सारं काही समष्टीचा एल्गार

०३ मार्च २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


गेली पाच वर्ष नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ सारं काही समष्टीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय. यंदा हा कार्यक्रम मुंबई युनिवर्सिटीच्या कलिना कँपसमधे असलेल्या मराठी भाषा भवनमधे झाला. यंदाच्या कार्यक्रमाची रुपरेखा दरवर्षीपेक्षा थोडी वेगळी होती. दरवर्षी हा कार्यक्रम एक दिवसाचा होतो. यंदा मात्र दोन दिवस हा समष्टीचा एल्गार साजरा करण्यात आला.

सारं काही समष्टीसाठीच्या पहिल्या दिवशी २३ फेब्रुवारीला कवितांचं सादरीकरण, डॉक्युमेंट्री फिल्म्स आणि वादविवाद कार्यक्रम घेण्यात आले. कोंडवाडा, लाईट, ड्रेनेज आणि गन्स अँड गिटार यासारख्या जगभरात वेगवेगळे पुरस्कार जिंकलेल्या शॉर्टफिल्म दाखवण्यात आल्या. प्रेषिता रामटेके ही तरुणी तर कवितेचं वाचन करण्यासाठी थेट हैद्राबादहून इथे आली. हैद्राबाद युनिवर्सिटीत कंटेम्पररी लिटरेचर विषयात पाएचडी करणाऱ्या प्रेषिताने या कार्यक्रमात सहभागी होणं अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. तिच्या तीनही कवितांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

यानंतर कम्युनल हार्मनी आणि हॅश टॅग मी टू या विषयांवर चर्चासत्र झालं. गेल्यावर्षी चरण जाधव या कलाकाराने नामदेव ढसाळ यांची कविता हलगीच्या तालावर सादर केली होती. त्याच्या या कलाकृतीला नागराज मंजुळे यांनीही दाद दिली होती. यंदाच्या समष्टी सोहळ्यात चरण जाधव याचा कॅथार्सिस नावाचा कवितासंग्रह नामदेव ढसाळ यांचे भाऊ बाळासाहेब ढसाळ आणि लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी मुंबई युनिवर्सिटी आणि औरंगाबाद युनिवर्सिटीतल्या विद्यार्थ्यांनी नांगेली नावाची एकांकिका सादर केली. या एकांकिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती १८ व्या शतकातल्या एका सत्यघटनेवर आधारीत आहे. आणि पहिल्यांदाच ती रंगमंचावर सादर करण्यात येत होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध डायरेक्टर अनुराग कश्यप उपस्थित होते. नांगेली हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं.

असं काय होतं नांगेलीमधे?

नांगेली ही अठराव्या शतकातली एक विद्रोही महिला आहे. केरळातल्या चेरथला या गावात त्रावणकोर शासकाकडून दलित पुरुषांच्या केसांवर आणि महिलांच्या स्तनांवर कर लावला जायचा. तसंच अविवाहित मुलींना अर्धनग्न अवस्थेत राजाच्या स्वागतासाठी उभं राहावं लागायचं. या सगळ्याला विरोध करताना अनेकांना राजाचा अत्याचार सहन करावा लागला होता. हा कर देण्यास नकार देणाऱ्या नांगेलीने केळीच्या पानात राजाला आपले दोन्ही स्तन कापून दिले. यातच तिचा मृत्यू झाला आणि तिच्या नवऱ्याने तिच्या चितेवर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली.

ही एकांकिका पाहून अनुराग कश्यपही भारावून गेले. त्यांनी ही एकांकिका सविस्तरपणे मांडण्याचा सल्ला दिला. सर्व कलाकारांचं आणि डायरेक्टर धनंजय साबळे यांचं कौतुक केलं.

यंदाचा समष्टी पुरस्कार

तमिळ फिल्म डायरेक्टर मारी सेल्वराज यांना यंदाचा समष्टी पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पेरियार पेरुमल या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळालेत. पुरस्कार मिळाल्यावर मनोगत व्यक्त करताना मारी सेल्वराज यांनी आज आपल्या हातात सोशल मीडिया आहे. त्यातून आपण थेट व्यक्त झालं पाहिजे. आपल्याला जे वाटतं ते सांगितलं पाहिजे. आपण मेनस्ट्रीम मीडियावर अवलंबून राहता कामा नये अशी भावना व्यक्त केली.

आपापल्या क्षेत्रात राहून तळागाळातल्या लोकांचे प्रश्न लावून धरणाऱ्या तरुणांना गेल्यावर्षीपासून ‘गोलपिठा’ पुरस्कार देण्यात येतोय. यंदाचा ‘गोलपिठा पुरस्कार’ दलित महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या सुकन्या शांता यांना देण्यात आला. सुकन्या शांता सध्या ‘द वायर’ या न्युज वेबसाइटसाठी पत्रकार म्हणून काम करतात. या आधी समष्टीचा पुरस्कार लोकशाहीर संभाजी भगत, लोककवी लोकनाथ यशवंत, नागराज मंजुळे आदींना देण्यात आलाय.

सिनेमाची बदलती लँग्वेज

उद्योजक, सिनेसमीक्षक जितेंद्र घाडगे म्हणाले, सध्याचं सिनेविश्व कात टाकतंय. या आधी हिंदी किंवा इतर सिनेमाममधे अप्रत्यक्षरित्या नायक हा दलित समाजाचा असायचा. तो प्रत्यक्ष दलित असल्याचं खूप कमी सिनेमांमधे दाखवलं असेल. तसंच हिंदी सिनेमात तर हिरोच आडनाव नेहमी उच्चजातीतल असतं. फारतर दोन वर्षांपूर्वी आलेल्या न्युटनमधे हिरो दलित असल्याचं अप्रत्यक्ष दाखवलं होतं.

नागराज मंजुळे, मारी सेल्वराज यांच्या सिनेमातले नायक हे थेट दलित आहेत. कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी आपले नायक दलित दाखवलेत. लोकांनीही हे सिनेमे डोक्यावर घेतले. याचं ताज उदाहरण म्हणजे ‘काला’ हा सिनेमा आहे, असं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं.

कबीरा कहे ये जग अंधा

कृतिका बोरकर आणि रसिका बोरकर यांनी कबिराचे दोहे आणि आंबेडकरांवरील गाणी सादर करत दोन दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप केला. कृतिकाने कबीरा कहे ये जग अंधा हा दोहा सादर केला. तर रसिकाने माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं हे गाणं सादर करताच प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

डॉ. रेवत कानिंदे, कवी वैभव छाया यांनी या सोहळ्यासाठी पुढाकार घेतला. आभार मानताना वैभव म्हणाला, नामदेव ढसाळांच्या कवितांवर सिनेमा, नाटक, चित्र आणि शिल्प झाली पाहिजेत. त्यांची कविता आपण सर्वांनी जगली पाहिजे. 
 

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)