आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?

१० मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


एकोणिसाव्या शतकात सावित्रीबाई फुलेंनी मुली लिहित्या-वाचत्या केल्या नसत्या तर आज आपल्यालाही शिकता आलं नसतं, हे खरंच आहे. त्या अर्थी शिकणारी प्रत्येक मुलगी सावित्रीची लेकच आहे. पण केवळ शिकून साक्षर होणं, शैक्षणिक पदव्या मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं, म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे का? आज सावित्रीबाई फुलेंचा स्मृतीदिन.

सावित्रीबाई फुले कोण? या प्रश्नादाखल सावित्रीबाई फुले या 'पहिल्या भारतीय शिक्षिका' असं टिपीकल उत्तर आपल्या ओठांवर येतं. सावित्रीबाईंच्या नावावर 'पहिल्या भारतीय शिक्षिका' हा एकच एक शिक्का मारून आपण त्यांना एका मर्यादित चौकटीत बंदिस्त करून टाकलंय. सनातनी कर्मठ विचारांच्या पुण्यात सावित्रीबाईने पती जोतिराव  फुले यांच्या सहकार्याने मुलींची पहिली शाळा १८४८ ला सुरू केली.

'मुलीबाळींनी अक्षरं लिहिली वाचली, तर त्या अक्षरांच्या अळ्या बनून जेवणाच्या ताटात येतात.' असा गैरसमज बाळगण्याच्या काळात त्यांनी मुलींना साक्षर करण्याच्या विचाराला मूर्तरूप दिलं. ही मोठीच क्रांती होती. मोठ्या कष्टाने सावित्रीबाईने या क्रांतीची ज्योत पेटवली. त्याच ज्योतीच्या प्रकाशात आपण मुली निर्भीडपणे चालत आहोत. पण सावित्रीबाईंचे कष्ट फक्त शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित नक्कीच नव्हते.

शिक्षणाच्या पलीकडे मोठं काम

एकोणिसाव्या शतकात सावित्रीबाईंनी मुली लिहित्या-वाचत्या केल्या नसत्या तर आज आपल्यालाही शिकता आलं नसतं, हे खरंच आहे. आपण शिकलो, नोकऱ्या करू लागलो, याचं सगळं श्रेय सावित्रीबाईंना जातं. त्या अर्थी शिकणारी प्रत्येक मुलगी सावित्रीची लेकच आहे. पण केवळ शिकून साक्षर होणं, शैक्षणिक पदव्या मिळवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं, म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे का? तर याचे उत्तर नकारार्थीच येतं. सावित्रीची लेक ही संकल्पना इतकी संकुचित खचितच नाही. मुलींना शिक्षण देण्यापलीकडे त्यांचं काम खूप व्यापक आहे. ते कार्य समजून घेऊन सावित्रीबाईंचे विचार अवलंबणं, तशी कृती आपल्याकडून व्हावी यासाठी प्रयत्न करणं म्हणजे सावित्रीची लेक होणं आहे; असं वाटतं.

अवघ्या नऊ वर्षांच्या सावित्रीबाईंच्या हाताला धरून जोतिरावांनी अबकड शिकवलं. दोघांनी मिळून शिक्षणाचं आणि समाज सुधारण्याचं काम केलं. सावित्रीबाईंनी कुमारी मातांसाठी बालहत्या प्रतिबंधकगृह चालवलं. कित्येक कुमारी मुलींची बाळंतपणं केली. त्यातल्याच एकीचा मुलगा दत्तक घेतला. त्याला मोठं केलं. केशवपन पद्धतीच्या विरोधात न्हाव्यांचा संप घडवून आणला. १८७६-७७ च्या दुष्काळात २०० मुलामुलींचं अन्नछत्र चालवण्यात पुढाकार घेतला. स्त्रियांच्या सुधारणेसाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. कर्मकांडांपासून महिलांना परावृत्त केलं. विधवा विवाहाचा विचार पुढे आणला.

प्लेगच्या काळात रुग्णांची सेवा केली. 'माणूस म्हणून जगण्याचा हक्क माणसांना मिळवून देणं.' या विचाराला केंद्रस्थानी ठेवून कविता लेखन केलं. समाजात समता निर्माण व्हावी, स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं, याचा नुसता विचारच केला नाही, तर ते विचार कृतीतही उतरवले. १८९०ला जोतिबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहभाग घेतला. स्त्रीमुक्ती अथवा मानवमुक्ती असा कोणताही शब्द तेव्हा प्रचलित नसतानाही सर्वांगीण विकासासाठी त्या कार्यरत राहिल्या. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.

निर्बुद्ध व्रतांपासून दूर राहणार का? 

सावित्रीबाईंचं कार्य इतकं मोठं आहे. आपण फक्त सावित्रीबाईंचा शिक्षणाचा वसा तेवढा सांभाळून पुढे नेतोय. सावित्रीबाईंचे इतर विचार आपल्या आचरणात कुठेच दिसत नाहीत. सावित्रीबाईंनी पूजाअर्चा, व्रतवैकल्यांपासून स्त्रियांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केलं. मूल होत नाही, म्हणून दगडाला नवस करणाऱ्या स्त्रियांना उद्देशून त्या लिहितात,

गोट्याला शेंदूर । फासून तेलात।
बसती देवात । दगड तो॥
धोंडे मुले देती। नवसा पावती।
लग्न का करती। नारी-नर ॥

संत तुकारामाच्या जातकुळीचा विचार मांडणाऱ्या सावित्रीबाई आचार आणि विचाराने क्रांतिकारक ठरतात. सावित्रीबाईंनी या ओळी लिहून दशकं उलटून गेली तरी भारतीय स्त्री अजूनही कर्मकांडाच्या भोवऱ्यातच अडकलीय. नवस सायास करून आपल्या इच्छा पूर्ण होतील यावर डोळे झाकून विश्वास ठेवून आहे. जे काही दशकांपूर्वी सावित्रीबाईंना ज्ञात झालं ते आपल्याला आजही कळत नाही, हे आपल्या सुशिक्षित समाजात वावरणाऱ्या स्त्रियांसाठी दुर्दैवीच म्हणावे लागेल.

सावित्रीबाईंनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात कुमारी मातांना आपल्या घरी आश्रय दिला. बालहत्या करण्यापासून त्यांना परावृत्त केलं. पण कुमारीमाता ही संकल्पना आजच्या एकविसाव्या शतकातही आपल्या पचनी पडत नाही. मुलाला वंशाचा दिवा ठरवून कित्येक मुलींना आजही आपण गर्भातच मारतो आहोत. शिकून सवरून आपण असे अमानवी कृत्य करून सावित्रीबाईंच्या विचारांचा, त्यांच्या शिकवणुकीचा एका अर्थाने अपमानच करतो आहोत. मग कसं काय आपण स्वतःला सावित्रीची लेक म्हणवून घेऊ शकतो?

हेही वाचाः शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

सोशल मीडियावरही जात आहेच

सावित्रीबाईंनी जातीभेद मानला नाही. सावित्रीबाईंच्या शाळेत सगळ्या जातीच्या मुली होत्या. सावित्रीबाईंना ' दलितांच्या कैवारी' म्हणून त्यांच्या कामाला मर्यादा घातल्या जात आहेत. पण त्यांनी केवळ दलितांचाच कैवार वाहिला नाही. त्या सगळ्या स्त्री जातीच्या कैवारासहीत अनिष्टांशी झगडत रहिल्या. त्यांनी प्रत्येक जातीच्या व्यक्तीला आपल्या कामात सामावून घेतलं. पुण्यात प्लेगची साथ पसरली असताना स्वतः पुढाकार घेऊन रुग्णांसाठी दवाखाने चालवले. मग तो रुग्ण सवर्ण आहे की दलित याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.

आपल्या मनातला जातीद्वेष मात्र आपण आजही मुळासकट उपटून काढू शकलो नाही. आपण आजही आपल्या जातीतल्या व्यक्तीला दुसऱ्या जातीच्या व्यक्तीपेक्षा लवकर जवळ करतो. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना वाळीत टाकतो. कामवाल्या बाईला जवळ बसवून घेत नाही. तिला वेगळ्या कपात चहा देतो. आपापल्या जातीच्या व्यक्तींचे सोशल मीडियावर ग्रुप बनवतो. त्यातच रमतो. आपली मदतीची, प्रेमाची भावना अजूनही जातीच्या चौकटीतच घुटमळतेय.

'पुरुषाला जर एकाहून अधिक लग्न करण्याची मुभा आहे, तर स्त्रीला अनेक लग्न करण्याची परवानगी का असू नये?', स्त्रीपुरुष समानतेच्या अनुषंगाने सावित्रीबाईंनी असा प्रोग्रेसिव विचार मांडला होता. त्यांनी सती पद्धतीला विरोधही केला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेत बायकोनेही उडी घेण्यापेक्षा दुसरं लग्न करावं, असा मानवतावादी विचार त्यांनी मांडला. आज सतीप्रथा पूर्णपणे बंद झाली असली तरी नवऱ्याच्या मृत्युनंतर स्त्रियांना दुसरं लग्न करण्याची परवानगी खूप कमी कुटुंबात दिली जाते.

सावित्रीच्या लेकी म्हणवून घेणाऱ्या किती स्त्रियांना आपल्या मुलीने, सुनेने दुसरं लग्न केलेलं रुचतं? आजही आपण विधवांना, घटस्फोटित स्त्रियांना आयुष्यभर कुढत ठेवण्यातच धन्यता मानतो. आणि दुसरीकडे सावित्रीबाईच्या वारसदार म्हणून मिरवत असतो. हे केवळ दुर्दैवीच म्हणावं लागेल.

इंग्रजी आलं, पण माणुसकी नाही

इंग्रजी भाषेवर सावित्रीबाईंना कमालीचा विश्वास होता. इंग्रजीच्या शिक्षणाने माणसातलं पशुत्व दूर होतं, असं त्या म्हणत. इंग्रजी शिकण्याने माणसातलं क्षुद्रत्व निघून जातं आणि तो निव्वळ मनुष्यत्वाकडे वाटचाल करतो हे सावित्रीबाईंचं म्हणणं होतं. पण आज सावित्रीबाईंच्या मताच्या पूर्ण विरोधात आपलं वर्तन आहे. आपण जितक्या वेगाने फाडफाड इंग्रजी बोलू लिहू लागलो आहोत, तितक्याच वेगाने आपला प्रवास अमानवीय होत चाललाय.

इंग्रजी शिक्षणातून आत्मविश्वास येतोय, पण तो आपल्याला इंग्रजी भाषा न येणाऱ्याचा द्वेष करण्याकडे घेऊन जातोय. इंग्रजी भाषा येणारे आणि ती न येणारे, असे सरळसरळ दोन वर्ग उदयास येताहेत. ते सावित्रीबाईंना अजिबातच अपेक्षित नसावं. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविलेल्या स्त्रिया ती न येणाऱ्या स्त्रियांना आपल्यात सामावून घेत नसल्याचं चित्र आहे.

हेही वाचाः आधुनिकतेच्या नावाखाली लैंगिक जाणिवा व्यक्त करताना निकोपता हरवतेयः अनुराधा पाटील

सावित्रीबाईंनी स्त्रियांना जुन्या रूढी-परंपरांच्या जोखडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणांना, कवितांना कृतीची जोड दिली. जसं लिहिलं, बोलल्या तसंच केलं. स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद या शब्दांचा सर्रास वापर करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आज आपल्याला जागोजागी दिसतात. समाजात मिरवता यावं म्हणून 'सोशल वर्क' करणं अनेक स्त्रियांची फॅशन बनलीय. ती सावित्रीबाईंच्या विचारात कुठेच दिसत नाही. सावित्रीबाईंचं निःस्वार्थीपणे समाजकार्यासाठी वाहून घेणं, आजच्या सोशल वर्कर्समधे जाणवत नाही. आजच्या सावित्रीच्या लेकींचे शब्द धारदार आणि कृती बोथट आहे.

फक्त पांडित्य फार झालं

सावित्रीबाईंच्या काळात फक्त लिहिणं, वाचणं शिकायचं म्हटलं तरी मुलींना मोठा संघर्ष करावा लागायचा. काही अपवाद वगळता हल्ली मुलींसाठी शिक्षण सहज उपलब्ध झालंय. हवं ते शिकून, हव्या त्या क्षेत्रात मुली यश मिळवताहेत. पण फक्त शिकून आणि पदव्या मिळवून आपण सावित्रीची लेक होऊ शकत नाही. सावित्रीच्या प्रत्येक विचाराला कृतीची जोड देणं गरजेचं आहे. सावित्रीबाईच्या जयंती-पुण्यतिथी दिवशी मी सावित्रीची लेक म्हणून मिरवून घेताना प्रत्येक स्त्रीने 'आपण सावित्रीच्या विचारांवर चालतोय का? सावित्रीच्या त्यागाची जाणीव ठेवून आचरण करतोय का?' असा प्रश्न स्वतःला विचारायला हवा आहे.

सावित्रीबाई ही केवळ एक व्यक्ती नाहीय. ती मानव उत्थानाचा दार्शनिक विचार आहे. हा विचार केवळ अभ्यासापुरता मर्यादित आणि तात्कालिक होऊ नये, असं वाटतं. सावित्रीबाई पांडित्यपूर्ण विचारांपेक्षा कृतीला सर्वस्व मानत. आज आपण विचार सोडून देत केवळ पांडित्य मिरवण्यात पूर्णतः गढून गेलोय. विचारांपुढे अनेकांचं पांडित्य गळून पडलंय.  याचे दाखले इतिहासात खूप मिळतात. म्हणून सावित्रीबाईंचा विचार आपण सर्वांनी पुढे न्यायला हवा. कारण त्यांचा विचारच समस्त स्त्रियांच्या दुःखावरचा, शोषणावरचा एकमेव इलाज आहे.

 

(लेखिक प्रसिद्ध ब्लॉगर आहेत. )