कोरोनाच्या काळात पावसाळ्यातल्या सिझनल फ्लूचं काय होणार?

२५ जुलै २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


जगभरात दरवर्षी ६५ हजार लोक सिझनल फ्लूने मृत्यूमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली होती. पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय.

मॉन्सून सुरू झाला रे झाला की आपल्या आसपासचं कुणीतरी शिंकायला सुरवात करतं. चार पाच दिवसांनी ऑफिसमधला एक सहकारी, शाळेतला किंवा कॉलेजमधला एखादा मित्र सर्दी पडशाने आजारी पडलेला असतो. बघता बघता हे सर्दी पडसं, तापाचं दुखणं आपल्या घरातही येऊन पोचतं आणि ‘काळजी घ्या रे बाबांनो, फ्लूची साथ सुरू झालीय’ असे शब्द आपल्या कानावर पडतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, दरवर्षी जगभरात जवळपास ६ लाख लोक या सिझनल फ्लूमुळे मृत्यूमुखी पडतात. कितीतरी लोकांना या फ्लूची लागण होत असते. यावेळी मात्र, कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपण करत असलेल्या उपाययोजनांमुळे फ्लूच्या पेशंटमधे घट झाल्याचं दिसून आलंय.

वर्षातून दोनदा येतो फ्लू

पावसाळ्यात अनेकदा आपल्याला ताप येतो. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणं, अंगदुखी अशी काही लक्षणं आपल्याला दिसू लागतात. गंमत म्हणजे, आपण काहीही औषध घेतलं नाही तरी दोन ते तीन दिवसांत आपण एकदम बरे होऊन पुन्हा कामावर, शाळेत वगैरे जाऊ लागतो. आपल्याला आजारी पाडणारे हे वायरस इन्फ्लुएन्झा या नावाने ओळखले जातात. वर्षातून दोनदा हे वायरस जास्त सक्रीय होतात. एकदा जूनमधे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात हिवाळा सुरू होतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा डिसेंबरमधे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू होतो तेव्हा.

हिवाळ्यातल्या या आजारपणाला सिझनल फ्लू असंही म्हटलं जातं. सिझनल फ्लूचे पेशंट हिवाळ्यात उच्चांक गाठत असले तरी त्याची सुरवात त्याआधीच झालेली असते. भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात येणारा देश आहे. भारतात सिझनल फ्लूचे जास्तीत जास्त पेशंट साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यात सापडतात. मार्चमधे उन्हाळा सुरू झाला की ही साथ ओसरते आणि पुन्हा म़ॉन्सून आला की जून महिन्यात या साथीची सुरवात होते.

यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना वायरसचा धोका आणखी वाढलेला असेल, असं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलं होतं. जूनमधे भारतात कोरोना वायरसची दुसरी लाट येणार असल्याची चर्चाही केली जात होती. आधीच बिकट अवस्थेत असलेल्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण यामुळे आणखी वाढू शकते, अशी भीती वाटत होती. आता मॉन्सून सुरू झालाय. त्यामुळे सगळी सरकारं, आरोग्य व्यवस्था, तज्ञ काय होईल याकडे डोळे लाऊन बसलेत खरे. पण आता सिझनल फ्लू येणारच नाही, अशीही चर्चा सुरू झालीय.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

फ्लू झालाय बंदिस्त

द वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका बातमीनुसार, यंदा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात हा सिझनल फ्लू आलाच नाही. दक्षिण गोलार्धात साधारण जून महिन्यात हिवाळ्याला सुरवात होते. मात्र उत्तर गोलार्धातून अनेक लोक स्थलांतरित झाल्याने जानेवारीपासूनच तिथे सिझनल फ्लूचा प्रसार व्हायला सुरवात होते. यंदा दक्षिण गोलार्धातल्या अर्जेंटीना, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांनी फ्लूच्या पेशंटमधे लक्षणीय घट झाल्याचं स्पष्ट केलंय.

‘कोरोना वायरसचा प्रसार थांबवण्यासाठी आपण करत असलेल्या उपाययोजना हे फ्लूचे पेशंट कमी होण्यामागचं कारण आहे,’ असं मत पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या हेल्थ इमर्जन्सिज विभागाचे उपसंचालक सिल्व्हिन अल्डीघेरी यांनी मांडलंय. कोरोना वायरस ज्या मार्गाने पसरतो त्याच मार्गाने हे सिझनल फ्लूचे वायरसही पसरतात. लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आल्याने, त्याच्या सर्दी किंवा खोकल्यातून किंवा त्याच्याशी खूप वेळ बोलल्यामुळेच सिझनल फ्लू पसरतो.

कोरोना वायरसचा प्रसार थांबवण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून अनेक देश लॉकडाऊनमधे आहेत. देशाच्या सीमाही आपण बंद केल्यात. कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास गेल्या चार महिन्यात झालेला नाही. साधा ताप आलेले, सर्दी खोकला झालेले प्रवासी प्रवास करणं टाळतायत. प्रवाशांचं तापमान तपासलं जातंय. त्यामुळे कुणाला फ्लूची लागण झाली असेल तर ती लगेचच ओळखता येतेय.

आपण सगळे आपापल्या घरात बंदिस्त आहोत. आपण बाहेर पडतोय तेसुद्धा तोंडावर मास्क घालूनच. बाहेर पडल्यावर शारिरीक अंतर पाळणं बंधनकारक आहे. उगाचच चेहऱ्याला, नाकाला हात लावण्याची सवय आपण हळूहळू मोडतोय. वारंवार हात धुवायलाही आपण विसरत नाही. या सगळ्यामुळे दक्षिण गोलार्धातल्या देशात सिझनल फ्लूला आळा घालणं शक्य झालंय.

इतरही रोग होतायत कमी

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातही फ्लूचे पेशंट दिसत नाहीत, असं नेचर डॉट कॉम या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखात सांगण्यात आलंय. ‘स्थानिक संस्थांनी पुरवलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्कमधेही फ्लूच्या पेशंटमधे घट झाल्याचं दिसून येतं. न्यूयॉर्कमधे नेहमीपेक्षा एखादं दुसरा आठवडा आधीच फ्लूची सुरवात झाली, पण फ्लू वायरसची लागण झालेल्यांची संख्या खूप कमी होती आणि नेहमीपेक्षा जवळपास पाच आठवडे आधीच ही साथ संपली. हाँगकाँगमधेही यंदा एन्फ्लुएन्झा फ्लूचे पेशंट ६३ टक्क्यांनी कमी झालेत. या प्रकारची घट २००३मधे सार्स साथरोग आला होता तेव्हाही दिसली होती,’ अशी माहिती या लेखात देण्यात आलीय.

हाँककाँग, न्यूयॉर्क ही शहरं पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात येतात. जानेवारीपासून तिथेही फ्लूचे पेशंट कमी झाल्याचं दिसून आलंय. नुसते फ्लूचेच नाही तर इतर अनेक आजारांची संख्याही कमी होतेय. २०१६ नंतर पहिल्यांदा गोबर, रूबेला या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. यंदा आत्तापर्यंत गोवरचे जगभरातून फक्त ३६ पेशंट सापडलेत. विशेषतः लहान मुलांना हे आजार धरतात. पण कित्येक महिने शाळा बं द असल्या ने हे आजार  लहान मुलांपर्यंत पोचत नाहीत.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

फ्लू विरोधातली लस टोचून घ्या

हे सगळं पाहता यंदा भारतातही फ्लू सुट्टी घेईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. फ्लू आणि कोरोना वायरस असं एकत्र आल्यावर भारताच्या आरोग्य व्यवस्थेचं काय होणार याची काळजी करणाऱ्यांना दिलासा देणारीच ही गोष्ट आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी म्हणजेच एआयवी या पुण्यातल्या संस्थेनं ५ वर्षात केलेल्या १० शहरांच्या अभ्यासानुसार भारतातल्या वेगवेगळ्या शहरात या सिझनल फ्लूचे वेगवेगळे उच्चांक असतात. श्रीनगरसारख्या बर्फाळ प्रदेशात साधारण डिसेंबर ते एप्रिल या दिवसांत फ्लूचे जास्तीत जास्त पेशंट आढळतात. दिल्ली, लखनऊ, कोलकत्ता, पुणे अशा मध्यवर्ती शहरांमधे जुलै, ऑक्टोबर या महिन्यात फ्लूचे पेशंट दिसतात. तर हिवाळा सुरू झाला की दिल्ली, नागपूर, पुणे अशा शहरात एकदम उच्चांक गाठला जातो. तर चेन्नई, वेल्लोर या दक्षिण भारतातल्या शहरांत नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात फ्लू सक्रिय होतो.

एआयवीचा हा अहवाल लक्षात घेता आत्ता लॉकडाऊनमुळे फ्लू सिझन टाळण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी लॉकडाऊन संपल्यावर फ्लू रोखण्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. ही काळजी कशी घ्यावी यासाठी जगभरातल्या आरोग्य संस्थांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडलेल्या अमेरिकेतल्या आरोग्य नियंत्रण संस्थेनंही सूचना जारी केल्यात.

पहिलं म्हणजे, दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात फ्लूविरोधातली लस टोचून घ्यायला हवी. लहान मुलं, वृद्ध, गरोदर बायका यांच्यासाठी ही लस अतिशय महत्त्वाची ठरते.

दुसरं म्हणजे, आपल्या आसपास असणाऱ्या असंख्य वायरसपैकी प्रत्येकाला ही लस प्रतिबंध करू शकणार नाही. त्यामुळे यासोबत वारंवार हात धुणं, खोकताना शिंकताना रूमाल वापरणं, शारीरिक अंतर पाळणं गरजेचं आहे.

याशिवाय, चुकून माकून आजारी पडलोच तर डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं व्यवस्थित घेणं हासुद्धा फ्लूला आपल्यापासून लांब ठेवण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे. अशा काही सोप्या पद्धतींनी आपण फ्लूसोबतच कोरोनालाही पळवून लावू शकतो.

हेही वाचा :  

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?