स्टीफन हॉकिंगः आयुष्यभर खुर्चीत बसून उलगडलं अवकाशातलं गूढ

०८ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


अत्यंत खडतर आयुष्य जगावं लागलेले प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी कधी विज्ञानवादी भूमिकेपासून फारकत घेतली नाही. अवकाशातल्या ताऱ्यांचं गूढ उकलण्यात अख्खी हयात घालवलेल्या हॉकिंग यांनी आयुष्यभर मूलभूत विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाश.

मुंबई, पुणे या शहरात दरवर्षी मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. वेगवेगळे सामाजिक, वैयक्तिक, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान, महिलांसंबंधित प्रश्नांसोबतच शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्यांचे प्रश्नही हाताळले जातात. गेली चार दशकं मी एक अभ्यासक म्हणून या महाविद्यालयीन स्तरावरील एकांकिका स्पर्धांना आवर्जून जातो. त्यातील काही वर्षांपूर्वी पाहिलेली एक एकांकिका आजही माझ्या मनात कायम घर करून आहे.

आठवणींचा फ्लॅशबॅक

स्टेजवर फक्त एक रिकामी आरामखुर्ची. आणि ती झुलताना तिच्यामधे बसलेल्या एका वृद्धाचा तारुण्यापासून ते वृद्धत्वापर्यंतच्या अनेक संवेदनशील आठवणी फ्लॅश बॅक पद्धतीने दाखविल्या होत्या. एकांकिका संपली तेव्हा स्टेजवर पुन्हा तीच रिकामी खुर्ची आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट चालू होता.

थोर भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग वयाच्या ७६ व्या वर्षी इंग्लडमधल्या केंब्रिज विद्यापीठाच्या परिसरातल्या त्यांच्या राहत्या घरी १४ मार्च २०१८ ला मृत्यूस शांतपणे सामोरे गेले. आणि गेली ५५ वर्षे खुर्चीमधे विसावलेला त्यांचा जिवंत पण गतिशून्य देह त्यांची स्वयंचलित खुर्ची रिकामी करून दफनभूमीच्या प्रवासास कायमचा निघून गेला. 

तीन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन १७२७, डॉर्विन १८८२ आणि स्टीफन २०१८ एवढ्या अंतराने काळाच्या पडद्याआड गेले. पण ग्रेवयार्डमधे मात्र काही फुटांच्या अंतरात तिघेही एकमेकांच्या शेजारी अचेतन अवस्थेत असणार. हे सर्व आठवताना मला डॉ. स्टीफन यांची स्वयंचलित रिकामी खुर्ची डोळ्यासमोर दिसू लागली. सोबत तिच्याशी निगडित त्यांच्या शेकडो वैज्ञानिक आठवणी.

याचि देहि याचि डोळा भेट

२००१ मधे नवीन वर्षाच्या सुरुवातीस ते भारतात आले होते. मुंबईस्थित टाटा मूलभूत विज्ञान संस्थेत त्यांचं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानास मी आवर्जून गेलो होतो. अनेकांनी मला सांगितलं, ‘तिथे प्रचंड गर्दी असेल आणि ते काय बोलतात ते तुला समजणारच नाही!’ तरीही मी गेलो, ‘याचि देहि याचि डोळा’ त्यांची प्रतिमा मनात साठवली. ते फार कमी बोलले आणि तेही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातूनच.

स्टीफन यांच्यापेक्षा मला त्यांची ती स्वयंचलित वैज्ञानिक खुर्ची बघायची होती. खुर्ची जी त्यांच्या शरीरास चोवीस तास कायम जखडून होती आणि तीसुद्धा १९७४ पासून ते १४ मार्च २०१४ म्हणजे मृत्यूपर्यंत. खुर्चीत त्यांचा देह निर्जीव वाटत होता. डोळे भरून आले! देव एवढा कसा क्रूर असू शकतो? पण असं जर कोणी त्यांना म्हटलं असतं, तर ते म्हणाले असते, ‘देव आहे का?’

