आपल्याला काय त्याचं : तरूणाच्या स्थित्यंतराची तरूणीनं सांगितलेली गोष्ट

०७ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


राजगृह या नव्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक ‘आपल्याला काय त्याचं’ आज प्रकाशित होतंय. खेड्यातून शहरात आल्यावर पुरोगामी चळवळीशी जोडलेल्या तरुणाच्या आंतरिक बदलाची ही गोष्ट. स्त्रीपुरूष समानता कृतीत आणत माणूस बनण्याचा त्याचा प्रवास उलगडणारी श्वेता सीमा विनोद या तरुणीची ही कादंबरी. त्यातला छोटा भाग इथं देत आहोत.

संध्याकाळी कार्यक्रमाला गेलो. समाजातल्या नावाजलेल्या वगैरे लोकांचे सत्कार, हार, तुरे, भाषण असं सगळं साग्रसंगीत चालू होतं. महिमाचं जोरदार भाषण आणि टाळ्या. व्यवस्थित होता कार्यक्रम. समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करावं जे समाजाच्या भल्याचं असेल असा एकंदरीत कार्यक्रमाचा उद्देश होता. काय करावं हे काही नीटसं ठरलं नाही. पण स्वतःच्या जातीचं श्रेष्ठत्व, आपली जात कशी इतरांपेक्षा महान आहे वगैरे अशा आशयाचं बोललं जात होतं.

मला काही केल्या त्यात इंटरेस्ट येत नव्हता. खरंतर जातीसाठी म्हणून झालेली ही पहिली मीटिंग मी अटेंड करत होतो. माझ्या गावात अनेक जातीची लोकं राहतात. त्या त्या जातीच्या लोकांनी पुढे येऊन जातीचं म्हणून काही केलेलं माझ्या बालपणीच्या आठवणीत तरी नाहीय.

आता अचानक या पाच-सहा वर्षांत काय झालंय नेमकं? की लोकांना असे कार्यक्रम घ्यायची गरज पडतेय? मला काही केल्या पटत नव्हतं. गरजेचं वाटत नव्हतं. काय पटत नाहीय तेही क्लिअर नव्हतं. मी तिथून लवकर कलटी मारायच्या प्रयत्नात होतो.

तोपर्यंत अँकरिंग करणारा पोरगा बोलला, ‘आता मी आपल्या नितीनला स्टेजवर बोलवतो. आपल्या सगळ्यांना माहितीय, नितीन आपल्यातला एक हुशार मुलगा आहे. जो गेल्या काही वर्षांपासून पुण्याला जॉब करतोय.’

हेही वाचा : नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?

टाळ्या. मी गांगरलो. सुरज्याकडे पाहिलं. तो स्टेजवरच होता. त्याच्याकडे पाहूनच समजत होतं या त्याच्याच काड्या आहेत ते. पण म्हणजे याला काय अर्थय? काय तीर मारतोय मी पुण्यात की इथं येऊन लोकांना ग्यान देऊ? साला, किती जॉब करणारे पोरं आहेत इथं! माझंच नाव घ्यायची काय गरज होती? हे म्हणजे लय झालं! आपणच माती खाल्ली. फोनवर त्याला सांगत बसलो की मी नाटक वगैरे करतो तिथं पुण्यात. चला आता, चला स्टेजवर. पर्याय आहे का काही?

स्टेज म्हणजे काय तर एका घराचा ओटा. कार्यक्रम गल्लीत नव्हता तर एका कॉलनीत होता. धरणाचे पैसे मिळाल्यामुळे जसं लोकांनी स्वतःची जुनी घर पाडून नवी घरं बांधली तसंच काही लोकांनी गावाबाहेर जागा घेऊन तिथं घर बांधली. आणि अशा प्रकारे आमच्या गावाला कॉलनी हा प्रकार मिळाला.

मी बिचारा ठरलो. गेलो स्टेजवर. सगळ्यांना नस्कार केला. आणि वा.. समोर रस्त्याच्या कडेला भाऊ हाताची घडी घालून उभा.

‘अरे हा कशाला आला इथे?’ माझी मनातल्या मनात चिडचिड.

जाऊ दे! जे योग्य वाटतंय ते बोलायचं. बाकी बघू नंतर. मी सुरवात केली.

‘मला जास्त काही कळत नाही. इथं सगळे गावात वर्षानुवर्षांपासून राहणारे लोक आहेत. त्यांना नक्कीच माझ्यापेक्षा जास्त कळतं. मला का बोलायला बोलवलंय हे सुरज्यालाच माहीत.’ मी सुरज्याकडे पाहून बोललो. या वाक्यावर सगळे हसले. स्टेजवरच अध्यक्षस्थानी बसलेले आप्पा म्हटले, ‘दोस्ती. दुसरं काय?’ पुन्हा हशा.

‘पण आता आलोय तर दोन गोष्टी बोलतो. पहिली गोष्ट, आपण इथं नाही म्हटलं तरी पन्नास-पंचावन्न लोक आहोत. यात महिला किती आहेत. फक्त चार. तर मला असं म्हणायचंय की समाजासाठी काही करायचंय, त्या समाजात महिला येत नाहीत का? यापुढे अशा कार्यक्रमांचं निमंत्रण महिलांनाही दिलं जावं.’ शांतता.

महिमा अन् तिच्या मैत्रिणीने हलकेच टाळ्या वाजवल्याचं मी बघितलं. काय प्रतिक्रिया द्यावी हे बाकीच्यांना कळलं नव्हतं कदाचित. मी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट न बघता पुढे बोललो, ‘अन् करायचं काही असेल समाजासाठी, तर तरुण मुला-मुलींसाठी अभ्यासिका सुरू करू. म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या सगळ्यांना फायदा होईल.’ यावर मात्र टाळ्या पडल्या.

हेही वाचा : कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

भाऊच्या हाताची घडी तशीच होती. मी धन्यवाद म्हणून स्टेजच्या खाली उतरलो. माझ्यानंतर बोलायला आलेल्या महाजन सरांनी माझ्या बोलण्याचं कौतुक केलं.

कार्यक्रमानंतर फिरत फिरत गावाच्या बाहेर आलो. वर चांदणं, शेतातून येणारे रातकिड्यांचे आवाज. आम्ही चार-पाच लोक होतो. गाड्या साईडला लाऊन गाड्यांनाच टेकून उभं राहिलो. पगार पाण्यासाठी वेगवेगळ्या शहरात पांगलेले सगळे जमले होते.

सुरज्याने त्यांना माझ्या भाषणाचा किस्सा सांगितला. ‘काहीही म्हणा भो. पण हे पोरगं बदलून गेलंय. तुम्हाला आठवतं का? शाळेत भाषणाले नाव देलतं येणं अन् नंबर याच्या आधीच मुतारीत जाऊन लपून राहिला होता.’

याच्यावर ‘आठवतं आठवतं’ म्हणत सगळे जोरात हसले. ‘अन् आज. फक्त दोनच मिनिटं बोलला न भो, पण सगळे पाहातच राहिले नं.’

‘का रे? खरं का?’ बाकीचे पण मग विचारायला लागले.

‘बदललाय हे तर खरंच आहे. याचं फेसबूक बघतो ना मी. काय काय शेअर करत असतो. समाजकार्य करायला लागलाय असं वाटतं.’ सुमित बोलला.

‘नाही रे. असं एवढं काही नाही. मला जेवढं जमतंय तेवढं बदलतोय. स्वतःला समजून घेतोय. बाकी नाही करत काही.’ मी उत्तर दिलं.

‘हे स्वतःला बदलणं अन् ते हे नं हे सगळं शहरात चालतं भो. गावात हसतात लोकं याला. आपला जॉब करा, लग्न करा, मस्त रहा.’ किर्‍या हसत बोलला.

तो हसत बोलत असला तरी मला ते खटकलं. ‘म्हणजे गाव तसंच ठेवायचं का?’ असं मी त्वेषाने विचारणार होतो. पण जमलं नाही. नेमकं काय करणार होतो मी गावात? किंवा आम्ही सर्वांनी गाव बदलण्यासाठी काय करणं अपेक्षित होतं? यापैकी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी ब्लँक होतो.

हेही वाचा : जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!

नंतर बर्‍याच विषयांवर गप्पाटप्पा झाल्या. रात्री घरी जायला उशीर झाला. आई जागीच होती. एवढ्या रात्रीही तिने विचारलंच. ‘काय गरज होती नितू? कशाला त्या सुरज्याचं ऐकून भाषण केलं?’ आईला सगळी माहिती कोणीतरी आधीच दिली होती वाटतं. ‘तुला माहीत नाही. ही सगळी राजकारणी लोकं आहेत. कशाला यांच्यात पडतो? तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी?’

‘असं कसं म्हणतेस आई? अन् सुरज्यानं बोलावलं म्हणून गेलो नं. तो कुठे राजकारणीय? अन् गाव आहेच नं आपलं. पुण्यात राहतो म्हणून गावाशी संबंध संपला का?’ मी तावातावाने उत्तर दिलं.

‘जाय भो जाय. तू काही ऐकणार नाही. वरच्या खोलीत पाणी नाहीय. जाताना तांब्या भरून घेऊन जाय.’

मी झोपायचा प्रयत्न करत होतो खरं! पण झोप काही येत नव्हती.

पुस्तकाचं नाव : ‘आपल्याला काय त्याचं...’

लेखक : श्वेता सीमा विनोद

प्रकाशक : राजगृह प्रकाशन

पान संख्या : १००

किंमत : १४० रुपये

हेही वाचा : 

दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

सावित्रीआईचं एनजीओ नको करुया

मांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

मनोरंजन ब्यापारी: रिक्षा चालवत ते जगप्रसिद्ध लेखक बनलेत

(पुस्तकासाठी संपर्क - ७८७५०१७६३७ किंवा ८६००८१००४३)