मुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे?

१० जुलै २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


केंद्राच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशातल्या ३ कोटी  लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण आयसीएमआरनं केलेल्या सिरो सर्वेत जवळपास २९ कोटी लोकांकडे कोरोनाच्या अँटीबॉडी असल्याचं समजलंय. असाच सिरो सर्वे मुंबईत झाला तेव्हा ५० टक्के मुलांना कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. हे आकडे धक्कादायक आहेत. कोरोनाच्या पाऊलखुणा ओळखायला हा सिरो सर्वे मदत करू शकतो.

आत्तापर्यंत किती लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलीय ही आकडेवारी अतिशय महत्त्वाची असते. कोविडचा ट्रेण्ड, त्यातले चढ उतार, त्यासाठी करायच्या उपाययोजना, पेपरमधली चर्चा, सामान्य माणसांच्या गप्पा हे सगळंच या आकडेवारीवर अवलंबून असतं. 

कोविड सुरू झाला तेव्हापासून ही आकडेवारी मिळवण्यासाठी वायरसचं जेनेटिक मटेरिअल शोधणाऱ्या आरटीपीसीआर या किंवा तोंड, नाक आणि घसा या भागातल्या स्वॅबमधून वायरसचं वायरल प्रोटिन शोधणाऱ्या रॅपिड अँटीजन या टेस्टचा वापर केला जातो. सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत ३ कोटी ६० लाखपेक्षा जास्त लोकांना कोरोना वायरसची लागण झालीय. आरोग्यसेतू ऍपवर ही आकडेवारी सहज पाहता येते.

पण इंडियन मेडिकल रिसर्च काऊन्सिलकडून फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या तिसऱ्या सिरो सर्वेक्षणातून आत्तापर्यंत २९ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. तेव्हापासून सिरो सर्वेचं महत्त्व प्रस्थापित होऊ लागलंय. नुकताच मुंबईतही असा सर्वे झाला. त्या सर्वेत मुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचं समोर आलंय. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना फटका बसणार असं बोललं जात असताना ही आकडेवारी धक्कादायक वाटते. जे भविष्यात होणार होतं ते आत्ताच सुरू झाल्याची ही चाहूल आहे.

हेही वाचा : कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

सिरो सर्वे म्हणजे काय?

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सिरो सर्वे म्हणजे एखाद्या भागातल्या किती माणसांकडे कोरोनाविरोधी प्रतिकार शक्ती म्हणजे अँडीबॉडी आहेत याचा शोध घेणं. ज्याच्याकडे अँटीबॉडी असतील त्याला अलिकडेच कधीतरी कोरोनाची लागण होऊन गेलीय आणि तो त्यातून बराही झालाय असा त्याचा अर्थ होतो. या सर्वेसाठी लागणारं सॅम्पल हे नाकातून किंवा घशातून नाही तर थेट रक्तातून घेतलं जातं. 
  
इंडियन एक्सप्रेसमधे लिहिलेल्या एका लेखात साथरोगतज्ञ विनीता बाळ लिहितात की एखाद्याला वायरसचं इन्फेक्शन झालं की काही वेळाने त्या माणसाच्या शरीरात वायरस विरोधातली रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. या प्रतिकारक शक्तीचा एक भाग म्हणजे एक प्रकारचं प्रोटिन किंवा अँटीबॉडी. या अँटीबॉडी वायरसला चिकटून बसतात. काही दिवसात शरीरातला वायरस मरतो. पण या अँटीबॉडी रक्तात राहतात. त्यातही आयजीजी नावाच्या खास अँटीबॉडी असतात. त्या अनेक महिने टिकतात.

माणसाला संसर्ग झाल्यानंतर तो असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणविरहीत होता की त्याला तीव्र लक्षणं दिसत होती याचा या अँटीबॉडीवर काहीही फरक पडत नाही. त्या त्यांना हव्या तेव्हा तयार होतातच. शिवाय, वायरसचा आकार कसा आहे यानुसार या अँटीबॉडी तयार होत असतात. त्यामुळे प्रत्येक वायरससाठीची अँटीबॉडी वेगळी असते.

आठवड्याला २०० नमुने

सिरो सर्वेमधे निरोगी व्यक्तींच्या रक्ताची तपासणी होते. त्यात कोरोना वायरसविरोधात लढणाऱ्या या आयजीजी प्रकारच्या अँटीबॉडी आहेत की नाही हे पाहिलं जातं. आता आपल्या लोकसंख्या पाहता देशातल्या सगळ्या निरोगी लोकांना सर्वेत सहभाग करून घेता येणार नाही हे उघडच आहे. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात लोकांचा एक समुह निवडला जातो. या समुहात संसर्गाचा कमीतकमी धोका असलेले आणि संसर्गाचा जास्तीत जास्त धोका असलेले अशी दोन्ही प्रकारची लोकं घेतली जातात.

म्हणजे ज्यांना संसर्ग होण्याची काहीही शक्यता नाहीय अशी अजिबात घराबाहेर न पडणारी माणसं, गरोदर महिला, लहान मुलं वगैरे. तर सतत संसर्गित व्यक्तींमधेच राहणारे डॉक्टर, नर्सेस असे दोन गट असतात. शक्यतो, दर आठवड्याला संसर्गाची जास्तीत जास्त शक्यता असलेल्या २०० माणसांचं टेस्टिंग केलं जातं. तर एका आठवड्यात कमीत कमी शक्यता असणाऱ्या ५० लोकांचं टेस्टिंग होतं.

या सिरो सर्वेतून दोन तीन गोष्टींचा अंदाज येतो. एक म्हणजे, किती टक्के लोकसंख्येला वायरसची लागण झालीय हे समजतं. दुसरं, कोणत्या वयोगटातल्या किंवा समुहातल्या लोकांमधे जास्त लागण दिसून येते ते कळतं. तिसरं, एखाद्या भागात वायरसचा किती प्रसार होतोय ते कळतं.

हेही वाचा : तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

तिसऱ्या लाटेआधीचा सर्वे

या मुळेच कोरोना साथरोग सुरू झाल्यापासून आयसीएमआरने असे ४ सर्वे घेतलेत. त्यांचा पुढचा पाचवा सर्वे जून महिन्यात पूर्ण झालाय. त्याचे निकालही लवकरच येतील. पण त्यांच्यासोबतच पुणे, मुंबई, हैदराबाद, हरियाणा, दिल्ली अशा काही महत्त्वाच्या शहरातही हे सर्वे केले जातायत.

मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या मुंबईतल्या चौथ्या सिरो सर्वेचा निकाल मागच्या आठवड्यात प्रसिद्ध झालाय. या निकालानुसार, १ ते १८ वयोगटातल्या  ५१.१८ टक्के मुलांमधे कोरोनाविरोधी अँटीबॉडी दिसून आल्यात. नायर हॉस्पिटल आणि कस्तुरबा मॉलेक्युलर डायग्नोस्टिक लॅबोरेटरी या दोन संस्थांनी मिळून हा सर्वे केला होता. त्यासाठी लॅबमधे येणारे २,१७६ रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. यातल्या एकाही माणसाने कोरोनाची लस घेतली नव्हती. 

१ एप्रिल ते १२ जून या काळात हा सर्वे करण्यात आला. सिरो पॉझिटिव असणाऱ्या ५१.१८ टक्के नमुन्यांमधले ५४ टक्के नमुने सार्वनिक लॅबमधून घेतले होते. तर ४७ टक्के खासगीमधून. त्यातही १० ते १४ या वयोगटा सिरो पॉझिटिवीटी रेट सगळ्यात जास्त म्हणजे ५३.४३ टक्के होता, असं सर्वेतून समोर आलंय.

मार्चमधे झालेल्या सिरो सर्वेमधे ३९ टक्के लहान मुलांमधे कोरोना वायरसच्या अँटीबॉडी दिसून आल्या होत्या. त्यातुलनेत चौथ्या सर्वेमधे संसर्ग होऊन गेलेल्या  लहान मुलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचं समोर येतंय. देशात तिसरी लाट येणार आणि तिचा सगळ्यात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार असं बोललं जात असताना सिरो सर्वेमधून समोर आलेली ही आकडेवारी अतिशय धक्कादायक वाटतीय. आता १५ जुलैपासून सुरू होणारा मुंबईतला पाचवा सिरो सर्वे काय सांगतो तेही तितकंच महत्त्वाचं असेल.

लसीकरणासाठी उपयोगी

पण एवढ्यावरच भागणार नाहीय. आपल्याला अजून सिरो सर्वे करायची गरज आहे. जास्तीत जास्त लोकांचा समावेश त्यात असायला हवाय. एवढंच नाही तर वेगवेगळ्या भागात असे सर्वे झाले पाहिजेत. एकाच भागातून अनेकवेळाही व्हायला पाहिजेत. वायरसची पावलं कुठे आणि कशी पडतायत हे ओळखायला यातून खूप मदत होईल.

शिवाय, विनीता बाळ सांगतात त्याप्रमाणे आत्ता केल्या जाणाऱ्या टेस्टमधे रक्ताच्या नमुन्यातून कोरोना वायरसविरोधी फक्त वरवरची सुरक्षा देणाऱ्या अँटीबॉडी तपासल्या जातात. त्याऐवजी थोडं खोलात जाऊन दुसऱ्या अँटीबॉडींचाही शोध घेतला पाहिजे. त्यामुळे समाजातली किती लोकं कोरोनापासून सुरक्षित झालीयत हेही लक्षात येईल. या सिरो सर्वेचा लसीचं प्लॅनिंग करायलाही अतिशय उपयोग होऊ शकतो. तो समजून घ्यायला हवा.

हेही वाचा : 

कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो