात काँग्रेसची दुखरी बाजू होती, ती म्हणजे १० वर्षांची दिग्विजयसिंह यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द. त्यामुळे काँग्रेसने प्रचार सभांमधून दिग्विजयसिंह यांना बाजूला करत निव्वळ पडद्यामागे धोरणं ठरवण्याचं काम दिलं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी अनुभवी कमलनाथ आणि तरुण तुर्क ज्योतिरादित्य यांच्यात रेस लागली. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यायला काँग्रेस हायकमांडला तब्बल तीन दिवस लागले.

स्टँड न घेणारे कमलनाथ

कधीच कुठल्या गोष्टीवर स्टँड न घेणारा नेता अशी कमलनाथ यांच्यावर टीका होते. एवढंच नाही तर गेल्या १५ वर्षांत त्यांनी कधीच शिवराजसिंह चौहान यांच्यावर थेट टीका केली नाही. आपले व्यापारी संबंध कायम राखण्यासाठी सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहण्याचा धोरणीपणा त्यांच्याकडे आहे. काम करणं आणि करून घेण्याची राजकारणातली ही खास कमलनाथ शैली आहे. या शैलीमुळेच आज मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आलीय.

कमलनाथ यांचा हवाला घोटाळ्यात आलं होतं. त्यामुळे १९९६ मधे पक्षाने त्यांची बायको अलका नाथ यांना उमेदवारी दिली. त्या प्रचंड मताने जिंकूनही आल्या. पण वर्षभरातच त्यांनी राजीनामा दिला. हवाला कांडाचं वादळ थंडावलं होतं. हे बघून कमलनाथ निवडणूक रिंगणात उतरले. भाजपने त्यांच्याविरोधात सुंदरलाल पटवा यांना तिकीट दिलं होतं. कमलनाथ यांचा पराभव झाला. कमलनाथ यांचा आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतला हा एकमेव पराभव ठरला.

एकमेव पराभवाची इंटरेस्टिंग गोष्ट

कमलनाथ यांच्या या पराभवामागची कहाणीही खूप मजेशीर आहे. दोनेक टर्म खासदार असलेल्या कमलनाथ यांना दिल्लीच्या तुघलक लेनवर एक मोठा खासदार बंगला मिळाला होता. पण त्यांच्याकडे खासदारकी नसल्याने हा बंगला सोडावा लागणार होता. यासंबंधीची नोटीस मिळाल्याने त्यांनी बंगला बायकोच्या नावावर अलॉट व्हावा म्हणून खूप केले. पण नियमानुसार, पहिल्यांदाच खासदार झालेल्या व्यक्तीला एवढा मोठा बंगला देता येत नाही. त्यामुळे हवाला कांड प्रकरण थंडावल्याचं बघून कमलनाथ यांनी बायकोला राजीनामा द्यायला सांगून स्वतः निवडणूक लढवली. पण यात त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर या बंगल्याचं काय झालं हे मात्र आता कुठं सापडतं नाही.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ उसळलेल्या शीख दंगलीत जमावाला भडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दंगलीच्या काळात कमलनाथ जमावात होते, असंही सांगितलं जातं. कमलनाथ यांनीही जमावामधे आपण असल्याची कबुली दिलीय. पण आपण पक्ष नेत्यांच्या सांगण्यावरून जमावाला शांत करण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो, असा दावा करत कमलनाथ दंगलीचा आरोप फेटाळून लावलाय.

गांधी घराण्याशी खूप जवळीक असूनही स्वतःला लो प्रोफाईल ठेवण्याचं कसब कमलनाथ यांना साधलंय. या सगळ्या गोष्टींमुळेच ते मुख्यमंत्रीपदाचं प्रोडक्ट म्हणून राहूल गांधीच्या यंग टीमचा सदस्य आणि राजघराण्याचा वारसा असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याहून उजवे ठरले.

सत्तेस्थापनेसाठीची चपळाई

गोव्यामधे सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेची गोळाबेरीज करण्यास काँग्रेसने उशिरा केला. हीच संधी साधत भाजपने पुन्हा एकदा सरकार बनवलं. काँग्रेसच्या या लेटलतीफ कारभाराचा सारं खापर गोव्याचे पक्ष प्रभारी असलेल्या दिग्विजय सिंह यांच्या डोक्यावर फुटलं. मध्य प्रदेशात मात्र, काँग्रेसची सत्ता येणार असं दिसत असतानाच निवडणुकीच्या मॅनेजमेंटमधे तरबेज असलेल्या कमलनाथ यांनी लगेच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा सादर केला. 

जम्मू काश्मीरमधे महेबुबा मुफ्तींसारखं निव्वळ फॅक्स पाठवून हातावर हात ठेऊन गप्प बसण्याचा पर्याय त्यांनी अगोदरच बाजुला सारला. राज्यपालांकडे ईमेलपाठोपाठ सदेह माणूसही पाठवला. २३० पैकी १२१ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. भाजपकडे त्यांचेच केवळ १०९ आमदार राहिले. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचा एखादा नेता एवढा सक्रीय असल्याचं दिसलं. कमलनाथ यांनी हा राजकीय मुत्सद्दीपणा गेल्या ४० वर्षांच्या राजकारणातून मिळवलाय.

सलग नऊवेळा खासदार होण्याचा मान मिळवणाऱ्या कमलनाथ यांनी आदिवासीबहूल मतदारासंघात विकासाचं छिंदवाडा मॉडेल उभं केलंय. इथं त्यांनी शाळा, कॉलेजसोबतच आयटी पार्कही उभारलंय. एवढंच नाही तर स्थानिक लोकांच्या रोजगाराची, कामधंद्याची गोष्टी सोडवलं. त्यासाठी वेस्टर्न कोलफील्ड्स आणि हिंदूस्तान युनीलिवर यासारख्या कंपन्या इथं आणल्या. याच्या सोबतीला कपडा शिलाई प्रशिक्षण संस्था आणि ड्रायवर ट्रेनिंग स्कूलही सुरू केलं. या सगळ्या कामांच्या जोरावरच २०१४ च्या मोदी लाटेतही ते जिंकून आले.

हे केवळ काँग्रेसचे नेते नाहीत

कमलनाथ यांच्याविषयीची चर्चा एका प्रसंगाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तो प्रसंग म्हणजे, संजय गांधींच्या आग्रहावरून छिंदवाडा मतदारसंघातून कमलनाथ पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले होते. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. यासाठी काँग्रेसने ‘इंदिरा लाओ देश बचाओ’चा नारा दिला. इंदिरा गांधी देशभर जाऊन काँग्रेसचा प्रचार करत होत्या.

छिंदवाड्यातही १३ डिसेंबर १९८० ला त्यांची सभा झाली. स्टेजवर बसलेल्या एका तरुण उद्योगपतीकडे इशारा करत इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘हे केवळ काँग्रेसचे नेते नाहीत. तर राजीव आणि संजय यांच्यानंतरचा माझा तिसरा मुलगा आहे.’ या निवडणुकीत कमलनाथ प्रचंड मतांनी विजयी झाले. तेव्हापासून ते इंदिरा गांधींना ‘आई’ म्हणायचे. 'इंदिरा के दो हाथ, संजय गांधी और कमलनाथ' हा नारा खूप चालला.

१९९३ ची गोष्ट आहे. कमलनाथ मुख्यमंत्री बनणार अशी सगळीकडे चर्चा होती. ज्येष्ठ नेते अर्जुन सिंह यांनी दिग्विजय सिंह यांचं नाव पुढे केलं. त्यामुळे कमलनाथ मुख्यमंत्री यांचा चान्स गेला. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं होतं. जमीनदार घरातले अर्जुन सिंह आणि आदिवासी नेते शिवभानू सोलंकी हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. तिसरा नंबर होता कमलनाथ यांचा. कमलनाथ यांनी आपली पसंती अर्जुन सिंह यांना दिली. तेच अर्जूनसिंह १३ वर्षांनी इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर कमलनाथ यांच्या विरोधात गेले होते. हा कमलनाथ यांचा बॅड पॅचचा काळ होता.

तेव्हा अर्जुन सिंह यांचा चॉईस असलेल्या दिग्विजयसिंह यांनी आता मात्र आपलं वजन कमलनाथ यांच्या पारड्यात टाकलं. त्यामुळे नवख्या ज्योतिरादित्य सिंधियांच्या तुलनेत अनुभवी कमलनाथ यांचं राजकीय वजन वाढलं. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, याचा निकाल लावायला तीन दिवस लागले.

आता इंदिरा गांधींच्या नातवाला मदत

राहुल गांधींनी जगप्रसिद्ध कादंबरीकार लिओ टॉलस्टॉय यांच्या एक प्रसिद्ध वाक्यासोबत कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा फोटो ट्विट केलाय. ते वाक्य म्हणजे ‘संयम आणि वेळ दोन सर्वांत मोठे योद्धे आहेत.’ राहुल यांच्या या ट्वीटवरून स्पष्ट झालं होतं, की आता वेळ कमलनाथ यांच्या बाजूने आहे. आणि ज्योतिरादित्य यांना अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे.

वर्ष बदललं, वेळ बदलली. पण तारीख तीच १३ डिसेंबर. भावूक झालेले कमलनाथ, राहुल गांधींचा हात हातात घेत म्हणाले, ‘आजच्याच दिवशी इंदिरा गांधींनी मला आपला मुलगा म्हटलं होतं. ’ आणि आज त्याच तारखेला राहुल गांधींनी मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तत्कालीन मोरारजी देसाई सरकारविरोधात लढायला मदत करणाऱ्या या इंदिरा गांधींच्या तिसऱ्या पोरानेच मध्य प्रदेशात काँग्रेसचा १५ वर्षांपासूनचा सत्तावनवास संपवलाय.