ताज हॉटेलमधे चहा पिण्याचा हट्ट

त्यांची ती वैज्ञानिक खुर्ची विजेवर चालणारी होती आणि स्टीफन स्वत: ती चालवत, तीही वेगाने. खुर्चीच्या समोर अत्याधुनिक संगणक होता. त्याच्यावर बोटांचा वापर करून ते संगणकामार्फत त्यांची वैज्ञानिक भाषणं जगभर देत असत. कारण मज्जातंतूच्या दुर्धर आजाराने १९८५ पासून त्यांना बोलणं, चालणं, लिहिणं, स्वत:च्या हाताने जेवणं अशक्यप्राय झालं होतं. न्युमोनियामुळे त्यांचा आवाजसुद्धा गेला.

इतकेच काय, पण डोकं पुढे झुकून हनुवटी छातीला टेकली तरी स्वत:हून मान ताठ करणं त्यांना जमेनासं झालं होतं. ते बोलताना अनेक वेळा मला यंत्रमानवाचाच भास होत होता. केवळ हाताची बोटं, तल्लख मेंदू आणि गालाचा एक स्नायू यांच्या जिवावर या माणसाने कृतिशील आयुष्य जगून भौतिक आणि अंतराळ संशोधनामधे अनेक टप्पे सिद्धांताच्या रूपात प्राप्त केले.

मुंबईत मुक्कामाला असताना त्यांचा ८ जानेवारी हा वाढदिवस टाटा मूलभूत विज्ञानसंस्थेत शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी यांनी साजरा केला. मलबार हिल, मरिन ड्राइव बघण्याची त्यांची हौस पूर्ण केली. आणि ताजमहलमधे चहा पिण्याचा त्यांचा हट्टसुद्धा पुरा करण्यात आला. स्वत: रतन टाटा त्यांना भेटण्यासाठी तिथे आले. टाटांसाठी तो स्वर्गीय आनंदाचा दिवस होता.

इच्छाशक्तीच्या जोरावर जगले ७६ वर्ष

हॉकिंग यांना १९६३ म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी ‘मोटर न्युरॉन’ हा आजार जडला. त्यामधे फक्त मेंदू वगळता त्यांचं संपूर्ण शरीर हळूहळू निष्क्रिय झालं. तज्ज्ञ डॉक्टरांनी ते वयाची पंचविशीसुद्धा पाहू शकणार नाहीत, असं सांगितलं. पण काळरूपी मृत्यूवर विजय मिळवत ते वयाची ७६ वर्ष तृप्त वैज्ञानिक आयुष्य जगले आणि वैद्यकीय क्षेत्रात एक आश्चर्य म्हणून नावारुपाला आले.

फक्त बोटांच्या हालचालींनी स्पीच ‘सिंथेसायझर’ वापर करून खुर्चीवरच ठेवलेल्या संगणकावर ते टाइप करत. त्यातूनच अमेरिकन उच्चार असलेली वाणी निर्माण होत असे. २३ व्या वर्षी मृत्यू होणार, हे निदान करणार्‍या डॉक्टरांचे आभार मानताना ते म्हणतात, ‘मी सुदैवी आहे की, माझा हा आजार हळूहळू वाढत आहे. इच्छाशक्तीने मला जगण्याचं बळ दिलं.’

यातून एक धडा प्रत्येकाने घ्यावा की, कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये. दुर्धर रोगाचं निदान झाल्यावर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध केंब्रिज विद्यापीठास सादर केला. हे सर्व त्यांच्या दांडग्या इच्छाशक्तीमुळेच घडू शकलं. नंतर याच विद्यापीठात ते भौतिक अवकाशशास्त्राचे प्रोफेसर आणि पीएच.डी.चे गाईडसुद्धा झाले.

डॉ. जयंत नारळीकरांचे विद्यार्थी

त्यांना १९६१ मधे केंब्रिज विद्यापीठात डॉ. जयंत नारळीकरांचा सहवास लाभला. एका उन्हाळी सुट्टीत रॉयल ग्रिनीच अवकाशदर्शन प्रयोगशाळेत एकाच दुर्बिणीवर दोघांनी एकत्र अभ्यास केला. यानंतर डॉ. स्टीफन काही दिवस डॉ. नारळीकरांचे विद्यार्थीसुद्धा होते.

अवकाश म्हणजेच अंतराळ विज्ञानावर त्यांनी शंभर वर्षे पुढचं संशोधन केलं. ते म्हणत, ‘माझं ध्येय एकच आहे. ते म्हणजे या अंतरिक्षाचं गूढ उकलणं. या लुकलुकणार्‍या तार्‍यांच्या पलीकडेही काही आहे काय याचा शोध घेणं.’

वयाच्या ३७ व्या वर्षी केंब्रिजमधील प्रोफेसरपद स्वीकारताना त्यांची शारीरिक अवस्था अतिशय दयनीय होती. मात्र त्यांचा तल्लख मेंदू अंतराळात तार्‍यांचा, कृष्णविवरांचा शोध घेत होता. कृष्णविवरावरील त्यांच्या संशोधनाची विज्ञान जगताने नोंद घेतली. अवकाशात अनेक कृष्णविवरं आहेत. प्रचंड वस्तुमान असलेल्या तार्‍यांचा स्फोट होऊन कृष्णविवर जन्माला येते आणि नंतर ते कधीच नष्ट होत नाही. उलट त्याचा आकार आणि वस्तुमान वाढतच जाते, अशी विज्ञानधारणा होती. मात्र हॉकिंगच्या सिद्धांताने त्यास तडा गेला.

हॉकिंग इफेक्टचा जन्म

डॉ. स्टीफन म्हणतात, ‘कृष्णविवर हे फक्त पोकळी आहे. त्यातून काहीही उत्सर्जित होत नाही हे चूक आहे. कृष्णविवरामधून ऊर्जा म्हणजे किरणोत्सार सतत बाहेर पडतो. त्यामुळे त्याचं वस्तुमान कमी होत जातं. ते लहान होत जातात आणि कालांतराने नष्ट होतात. म्हणजेच त्यांना अमरत्व नाही.’ याला ‘हॉकिंग इफेक्ट’ असं नाव दिलं गेलं. आणि कृष्णविवरामधून बाहेर पडणार्‍या किरणोत्साराला ‘हॉकिंग रेडिएशन’ असं संबोधलं गेलं.

वास्तविक या दोन सिद्धांतामुळे ते भौतिक शास्त्रामधील नोबेल पुरस्कारास प्रात्र ठरू शकले असते. पण या सिद्धांताच्या सत्यतेची पडताळणी शक्य नव्हती आणि नोबेलसाठी ही आवश्यक अट होती. डॉ. हॉकिंग यांच्या या दोन्हीही सिद्धांताना सुरवातीला खूप विरोध झाला.

प्रश्न होता की, कृष्णविवर जेव्हा हळूहळू नष्ट होते, तेव्हा त्याचा आकार कमी करणारे कण कुठं जातात? भविष्यात याचं उत्तर मिळेलही, पण त्यासाठी अब्जावधी वर्ष लागतील. कारण एवढे मोठे विवर नष्ट होण्यास एवढा कालावधी लागतोच. ते म्हणतात, ‘अंतराळामधील कृष्णविवरामधे प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि ती मध्यभागी एका बिंदूत एकवटलेली आहे. त्याचाच स्फोट होऊन ही विश्वनिर्मिती झाली आहे.’ शारीरिक क्षमता नसतानाही केवळ तल्लख बुद्धीच्या जोरावर त्यांनी अंतराळामधील अनेक गुढं उकलली. उकलण्याचा प्रयत्न केला.

विज्ञानवादी भूमिकेमुळे वाद

अनेक वेळा ते वादामध्ये अडकलेसुद्धा. देवाचे अस्तित्व, कृत्रिम बुद्धिमत्ता,  परग्रहावर प्रगत जीवसृष्टी आणि त्यापासून पृथ्वीला धोका, मानव जमात शंभर वर्षांनी नष्ट होणार ही त्यांची विधानं कायम चर्चेत राहिली. विश्वाची निर्मिती देवाने केली, हे त्यांना पटत नव्हते. याचं उत्तर विज्ञानाकडेच आहे, यावर ते ठाम होते. 

मृत्यूबद्दल बोलताना ते म्हणत, ‘मला मृत्यूची भीती वाटत नाही, मात्र मरणाची मला घाईसुद्धा नाही.’ केवढं सूचक विधान आहे हे! 

डॉ. हॉकिंग यांना नोबेलचा अपवाद वगळता त्या योग्यतेचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. ब्रिटनच्या राजघराण्यातर्फे त्यांना ‘नाइटहूड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला. मात्र केवळ मूलभूत संशोधनासाठी शासनाकडून पैसे कमी मिळतात, म्हणून त्यांनी तो नाकारला.

मूलभूत विज्ञानावर प्रचंड प्रेम

डॉ. हॉकिंग यांचं मूलभूत विज्ञानावर खूप प्रेम होतं. ते म्हणत, ‘जोपर्यंत शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा पाया त्यांच्या विषयामधील मूलभूत विज्ञानाने पक्का रचला जात नाही, तोपर्यंत त्यावर रचलेली आधुनिक तंत्रज्ञानाची इमारत नेहमीच तकलादू असेल.’ आपल्या कृषिक्षेत्रात आज नेमके हेच घडत आहे. जमिनीमधील उपयोगी जिवाणूंचे महत्त्व, सेंद्रिय कर्ब, आर्द्रता, पारंपरिक पिकं, त्यांची आलटापालट, जमिनीस एक वर्ष आराम, वृक्ष-प्राणी-पक्षी आणि कीटकांचे महत्त्व हे सर्व मूलभूत विज्ञान आपण विसरलो आहोत. मूलभूत कृषिविज्ञानावरच आधुनिक कृषीची इमारत रचता येते.

डॉ. हॉकिंग म्हणतात, ‘अज्ञान हा ज्ञानाचा सर्वांत मोठा शत्रू नाही, तर ज्ञानाविषयीची भ्रामक कल्पना हाच ज्ञानग्रहणातील सर्वांत मोठा अडसर आहे.’ संकरित पिकावर पडणारे रोग याबद्दल आमचा शेतकरी अज्ञानी आहे. ‘किडीचा अभ्यास करण्यापूर्वी मी त्यास कसा मारून टाकतो’ या भ्रामक कल्पनेतून तो स्वत:चाच घात करून घेत आहेत. 

डॉ. हॉकिंग यांच्या मते, ‘नि:शब्द माणसाचे मन सर्वाधिक गोंगाटी असते.’ किती सत्य आहे हे! आतापर्यंत लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. त्यातील अनेक जण तरुण होते. आणि मृत्यूपूर्वी किती तरी दिवस ते अबोल, नि:शब्द होते. त्यांच्या मनातला उद्ध्वस्त शेतीचा, कुटुंबाचा, मुलांच्या शिक्षणाचा, मुलीच्या लग्नाच्या चिंतेचा गोंगाट कुणी लक्षातच घेतला नाही.

मदत घ्या, पण अवलंबून राहू नका

डॉ. हॉकिंग म्हणत, ‘जीवनाच्या यशस्वी पायर्‍या चढताना इतरांची मदत घ्या. पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका.’ एकदा त्यांच्या स्वंयचलित खुर्चीला एका व्यक्तीने पाठीमागून आधार देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रसन्न मनाने त्यांनी त्याचे आभार मानले. पण लगेच म्हणाले, ‘अरे, तू जर असा माझ्यामागे आधारासाठी उभा राहिलास, तर मी कायमचा अवलंबून राहीन आणि माझी प्रगती, अवकाशसंशोधन इथेच थांबेल.’

किती सत्य आहे हे. स्वत:चे शरीर स्वत:चे वैरी झालेले असतानाही त्यांनी परिस्थितीला आपला जवळचा सहकारी मित्र म्हणून कायमचं स्वीकारलं. खुर्चीत स्वत:ला जखडून २२ वर्षातला प्रत्येक दिवस त्यांनी त्यांच्या संशोधनाने, व्याख्यानाने, देश-विदेशांना भेटी देऊन साजरा केला. अवकाश संशोधनात ध्रुवतार्‍याचे अढळपदही प्राप्त केलं.

डॉ. स्टीफन हॉकिंगची ती वैज्ञानिक खुर्ची मला रिकामी वाटतच नाही. सारखं वाटतं की, ते त्याच खुर्चीत बसले आहेत, तशीच हनुवटी छातीवर विसावलेली. मात्र चष्म्यामधील तीक्ष्ण नजर अंतराळात काही तरी शोधत आहे. कोणते तरी अज्ञात गूढ उकलत आहे.

 

(साभार साप्ताहिक साधना)