ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांतून विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. यासंदर्भात मेरी कोम समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. पण तो जाहीर केला गेला नाही. त्यामुळे पुन्हा महिला मल्लांनी आंदोलन सुरु केलंय.
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत देशाच्या कानाकोपर्यातले २००हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मल्ल जंतरमंतरवर एकत्र येऊन दिवस-रात्र आंदोलन करतायत, ही भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खर्या अर्थाने एक शोकांतिका!
ज्याप्रमाणे आरोप होतायत, त्याप्रमाणे सुमारे दशकभरापासून बृजभूषण या ना त्या तर्हेने महिला मल्लांचं शोषण करत असतील तर याहून शरमेचं दुसरे काहीच असू शकत नाही.
ज्या मल्लांनी देशाला अगदी ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठापर्यंत पोचत भारताला अव्वल मेडल जिंकून दिलं, ज्यांच्यामुळे त्या स्तरावर राष्ट्रगीताची धून वाजली, त्याच मल्लांना जंतरमंतरवर उतरत असं थेट आंदोलन करावं लागतं. हा घटनाक्रम हेच सांगतो की दाल मे कुछ काला है या सारी दाल काली है!
हेही वाचाः कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश
ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलसारख्या सर्वोच्च क्रीडा व्यासपीठावर विविध मेडल जिंकणार्या महिला मल्लांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आणि अर्थातच भारतीय क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली.
खरं तर २३ जानेवारीलाच या सर्व घटनाक्रमाची सुरवात झाली. पण त्यावेळी भारतीय क्रीडा मंत्रालयाने मेरी कोमच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आणि झाल्या प्रकाराची शहानिशा करुन यावर अहवाल देण्याचे निर्देश दिले. यासाठी चार आठवड्यांचा अवधीही दिला. मेरी कोमच्या समितीने आपला अहवाल या कालावधीत जरुर सुपूर्द केला.
पण तो जाहीर केला गेला नाही आणि ही फक्त सारवासारव असल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित सात महिला मल्ल जंतरमंतरवर उतरल्या आणि त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले साधारणपणे १५० ते २०० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महिला-पुरुष मल्ल! चौकशी समितीचा अहवाल जाहीर करावा आणि बृजभूषण यांना अटक करावी, यावर या महिला ठाम राहिल्या.
बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे दि. २३ एप्रिलपासून आंदोलन सुरु झालं. ज्यावेळी आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक क्वॉलिफायरची तयारी करावी, त्याचवेळी स्वत:वर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी या स्तरावर उतरावं लागावं, यासारखी दुसरी शोकांतिका नाही.
पुढे याचे इतके संतप्त पडसाद उमटले की, मल्लांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही मल्लांना अशा प्रकारे आंदोलन करावं लागतं, हे गंभीर आहे, असं निरीक्षण नोंदवलं.
हेही वाचाः क्रिकेटच्या देवानेही विल्यम्सनला कॅप्टन म्हणून निवडलं, कारण
साक्षी मलिक असेल, विनेश फोगट असेल, बजरंग पुनिया असेल आणि त्यांचे इतर सर्व सहकारी. या सार्यांची मागणी एकच की, या सर्व गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि बृजभूषण यांना अटक करावी.
मध्यंतरी एका सायकलिंग प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला, त्यावेळी त्या पदाधिकार्याचा करार तडकाफडकी रद्दबातल केला गेला आणि काहीच दिवसात पोलिसात त्याप्रकरणी एफआयआर दाखल केला गेला, याचा संदर्भही यावेळी देण्यात आला. पण प्रत्यक्षात दिल्ली पोलिसात अगदी एफआयआरसाठीही टाळाटाळ सुरु होती.
आता लैंगिक शोषणाचे आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी अधिक वेळ लागेल, असा पवित्रा क्रीडा मंत्रालयाने घेतला. पण एकंदरीतच बृजभूषणसारखी महनीय व्यक्ती यात गुंतली असल्याने चौकशी आणि कारवाईत टाळाटाळ सुरु असल्याचंच सूर्यप्रकाशाप्रमाणे सुस्पष्ट होत गेलं.
टोकियो ऑलिम्पिकमधला ब्राँझविजेता पुरुष मल्ल बजरंग पुनियाने तर थेट पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्यासाठी साकडं घातलं. तो जाहीरपणे म्हणाला, ‘आम्ही मेडल जिंकतो, त्यावेळी तुम्ही आमच्या पाठीशी असता. आता आम्ही थेट रस्त्यावर उतरलोय तर तुम्ही शांत आहात’.
दोनवेळची वर्ल्ड चॅम्पियनशिप मेडलविजेती विनेश फोगटने ज्या महिला मल्लांनी तक्रार केली, त्यांच्या घरापर्यंत पोचत, मारण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी केला. आंदोलन याच क्षणी थांबवावं, यासाठी धमकावणं, पैशाची ऑफर देणं, दडपण आणणं असे प्रकार सुरुच आहेत, असं ती म्हणाली.
कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात याची दखल घेतली गेली. पण ज्या ७ महिला मल्लांनी तक्रार नोंदवली, त्यांची नावं कुस्ती महासंघ अध्यक्षांकडं लीक करण्यात आली, अर्थात, सोयीस्करपणे पोचवली गेली, हे सर्वात दुर्दैवी आहे, असा आरोप विनेशने इथं केला.
२०१२ पासून २०२२ पर्यंत बृजभूषण यांनी महिला मल्लांचं आपल्या दिल्लीतल्या बंगल्यात आणि त्याचप्रमाणे देशविदेशात विविध स्पर्धांच्या ठिकाणी लैंगिक शोषण केलं, असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. तूर्तास, बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत. तसंच वैयक्तिक हेव्यादाव्यातून आपल्याला एक गट त्रास देत असल्याचा दावा केलाय.
हेही वाचाः लेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'
६६ वर्षीय बृजभूषण सिंह हे १९९१ पासून ६ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापैकी ५ वेळा त्यांनी भाजपच्या तिकीटावर बाजी मारली. उत्तर प्रदेशमधला कैसरगंज हा त्यांचा मतदारसंघ. राम जन्मभूमी चळवळीत त्यांचा समावेश राहिला आणि २०१९मधे निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या माहितीनुसार, बाबरी मशिद प्रकरणी त्यांच्यावर दोषारोप होते.
प्रदीर्घ कालावधीपासून ते भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत आणि या सर्व प्रभावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय कुस्तीत त्यांचा शब्दच अंतिम असायचा! ७ मेला नव्याने होणार्या निवडणुकीसाठीही ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होते. पण यापूर्वीच चार वर्षांच्या ३ टर्म पूर्ण केल्या असल्याने यंदा ते ही निवडणूक लढवू शकत नाहीत.
अर्थात, यानंतरही त्यांनी जिद्द सोडलेली नाही. या ना त्या पदाच्या माध्यमातून संघात घुसखोरी करायची आणि आपलं वर्चस्व जैसे थे राखायचं, यासाठी साम, दाम, दंड ही सारी तत्वं अंमलात आणण्यात ते कसर सोडणार नाहीत, असंच सध्याचं चित्र आहे आणि यासाठी बृजभूषण आपलाच सुपुत्र करण भूषणला रिंगणात उतरवत नवा डाव टाकू शकतात!
कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण यांना हटवून सारे काही साध्य होणार का, असा प्रश्न विचारला तर आजच्या घडीला त्याचं उत्तर नाही, असंच येईल. कारण, ज्या ज्या ठिकाणी संघ आहे, त्या त्या ठिकाणी बृजभूषण यांनी तिथं आपले चेले प्रस्थापित केले आहेत. हे चेले तेच करतात, जे बृजभूषण सांगतात.
यावर पर्याय एकच असेल, तो म्हणजे कुस्ती संघ बरखास्त करुन तिथं योग्य त्या माजी मल्लांची नियुक्ती करुन त्यांच्याकडं कार्यभार सोपवणं. बृजभूषण सिंह यांना तत्काळ अटक करुन त्यांना भारतीय कुस्ती संघातून बहिष्कृत केलं जावं, ही आंदोलकांची मुख्य मागणी आणि यावर ते ठाम असणं साहजिक होतं.
सदर सात महिला मल्लांपैकी एक महिला मल्ल सज्ञानही नाही. त्यामुळे पोस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला जावा आणि त्यानुसार रितसर कारवाई केली जावी, ही जंतरमंतरवर आंदोलन करणार्या मल्लांची आणि त्यांच्या समर्थकांची मुख्य मागणी आहे.
हेही वाचाः अपघाताने जन्माला आलेल्या वनडे क्रिकेटची आज पन्नाशी
ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेत खेळणारे मल्ल राष्ट्रीय स्पर्धेत खेळले नाहीत तर त्यांच्यावर बंदी असा नवा फतवा मध्यंतरी काढला गेला होता. पण ज्यावेळी ऑलिम्पिक गोल्डविजेता नीरज चोप्राने राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास नकार दिला, त्यावेळी त्याला सोयीस्कर सूट देण्यात आली, त्याकडे मल्ल अंगुलीनिर्देश करतात.
कुस्तीत पात्रता स्पर्धेत मिळवला जाणारा कोटा हा देशाचा असतो. त्यामुळे ज्यांनी कोटा मिळवला, त्यांनीच स्पर्धेत उतरायचं असा कोणताही दंडक नसतो. हाच नियम पुढे नेमबाजी, तिरंदाजीतही लागू केला गेला. पण या प्रत्येक क्षेत्रात यावरुनही अनेक वाद विकोपाला गेलेत. आता क्रीडा क्षेत्रात कसा गहजब सुरु आहे, याचं आणखी एक उदाहरण पाहूयात.
विनेश फोगट टोकियो ऑलिम्पिकमधे उतरली, लढली, त्यावेळी तिला अनेक दुखापतींनी त्रस्त केलं होतं आणि सोबत साधा फिजिओही पाठवला गेला नव्हता. या पार्श्वभूमीवर, विनेश भारतात आल्यावर म्हणाली होती, ‘ऑलिम्पिकला अध्यक्ष आणि सचिव या दोघांनीही जाण्याची आवश्यकता नव्हती. सचिवांऐवजी तेच तिकीट फिजीओला दिलं असतं तर निदान ज्या मल्लांना गरज आहे, त्यांची सोय तरी झाली असती’.
मुळात, कुस्ती संघटना हे सध्या फक्त निमित्त आहे. पण या निमित्ताने काहीही संबंध नसणार्या राजकीय नेत्यांनी गेली कित्येक दशकं विविध संघटनांवर जे राज्य गाजवलं आणि संघटनांची सर्व आघाड्यांवर फरफट करत खेळाचं जे नुकसान केलं, ते सर्वाधिक चिंतेचं आहे.
घडल्या प्रकारात कुस्तीत ज्या मल्लांवर अन्याय झाला, त्यांना न्याय मिळेलही. पण एकूणच खेळाची अशा प्रकरणामुळे जी फरफट होते, ती थांबायला हवी. तसं झालं तरच जंतरमंतरवर अहोरात्र आंदोलन करणार्या आंदोलकांना खर्या अर्थाने न्याय मिळेल. तोच कुस्तीच्या शोकांतिकेला पूर्णविरामही असेल.
हेही वाचाः
वेस्ट इंडिजची 'त्रिमूर्ती' टी ट्वेन्टी वर्ल्डकपमधे धडकी भरवणार!
स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा
शिवाजी पार्कचा श्रेयस अय्यर तर विराटच्या ‘नक्शे कदम पर’ चाललाय!