आवेशपूर्ण हातवारे करत 'नेशन वॉन्ट्स टू नो' म्हणणाऱ्या अर्णब गोस्वामींबद्दल आपल्याला काय आणि किती माहीत असतं? बऱ्यावाईट कारणामुळे अर्णब नेहमीच चर्चेत राहतात. आत्ताही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेनं ते चर्चेत आलेत. यानिमित्तानं अर्णब यांची कॅमेरासमोरची आणि कॅमेरामागचीही जडणघडण समजून घेतली पाहिजे.
अर्णब गोस्वामी हा काही एका रात्रीत मोठा झालेला माणूस नाही. मोठं होण्यासाठी लागणारी मेहनत अर्णब यांनीही केली असणारच. मेहनत ब्युटीफूलच असते. आपल्या आक्रमक अँकरींगने त्यांनी नावही कमावलं. पण गेल्या काही दिवसांत अर्णब प्रसिद्ध झाले, ते त्यांच्या भाजपफ्रेंडली, मोदीफ्रेंडली भुमिकेमुळे. आणि आत्ता ते चर्चेत आलेत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरच्या टीकेमुळे.
पत्रकाराने पक्षपातीपणे वागू-बोलू नये. एकांगी व्यक्त होऊ नये. नाण्याच्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्याच पाहिजेत, असं अजूनतरी शिकवलं जातंय. पण अर्णब यांचा आणि त्यांचं चॅनेल रिपब्लिक टीवीचा अजेंडा ठरलेलाय. भाजपच्या प्रवक्त्यालाही लाजवेल, अशा भूमिका अर्णब गोस्वामींचं चॅनेल घेतं, असे वारंवार आरोप केले जातात. कुणाल कामराने विमानात प्रश्न विचारल्यानंतर अर्णब गोस्वामींचं मूग गिळून गप्प बसणं, अनेकांना खुपलं होतं. त्याचीही चर्चा जोरात झाली. चॅनेलवर तावातावाने भडा-भडा बोलायचं आणि दुसऱ्याने प्रश्न विचारला की गप्प बसायचं? या प्रश्नाचं उत्तर अजूनही नेशन वॉट्स टू नो, म्हणजेच देशाला जाणून घ्यायचंय.
लोक कुणाल कामराच्या वेळीही अर्णब यांच्या भूमिकेबद्दलच बोलले. आणि आता पालघरवर अर्णब यांच्या कॉमेंटवरही भरभरुन बोलताहेत. आहे हे असं आहे. पण असं का आहे, याचाही विचार व्हायला हवा. पण अर्णब यांची भूमिका, त्यांचं म्हणणं, तसं का झालंय, यावर कुणीच काही बोललं नाही. बोलत नाही. अनेक जण अर्णब यांच्यावर फक्त टीका करून मोकळे होतात. पण अर्णब असं नेमके का झालेत, याच्या खोलात जात नाही, खोलात जाऊन बोलत नाहीत.
टीवीवाले एक गोष्ट चांगली करतात. एखादी कॉन्ट्रवर्सी झाली, की ज्याचं त्या कॉन्ट्रवर्सीत नाव आहे, तो कोण आहे, हे ग्राफिक्स करुन थोडक्यात सांगतात. अर्णब यांनी पालघरवर केलेला शो, त्यांच्यावर झालेली कथित शाईफेक यासारख्या त्यांच्या इतरही अनेक कॉन्ट्रवर्सी अनेकांना ठाऊक आहेत. त्यामुळे आता गोस्वामी कोण आहेत, हेदेखील आपण ठावूक करुन घेऊ.
हेही वाचा : अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं
आसामच्या गुवाहाटीतल्या एका ब्राम्हण कुटुंबात ७ मार्च १९७३ला अर्णब यांचा जन्म झाला. वडलांचं नाव मनोरंजन. तर आईचं नाव सुप्रभा गाईन-गोस्वामी असून त्या लेखिका आहेत. अर्णब यांच्या वडलांचे वडील म्हणजे अर्णबचे आजोबा वकील होते. त्यांचं नाव रजनी कांता गोस्वामी. तर आईचे वडील गौरीशंकर भट्टाचार्य हे कम्युनिस्ट पार्टीचे नेते होते. त्यांनी तर विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं.
अर्णब गोस्वामी यांचे वडील भाजपमधे होते. त्याआधी ते भारतीय सैन्यात होते, असं आपल्याला विकिपिडिया सांगतो. वडील मनोरंजन गोस्वामींनी भाजपच्या तिकीटावर १९९८ मधे गुवाहाटीतून लोकसभेची निवडणूक लढवली. पण काँग्रेसच्या भुवनेश्वर कलिता यांनी त्यांना धूळ चारली. अर्णब यांचे मामा सिद्धार्थ भट्टाचार्य. भट्टाचार्य हे आसाममधल्या विद्यमान भाजप सरकारमधे शिक्षणमंत्री आहेत.
मामा-भाचाच्या करिअरची सुरवात एकाच वर्षी झालीय. १९९५ मधे भट्टाचार्य यांनी भाजपमधे प्रवेश केला. राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून त्यांना जबाबदारीही मिळाली. नंतर २०११ मधे आसाम विधानसभेचं तिकीटही मिळालं. पण मामांनाही पराभवाचं तोंड बघावं लागलं. नंतर पाच वर्ष भरपूर होमवर्क केला. आणि २०१६ मधे विक्रमी ९६ हजार ६३७ मतांनी ते जिंकले. आणि पहिल्यांदाच झटक्यात मामांना शिक्षणमंत्रीपद मिळालं. आज त्यांचं वय आहे ५८ वर्ष. म्हणजेच अर्णब यांच्याहून ते ११ वर्षांनी मोठे आहेत.
मामा मंत्री असले तरी मामापेक्षा जास्त प्रसिद्ध भाचा आहे. अर्णबचं सध्या वय आहे ४७ वर्ष. १९९५ मधेच करिअरला सुरवात करणाऱ्या अर्णब यांच्या गाठीशी २५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे. प्रिन्ट ते इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यूज रिपोर्टर, न्यूज अँकर, संपादक, मुख्य मंपादक, कार्यकारी संचालक असा चढता आलेख अर्णबचं करिअर किती यशस्वी आहे, हेच सांगतो. मात्र मीडियात येणं आणि प्रसिद्ध होणं ही काही साधीसुधी गोष्ट नसते. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. प्रचंड स्ट्रगल असतं. हे सगळं अर्णब यांना तरी कसं चुकलं असेल?
वडील सैन्यात. पर्यायानं सैन्याच्या शाळेतच अर्णबचं दहावीपर्यंतच शिक्षण झालं. दिल्लीच्या सेंट मेरी शाळेत दहावी. त्यानंतर सैन्याच्याच जबलपूरच्या कॉलेजात बारावी. नंतर समाजशास्त्रात डिग्री घेतली. पदवीपर्यंतच शिक्षण झालं दिल्ली युनिवर्सिटीच्या हिंदू कॉलेजमधे. १९९४ मधे त्यांनी इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतून सोशल अँथ्रोपोलॉजी म्हणजेच सामाजिक मानववंशशास्त्र या विषयात मास्टर्स केलं.
भारतात येऊन अर्णब यांनी काही महिने कोलकात्याच्या प्रसिद्ध द टेलिग्राफ या पेपरमधे काम केलं. अर्णब आपल्या एका भाषणात सांगतात, रिपोर्टर रिपोर्टिंग करणार. आणि त्यावर भलताच कुणीतरी माणूस आपलं मत एडिटोरिअल पानावर मांडणार. असं कसं काय? घटना घडलेल्या ठिकाणी न जाता, लोक मत कसं काय तयार करु शकतात? म्हणून मी ठरवलं की दिल्लीला जायचं आणि रिपोर्टर व्हायचं.
हेही वाचा : पालघर झुंडबळी सत्य कळण्यासाठी सहा प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत
(हा व्हिडीओ ४०व्या सेकंदापासून पाहा.)
यानंतर १९९५ मधे एनडीटीवी या आघाडीच्या मीडिया संस्थेनं त्यांनी संधी दिली. घरातूनच मिळालेल्या भाषण कौशल्याच्या जोरावर त्यांनी अँकरींग गाजवून सोडलं. प्रेक्षक अर्णब यांच्या तुफान एनर्जी, नैसर्गिक आक्रमकपणाला भाळले. माणूस आत्मविश्वासाने काहीही बोलला की तो अभ्यासपूर्ण आणि खरंखरंच सांगतोय, असं वाटणं स्वाभाविकच आहे. अनेकांना तसंच वाटत राहिलं. अर्णबचे फॅन त्याच्यावर फिदा होत गेले.
पोरगा मेहनती आहे, हे पाहून एनडीटीवीनं अर्णबचं प्रमोशन केलं. वरिष्ठ संपादकपद दिलं. यानंतर मात्र अर्णब यांनी एनडीटीवीचा टीआरपी वाढवण्याचं काम मनावर घेतलं. त्यात अर्णब यांना यशही मिळालं, असं जाणकार सांगतात.
वरिष्ठ संपादक झाल्यावर अर्णबचा आत्मविश्वास आणखी वाढला. इतका की त्यांच्या अँकरींगची अनेकांना दखल घ्यावी लागली. २००४मधे सर्वोत्कृष्ट अँकर म्हणून अर्णबला एशियन टेलिविजन पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. सलग ६ वर्ष अर्णब यांनी एनडीटीवीवर एक शो केला. ११ वर्ष एका चॅनेलमधे काढल्यावर अर्णब यांनी एनडीटीवी सोडून टाईम्स नाऊ चॅनेल जॉईन केलं. न्यूज अँकरपेक्षाही तिथे त्यांना महत्त्वाचं पद मिळालं. हे पद होतं एडिटर इन चीफ.
इथे अर्णब गोस्वामींनी अनेक प्रयोग केले. न्यूज अवर नावाचा शो सुरु केला आणि तो गाजवलाही. नळावरची भांडणं बघायला गर्दी होते, तशी या कार्यक्रमासाठी तुफान आलेली प्रेक्षकांची गर्दी चॅनेलला तुफान टीआरपी देऊन गेली. 'फ्रॅन्कली स्पिकिंग विथ अर्णब' हा शो देखील चर्चेत राहिला. अर्णब यांनी आपलीही मुलाखत घ्यावी, असं अनेक दिग्गजांना वाटायचं. एवढा या शोचा टीआरपी होता. दलाई लामांसारख्या दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या.
टाईम्स नाऊमधे अर्णबने एक इतिहास रचला. तब्बल ६५ तास सलग अँकरींग करण्याचा विक्रम अर्णब गोस्वामींनी करुन दाखवला. मुंबईतील २६/११च्या हल्लावेळी टाईम्स नाऊने केलेल्या कवरेजचा उल्लेख आजही केला जातो. याचवेळी अर्णब यांनी सलग ६५ तास अँकरींगचा विक्रम केलाय. ६५ तास म्हणजे जवळपास अडीच दिवस न झोपता काम करत राहणं. कॅमेऱ्यासमोर सलग अँकरींग करण्यासाठी प्रचंड एनर्जी लागते. पण यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मानसशास्त्र उपस्थित करतं.
सलग ४८ तासांहून जास्त वेळ आपण झोपलो नाही, तर आपल्या मेंदूत केमिकल लोचा होण्याची शक्यता खूप असते. त्यात ६५ तास जराही उसंत न घेता, सलग काम करणं हे वाखाण्याजोगं तर आहेच. पण ते तितकंच रिस्कीदेखील आहे. आजारी पाडणारं आहे. यामुळे शरीरावर आणि पर्यायानं मनालाही मार लागण्याची शक्यता अधिक असते, असं तज्ज्ञ सांगतात. ही भीती लक्षात घेऊनच कदाचित मीडियात अजूनही अर्णबचा हा रेकॉर्ड तोडण्याचं धाडस कुणीच केलं नसावं.
टीआरपीच्या स्पर्धेत नेहमी पुढे असणाऱ्या अर्णबने टाईम्स नाऊ सोडलं आणि आपलं स्वतःचं चॅनेल सुरु केलं. या चॅनेलचं नाव, रिपब्लिक टीवी. ६ मे २०१७ला रिपब्लिक चॅनेल लाँच झालं. नंतर रिपब्लिक भारत नावानं हिंदी चॅनेलही सुरु केलं. हिंदी चॅनेल तुलनेने स्पर्धेत नसलं तरी रिपब्लिक टीवी हे इंग्रजी चॅनेल मात्र रेटिंगमधे टॉपवर आहे. अवघ्या दोन वर्षात हे चॅनेल तब्बल १०० आठवडे नंबर वन राहिलं. रेटिंगच्या बाबतीत प्रेक्षक अर्णबला बघतात, हेच यातून सिद्ध होतं.
सुरवातीला भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांचीही या चॅनेलमधे आर्थिक गुंतवणूक होती. काही महिन्यांपूर्वी चंद्रशेखर यांनी आपली सर्व गुंतवणूक काढून घेतल्याच्या पोस्ट ट्वीटरवर सापडतात. खरं खोटं भाजपला आणि त्यांच्या खासदारांना माहीत.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं
अर्णब गोस्वामी यांची पत्रकार म्हणून कारकीर्द वादग्रस्त असली, तरी एक माणूस म्हणून तसंच व्यावसायिक म्हणून त्यांनी बक्कळ यश मिळवलंय. टीआरपीवालं चॅनेल चालवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते, याचं गणित त्यांना कळालंय. त्यांच्या चॅनेलच्या व्यावसायिकतेचा पत्रकारितेशी काही संबंध आहे का, यावर मतं मतांतरं असू शकतात. पण त्यांचा उद्देश चॅनेल चालवणं आहे, हे मुळात समजून घेतलं पाहिजे. मग योग्य-अयोग्य, चूक-बरोबर असं काही ठरवण्याच्या पलीकडची ही गोष्ट आहे, हे आपसूकच उमगतं. कारण तिथे काम केलेल्या लोकांची अर्णब गोस्वामींबद्दलची मतंही तितकीत इंटरेस्टिंग आहेत.
अर्णब वर्कहोलिक आहे. आपल्या सहकाऱ्यांनीही आपल्यासारखंच झोकून देऊन काम करावं असं त्यांना वाटतं, ते त्यामुळेच. नाव न सांगण्याच्या अटीवर रिपब्लिक टीवीत काम केलेल्या एका मुलीने सांगितलं. ‘अर्णब हा मस्त माणूस आहे. हेल्पफूल आहे. त्याचा स्वभाव विनोदी आहे. त्याच्यासोबत जो माणूस दोन किंवा तीन वर्ष काम करेल, तो नंतर कितीही स्ट्रेसफूल परिस्थितीत काम करु शकतो. कॅमेऱ्यासमोरचा अर्णब आणि कॅमेऱ्यामागचा अर्णब यामधे जमीनअस्मानचा फरक आहे.’
काही जण असंही सांगतात की दिवस-दिवस अर्णब ऑफिसमधेच थांबतात. बॉसिंग करणं आवडतं. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी कॉस्ट कटींगची वेळ आली होती, त्यावेळी रिपब्लिक टीवीत कुणाचीही नोकरी जाणार नाही, यासाठी अर्णबने विशेष काळजी घेतली, असंही काही जण सांगतात.
माणूस कॅमेऱ्यासमोर आदळआपट करतो, तावातावाने भांडतो, एकांगी भूमिका मांडतो आणि हे सातत्यानं होतंय, याचा अर्थ ही ठरवून केलेली गोष्ट आहे, हे न कळण्याइतका आपला प्रेक्षक भोळा थोडीच आहे. २५ वर्ष एका माणसाला बघून त्याचे विचार नेमके कुणाचा प्रचार करतात आणि कुणाचा विरोध करतात, याची कल्पना लोकांना आता आलीय. आणि घरातूनच तसं बाळकडू मिळालेलं असल्यावर अर्णब यांचे विचारही भाजपप्रेरीत होणार नाहीत काय? आणि झालेच तर त्यात चूक ते काय? आणि चुकलं तरी माणसाला नाकारणं, हा कुठला सभ्यपणा?
आता आपण अर्णब यांच्या पत्रकारितेचे काही उदाहरणं बघू.
माणूस आधी पत्रकार असतो, नंतर तो अचानक प्रचारक कसा होऊन जातो, असा प्रश्न हा वीडिओ पाहिल्यावर कुणालाही पडेल. टाईम्स नाऊमधे असताना योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका करतात. रिपब्लिक टीवीवर मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेताना त्यांची देहबाली, बोलण्याची पद्धत सगळंच इतकं कसं बदलून जातं, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.
Official PeeingHuman हे यूट्यूब चॅनेल आणि Newslaundry या वेबसाईटने अनेकदा अर्णबच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. अर्णबची पत्रकारिता समजून घेता यावी म्हणून त्यांनी एक विडिओही तयार केलाय. या विडिओत लोकांच्या जगण्याशी संबंधित असलेले विषय सोडून हिंदू-मुस्लिम आणि सांप्रदायिक वादाला फोडणी देण्याचं काम अर्णबने करताना, भाजपचा अजेंडा कसा राबवलाय, याचे दाखले दिलेत.
हेही वाचा : कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावणं हा छळ असेलः अँजेला मर्केल
खऱ्या जगात फिरल्याशिवाय परिस्थिती समजून घेता येत नाही, असं म्हणणाऱ्या अर्णब यांनी गेल्या काही वर्षांत केलेले ग्राऊंड रिपोर्ट शोधण्यासाठी आपल्याला अनेक चाळण्या लावाव्या लागतात. तरीही त्यात फारसं काही लागत नाही. उपलब्ध ग्राऊंड रिपोर्ट तपासले तर त्यांचा आणि डिबेट शोचा काहीएक संबंध नसल्याचं दिसतं. फिल्ड रिपोर्टिंग केलेल्या विषयावर ते स्टुडिओत येऊन चर्चा करतानाही दिसत नाहीत. स्वतः शोधलेल्या ग्राऊंड रिएलिटीची चर्चा करत नाहीत.
शाम पेठकरांच्या गावझुला या पुस्तकात एक छान उल्लेख आहे- क्रौर्यानं आवाज दाबता येतील, काळजातलं गाणं बंद करता येत नाही. शौर्यानं भूभाग जिंकता येतील, माणसांवर राज्यही करता येईल. मात्र माणसं जिंकायची असतील कायमची, तर प्रेमच करावं लागतं.
समोरचा ओरडतो म्हणून तुम्ही आणखी मोठ्या आवाजात ओरडून वाद जिंकण्याचा प्रयत्न करणार असाल, तर तुम्ही चुकताय. समोरचा ओरडल्यावर काही ऐकूच आलं नाही बुवा, असं जोवर तुम्ही रिअॅक्ट करत नाही, तोवर समोरच्याचं ओरडणं काही कमी होणार नाही. कदाचित म्हणून पालघरवर कॉमेंट केल्यानंतर अजेंडा आधीच ठरवलेल्या अर्णबला प्रेमानं फैज अहमद फैज यांच्या शब्दांत एवढंच सांगायची गरज आहे.
'बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल ज़बाँ अब तक तेरी है!' जेव्हा अर्णबला कळेल की आपण दुसऱ्या कुणाची तरी जुबान झालोय, तेव्हा त्याला या दोन ओळींचा अर्थ कळलाय असं होईल. हा अर्थ कळल्यानंतर तो स्वतःचं काहीतरी बोलेल, अशी अपेक्षा करुयात. तोपर्यंत चालू दे. नेशन वॉट्स टू नो!
हेही वाचा :
कलयुगातल्या राक्षसांची ओळख करून देणारा 'असूर'
वाचकाचा लेख: माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट
लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा
आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल
किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार?
प्लेगला आटोक्यात आणण्यासाठी लोक शेतात राहायला गेले होते!
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही