राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या मराठी माणसाला राजेश टोपे हे नाव अनोळखी नाही. पण आता हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलंय. इतकंच नाही, तर देशभरातल्या जाणकारांनाही टोपेंचा परिचय झालाय. ही ओळख आहे एक संवेदनशील तरीही कार्यक्षम, अभ्यासू तरीही विनम्र आणि लढाऊ तरीही संयत कर्तृत्वाचा नेता म्हणून. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्यमंत्री म्हणून नेतृत्व करणाऱ्या या नेत्याची ही ओळख.
देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री कोण आहेत? ते सध्या काय करतात? असा प्रश्न सोशल मीडियावरून ऐन कोरोनाशी लढाई सुरू असताना विचारला जातोय. त्याचं उत्तर म्हणून एक फोटो शेअर होतोय. त्यात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन लॉकडाऊनमधे घरात बसून भाजी निवडताना दिसत आहेत. तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे मास्क लावून हॉस्पिटलमधे व्यवस्थेची पाहणी करताना दिसत आहेत. त्यात राजेश टोपे यांचं वेगळेपण स्पष्ट दिसतंय.
लोकशाहीत लोकप्रतिनिधींचं जनतेविषयीचं उत्तरदायित्व अधिक असतं. मान, सन्मान, राजेशाही थाट वगैरे वाट्याला येत असलं, तरी राज्यातली जनता संकटात असताना त्यांनाच जीवावर उदार होऊन नेतृत्व करावं लागतं. हीच लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेची खरी कसोटी असते. या कसोटीला उतरणाऱ्यांना जनता दीर्घकाळ स्मरणात ठेवते. राजेश टोपे सध्या या काळाच्या कसोटीवर उतरत आहेत, असंच म्हणावं लागेल.
भारतात कोरोनाला रोखण्यासाठीचं काम सुरू झालं तेव्हा टोपेंच्या कामांची चर्चा सुरू झाली. दहाएक दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एनडीटीवी इंडियावर एक मुलाखत होती. यावेळी टोपेंची ओळख करून देताना मुलाखत घेणारा पत्रकार म्हणाला, ‘राजेश टोपे देश के ऐसे मंत्रियों में से एक हैं, जो अपना अभ्यास पुरा करके मीडिया के सामने आते है. आजकाल हमें यह चित्र राजनीति में कहां दिखाई देता हैं.’ राष्ट्रीय पातळीवरच्या या न्यूज चॅनलचा हा शेरा टोपेंचं कामाची पावती म्हणायला हवीय.
टोपे याचं श्रेय घेत नाहीत, हे आणखी विशेष. 'आपत्तीच्या काळात काम कसं करावं हा आदर्श आम्ही शरद पवार यांच्याकडून घेतला`, हे त्यांचं वाक्य आपल्या वरिष्ठ नेत्यांकडून काय शिकावं आणि प्रसंगी प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वस्तुपाठ आपल्या कामातून कसा घालून द्यावा, याचं एक उदाहरण म्हणून याकडे पाहता येईल. किल्लारी आणि भूजच्या भूकंपांमधलं शरद पवारांचं आपत्ती व्यवस्थापनातलं काम हे देशभरात आदर्श मानलं जातं.
हेही वाचा : १०० वर्षांपूर्वी शाहू महाराजांच्या विद्यापीठ एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!
खरं तर राजेश टोपे हे काही पहिल्यांदा मंत्री झाले नाहीत. फडणवीस सरकारच्या आधीची पंधरा वर्षं ते सतत मंत्री राहिलेत. सुरवातीला नगरविकास, जलसंधारण, पर्यावरण, उद्योग, सामान्य प्रशासन, संसदीय कार्य अशा विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. नंतर २००८ ते २०१४ या काळात राज्याचे उच्च, तंत्रशिक्षणमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली.
पण या काळात त्यांच्या कामाचा असा खास काही ठसा उमटलेला दिसला नाही. वारसा आणि घराणेशाहीचं अपत्य म्हणूनच महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. त्यांचं राजकारणही या वारशाच्या कलेनंच पुढं जात होतं. जालन्याचे माजी खासदार आणि मराठवाड्यात सहकार क्षेत्रातलं वजनदार प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडील अंकुशराव टोपे यांच्या पुण्याईवर राजेश टोपे पहिल्यांदा आमदार झाले.
ते साल होतं १९९९. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन केली होती. निकटवर्ती, विश्वासू सहकारी असलेले अंकुशराव टोपे काँग्रेस सोडून पवारांसोबत आले. मग १९९९च्या विधानसभा निवडणुकीत टोपेंचा मुलगा राजेश यांना आयुष्यातली पहिलीवहिली निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. वडलांचं काम, जनसंपर्क आणि शरद पवारांना मानणारा या भागातील मोठा शेतकरी वर्ग यांच्या बळावर ते सहज विधानसभेत पोचले. पवारांनी आपल्या या विश्वासू मित्राच्या मुलाला थेट तरुण राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली.
अंकुशराव हे अतिशय प्रामाणिक, कठोर परिश्रम करणारं व्यक्तिमत्व म्हणून आजही ओळखले जातात. त्यांचा पिंड राजकारणापेक्षाही समाजकारणाचाच अधिक. व्यवसायाने वकील असलेले अंकुशराव १९७०च्या दशकात राजकारणात सक्रिय झाले. नंतर ते औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य ते १९९१ मधे जालना जिल्ह्याचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.
या काळात त्यांनी अतिशय कष्टातून मत्सोदरी शिक्षण संस्थेची उभारणी केली अंबड, जालना, घनसावंगी या तीन तालुक्यात तिचा विस्तार केला. त्यानंतर बीड-औरंगाबाद रोडवर समर्थ सहकारी साखर कारखाना उभारला. सभासदांचा विश्वास जिंकत कारखाना मोठा केला. आजमितीला हा कारखाना मराठवाड्यातला अग्रेसर सहकारी कारखाना म्हणून ओळखला जातो. त्यामागे अंकुशरावांचे परिश्रम, शिस्त, व्यवस्थापन कौशल्य आहे.
अंकुशराव स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. असं असूनही त्यांनी आपल्या या स्वभावाने कुणाची मनं दुखावली जाऊ नयेत याची काळजी घेतली. टोपे या नावामागं उभं असलेलं जनतेचं पाठबळ हे त्याचंच फळ आहे. त्यांच्यामुळे अनेकांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला. त्यांची प्रतिमा परिसरात एक कुटुंबप्रमुख म्हणून निर्माण झाली. अंकुशरावांचा हाच वारसा एकुलता एक मुलगा असलेल्या राजेश यांच्याकडे आला.
हेही वाचा : बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती
राजेश टोपे बी. ई. मॅकेनिकची पदवी घेऊन नोकरी व्यवसायात रमण्याऐवजी राजकारणात आले. १९९२मधे ते जालना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यांनी अंबड इथं यशवंत सहकारी सूतगिरणीची स्थापना केली. समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले. सहकार आणि शिक्षणक्षेत्रात विविध पदं भूषवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा, व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून काम केलं. ११ जानेवारी १९६९ ला जन्मलेले राजेश टोपे आता ५१ वर्षांचे आहोत.
हे सगळं सुरू असताना त्यांच्या मागं अंकुशराव टोपेंचा वारसा होता. `अंकुशरावांचा पोरगा` हे वलय कायम त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाठलाग करत राहिलं. जिल्ह्यातला महत्त्वाचा नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेश टोपेंना मंत्री म्हणून राज्यभर ओळख निर्माण करता आली नाही. वारसानं गोष्टी मिळाल्यानंतर स्वतंत्र ओळख तयार करणं अवघडच जातं. नेमकं तेच राजेश टोपेंच्या बाबतीत झालं.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाल्यावर पवारांनी वेगवेगळ्या घराण्यांचा वारसा असणाऱ्या काही तरुण नेत्यांना वेळोवेळी संधी दिली. त्यात राजेश टोपेंचंही नाव येतं. परंतु इतरांच्या तुलनेत टोपेंना स्वत:ला राज्य पातळीवरचा नेताच काय, मराठवाड्याचा नेता म्हणूनही प्रस्थापित करता आलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्या तुलनेत धनंजय मुंडे यांनी अतिशय कमी कालवधीत आणि संघर्षातून स्वतःला राज्य पातळीवर प्रस्थापित केलं.
राज्याचे उच्चशिक्षण मंत्री म्हणून काम करताना टोपेंना तशी मोठी संधी होती. परंतु त्यांना ती संधी साधता आली नाही. कदाचित मतदारसंघावर असणारं त्यांचे प्रेम आडवं येत असावं. ते मुंबईत असले तरी मनाने मतदारसंघात असतात. स्वतःच्या मतदारसंघाबद्दल ते पझेसिव म्हणून ओळखले जातात. मतदारसंघातली विकासकामं आणि लोकांच्या प्रश्नांबाबत ते जागरूक असतात. पण संघटक म्हणूनही ते फारसे प्रभावी दिसले नाहीत. औरंगाबादचे संपर्कमंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती वाढीस लागला, हा देखील संशोधनाचा विषय आहे.
हेही वाचा : शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय
२०१९ला अंकुशरावांच्या निधनानंतर ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत होते. पाठीशी तसं कुणीच नव्हतं. निवडणूक अटीतटीची झाली. टोपे कसेबसे अडीच हजारांच्या फरकाने निवडून आले. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद कापण्याचे प्रयत्न झाले. पण त्यांची पक्षनिष्ठा आणि शरद पवारांचं त्यांच्यावरचं प्रेम कामाला आलं. ते महाविकास आघाडीत आरोग्यमंत्री झाले.
पण सरकार आल्यावर अल्पावधीतच कोरोना वायरसच्या प्रादुर्भावानं आरोग्य खातं देशभर चर्चेत आलं. आरोग्य मंत्री राजेश टोपे याच आपतीच्या काळाचा सामना करणारा योद्धा म्हणून चर्चेत आले. मुळात आपल्या देशातल्या सरकारी आरोग्य यंत्रणेची बिकट स्थिती जगजाहीर आहे. खासगीकरणानंतर कोणत्या क्षेत्रातून सरकारने अधिक लवकर अंग झटकलं असेल तर ते म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. त्यातून आरोग्य हा 'सेवाधर्म' म्हणून मागे पडून नवीन 'उद्योग क्षेत्र' उभं राहिलं.
कर्जबाजारी झालं तरी चालेल परंतु ते सरकारी रुग्णालयात नको, ही मानसिकता वाढीस लागली. खेड्यापाड्यात तर आरोग्ययंत्रणेचे तीनतेरा वाजले. त्यांच्यापेक्षा जडीबुटीवाल्या बाबांकडे जास्त पेशंट असतात. काही सरकारी दवाखान्यांचा अपवाद वगळला तर एकूण सर्वच परिस्थिती बिकट होत गेली. या पार्श्वभूमीवर 'कोरोना' नावाचा भयंकर संसर्गजन्य वायरस आला.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
हमीद पर उम्मीद : कोरोनाचं औषध सिप्ला शोधेल असं जगाला का वाटतं?
ग्रेट लॉकडाऊन: आत्ताची आर्थिक मंदी १९३०च्या जागतिक महामंदीहून वाईट
भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं
प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट
तोकडी साधनसामुग्री, आरोग्य सेवेत डॉक्टर, नर्स, ब्रदर्स, सफाई कर्मचारी यांची असंख्य पदं रिक्त, अशा अभावात्मक परिस्थितीत टोपे गेला दीडेक महिना या खात्याचे प्रमुख म्हणून धीरोदात्तपणे परिस्थितीशी दोन हात करत आश्वासकरित्या लढले. सातत्याने मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला माहिती देत राहिले.
एकीकडे मंत्री म्हणून सबंध आरोग्ययंत्रणेला विश्वासात घेत, तिला आधार देत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत, प्रसंगी कडक भूमिका घेत, कारवाई करत, नेटाने आपली जबाबदारी पार पाडणं होतं. तर दुसरीकडे मुख्यमंत्री, पक्षाचे नेते आणि जनता यांना सातत्याने परिस्थितीविषयी अवगत करत राहणं होतं. त्यांनी या दोन्ही भूमिका सहजपणे पार पाडण्याचं कसब आरोग्यमंत्री म्हणून सिद्ध केलं.
विशेषतः हे घरात अथवा ऑफिसमधे बसून नाही, तर जिथं कोविड-१९ च्या पेशंटवर औषधोपचार सुरू आहेत, अशा रुग्णालयात जाऊन केलं. रुग्णांची व्यवस्था करणे, डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधणं, प्रसंगी तिथेच बैठका घेणं, राज्यभरातल्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलणं, केंद्र सरकार, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीचा अभ्यास करून निर्णय घेणं. अशा असंख्य पातळीवर हा माणूस आज अडचणीच्या प्रसंगी महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढताना दिसतोय.
विशेष म्हणजे स्वतःची आई मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमधे ऍडमिट असतानाही एक मंत्री म्हणून लोकांप्रतीचं कर्तव्य पार पाडणारे मंत्री तसे दुर्मीळच म्हणायला हवेत. एकुलता एक मुलगा आज आपल्या आईजवळ थांबून आपलं कर्तव्य पार पाडण्याऐवजी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांवर ती जबाबदारी सोपवतो आणि महाराष्ट्राची काळजी घेत फिरताना दिसतोय. याच गोष्टीसाठी त्यांचं कौतुकही होतंय.
गेल्या काही दशकांत महाराष्ट्रानं दिग्विजय खानविलकर, विमल मुंदडा, सुरेश शेट्टी असे काही चांगले आरोग्य मंत्री अनुभवले. या परंपरेत राजेश टोपेंनी आपला अमीट ठसा उमटवलाय. मागच्या पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या होत असताना कृषीमंत्री लोकांना माहीत नव्हते.
सांगली, कोल्हापूर महापुरात बुडलं, तेव्हा मंत्र्यासह राज्याचे प्रमुखच प्रचारात मश्गुल असल्याचं चित्र महाराष्ट्राने पाहिलं. या पार्श्वभूमीवर अतिशय संवेदनशीलपणे कर्तव्याचं भान ठेवून कार्य करणारे मंत्री म्हणून राजेश टोपे उठून दिसले.
हेही वाचा : महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?
सध्या जगच अडचणीत आहे. परंतु याप्रसंगी राज्याच्या आरोग्यखात्याची जबाबदारी योग्य माणसांच्या हातात आहे. असा विश्वास जनता व्यक्त करते हेच त्यांच्या कामाचे यश. हा माणूस कर्तृत्ववान, संवेदनशील आणि आपल्या कर्तव्याविषयी सजग आहे, याची प्रचिती पहिल्यांदाच महाराष्ट्राला या निमित्ताने आली.
एरवी दोन साखर कारखाने, दूध संघ, शिक्षणसंस्था यासोबत मंत्रीपद सांभाळणाऱ्या राजेश टोपेंच्या कार्यक्षमतेचा त्यांच्या घनसावंगी मतदारसंघाबाहेर महाराष्ट्राला परिचय नव्हता.
राजेश टोपे हे नाव आज महाराष्ट्राच्या जनतेच्या ओठावर अतिशय आदराने घेतलं जातंय. पण अजून कोरोनाशी लढाण्यात त्यांच्या कामाची कसोटी लागणार आहे. शिवाय सरकारी आरोग्ययंत्रणेचं सक्षमीकरण करणं हे येत्या काळात त्यांच्या खात्यासमोरच खरं आव्हान आहे.
हेही वाचा :
अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे
भाई उद्धवराव पाटलांचा वारसा कोण चालवणार?
कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?
आव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का?
बापूसाहेब काळदाते : तत्त्वांसाठी मंत्रीपद नाकारणारा राजकारणी
पालघरबद्दल मी गप्प नव्हतो, हिंदू-मुस्लिमवाली टोळी जास्त सक्रिय होती
महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही
बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा,
जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याबद्दलचा प्रत्येकाने वाचावा असा लेख
(लेखक डॉ. गणेश मोहिते हे बीडच्या बलभीम महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत.)