शांताबाई कांबळेंनी लिहलं हीच बाबासाहेबांची क्रांती!

२८ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


पहिल्या दलित आत्मचरित्रकार शांताबाई कांबळे यांचा जन्म मार्च १९२३ चा. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून बॅरिस्टर होऊन परतले ते एप्रिल १९२३ ला. त्यांचा पहिला खटला हा महार जातीवरच्या अन्यायाचा. म्हणजेच शांताबाईंनी बाबासाहेबांची जातीअंताची संपूर्ण लढाई, एका महार घरात आणि तेही बाई म्हणून अनुभवली. खंबीरपणे शब्दांमधे मांडली. त्यांचं २५ जानेवारीला निधन झालंय. शांताबाई समजून घेणं हे आजच्या पिढीसाठी महत्त्वाचं आहे.

मास्तरानं मला पाच छड्या एकाच हातावर मारल्या. थंडीचं दिस हुतं. छडीचा मार बसला. हात झनझनायला लागला, हात लाल झाला. शाळा सुटली. मी घरला रडत चालली. मास्तर मला समजावत म्हनालं, 'नाजा, तुज्या हितासाठी मी मारलं. तुज्या आयला मास्तरनं मारलं म्हनून सांगू नगं.'

मी डोळं पुसलं. दप्तर देव्हाऱ्यावर ठिवलं. तसं मी कायम दप्तर देव्हाऱ्यावर ठिवत होतो. जेवायला बसले. डाव्या हातानं खात हुती. आय मला म्हनली, 'तुझ्या उजव्या हाताला काय झालं तवा डाव्या हातानं जेवतीच?' आयला मी सांगितलं, 'आये, खेळताना मी उजव्या हातावर पडलीया. माझा हात दुकतुया.'

मास्तर मारतुया म्हनून दादाला घरीच बसवलं. तिनं त्याला शाळा शिकू दिली नाय. त्या बकताची मला आटवन झाली. म्हनून आयला मास्तरानं मारल्यालं सांगितलं आसतं तर ती मास्तरकडं गेली आसती. 'मास्तर, का मारलं?' म्हरून इचारलं आसत, मग माजं नाव शाळंतनं काडून मला घरातच बसवलं असतं.

शांताबाई कांबळे यांच्या 'माज्या जल्माची चित्तरकथा' या आत्मचरित्रातला हा किस्सा. शिक्षणाचं महत्त्व काय असतं, हे शांताबाईंना बाबासाहेबांमुळे चांगलंच कळलं होतं. त्यामुळेच प्रसंगी त्यांनी शाळेत मास्तराचा मार खाल्ला, पण शाळा सोडावी लागेल असं काही होऊ दिलं. त्यामुळेच 'माज्या जल्माची चित्तरकथा' ही फक्त शांताबाई कांबळे यांची चरित्रकथा नाही. ती त्या जातीअंतांच्या काळातल्या गावाच्या महारवाड्यातल्या बाईच्या लढ्याची गोष्ट आहे.

कोण होत्या शांताबाई?

शांताबाईंचा जन्म हा सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीमधल्या करगणी महूद गावातला. त्यांचं आधीचं नाव नाजुका सखाराम बाबर. त्यावेळच्या गावातल्या सर्वात उपेक्षित असलेल्या महारवाड्यात त्यांचं बालपण गेलं. त्यामुळे घरात अठराविश्वं दारिद्र्य. घरात खायला अन्नाचेही वांदे होते. त्या आपल्या पुस्तकात लिहितात की, 'सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धुवून स्वच्छ करून खाल्ली.'

अशा परिस्थितीमधे आयुष्याची सुरवातीची वर्ष गेलेल्या शांताबाईंनी कष्ट करत, महारकीचे भोग भोगत आपलं शिक्षण पूर्ण केलं. प्रसंगी गावातनं अन्न गोळा करूनही आणलं. लग्नानंतरही नवऱ्यानं दुसरी बायको आणली तरीही त्यांनी हार मानली नाही. शिक्षिका म्हणून सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात त्यांची १६ जानेवारी १९४२ ला नियुक्ती झाली. त्या जिल्ह्यातल्या पहिल्या दलित शिक्षिका ठरल्या.

पुणे इथं प्राथमिक शिक्षिका प्रशिक्षणाची दोन वर्ष पूर्ण करून १९५२ मधे त्या उत्तीर्ण झाल्या. १९५२ ला पुण्याच्या विमेन्स कॉलेजमधून ट्रेनिंग कॉलेज वर्ष दुसरं वर्ष त्या उत्तीर्ण झाल्या. काही काळ सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केलं. एकवेळ जेवणही न मिळणारी गावातली 'नाजा', पुढे शिक्षण अधिकारी 'शांताबाई' बनते, ती या शिक्षणाच्याच जोरावर.

हेही वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

बाबासाहेबांची भेट आणि धर्मांतर

शांताबाई मोठ्या होत असतानाच, जातीअंताची लढाईही मोठी होत होती. बाबासाहेब आंबेडकर हे नाव गावाखेड्यातल्या महारवाड्यावर पोचलं होतं. एकीकडे स्वातंत्र्याचं वारं वाहत होतं तर दुसरीकडे जातीअंताची लढाई. अशा भारावलेल्या वातावरणात शांताबाईंचं शिक्षण, लग्न, विविध आव्हानं हे सगळं घडत होतं. १९३० ते १९५० या भारतीय इतिहासातल्या महत्त्वाच्या कालखंडाकडे पाहताना शांताबाईंचं लेखन संदर्भ म्हणून महत्त्वाचं ठरतं.

शांताबाईंच्या पुस्तकात १९३२ आणि १९४३ या वर्षातल्या बाबासाहेबांच्या आठवणी नोंदवलेल्या आहेत. 'बाबांचा वर्ण गव्हाळ, भव्य कपाळ, मोठे डोळे, नाक सरळ. ते उंचेपुरे असून शरीराने धिप्पाड होते. ओवाळताना मी त्यांच्या छातीलाच लागत होते.’ या शब्दात त्या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करतात.

पुढे १९५७ मधे त्यांनी बाबासाहेबांच्या आदर्शाचं पालन करत बौद्ध धर्म स्वीकारला. एवढंच नाही तर आजुबाजूच्या सात गावांमधे त्यांनी आणि त्याचे पती कृष्णाजी कांबळे यांनी दलितांना धर्मांतर करण्यासाठी मदत केली. बाबासाहेब आपल्या कृतीमधून प्रत्यक्षात आणण्याचं व्रत घेतलेल्या शांताबाईंनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या आदेशांचं तंतोतंत पालन केलं.

गावातल्या पोरांनी शाळेत यावं, शाळेचा निकाल १०० टक्के लागावा, प्रौढ साक्षरता वर्ग चालवावे, शाळा जास्तीत जास्त चांगली, मोठी आणि अधिक सुविधा असणारी असावी, या दृष्टीने त्या सतत प्रयत्नशील राहिल्या. त्याची सुरवात स्वतःच्या घरातून करतात. आपल्या तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण देतात आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होेण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात.

वास्तवाला, सत्याला भिडण्याचं अंगभूत सामर्थ्य

२८ फेब्रुवारी १९८१ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपलं आत्मकथन लिहिलं. मराठी वाङ्मयातल्या दलित स्त्रीनं लिहिलेलं हे पहिलंच आत्मकथन. त्यामुळे हे आत्मकथन दलित चळवळीसाठी आणि मराठी साहित्यासाठी अत्यंत महत्त्वाची सुरवात आहे. एखाद्या बाईनं स्वतःविषयी एवढ्या स्पष्टपणे लिहिण्याची आणि समाजासाठी ते ऐकण्याची ही पहिलीच वेळ होती.

हे आत्मकथन १९८२ला ‘पूर्वा’ मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झालं. पुढे १७ जून १९८६ला ते 'माज्या जल्माची चित्तरकथा' या नावानं पुस्तकरुपात आलं. या चरित्राचं प्रकाशन झालं. तत्कालीन अर्थमंत्री सुशिलकुमार शिंदे, एस. एम. जोशी, माधव गडकरी, दिनकर साक्रीकर, प्रा. स. शि. भावे, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, बाबुराव बागुल, विद्यागौरी सरखोत-साक्रीकर, कृष्णाजी कांबळे हे त्यावेळी उपस्थित होते.

दलित पँथरचे नेते, लेखक आणि चळवळीत बिनीचा कार्यकर्ता असलेले दिवंगत प्रा. अरुण कांबळे हे शांताबाईंचा मोठा मुलगा. त्यांनी आपल्या आईविषयी सांगितलं की, 'हे आत्मवृत्त माझ्या आईचं म्हणून ओळखलं जाऊ नये. स्वतंत्रपणे सौ. शांताबाई कृष्णाजी कांबळे या बाईंचं आत्मवृत्त म्हणून या आत्मवृत्ताचं मूल्यमापन व्हावं. वास्तवाला, सत्याला एक अंगभूत सामर्थ्य असतं. आत्मवृत्तात्मक लेखनात सत्यच एक जातिवंत कलात्मक भान घेऊन अवतरत असतं असं म्हटलं जातं. आईच्या आत्मवृत्ताबाबत असंच झालं.'

हेही वाचा: रोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे! एका कार्यकर्त्याचं पत्र

इंग्रजी आणि फ्रेंचमधेही शांताबाईंचं कर्तृत्व

या आत्मकथनाचं भाषांतर इंग्रजी, फ्रेंच, कानडी, हिंदी या भाषांमधे झालंय. हिंदीमधे रजनी तिलक, उशा आंभोरे यांनी भाषांतर केलं आहे, त्या पुस्तकाचं नाव 'नाजा’. फ्रेंचमधे असलेलं पुस्तक हे गी पोयटवा (Guy Poitevin) यांनी केलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव 'पॅरोल डी फेमा इनटचेबल' (Parol de femme intouchable) असं आहे.

इंग्रजीमधल्या फेमिना या मासिकात शांताबाईंविषयी लिहून आलंय. तसंच शर्मिला रेगे आणि माया पंडित यांनी लिहिलेल्या 'राईटींग कास्ट/ राईटींग जेंडर : नरेटींग दलित वुमेन्स टेस्टीमनी' (Writing Caste/ Writing Gender : Narrating Dalit Women's Testimonios) या पुस्तकात 'द कॅलिडोस्कोपिक स्टोरी ऑफ़ माय लाईफ' (The Kaleidoscopic Story of My Life) या प्रकरणात शांताबाईंच कतृत्त्व मांडण्यात आलंय.

१९९० मधे चित्तरकथेवर आधारित 'नाजुका' ही १३ भागांची मालिका दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली होती. त्यात निळू फुले, सुलभा देशपांडे, चारुशीला साबळॆ, दिलीप कुलकर्णी यांसारख्या दिग्गजांनी काम केलं. बाबा माजगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेच्या शेवटच्या भागात स्वतः शांताबाईंनी लोकांशी संवाद साधला. सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं 'नाजुका'चं सारी 'वादळं गेली शमुनिया' हे टायटल ट्रॅकही लोकांच्या लक्षात राहिलं.

१९९९ला दिग्दर्शक शिल्पा रानडे यांनी इंग्लंडमधल्या 'चॅनेल फोर' या कंपनीतर्फे शांताबाईंच्या पुस्तकातला एक भाग एनिमेशनमधे तयार करुन प्रसारित केला होता. तसंच मुंबई विद्यापीठातर्फे योगेश सोमण यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नाजुका' या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात गाजले.

दलित पितृसत्तेची गुंतागुंत मांडणी

प्रज्ञा दया पवार या आजच्या आघाडीच्या लेखिका. आंबेडकरी आणि परिवर्तनवादी विचारधारेचा विचार केला तर, शांताबाईंनी जो पायंडा पाडला, त्याचा वारसा प्रज्ञा दया पवारांना मिळाला. प्रज्ञाताईंनी शांताबाईंना त्यांच्या फेसबुक पोस्टमधून हृद्य श्रद्धांजली वाहिलीय. त्यात त्यांनी एक प्रसंग सांगत दलित घरातल्या बाईच्या वाटेला आलेल्या उपेक्षेला शांताबाईंनी कसं यशामधे परिवर्तित केलं. ते सांगितलंय. 

प्रज्ञा दया पवार आपल्या फेसबुक पोस्टमधे लिहितात…. 'एकदा आम्ही एका सभेसाठी मुंबईला रेल्वेच्या जनरल डब्यातून निघालो होतो. डबा गच्च भरलेला होता आणि जवळची काही तरुण मुलं माझ्याकडे पाहात होती. माझ्या नवर्‍याला लगेच माझा संशय आला आणि माझ्या तोंडावर त्याने एक जोरदार थप्पड लगावली. माझ्या नाकातून भळाभळा रक्त वाहू लागलं... संध्याकाळी आम्ही परतताना देखील नवर्‍याचा राग ओसरला नव्हता. घरी परतेस्तोवर तो मला मारतच सुटला होता.'

दलित पितृसत्तेची गुंतागुंत मांडणं आणि आंबेडकरवादी जाणिवेचं निर्धारण करणं या टप्प्यावरचं महत्वाचं कथन म्हणजे 'माज्या जल्माची चित्तरकथा..' शांताबाई कृष्णाजी कांबळे उर्फ नाजुका आपल्यात राहिल्या नाहीत. नाजुकासारख्या अत्यंत कणखर बाईमाणसाने एक पायवाट तुडवली. आज ती हमरस्त्यात बदलत चालली आहे. त्यांना अखेरचा जयभीम!

हेही वाचा: 

दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!