मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे

२७ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


‘मराठीतल्या ऐतिहासिक ललित साहित्यात सत्य कमी आणि अतिशोयक्ती फार असते. रणजीत देसाई, ना. सं. इनामदार, वसंत कानेटकर यांच्या लेखनात असंच दिसून येतं. हे टाळूनही चांगलं ललित लिहिता येणं शक्य आहे,’ असं ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांना वाटतं. मुंबई विद्यापीठात न. र. फाटक स्मृती व्याख्यानात त्यांनी याविषयी सविस्तर भूमिका मांडली.

कार्यक्रमः प्रा. न. र. फाटक स्मृती व्याख्यान
ठिकाणः फिरोजशाह मेहता भवन, मुंबई विद्यापीठ, कलिना, मुंबई
वेळः २१ डिसेंबर, सकाळी ११ वाजता
वक्ते: नंदा खरे
विषयः ललित लेखकांच्या नजरेतून मराठेशाही

पानिपत, आनंदी गोपाळ यासारख्या सिनेमांतला इतिहास किती खरा आहे आणि किती खोटा याची चर्चा सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीपासूनच सुरू असते. ‘सिनेमा हे साहित्याचं एक्सटेन्शन असतं’, असं ज्येष्ठ लेखक नंदा खरे म्हणाले. सिनेमा असो वा मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन दोन्हीमधे सत्यापेक्षा मनोरंजन आणि भावनिक आवाहनांना महत्व दिलं जातं, असंही ते म्हणालेत. 

मुंबई विद्यापीठातल्या इतिहास संशोधन मंडळ, राज्यशास्त्र विभाग, मराठी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. प्रा. न. र. फाटक यांच्या स्मृती व्याख्यानात नंदा खरे यांना आमंत्रित केलं होतं. ‘ललित लेखकांच्या नजरेतून मराठेशाही’ याविषयावर ते भरभरून बोलले. त्यांच्या भाषणातले काही महत्वाचे मुद्दे इथं देत आहोत.

काय स्वीकारायचं हे तुम्ही ठरवा 

मराठी माणसांना दुसऱ्याचं मत चुकीचं कसं आहे हे सांगायला फार आवडतं. कधी कधी मत पटलं तरी ते असं सांगण्यापेक्षा तसं सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं असे खेळ सारखे चालतात. तेव्हा सगळ्या ललित लेखकांच्या नजरेतून काहीतरी दिसतंय असं सांगण्याचा मी प्रयत्न केला तर ते मान्यच होणार नाही. त्यामुळे मी फक्त एकाच लेखकाच्या नजरेतून मराठेशाही कशी होती याबद्दल काही दावा करु शकतो. आणि तो लेखक म्हणजे मी स्वतः माझे गुणदोष, मर्यादा, पूर्वग्रह हे मी आज इथं मांडणार आहे. त्यातून काय स्वीकारण्यासारखं आहे आणि काय नाही हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागेल.

माझंही वाचन सर्वसामान्य मुलांसारखंच

मी मराठीतून लिहित असलो तरी माझं मराठी औपचारिक शिक्षण आठवीतच संपलं. माझ्या लहानपणी वाचन हा एकमेव विरंगुळा उपलब्ध होता. सर्वसामान्य घरातल्या मुलाचं असतं तसंच माझं वाचन होतं. मराठी बालकुमार साहित्यात तेव्हा इतिहासाचा मोठा भाग असायचा. वि. वा. हडप आणि नाथ माधव यांच्या ऐतिहासिक कांदबऱ्या प्रसिद्ध होत्या.

१९६० च्या आसपास चमत्कार व्हावा तशी शिवाजी महाराजांवरची एक पुस्तक मालिका निघाली. ब. मो. पुरंदरे यांनी लिहिलेली. ही मालिका पु. ल. देशपांडे यांना इतकी आवडली की त्यांनी पुरंदरेंवर एक लेख लिहिला. आणि त्यानंतर ब. मो. पुरंदरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे झाले. मराठीतलं सगळ्यात लोकप्रिय इतिहास लेखन पुरंदरेंचं पुस्तक हेच असावं.

कॉलेजमधे गेल्यावरही माझं ऐतिहासिक ललित वाचन चालूच होतं. त्यात मुख्यतः ‘स्वामी’ आणि ‘श्रीमानयोगी’ या रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या आठवतात. ना. सं. इनामदारांची ‘राऊ’, ‘झेप’, ‘झुंज’, ‘शहेनशाह’ ही सगळी पुस्तकं माझ्या लहानपणी लोकप्रिय होती. अजूनही आहेत.

खरं तेच लिहावं!

मी इंजिनिअरींग शिकलो आणि कंत्राटदारी सुरू केली. इंजिनिअरिंग हे उपयोजित विज्ञान आहे आणि कंत्राटदारी हे उपयोजित शास्त्र आहे. आपल्यासमोर जी माहिती येते ती बेभरवशाची आहे असं समजून वागावं. तिच्याकडे साशंकतेनं पाहवं, तपासून घ्यावं, अशी शिस्त मला या शास्त्रांमुळे लागली. त्यानंतर या लोकप्रिय कांदबऱ्या मला समाधान देत नाहीत हे माझ्या लक्षात आलं.

अनेकजण म्हणतात की ललित साहित्याला असले निकष लावू नयेत. त्यांनी जे सांगितलं ते स्वीकारावं. यावर उलट मला असं वाटतं की ऐतिहासिक ललित साहित्यिकांनी खरं तेच लिहावं.

हेही वाचा : तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?

ललित साहित्य म्हणजे फॅन फिक्शन

आजकाल बरेच नवीन शब्द निघालेत. त्यातला एक म्हणजे फॅन फिक्शन. ओळखीच्याच एखाद्या साहित्यकृतीमधली पात्र घ्यायची आणि त्यांना वेगळ्याच परिस्थितीत घालून काय होतं ते पहायचं म्हणजे फॅन फिक्शन. भा. रा. भागवत यांचं ‘रॉबीनहुड आणि त्याचे रंगेल गडी’ हे माझं आवडतं पुस्तक. राजे राजवाड्यांना खिजवणाऱ्या, त्यांची संपत्ती लुटून गरिबांमधे वाटणाऱ्या अशा एखाद्या माणसांचा गट दाखवायचा अशी आज कुणाला इच्छा झाली आणि त्यांनी त्या माणसांना रॉबीनहुड, मेरीयन, धाकला जॉन ही भागवतांच्या पुस्तकातलीच नावं दिलं तर ते झालं फॅन फिक्शन.

कधीकधी आपले ललित ऐतिहासिक लिहिणारे लेखक फॅन फिक्शन लिहायला लागतात. ते त्यांनी करु नये, असं मी म्हणेन. फॅन फिक्शन आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. सदाशिवरावभाऊ ताडताड चालत गेला आणि बादशाहचा अपमान करायचा म्हणून त्यानी दिल्लीचं तख्त फोडलं, असं वर्णन मी वाचलंय. पण मुळात असं काहीही झालं नाही.

अलिकडेच आलेल्या पानिपत सिनेमात हा प्रसंग घातला नाही यामुळे मी सुखावलो. गोवारीकरांनी काहीतरी तरी खरं दाखवलंय असं वाटलं. तर अशाप्रकारे अनेकजण आपल्याकडे फॅन फिक्शन लिहितात. हे लिहिणं गौण आहे एवढंच नाही, तर मला ती गुन्हेगारीच वाटते.

ऐतिहासिक लिहिणाऱ्यांनी फॅन फिक्शन लिहू नये, आपल्या मनाचं फार काही घालू नये, असं मला वाटतं. हे पथ्य देसाई, इनामदार पाळत होते असं मला वाटत नाही. आणि तरीही ते सगळ्यात लोकप्रिय लेखक आहेत. त्यांच्या मानाने पुरंदरे फॅन फिक्शन लिहिणं टाळतात अशी माझी समजूत आहे.

ललित साहित्यातून इतिहास कळल्याचा गैरसमज होतो

आज ज्यांच्या नावानं हे व्याख्यान चाललंय त्या न. र. फाटकांनी रानड्यांचं चरित्र लिहिलं. त्यात १८६५-६६ मधलं रानड्यांचं एक मत त्यांनी सांगितलंय. रानडे एम. ए. करत होते तेव्हा इतर विद्यार्थी काय वाचतात यावर त्यांना अहवाल लिहायला सांगितला होता. त्या अहवालाच्या शेवटी मूळ इतिहासावरचं पुस्तक वाचण्याऐवजी परीक्षेसाठीची गाईड वाचण्यात मुलं वेळ वाया घालवतात अशा आशयाचा मजकूर त्यांनी लिहिलाय.

रानडे गाईड वाचू नका सांगताहेत त्या गाईडसारखं आपल्याकडचं ऐतिहासिक ललित साहित्य असतं. आपल्याला वाटतं मूळ इतिहास समजला. पण तसं होत नाही. रानड्यांचा जन्म १८४२ चा. म्हणजे हे मत मांडताना रानडे २३-२४ वर्षांचे होते. रानड्यांना जी गोष्ट २३-२४ व्या वर्षी उलगडली ती समजायला मला चाळीशी उजाडली.

अलीकडेच ‘बायजू’ नावाचं एक गणित शिकण्याचं तंत्रज्ञान आलंय. त्या तंत्रज्ञानात गणित शिकवताना गणिताची प्रक्रिया सांगण्याऐवजी सरळसरळ फायनल उत्तर दिलं जातं. दिसताना सारं आकर्षक दिसतं. पण मुळात गणिताची समजच येत नाही. आपल्याकडचं ऐतिहासिक ललित लेखन हे या 'बायजू' सारखं आहे. आपल्याला इतिहास कळलाय असा खोटा समज होतो.

हेही वाचा : पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं? 

पुस्तकाच्या खपावरुन त्याचं यश ठरत नाही

काही काळापूर्वी मी म. वा. धोंड याचं ‘जाळ्यातील चंद्र’ हे पुस्तक वाचलं. त्यात 'आनंदी गोपाळ', 'रघुनाथाची बखर', 'स्वामी' अशा सगळ्या कादंबऱ्यांवर तपशीलवार लेख आहेत. या तिन्ही ऐतिहासिक चरित्र कादंबऱ्या आहेत. धोंड सांगतात की अशा चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिणारे चरित्र लिहिणाऱ्या माणसाइतकंच संशोधन करत असत. पुढे ते लिहितात, ‘चरित्रकाराएवढीच पूर्वतयारी केल्यानंतर तो म्हणजे कादंबरीकार चरित्र लिहावयास न घेता कादंबरी रचण्यास प्रवृत्त होतो. याचं कारण त्याला त्या व्यक्तीच्या जीवनाचे निवेदन करायचे नसते. जीवनाचा साक्षात्कार करायचा नसतो.’

धोंड पुढे लिहितात, ‘पूर्वतयारीवेळी संशोधन आणि निर्मितीवेळी सर्जक अशा या दोन अलग भूमिका नसतात. सर्जकाची भूमिका वठवताना संशोधकाची भूमिका त्याला पूर्णपणे टाकता येत नाही. या दोन्ही भूमिकांतील गुणांची शय्या त्याच्या लेखनात उत्कृष्ट जमते तेव्हा चरित्रात्मक कादंबरी यशस्वी होते.’

कादंबरीचा किती खप झाला, किती कमाई झाली हे यशाचे निकष धोंड लावत नाहीत. तर वाचकांना आणि समीक्षकांना कादंबरी किती समाधान देते याबद्दल ते बोलतात. या पातळीवर देसाई, इनामदार हे पुरंदरेंच्या खूप मागे आहेत. पुरंदरे कुठे आहेत हे आपण आपलं आपलं ठरवावं. पण देसाई, इनामदार यांच्या बाबतीत रसाळ लिहायची इच्छा ही संशोधकावर मात करते.

'स्वामी'ची कथा म्हणजे सास-बहु मालिकेची पटकथा

सध्या टीवीवर ‘स्वामिनी’ नावाची सिरियल सुरू आहे. माधवराव आणि रमाबाई यांच्या जीवनावर. या माधवरावची गोष्ट वेगळीच आहे. माधवराव पेशवा होणार असं कुणाला वाटलं नव्हतं. पानिपतच्या लढाईत विश्वासराव आणि सदाशिवराव मारले गेले आणि त्यानंतर लगेचच नानासाहेबांचा मृत्यू झाला. त्यामुळे हे पेशवेपद त्याच्याकडे येऊन पडलं. या पेशव्यानं चांगली कामगिरी केली. त्यानं निजामाला आटोक्यात ठेवलं.

१७६२ मधे माधवराव राज्यावर आला आणि त्याच्या पुढच्याच वर्षी निजामानं पुणे लुटलं. तेव्हा निजामाला पुण्यात वाट दाखवायला आणि आतल्या गोटातल्या बातम्या पुरवायला नागपूरचे जानोजी भोसले यांनी मदत केली. नागपूरच्या जानोजी भोसल्यांच्या प्रत्येक कामात पेशवे पाय आडवा घालत होते. म्हणून त्यांनी सूड घेतला. जानोजी भोसलेंकडे असलेला पश्चिम विदर्भ म्हणजे यवतमाळा, बुलढाणा, अमरावती, अकोला हे जिल्हे नागपूरकरांकडून काढून माधवरावांनी निजामाला दिले.

हा उल्लेख स्वामी कादंबरीत आहे का? नाही. कादंबरीच्या शेवटी फक्त बायकोसोबत सारीपाट न खेळता आल्याचं दुःख व्यक्त केलंय. कादंबरीच्या सुरवातीला सगळ्यात एक्सलंट प्रिन्स वगैरे उपाधी दिलीय. नंतर मात्र फक्त प्रेमकथाच राहते. नेमाडेंनी तर यावर अजून कठोर टीका केलीय.

नेमाडे म्हणतात, ‘रणजित देसाई यांची स्वामी ही कादंबरी तंत्रे, पात्रनिर्मिती. प्रसंगनिर्मिती, ट्रॅजिक नायकाला हळूवारपणे हाताळणारी संरचना याबाबतीत क्रांतिकारक आहे. एका बाजुने चित्पावन अस्मितेला सुखावून दुसऱ्या बाजुने मराठी राज्याची चिंता प्रकट करण्याचे कसब सबंध कादंबरीभर देसाईंनी कसे पार पाडले हे पाहण्यासारखे आहे. तथापि, स्वामीच्या युगकर्तृत्वाला दुसरी कारणे आहेत. इतिहासाचा आभास निर्माण करता करता ही कादंबरी वर्तमान वास्तवाशीही परावर्तित पद्धतीने नाते सांगते. स्वामी १९६२ म्हणजे अशावेळी प्रसिद्ध झाली की ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आल्यावर मराठी समाजाला आपले कर्तृत्वहीनत्व कळून चुकले होते. ब्राम्हण मराठी धुडगूस, शैक्षणिक क्षेत्रात पीछेहाट, व्यापारापासून ते संगीत, चित्रपट, नृत्य इत्यादी कलांपर्यंत सर्वत्र बोंब, महाराष्ट्राबाहेर मराठी तरुणांना स्कोप नाही म्हणत बेकारीपायी फिरणारी तरुण सुशिक्षित मुले, त्यांचे भौतिक आकांक्षा उंचावलेले भोगवादी आई-बाप हे सर्व माधवराव बल्लाळ या तडफदार तरुणाचे चित्र पाहून सुखावले. याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की स्वामीची रचना कौटुंबिक आहे. स्वामीचे अंतरंग ऐतिहासिक नाही. हेच कादंबरीच्या थोरवीचे प्रमुख कारण आहे.'

थोडक्यात स्वामीची कथा ही सास-बहु मालिकेची पटकथा आहे. पण या कादंबरीमुळे फक्त दहाच वर्ष राज्य केलेला, स्वतःचे सरदार दुखावणारा पेशवा महाराष्ट्राचा लाडका झाला.

हेही वाचा : पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

सध्या एकुणच जमाना पोस्ट ट्रूथचा आहे

बदलत्या काळाबरोबर इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. वसंत कानेटकर यांचं ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक लोकांनी उचलून घेतलं होतं. त्याचसोबत यातला शिवाजी हा मध्यम दर्जाचा उद्योजक असावा असा वाटतो, अशी टीकाही त्या नाटकावर झाली. शिवाजी आणि संभाजी संबंधातला ताण कसा असेल असं ते नाटक होतं.

याचकाळात द. ग. गोडसे यांनीही ‘राजियाचा पुत्र’ हे नाटक लिहिलं. हेही नाटक शिवाजी, संभाजी संबंधावरचंच नाटक होतं. आपल्या नाटकात समकालीन संदर्भ देत खरा शिवाजी-संभाजी तणाव कसा झाला असेल हे गोडसेंनी दाखवून दिलं. त्यांच्या या नाटकानंतर कानिटकरांचं नाटक अवास्तव आहे हे वेगळं सांगण्याची गरजही पडत नाही. पण राजीयाचा पुत्र हे नाटक पाहिलेलं, ऐकलेलं कुणीही सापडत नाही. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक मात्र अभिजात मराठी नाटक म्हणून प्रसिद्ध आहे.

वास्तविक तथ्य, पुरावे याच्याऐवजी भावनिक आवाहनांना महत्त्व द्यायचं याच्यासाठी पोस्ट ट्रुथ अर्थात सत्योत्तर असा शब्द वापरला जातो. खरं काय आहे हे कानेटकरांच्याच काळात एक माणूस सांगत होता. पण त्याकडे दुर्लक्ष करुन दुसरंच मत पुढे आलं. सध्या एकुणच जमाना सत्योत्तरचा आहे.

कुठलंही पुस्तक लिहिताना लेखकाचा त्यामागे काहीतरी हेतू असतो. पाहणाऱ्याची नजर, पाहणाऱ्याचा हेतू काय आहे, त्याप्रमाणे इतिहास काय आहे हे वेगवेगळ्या रुपात समोर येतं. ललित्तेतर लोकांना अधुनमधून तरी प्रमाणित, खरं लिहावं लागतं. ललित लेखनात तर कुठलीच बंधनं नसतात. म्हणूनच मराठीतलं ललित इतिहास लेखन हे कधीही तटस्थ राहिलेलं नाहीय. त्यामुळे प्रत्येकवेळा लिहिणाऱ्याची मापं शोधायची आणि त्याचे गुणाकार, भागाकार करुन लेखकाचं मत कितपत ग्राह्य धरायचं असं करावं लागतं.

आता तरी सत्य लिहिण्याचा प्रयत्न करावा

मानसशास्त्रात कन्फर्मेटरी बायस नावाचा एक प्रकार आहे. याचा अर्थ असा की आपल्या मताला पूरक जी गोष्ट असेल त्यावर आपण विश्वास ठेवतो. नाहीतर ठेवत नाही. माझं असं होत असेल. पण आपल्या मताविरुद्ध काही मत वाचलं, ऐकलं की त्याला नाहीच म्हणायचं याला डिनायल म्हणतात. हा तर मोठा आजार आहे. ‘मराठे व इंग्रज’ या पुस्तकात न. चिं. केळकर म्हणतात, ‘मराठेशाहीचे पतनात जातिभेदाचे मूल्य रुपयास पै.’ म्हणजे जातीभेद फारसा नव्हता पेशव्यांच्या, मराठेशाहीच्या काळात असा याचा अर्थ होतो. मला वाटतं केळकर विकारी डिनायलमधे आहेत.

ललित लेखकांनी इतिहास लिहिताना तो नुसता वर्णन करण्याकरता नाही तर साक्षात्कार घडवण्यासाठी लिहावा. हा साक्षात्कार खोल आणि सर्वव्यापी असावा यासाठी प्रयत्न करावेत. याबाब न. चिं. केळकर लिहितात ते फार महत्वाचं आणि माझ्या बाजुचं आहे.

'आपल्या पुर्वजांच्या काळाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी असतात. एक अभिमानाची आणि दुसरी केवळ ऐतिहासिक किंवा विवेकाची. अभिमानाच्या दृष्टीला स्वकियांच्या इतिहासरुपी पर्वतांची सर्वांत उंच शिखरे कर्तृत्वरुपी बर्फानं मढवलेली आणि किर्तीरुपी उज्ज्वल प्रकाशात चमकणारी तेवढीच दिसतात. ऐतिहासिक किंवा चिकित्सक बुद्धी ही जवळ जाऊन पाहणारी असल्यामुळे तिला त्या पर्वतांच्या शरीरांचा खडबडीतपणा, त्यातल्या खोल आणि भयंकर दऱ्याखोरी हे सर्व काही दिसते आणि शोधावे लागते.’ म्हणजेच इतिहास लिहिताना त्यातल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी दाखवता आल्या पाहिजेत, असं केळकर म्हणतात.

मी जॉर्ज ऑर्वेल या लेखकाचा भक्त आहे. भाषा ही सत्याची भागीदारी असली पाहिजे असं तो सांगायचा. त्यामुळे मी जे काही लिहिन ते सत्य असावं, असा माझा प्रयत्न होता. शिखरं दाखवताना दऱ्याखोऱ्या दाखवता येतात. दऱ्याखोऱ्या दाखवल्या तर शिखरं नाकारली असंही होत नाही. बरेच लोक सत्य लिहिण्याचा प्रयत्न करतात. असं केलं नाही तर आपली साहित्याची पातळी अजुनअजून खाली जात जाईल.

हेही वाचा :

जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट

पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार