कपिल पाटील : आंदोलक आमदाराचा पंधरा वर्षाचा प्रवास

२६ जून २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


२६ जून २००६ ला विधिमंडळातले समाजवादी नेते कपिल पाटील यांनी पहिल्यांदा मुंबई शिक्षक मतदार संघातून विजय मिळवला. त्यांच्यामुळं विधिमंडळातलं समाजवाद्यांचं अस्तित्व १५ वर्षांपासून टिकून आहे. विधान परिषदेत वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळं एक झुंजार नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या जनमानसात प्रतिमा निर्माण झालीय

२६ जून हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. आज लोकराजा राजर्षी शाहु महाराजांची जयंती. या राजानं दीन, दलित, शोषितांच्या जीवनात उर्जा निर्माण केली. शाहु राजा आरक्षणाचा प्रणेता. आरक्षणाचं हे तत्त्व पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारतीय राज्यघटनेत आलं. पण महाराष्ट्रातल्या लोकशाही समाजवाद्यांसाठी २६ जून हा दिवस आणखी एका घटनेमुळं विशेष आहे. समाजवाद्यांची विझत चाललेली राजकीय मशाल याच दिवशी पुन्हा एकदा प्रज्ज्वलीत झाली.

२६ जून २००६ ला प्रखर समाजवादी कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार संघातून विजय मिळवला. त्यांच्यामुळं विधिमंडळात समाजवाद्यांचं अस्तित्व १४ वर्षांपासून टिकून आहे. समाजवादी विचारांचा प्रखर विरोध करणाऱ्या शक्तींना हे शल्य दीड दशकापासून कायम टोचतंय. त्यानंतर झालेल्या दोन निवडणुका जिंकून आमदार पाटील यांनी २००६ मधे मिळालेला विजय हा ‘वाऱ्यावरची वरात’ नव्हती हे सिद्ध झालंय. 

हेही वाचा : बंद शाळांमुळे शिक्षणातल्या 'बहुजन हिताय'चे तीन तेरा

जिंकणार तर पाटीलच!

या दिवसाची आठवण आणखी एका प्रसंगामुळं राहते. २००६ मधे निवडणूक प्रचार सुरू असताना सरकारी नोकरीच्या मुलाखतींसाठी मुंबईत होतो. अर्थातच मुक्काम आमदार निवासावर होता. मुलाखत आटोपल्यानंतर झी न्यूजच्या कार्यालयात गेलो. मुंबईतल्या सहकाऱ्यांशी गप्पा झाल्यानंतर निघण्याची घाई चालली होती.

प्रचार सुरू असल्यानं कपिल पाटील यांना देण्यासाठी माझ्या आर्थिक कुवतीनुसार काही रक्कम नेली होती. त्यांना गाठण्याची माझी घाई सुरू होती. माझी तगमग लक्षात आल्यानं वरिष्ठ सहकारी मिताली मठकर यांनी चौकशी केली आणि मला सांगितलं, ‘कपिल जिंकणार आहेत.’ एव्हाना आम्हा समाजवाद्यांना पराजयाचीच सवय झाल्यानं हा अंदाज धक्कादायक होता.

मी फोन करून काही पत्रकार मित्रांचा अंदाज घेतला. त्यापैकी काही जणांनी तसंच मत व्यक्त केलं. पाटील यांची भेट झाल्यानंतर मी त्यांना ते निवडून येत असल्याचं पत्रकार सांगतायत असं म्हणालो. माझे लातूर जिल्ह्यातले मित्र श्रीशैल्य बिराजदार आणि अजित शिंदे प्रचारासाठी मुंबईत आले होते. पाटील यांना वाटलं मीही त्यासाठीच आलो. ते माझी निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना इतर मित्रांना देत असताना मी परत जाणार असल्याचं सांगितलं. तुमचा विजय निश्चित असल्यानं सोबत आणलेली रक्कम परत घेऊन जात असल्याचं सांगितलं.

पाटील यांच्यासाठी हा दुसरा धक्का होता. एकतर ते विजयी होणार असं मी ठामपणे सांगत होतो आणि निवडणुकीत पैशाची गरज असताना देत नव्हतो. त्यांना काहीच कळेना. मी म्हणालो, ‘काळजी करू नका, पराभूत झालात तर कर्ज फेडण्यासाठी मी यापेक्षा जास्त पैसे घेऊन येईन.’ २६ जून २००६ रोजी मतमोजणीनंतर कपिल पाटील आमदार झाले.

हाती घेतला अबीर गुलाल

कपिल जे काही करतात ते जीव झोकून देऊन करतात. मग पत्रकारिता असो की राजकारण. छात्रभारतीत असतानाच राजकारण करायचं हे पक्कं होतं. कर्मवीर जनार्दन पाटील यांच्या सोबत अत्यंत तरुण वयात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ते लढत होते. पुढे पत्रकार झाले. आज दिनांक आणि सांज दिनांक या दैनिकांची अकाली हत्या झाल्यानंतर कपिल पाटील यांनी राजकारण गांभीर्यानं घेतलं. पण जुन्या नव्यांच्या अंतर्गत कलहातून त्यांना जनता दल सोडणं भाग पडलं.

त्यानंतर ओबीसी आंदोलनातील जुने सहकारी शब्बीर अन्सारी यांच्यासोबत मुस्लिम ओबीसी संघटना बांधण्यात झोकून दिलं. त्याआधी आळंदीत संत ज्ञानेश्वरांच्या पावन भूमित मेळावा घेऊन ‘अबीर गुलाल’ हाती घेतला होताच. राजकीय पक्ष स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू होते. पण, जुनी समाजवादी मंडळी साथ देण्याऐवजी अडथळेच जास्त आणत होते.

तेव्हा मी छात्रभारतीचा अध्यक्ष होतो. मंडल आयोग लागू होऊन एक तप पूर्ण होत आलं होतं. उत्तर प्रदेश आणि बिहारमधे समाजवाद्यांची सत्ता स्थिर होऊन वैयक्तिक स्वार्थापोटी जनता दलाचे तुकडे होत होते. या परिस्थितीत पक्ष टिकेल का याचीही चिंता होती.

वी.पी. सिंग आणि मंडल आयोगामुळं सामाजिक न्याय हा शब्द प्रचलित झाला होता. त्यामुळं नवीन पक्षाला सामाजिक न्याय पार्टी हे नाव मी सूचवलं. या नावानं पुस्तिकाही तयार झाली, प्रयत्न केले. पक्ष उभा राहिला नाही. कपिल पाटील यांनी मात्र प्रयत्न सुरूच ठेवले. छात्रभारतीतील संपर्कामुळं शिक्षक भारती ही संघटना आणि लोकभारती हा पक्ष स्थापन केला.

हेही वाचा : केंद्रात मोदी आणि राज्यात कुणीही, असा फरक मतदार खरंच करतात?

सरकार आणि आंदोलकांतला दुवा

कपिल पाटील यांच्या विधिमंडळातलं पंधरावं वर्ष २६ जूनला सुरू होतंय. या काळात त्यांनी विधान परिषदेत वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळं त्यांची महाराष्ट्राच्या जनमानसात एक झुंजार नेता म्हणून प्रतिमा निर्माण झालीय. आजकाल अशी प्रतिमा निर्माण करून देणाऱ्या पब्लिक रिलेशन कंपन्या आहेत. पण समाजवादी असोत की जनआंदोलनवादी, कम्युनिस्ट असोत की आंबेडकरवादी, सत्यशोधक असोत की लहान मोठ्या संघटनांचे कार्यकर्ते. सगळ्यांना विधिमंडळात 'आपले कपिल पाटील' आहेत असं वाटतं. 

परिवर्तनवादी आंदोलक आणि सरकार यांच्यातला कपिल पाटील हे कायम दुवा राहत आले आहेत. जनतेसोबतच्या या जैविक रिलेशनमुळे त्यांना पीआर कंपन्यांची गरज भासली नाही. काही समाजवादी त्यांचा दु:स्वास करत असले तरी परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्याला त्यांचा आधार वाटतो, हे सत्य नाकारता येत नाही. भाई एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख,  भाई वैद्य, केशवराव धोंडगे, मृणाल गोरे यांची परंपरा ते सभागृहात आणि सभागृहाबाहेरही बजावत आहेत.

आमदारकीच्या दीड दशकात त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. पण इतर अनेक मुद्द्यांवर प्रखर भूमिका घेत सरकारला नामोहरम केलं. सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन इतर समाजवाद्यांसारखं मंत्रिपद मिळवणं त्यांना शक्य होतं. ते त्यापासून दूर राहिलेत. आमदारांच्या राजयोग सोसायटीतही मिळालेलं घर नाकारलं. हा एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु लिमये, राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव असावा.

समाजवाद्यांचा पाचवा कोन

हे असं असलं तरी पुरेसं नाही. लोकभारतीनं काही निवडणुका लढवल्या. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधे नगरसेवक निवडूनही आले होते. पण, महाराष्ट्राच्या चौकोनी राजकारणात पुढे फार यश आलं नाही. कपिल पाटील तीन वेळा आमदार झाले. चौथ्या वेळीही होतील. पण ते स्वत:पुरतं राजकारण करणारे नाहीत. किंवा तसं करून चालणारही नाही. 

शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चौकोनी राजकारणात समाजवाद्यांचा पाचवा कोन काढावा लागणार आहे. त्याशिवाय कोविड आणि जागतिकीकरणानंतर निर्माण झालेल्या प्रश्नानं ग्रासलेल्या जनतेला कुणीच राहणार नाही. हे लक्षात घेऊन ते पुढील वाटचाल करतील, अशी अपेक्षा आहे. आमदारकीच्या दीड दशकी वाटचालीनिमित्त कपिल पाटील यांना शुभेच्छा.

हेही वाचा : 

वो सुबह कभी तो आयेगी!

महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

 कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?

न्यायव्यवस्थेसोबतच आपला समाजही दिवसेंदिवस सुस्त होत चाललाय

(लेखक छात्र भारतीचे माजी अध्यक्ष आहेत.)