गोव्यात १९६७पासून पक्षांतर या सोयरीकीच्या रोगाच्या संसर्गाची लागण झाली. ती आजपर्यंत कायमच आहे. गेल्या पाच वर्षात तर गोव्यात काँग्रेस पक्ष चार वेळा फुटला. भाजप काँग्रेसचे आमदार फोडतोय. आता काँग्रेसच्या अकरापैकी आठ आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत करत भाजप प्रवेश केला. प्राण्यांना लाजवतील अशा लक्षवेधी उड्या कशा माराव्यात याचं प्रशिक्षण गोव्यानं देशाला दिलं.
गोव्यात २०१७च्या विधानसभेचे निकाल जाहीर होऊ लागले आणि काँग्रेस गुलाल उधळणार हे स्पष्ट होऊ लागलं. एका हॉटेलमधे आम्ही पत्रकार मंडळी सकाळी दहा वाजल्यापासून ताटकळत थांबलेलो. दुपारचे चार वाजून गेले. नवरा मुलगा कोण याची कमालीची उत्सुकता ताणलेली. स्थानिक आणि देशभरातून आलेले पत्रकार आणि तमाम जनता वाट पाहत होती.
सत्ताराणीचं लग्न. जनतेनंच ठरवलेलं. अगदी बहुमतानं. खुर्चीही सजलेली होती. नवरा कोण यावर काही एकमत होईना. चार जणांनी गुडघ्याला बाशींग बांधलेलं. चौघेही माजी मुख्यमंत्री. आता काय करायचं? प्रसंग तर बाकाच. चारपैकी कोणाच्याच नावावर एकमत काय होईना. आयुष्याच्या उत्तरार्धाकडे झुकलेले चार तरूण नवरे. प्रत्येकाची एकच डरकाळी - मीच होणार मुख्यमंत्री.
बैठकांमधले संवाद जसेच्या तसे बाहेर येऊ लागले. गोपनीय ठेवायला काय तो भाजप नाही, काँग्रेसच ती. नको तितका, भलताच मिडीयाफ्रेंडली. गाजलेले संवाद असे:
दिगंबर कामत: मी पाच वर्षं मुख्यमंत्री म्हणून राज्य करून दाखवलंय, त्यामुळे मीच होणार मुख्यमंत्री.
लुईझीन फालेरो: मी प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्या नेतृत्वाखाली १७ जागा निवडून आल्या. मीही मुख्यमंत्री होतो, त्यामुळे मीच होणार मुख्यमंत्री.
बाबू कवळेकर: सलग चार वेळा निवडून आलो. मला साधं मंत्रीही केलं नाही. त्यामुळे आता मीच होणार मुख्यमंत्री.
विश्वजीत राणे: माझे वडील म्हणजेच ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे सर्वात ज्येष्ठ आणि सर्वाधिक अनुभवी आहेत. त्यामुळे तेच होणार मुख्यमंत्री.
रवी नाईक: मुख्यमंत्रीपदाचा मला अनुभव आहे. मी बहुजन आहे. त्यामुळे मीच होणार मुख्यमंत्री.
‘दोघांचं भांडण तिसर्याचा लाभ’च्या धर्तीवर ‘चौघांच्या भांडणात भाजपचा लाभ’ ही नवी म्हण समोर आली. भाजपला नाकारून जनतेनं १७ आमदार काँग्रेसला दिले. एका अर्थानं जनादेशच. ४० सदस्यसंख्येच्या सभागृहात बहुमताचा जादुई आकडा २१ होता. ‘गोवा फॉरवर्ड’चे तिघे, ‘मगोप’चे तिघे आणि दोन अपक्ष काँग्रेसला पाठिंबा द्यायला एका पायावर तयार होते. आशेचा खेळ सुरु झाला. आता निरोप येईल. मग निरोप येईल. अमुक मंत्रीपद, तमुक महामंडळ मिळेल.
दुसरीकडं स्वतःला न्यायाधीशच समजणार्या मीडियानं काँग्रेसचं लग्न लावलेलं. शेवटी डाव मात्र फिस्कटलाच. जनादेशाचा आदर न करणारी काँग्रेस आत्मघातकी निघाली. मांजरं भांडत बसली. तेरा जागा मिळूनही भाजपनं सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकन खाऊनही टाकला. २१चा आकडा गाठण्यासाठीच्या सर्व कसरती, हिकमती परफेक्टच.
सत्ताही स्थापन झाली. भाजपने चतुराईनं आणि चपळतेनं गुलाल हिसकावून स्वतःवर उधळला. काँग्रेसची मंडळी बसली हात चोळत. २००७मधे दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार होतं. त्यानंतर आजतागायत काँग्रेसवाले हातच चोळत बसलेत. सत्तेविना इतकी वर्षं म्हणजे जल बिन मछलीच. तडफडून का मरायचं? मारा मग उड्या-लाजवा प्राण्यांना.
हेही वाचा: मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता
‘गावार म्हाळ आणि सुण्याक बोवाळ’ ही कोकणी म्हण. म्हाळाचा महिना असतो तेव्हा कुत्र्यांची चैन असते. पूर्वी जेवण पत्रावळीवर वाढायचे. पंगत उठल्यानंतर त्या पत्रावळी रस्त्याकडेला फेकल्या जायच्या. तिथं कुत्र्यांची पार्टी चालायची. भरपूर दंगा व्हायचा. त्यांचा आवाजही वाढायचा. या उदाहरणाचा आणि सांप्रतकालीन राजकारण्यांचा, राजकारणाचा काहीही संबध नाही.
तसा तो कुणाला आढळला तर निव्वळ योगायोग समजावा. अगदी कुत्र्यांच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. सर्व काही काल्पनिक आहे. निर्मिती करताना कोणत्याही प्राण्यांना दुखावलेलं नाही. प्राणी कोणत्याही पक्षाचा असो. सर्व प्राण्यांनी सर्व पक्षातून यथेच्छ भटकंती केलीय. मायबाप प्रेक्षकांनीही समजून घ्यावं.
काँग्रेसच्या सिनेमाला नायकच नाही. नेतृत्वहीन पक्ष. कोणच कुणाचं ऐकत नाही. सगळेच महान किंवा ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाच्या कार्यक्रमालाही सगळे नेते एका मंचावर येणार नाहीत. अहंकार मोठा. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना अभिवादन करण्यासाठीही वेळ नसतो.
पक्षाची समाजमाध्यमातली गतीही कासवाची. जो तो राजा. दिल की खुशी, मन का राजा. दिगंबर कामत समाजमाध्यमात भलतेच सक्रीय आहेत. याचं अभिनंदन, त्याला श्रद्धांजली, यांचा निषेध, त्याचं स्वागत. त्यासाठी त्यांनी पगारी माणूसच ठेवला होता. पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून.
दाराबाहेरची पक्षाची पाटी कधीही बदलली जाऊ शकते. ते मूळचे भाजपचे. काँग्रेसमधे १७ वर्षं होते. सत्ता भोगत असतानाही त्यांचा एक पाय काँग्रेस तर एक भाजपमधे होता. आता दोन्हीही पाय भाजपमधे आहेत. आता गोवा काँग्रेसच्या हवेलीत फक्त तीन आमदार शिल्लक राहिलेत.
हेही वाचा: प्रभाकर सिनारीः गोव्यात क्रांतीला मुक्तीकडे नेणारा नायक
दिगंबर कामत म्हणतात, मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी देवाला कौल लावून सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर देवानं तुला हवा तो निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी असल्याचं त्यांना सांगितलं. २०२२च्या निवडणुकीत धार्मिक स्थळांवर जाऊन आम्ही काँग्रेस सोडणार नाही, अशी शपथ काँग्रेसच्या तमाम ३६ उमेदवारांनी जाहीरपणे घेतलेली.
त्यामुळे पक्षांतरानंतर कामत यांनी डायरेक्ट देवालाच फोन केलेला असावा. हे मात्र खासगीत केलं. सत्ता हाच त्यांचा देव. ते म्हणतात, शपथ घेतल्याचं मी मान्य करतो, पण लक्षात घ्या, माझ्यावर देव कोपणार नाही. गरिबांची सेवा करण्यासाठी, लोकांची कामे करण्यासाठी म्हणजेच चांगलं काम करण्यासाठी त्यांनी पक्षांतर केलंय. त्यामुळे देव त्यांच्यावर खूशच होईल. पक्षांतर केलेल्या एका आमदाराचं देवाला दिलेलं हे प्रमाणपत्रच आहे.
भाजपमधे गेलेल्या आठ आमदारांनी माध्यमांच्या पर्यायानं जनतेच्या तोंडावर जी कारणं फेकली ती लाजबावच. लोककल्याणासाठी, विकासासाठी त्यांनी पक्षांतर केलं. आत्तापर्यंत किती कल्याण, विकास केला? खरं तर, चाळीस पैकी बाराजणांनाचं मंत्री होता येतं. चाळीसजणांना मंत्री करण्याची तरतूद असायला हवी होती. काय झालं असतं गोव्याचं? या लोकांनी भलतीच जन्नत केली असती.
गोव्यात मतदार संघ ४०. सरासरी मतदारसंख्या २५ हजार. एका उमेदवाराचा निवडणूक खर्च किमान आठ-दहा कोटी. प्रमुख तीन उमेदवारांचे झाले २४ ते ३० कोटी. बाकीचे उमेदवार आणि गणिती आकडेमोड तुम्ही करा. एका निवडणुकीत हजारावर कोटींचा खुर्दा. एका काँग्रेसेतर राष्ट्रीय नेत्याचं गोव्यात भाषण सुरु होतं. तो म्हणाला, राजकारण करियर आहे.
सत्ता मिळाली नाही तर आमदारांनी पाच वर्षं काय करायचं? का जाणार नाहीत आमदार पक्ष सोडून? लोकशाही व्यवस्थेचा सक्षम विरोधक लाखमोलाचा असतो. पण कंबरेचं डोक्याला गुंडाळून खूप काळ लोटला. १५ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन होता. त्याच्या पूर्वसंध्येला, देवाला साक्षी ठेवून पक्षांतराचा सोहळा विधीवत करण्यात आला.
लोकशाहीची हत्या झाली. जनादेशाचा अपमान झाला. मतदारांचा अपमान झाला. जिथं गूळ, तिथं मुंगळे. हे सगळे नेते निर्लज्ज आणि पैशाला हपापलेले आहेत. सत्तेसाठी विचारांचा, तत्वांचा खून करणारे आहेत. विचारशून्यता वाढलीय. जनतेची घोर फसवणूक होतेय. भाजपचं मिशन कमळ यशस्वी ठरतंय. ‘काँग्रेस छोडो, भारत जोडो’सारख्या शब्दांचा मुसळधार पाऊस. शब्दांनी रकानेच्या रकाने भरलेत.
खरं तर मतदारही ढोंगी असतात. हे एकदा मान्य केलं की विश्लेषण सोपं होतं. जशी आपली लायकी तसे आपलं राज्यकर्ते. मतासाठी पुन्हा वस्तू आणि पैसे मोजून घेतले. एकानं इतकं दिलं तर दुसर्यानं डबल यासारख्या चर्चेच्या धुराची आग आपणच लावली. ऐन मतदानाच्या दिवशी घरातच वाट बघून घरात पैसे पोचल्यानंतरच मतदानासाठी घराबाहेर पडणारा मतदारराजा. मत विकणारा भिकारी राजा. हात पसरणार्या या मतदारराजांची संख्या धडकी भरवते.
हेही वाचा:
फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा
सत्ता संघर्षाच्या पेचात देवेंद्र फडणवीस एकाकी
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार म्हणजे ‘तीन पायांचा तमाशा’
हैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं