हारकर जीतनेवाले को ‘सिकंदर शेख’ कहते है!

१६ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ७ मिनिटं


पुण्याच्या कोथरूडमधे ६५वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. नांदेड विभागाचं प्रतिनिधित्व करणारा शिवराज राक्षे यावेळच्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. या स्पर्धेतली माती विभागाची फायनल मात्र वादग्रस्त ठरली. पराभूत पैलवान सिकंदर शेखला पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला. हा निर्णय कुणाच्या दबावाने देण्यात आला, याबद्दल कुस्तीशौकिनांकडून प्रश्न उपस्थित केले जातायत.

काळं जॅकेट घालून आखाड्यात उतरलेला तो पैलवान. उंचापुरा, पीळदार, गोरापान देह. कमरेला निळा लंगोट आणि पायात लाल फीत. जॅकेट काढताच ती कमावलेली देहसंपदा बघून मैदानात टाळ्याशिट्ट्यांचा जोरदार कडकडाट होतो. महाराष्ट्र केसरी किताबाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या त्या पैलवानाकडे बघून एकच आरोळी घुमते, ‘वन अँड ओन्ली.. सिकंदर!!’

सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्र केसरीच्या माती विभागाचा फायनल म्हणजेच महाराष्ट्र केसरी किताबाचा सेमीफायनल सामना वादग्रस्त ठरला. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याने दोन गुणांनी सिकंदरला महेंद्रकडून पराभूत व्हावं लागलं. या कुस्ती स्पर्धेचं नियोजन हे ऑलिंपिकच्या दर्जाचं असल्याचं कौतुक तर झालंच, पण सिकंदरवर झालेल्या अन्यायामुळे ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.

हेही वाचा: एन. डी. पाटील यांचं जीवन, सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंडच

कोण आहे सिकंदर शेख?

सिकंदरचे वडील रशीद शेखही पैलवानच होते. इनामी कुस्त्यांच्या जोरावर संसाराचा गाडा ढकलणं अशक्य असल्याने त्यांनी हमाली करायचं ठरवलं. पण सिकंदरला मात्र त्यांनी इर्षेनं पैलवानच केला. सोलापूरच्या मोहोळमधे त्याचा मोठा भाऊ हुसेन वडलांच्या खांद्याला खांदा लावून हमाली करत असताना सिकंदरनेही त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून गावोगावच्या आखाड्यात विजयी घोडदौड कायम ठेवली.

त्याचा खुराक आणि अधिक तंत्रशुद्ध तालीम या दोन्ही गोष्टींची गरज लक्षात घेऊन त्याला कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घातलं गेलं. नावाप्रमाणेच कामगिरी करणाऱ्या सिकंदरला घरातून, गावातून अर्थसहाय्य मिळत गेलं. राज्यातल्या वेगवेगळ्या स्पर्धा गाजवणाऱ्या सिकंदरने वयाच्या पंचविसाव्या वर्षीच उत्तरेतल्या नामवंत पैलवानांना आस्मान दाखवलं होतं. चित्त्याची चपळाई असलेला सिकंदरने महाराष्ट्राचा वाघ बनून पंजाब-हरियाणातल्या पैलवानांवर दहशत बसवली.

महत्त्वाच्या पैलवानांना केलं गारद

लाल मातीवर खेळणाऱ्या सिकंदरने या स्पर्धेत वाशिम विभागाकडून भाग घेतला होता. वस्ताद विश्वास हारगुलेंचा हा पठ्ठ्या यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात होता. बाद फेरीमधे सिकंदरला आव्हान होतं ते अमरावतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पण त्याच्याच तालमीतल्या माऊली जमदाडेचं. सिकंदरचा दुहेरी पट काढून चार गुण मिळवणाऱ्या माऊलीला सिकंदरने ९-४ अशा हरवलं.  

त्यानंतर सिकंदरची लढत झाली ती माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख या बुलढाणा विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पैलवानासोबत. अगदी पहिल्या दहा सेकंदातच सिकंदरला रिंगणाबाहेर ढकलून दोन गुण मिळवत बाला रफिकने त्याच्या अनुभवाची झलक नवख्या सिकंदरला दाखवून दिली. त्यानंतर स्वतःला सावरून पुढच्या तीस सेकंदातच सिकंदरने बाला रफिकला चितपट करत आपल्या कौशल्याने सगळ्यांनाच चकित केलं.

माती विभागाच्या फायनलमधे सिकंदरसमोर सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचं आव्हान होतं. २०२२च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताकडून सिल्वर मेडल मिळवणाऱ्या महेंद्र गायकवाडने नांदेडच्या अनिल जाधवला आणि कोल्हापूरच्या शुभम शिदनाळेला धूळ चारत माती विभागाची फायनल गाठली होती. महाराष्ट्र केसरीची सेमीफायनल म्हणून माती विभागाच्या जेतेपदासाठी झालेल्या या निर्णायक लढतीला मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयाचं गालबोट लागलं.

हेही वाचा: मी बंडखोर कसा झालो सांगतायत राजा ढाले

कसा झाला डाव?

लढत सुरु झाल्यावर दोन्ही पैलवान एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्यात वेळ घालवत होते. सुरवातीला सिकंदरला निष्क्रिय राहिल्याबद्दल गुण मिळवण्यासाठी तीस सेकंदाचा वेळ देण्यात आला. पुरेशी आक्रमकता दाखवूनही गुण न मिळवता आल्याने महेंद्रच्या खात्यात १ गुण जमा झाला. पहिली फेरी संपायला काहीच सेकंद बाकी असताना सिकंदरने महेंद्रवर ताबा मिळवत त्याला रिंगणाबाहेर ढकलून दोन गुणांची कमाई केली.

दुसरी फेरी सुरु होताच सिकंदरने आक्रमक पवित्रा घेतला. त्याला थोपवण्याच्या नादात महेंद्रचा पाय रिंगणाबाहेर गेल्याने सिकंदरला आणखी १ गुण मिळाला. त्यानंतर महेंद्रला निष्क्रिय राहिल्याबद्दल गुण मिळवण्यासाठी तीस सेकंदाचा वेळ देण्यात आला. त्यानंतर महेंद्रने चपळाई दाखवत सिकंदरला रिंगणाजवळ नेऊन बाहेरची टांग डाव मारत चार गुणांची वसुली केली. हा या कुस्तीचा निर्णायक क्षण होता.

सिकंदरच्या प्रशिक्षकांनी या डावाला अपवाद घेत चॅलेंज दिलं. वीडियो रिप्लेनुसार रिंगणाबाहेर पडल्यावरही एका सेकंदात सिकंदर महेंद्रच्या पाठीवर आल्याने त्याला एक गुण देण्यात आला. पण महेंद्रचे गुण मात्र तसेच राहिले. यावर सिकंदर आणि त्याच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेताच ज्युरींचा निर्णय अंतिम असल्याचं सुनावत कुस्ती पुढे चालू ठेवण्याचा निर्णय दिला गेला. सिकंदरच्या प्रशिक्षकांना बाहेर ठेवलं गेलं.

त्यानंतर मैदानात एकच शांतता पसरली. कुस्ती संपायला अवघे दोन सेकंद बाकी असताना महेंद्रच्या आक्रमक चालीला रोखताना सिकंदरचा पाय रिंगणाबाहेर गेला. त्यामुळे महेंद्रने एका गुणाची कमाई करत ६-४ अशी भरभक्कम आघाडी घेतली. सिकंदरसारख्या तगड्या पैलवानाला हरवल्याची खुण म्हणून आपला दंड थोपटत महेंद्रने महाराष्ट्र केसरीच्या फायनलमधे प्रवेश केला.

नियम काय सांगतात?

ही कुस्ती स्पर्धा ऑलिंपिकसारखी आंतरराष्ट्रीय नियमावलीवर आधारित आहे असं सतत सांगितलं जात होतं. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग ही संस्था अशी आंतरराष्ट्रीय नियमावली बनवत असते. त्या नियमावलीत धोक्याची परिस्थिती, डाव, ताबा आणि पाडाव अशा सर्व गोष्टींचा बारकाईने आढावा घेण्यात आलेला आहे. नियमावलीतल्या सहाव्या प्रकरणाच्या ३५व्या विभागात एकूण अकरा नियम आहेत, जे कुणाला गुण मिळायला हवेत याचं स्पष्टीकरण देतात.

या नियमांनुसार, पाडाव करणाऱ्या पैलवानाने स्वतःचा पाडाव होऊ न देता जर खड्या स्थितीतून प्रतिस्पर्ध्याचा पाडाव केला तर त्याला चार गुण दिले जातात. चार गुण मिळवण्यासाठी बाहेरची टांग मारून सिकंदरचा पाडाव केल्यानंतर महेंद्रने त्याच्यावर काही सेकंद आपलं नियंत्रण ठेवणं भाग होतं. पण सिकंदर एका क्षणात महेंद्रच्या पाठीवर आल्याने महेंद्रचं नियंत्रण कमी असल्याचं सिद्ध झालं.

अशा स्थितीत सिकंदरला एक गुण मिळणं नियमाला धरूनच होतं आणि तो मिळालाही. नियंत्रण फसल्याने महेंद्रचा डाव पुरेसा यशस्वी झाला नसला तरी त्याने सिकंदरचा पाडाव केल्याने त्यालाही नियमानुसार दोन गुण मिळायला हवे होते. पण तरीही त्याचे गुण कायम ठेवल्याने सिकंदर आणि त्याच्या प्रशिक्षकांनी विरोध केला पण ज्युरींच्या निर्णयाचं कारण देत गुण कायम ठेवले गेले.

हेही वाचा: ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

... आणि आक्षेप तीव्र झाला

पाडाव झाल्यानंतर रेफ्रींनी चार गुणांसाठी हात वर करायच्या आतच सिकंदर वर आला होता. पाडावाच्या वेळी धुरळा उडल्याने सिकंदरचं वर येणं रेफ्रींना दिसलं नसावं. त्यामुळे सिकंदरला गुण न देता महेंद्रला चार गुण देण्यात आले. यावर आक्षेप म्हणून चॅलेंज दिल्यानंतर फक्त एकाच बाजूचा वीडियो रिप्ले ज्युरींनी बघितला. यात सिकंदरने केलेलं रिवर्सल दिसल्यामुळे त्याला एक गुण मिळाला.

पण हा वीडियो रिप्ले फक्त एकाच बाजूचा वीडियो असल्याने महेंद्रचं सुटलेलं नियंत्रण त्यात स्पष्ट दिसलं नाही. त्यामुळे सिकंदरच्या प्रशिक्षकांनी दुसऱ्या बाजूचा वीडियो रिप्ले दाखवा असं म्हणत ज्युरींकडे धाव घेतली. खरं तर, अशा निर्णायक सामन्यात सगळ्या बाजूंचे वीडियो रिप्ले दाखवलं जाणं अपेक्षित होतं. पण आयोजकांनी ज्युरींच्या या एकांगी निर्णयाला पाठींबा दिला.

त्यानंतरही सिकंदरने लगेच कुस्ती चालू न करता महेंद्रचा गुणांवर आक्षेप घेतला पण ज्युरींनी निर्णय घेतलाय अशी जवळपास दमदाटी करतच कुस्ती सुरु करण्यात आली. सिकंदरच्या प्रशिक्षकांनाही बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला. त्यानंतर सिकंदर समर्थकांच्या घोषणा मंदावल्या आणि मैदानात शांतता पसरली. त्यावर ही वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणत समालोचकांनी सारवासारव केली, पण ती शांतता आक्षेपाचा एक तीव्र सूर उमटवून गेली. 

समालोचनाची घसरली गाडी

या कुस्तीच्या वेळी समालोचकांनी केलेलं समालोचनही तसं वादग्रस्तच होतं. ते जाणीवपूर्वक केलं की उत्साहाच्या भरात झालं, याबरोबरीने त्याचा परिणाम काय झाला हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. महेंद्रच्या वादग्रस्त डावानंतर शांत झालेल्या मैदानाची मरगळ झटकण्यासाठी समालोचक शंकर पुजारी पुढं सरसावले. त्यांच्या समालोचनाचे, निवेदनाचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या खास शैलीतलं वाक्यं पैलवानांच्या सोशल मीडिया वीडियोत असतातच.

त्यामुळे एवढा वेळ दुमदुमून उठलेलं मैदान अचानक गार झाल्यावर त्यांनी पुढाकार घेतला. ‘वादळापूर्वीची शांतता’ म्हणत नाराज कुस्तीशौकिनांना मनवायचा प्रयत्न त्यांनी केला. पण धार्मिक प्रतीकांचा उल्लेख करणारं ‘सिकंदर म्हणतो मी सिकंदर.. महेंद्र म्हणतो मी महेंद्र.. महेंद्र हे शंकराचं नाव..’ हे त्यांचं पुढचं वाक्य मात्र अनेकांच्या भुवया उंचावून गेलं.

वारकरी असलेले शंकर पुजारी हे वाक्य जाणीवपूर्वक बोलले की कुणाच्या दबावाखाली बोलले हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. वादग्रस्त डाव होण्यापूर्वीही पुजारी हे वाक्य बोलले होते पण ते पूर्ण करू शकले नव्हते. डाव झाल्यानंतर मात्र हे अनावश्यक वाक्य त्यांनी पूर्ण केलंच. लढवैय्या पैलवानांना शाब्दिक प्रोत्साहनाचा खुराक पोचवणाऱ्या पुजारींचा निषेध करताना त्यांच्या बोलवित्या धन्यांचा तपास करायला हवा.

हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही

स्पर्धेची माती, राजकारणाचा डाव

या स्पर्धेचं नियोजन पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं होतं. त्यांनी ही स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रणेते कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ भरवली होती. गेली अडीच दशकं पुणे शहराच्या राजकारणात सक्रीय असलेल्या मुरलीधर मोहोळांना शहर भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे दोनदा आमदारकीचं तिकीट मिळवण्यापासून वंचित राहावं लागलंय.

त्यांनी स्थानिक पातळीवर केलेली पकड किती मजबूत आहे याचा प्रत्यय या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आला. कोथरूडच्या मतदारसंघात सर्वच पक्षांची तुल्यबळ लढत नेहमीच पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांत कोथरूडमधे आपल्याला अनुकूल चित्र बनवण्यात भाजपला मोहोळांच्या नेतृत्वामुळेच यश आलंय. विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यात. अशा वेळी या स्पर्धेच्या निमित्ताने भाजपचं जोरदार ब्रँडिंग करण्याची संधी दवडतील, ते मोहोळ कसले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो मध्यभागी ठेवणं असेल, शिंदे गटाची खटकणारी अनुपस्थिती किंवा भाजप पदाधिकाऱ्यांची वाढती रेलचेल असेल, मोहोळ यांनी स्पर्धेच्या आयोजनात आणि भाजपच्या छुप्या प्रचारात कसलीच उणीव भासू दिली नाही. अशा अनुकूल वातावरणात फडणवीसांना ‘सनातन धर्म की जय’ म्हणण्याची भुरळ पडणारच.

कुस्तीशौकिनांच्या प्रतिक्रिया

पुजारींचं वादग्रस्त समालोचन असेल किंवा फडणवीसांनी सनातन धर्माचा केलेला जयजयकार असेल, भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा फटका या सामन्याच्या निर्णयप्रक्रियेवर झाल्याची टीका अनेक कुस्तीशौकीनांनी केलीय. सिकंदरचे पालक, गंगावेश तालीम आणि स्वतः सिकंदरनेही आपल्यावर अन्याय झाल्याची कबुली दिलीय.

या स्पर्धत विभागनिहाय गुणांचा विचार करता, पुणे विभागातल्या पैलवानांनी गुणांची लयलूट केली होती. यावेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे हा नांदेड विभागातून खेळत असला तरी पुण्याच्या तालमीतला पैलवान हा शिक्का त्याच्यावर बसला होता. त्यामुळे पुण्यात महाराष्ट्र केसरी असली की विजेताही पुण्याचाच होतो, अशी टीकाही अनेक कुस्तीशौकीनांनी केली.

सेमीफायनलला पोचलेले चारही पैलवान तसे तुल्यबळ होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणाऱ्या या पैलवानांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. पण सिकंदरवर झालेल्या अन्यायाने या स्पर्धेला गालबोट लागलं. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांनी अन्यायकारक निर्णयप्रक्रियेबद्दल माध्यमांना दिलेली असमाधानकारक उत्तरं सिकंदरच्या ‘बाजीगर’ असण्यावर शिक्कामोर्तब करून गेली, हे वेगळं सांगायला नको.

हेही वाचा: 

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’ 

चळवळीच्या यशाचे मापदंड आज बदलतायत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा