संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

३१ मार्च २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


कोरोनाने आपल्याला विचार करायला लावलंय. पण आपले विचार वरवर वावरून थांबतात. मोठी माणसं अशाच वळणांवर खोल, अगदी तळापर्यंत पोचतात. जगाचा, जगण्याचा ठाव घेतात. त्यातून जगाला मार्गदर्शन करणारं तत्त्वज्ञान उभं राहतं. संत तुकाराम आणि महात्मा गांधी यांच्या आयुष्यातही वळणांनी नवे विचार दिले. ते आजही आपल्याला उपयोगी पडू शकतात.

कोरोनाच्या साथीने आणि त्याच्या परिणामांनी प्रत्येक विचारी माणसाला अंतर्मुख व्हायला भाग पाडलंय. त्यातून घडणारं चिंतन सोशल मीडियाच्या क्षणभंगुर वॉलवर उमटूही लागलंय. कोल्हापूरच्या शिवाजी युनिवर्सिटीतले मराठीचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांच्या दोन ताज्या फेसबूक पोस्ट या दृष्टीने वाचनीय आहे.

`कोरोनाः या टप्प्यावर जीवनाने नवं वळण घ्यावं` या शीर्षकाने संत तुकारामांविषयी आणि `भयग्रस्त जग आणि हिंद स्वराज्यची समकालीनता` या मथळ्याने गांधीविचारांविषयी अशा दोन पोस्ट त्यांनी फेसबूकवर टाकल्यात. त्या इथे एकाखाली एक देत आहोत.

हेही वाचाः गांधीजींना तुकोबा भेटले होते

पहिली पोस्टः विषय तुकोबा

कोरोना विषाणूच्या दहशतीत जग स्तब्ध झाले आहे. मृत्यूच्या भयाने लोक घरी थांबून आहेत. प्रथमच ते इतके घाबरले आहेत. सर्वांना आपल्या जीविताची काळजी पडली आहे. जगण्यासाठी लोक थांबले आहेत.

जगण्याच्या धडपडीचा भाग म्हणून ते परस्परांकडे संशयाने पाहताहेत. आपल्या आजूबाजूला विषाणूबाधित कोणी येऊ नये, याची काळजी घेताहेत. त्यासाठीच ते सक्तीच्या मुक्कामात आहेत. या मुक्कामात लोक काय काय विचार करत असतील?

आपण यातून सहीसलामत वाचू?

कदाचित ते चीनला शिव्या देत असतील. अमेरिकेसारख्या आर्थिक महासत्तेला अजून हा रोग कसा थोपवता आला नाही, या विचाराने हैराण होत असतील. त्यासाठी आपल्या देशातील सरकारांनी आजून काय काय करायला हवं, याचाही विचार करत असतील. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ बघून विकास म्हणजे काय? असा काहीना प्रश्न पडला असण्याची शक्यता आहे.

आपली सरकारं दरवर्षी रस्त्यांवर काळं फासण्याला विकास समजतात. या टप्प्यावर त्यांनाही विकास म्हणजे काय, हा प्रश्न पडला असेल काय? आपण आजपर्यंत केलेल्या चुका आणि लोकांना लावलेल्या थुका आठवत असेल काय? ते आता दररोज वाढत असलेली बाधितांची आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या बघून हवालदिल होत असतील. टीवीचा पडदा आणि मोबाईलवर येऊन पडत असलेल्या बातम्या चाळताना कासावीस होत असतील. या सर्वातून आपण कसं सहीसलामत वाचू, याचाही विचार ते करत असतील.

हेही वाचाः संजय राऊत लिहितातः कोरोना हा निसर्गाने देवधर्माचा केलेला पराभव

आता अणुबॉम्ब काय करायचा?

विषाणूंचा प्रार्दुभाव होऊ नये, यासाठी सर्वच लोक आपल्या आपल्या पद्धतीने उपाय करत असतील. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व घडामोडीत जीवनाची क्षणभंगुरता सर्वांच्या लक्षात आली असेल काय? डोळ्यांना दिसूही न शकणारा एक छुपा विषाणू जगाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करू शकतो, या विचाराने काहींचं डोकं पिकलं असेल.

आपण आपल्या सुरक्षिततेसाठी बलाढ्य सैन्यदळ उभारलं, शस्त्र आणि क्षेपणास्त्र तयार केली, अगदी अणुबॉम्बही तयार करून ठेवला आहे. या कशाचाच आजच्या घडीला उपयोग नाही, हे सर्वांच्या लक्षात आलंय. कदाचित आपण या संकटातून सहीसलामत सुटू. पुन्हा आपलं जीवन सुरू होईल. आपण तशीच धावपळ करत जगत राहू.

हेही वाचाः सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!

तुकोबाही अशाच वळणावर उभे होते

परंतु या टप्प्यावर अंतर्मुख होऊन गतजीवनाचा विचार करून स्वत:त काही बदल करू का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. गत आयुष्यात आपण काय काय केलं? जे जगलो ते बरोबर होतं का? असं आत्मचिंतन काही लोक नक्की करत असतील? मला स्वत:ला या टप्प्यावर हा विचार करणं आवश्यक वाटतं. मोठमोठ्या लोकांनी आपल्या आयुष्यात असा विचार केला असल्याचं इतिहास सांगतो.

यासंदर्भात मला सर्वात महत्त्वाचं उदाहरण तुकोबांचं दिसतं. संत तुकारामांनी आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावर असा विचार केलेला आहे. अशाच एका नैसर्गिक संकटात तुकारामांच्या घरातील निम्मे सदस्य त्यांना कायमचे सोडून गेले. ते स्वत: वाचले. परंतु एक बायको, मुलगा, मोठ्या भावाची बायको कायमची गेली. प्रतिष्ठेचा व्यवसाय बुडाला. पर्यायाने समाजातील पत संपली.

लोकांपुढे जायला त्यांना नकोसं वाटू लागलं. आणि याच टप्प्यावर ते अंतर्मुख झाले. गत आयुष्याबद्दल विचार करत आपण आता जीवनमार्ग बदलला पाहिजेत, या विचारावर येऊन पोहोचले. नवा जीवनमार्ग स्वीकारण्यासाठीची पूर्वतयारी करू लागले. ही तयारी करताना आपण पूर्वायुष्यात काय चुका केल्या, त्या आठवून पाहू लागले आणि विठ्ठलाजवळ स्वत:ला संसारसागरातून पार करण्यासाठी विनवणी करू लागले. संत तुकाराम म्हणतात,

मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी ।

तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कुपानिधी मायबापा ।।१।।

नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित ।

नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ।।२।।

केला करविला नाहीं उपकार । नाहीं दया आली पीडितां पर ।

करूं नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ।।३।।

नाहीं केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण ।

नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मूतींचें ।।४।।

असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय ।

न कळे हित करावें ते काय । नयें बालूं आठवूं तें ।।५।।

आपआपण्या घातकर । शत्रु जालों मी दावेदार ।

तूं तंव कृपेचा सागर । उतरीं पार तुका म्हणे ।।६।।

(अभंग क्रमांक ६१३)

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

तुकोबारायांनी विठ्ठलाला काय सांगितलं?

या अभंगात तुकोबा विठ्ठलाजवळ आपलं मन मोकळं करतात. ते म्हणतात, देवा, मी तुझे अनेक अपराध आजवर केले आहेत. मी कर्महीन असून तुझा विचारही न केलेला मंतिमंद आहे. आजवर मी तुझी कधीही आठवण काढलेली नाही. तुझं नाम ऐकलं आणि गायलं नाही. मी सतत माझं हीत साधत बसलो.

मला तुझं नाम आणि पुराणं ऐकत बसणं कधीच आवडलं नाही. मी आजवर अनेकांची निंदा केली. कोणावर काही कसला उपकार केला नाही आणि कुणाला करूही दिला नाही. दुसऱ्याला दु:ख देताना मला काही वाटलं नाही. कोणाची दया आली नाही. जो व्यवसाय करू नये तो केला. आजवर केवळ कुटुंबाचा भार वाहत जगलो.

मी केवळ माझंच पाहिलं. तुझी कधी सेवा केली नाही आणि तीर्थयात्राही घडली नाही. आजपर्यंत दुष्ट माणसांचीच संगत केली. त्यातून अनेक अन्यायकारक अपराधी गोष्टी माझ्याकडून घडल्या. यातील काही अपराध मला आता आठवतही नाहीत आणि सांगवतही नाहीत.

माझं हीत कशात आहे, हेच मला समजेनासं झालंय. मी आपल्या आपल्याचांच घात करणारा झालो असून मी स्वत:चा शत्रू बनलो आहे. परंतु हे विठ्ठला तू कृपेचा सागर आहेस. तूच मला आता या संसारसागातून पार कर.

बरं झालं देवा दिवाळं निघालं

ही विनवणी तुकाबांच्या जीवनातील निर्णायक टप्पा आहे. असाच टप्पा अनेकांच्या जीवनात कधीतरी येऊन जातो पण उमगत नाही. त्यामुळे ते लोक पुन्हा आपलं जीवन येरे माझ्या मागल्या करत धकवत जगतात. आता कोरोनाने आपल्याला अशी एक संधी दिली आहे. तुकारामांनाही आपल्यावरचं संकट संधी वाटलं होतं. म्हणून ते म्हणतात, `बरें जालें देवा निघाले दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केला।।`

याआधी वरती पाहिलेल्या अभंगात तुकोबा सांगतात त्याप्रमाणे, आत्मचिंतन करून एका विशिष्ट टप्प्यावर ते आपला जीवनमार्ग बदलतात. खडतर असा नवा मार्ग स्वीकारतात. तो मार्ग आत्मचिंतनातून आत्मवृद्धीकडे जातो. हेच तुकाराम पुढे समाजाचे मार्गदर्शक बनतात. समाजाला जीवनाचे खरं दर्शन घडवून नवी जीवनदृष्टी देतात. जगद्गुरू होतात.

समाजाला मार्ग दाखवण्याचं तुकारामांचं कार्य कधीच संपणारं नाही. ते सुरूच राहिल. सृष्टीवर जोपर्यंत माणूस असेल तोपर्यंत तुकारामांची गरज माणसाला भासत राहिल. हे तुकोबाराया, आज या टप्प्यावर आम्ही पुन्हा तुमच्याकडेच मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. तुम्हीच आम्हाला नव्या जीवनाची वाट दाखवा.

हेही वाचाः महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!

दुसरी पोस्टः विषय गांधीजी

महात्मा गांधींच्या विचारांची प्रस्तुतता हा विषय या ना त्या निमित्ताने नेहमी चर्चेत असतो. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात येण्याआधी १९०९मधे त्यांनी लिहिलेलं ‘हिंद स्वराज्य’ हे पुस्तक तर अलीकडे वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतं.

गांधीविचार समजून घेताना ही लहानशी पुस्तिका फार महत्त्वाची आहे. ‘भारतीय सभ्यतेचा पुरस्कार आणि पाश्चिमात्य सभ्यतेचे खंडन’ हे हिंद स्वराज्यच्या लेखनामगील मुख्य हेतू आहे. हा विचार मूळातून समजून घेण्यासाठी या पुस्तिकेला पर्याय नाही. तरीही या पुस्तिकेचा वापर गांधींविचारांच्या समर्थनापेक्षा गांधीवर टीका करण्यासाठी गांधींच्या टीकाकारानी केलेला आहे.

प्रत्येक वळणावर मार्गदर्शक हिंद स्वराज्य

मात्र पुस्तक वाचताना हे लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधींनी अगदी तारुण्यात लिहिलेल्या या पुस्तिकेतल्या विचारांचं शेवटपर्यंत समर्थन केलं आहे. या पुस्तिकेतली त्यांच्या तारुण्यातल्या विचारांची सुस्पष्टता अचंबित करणारी आहे. ‘हिंद स्वराज्य’मधील विचार अनेकांना प्रतिगामी, कालबाह्य आणि अवैज्ञानिक वाटले आहेत. त्या अंगाने या पुस्तिकेवर खूप टीका झाली आहे आणि तेवढेच किंवा त्याहून अधिक पटीने समर्थनही. 

‘हिंद स्वराज्य’ वाचताना एक गोष्ट सतत ठसठशीतपणे समोर येते ती म्हणजे, गांधीजी तेंव्हाही बरोबर होते आणि आजही बरोबर आहेत. गांधीविचारांची कालातीतता ही पुस्तिका ठळक करते. वसंत पळशीकर ‘हिंद स्वराज्य’बद्दल म्हणतात तसे, ‘भारताने आणि साऱ्या जगानेच, भविष्यात कोणती वाट धरावी, कोणती सभ्यता आदर्श मानावी, संस्कृती कशाला म्हणावं या मुद्दांच्या बाबतीत मुळातून विचार करण्यास प्रवृत्त करण्याचं सामर्थ्य तीमध्ये आहे.’ म्हणून जगाच्या प्रत्येक वळणावर ‘हिंद-स्वराज्य’ दिशादर्शक ठरणार आहे.

हेही वाचाः गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल

गांधीजींनी आजची दुःख हेरली होती

सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ही पुस्तिका लिहिताना औद्योगिक प्रगतीच्या अंगाने केवळ सुरवात झाली होती. रेल्वेचं जाळं आजच्या इतकं प्रचंड वाढलं नव्हतं. डॉक्टर आणि वकीलांनी ताळतंत्र सोडून लोकांना लुबाडायला सुरुवात केलेली नव्हती. तरीही या सर्वांतला फोलपणा गांधींच्या नजरेने हेरला होता.

गांधी स्वत: वकील असून ते वकिलीबद्दल बोलतात ते आजच्या पार्श्वभूमीवर अंतर्मुख करणारं आहे. म्हणूनच या पुस्तिकेतून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आपल्या डोळ्यांवरची झापडं दूर करतात. कोरोना विषाणूच्या निमित्ताने आज जगासमोर नवंच संकट उभं ठाकलं आहे. लोक यानिमित्ताने पर्यावरण, विकास, पैसा, औद्योगिक प्रगती, आरोग्य अशा अनेक गोष्टींचा विचार करू लागले आहेत.

हेही वाचाः भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्न केला का?

रेल्वेमुळे साथीचे रोग पसरतात

या सर्व गोष्टींचा विचार ‘हिंद-स्वराज्य’मध्ये ठासून भरला आहे. तो समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. गांधीजी ब्रिटिश अंमल, आरोग्य आणि दुष्काळ या संदर्भाने रेल्वेचा विचार करताना लिहितात,

‘रेल्वे नसेल तर इंग्रजांचा ताबा हिंदुस्थानावर आज आहे, तितका तर नक्कीच राहणार नाही, हे तुम्हाला उमगेल. रेल्वेमुळे प्लेगचादेखील फैलाव झाला आहे. रेल्वे नसेल तर फार थोडी माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील आणि त्यामुळे सांसर्गिक रोग देशभर पसरण्याचा संभव राहणार नाही. पूर्वी आपण असे ‘सेग्रिगेशन’ म्हणजे सुतक स्वाभाविकपणे पाळत होतो.`

`रेल्वेमुळे दुष्काळ वाढले आहेत, कारण रेल्वेच्या सोयीमुळे लोक आपलं धान्य विकून टाकतात. जिकडे महागाई आहे, तिकडे धान्य खेचलं जातं. लोक बेदरकार बनतात आणि त्यामुळे दुष्काळाचं दु:ख वाढतं. रेल्वेमुळे दुष्टता वाढते. वाईट माणसं आपला वाईटपणा झपाट्याने फैलवू शकतात.`

`हिंदुस्थानात जी पवित्र स्थाने होती ती आता अपवित्र झाली आहेत. पूर्वी लोक फार अडचणी सोसून तिकडे जात. ते खरा भाव धरून ईश्वराची भक्ती करायला जात. आता भामट्यांची टोळी फक्त भामटेगिरी करण्याकरता तिकडे जाते.’

आज या पुस्तकाची गरज आहे

अर्थात या पुस्तिकेतील हा एक मुद्दा आजच्या स्थितीसंदर्भाने विचार करताना उद्धृत करावासा वाटला. ‘हिंद स्वराज्य’ वाचताना गांधीजींच्या भूमिनिष्ठ विचारांचा घनिष्ठ परिचय होतो. समाज स्वत:ला कितीही पुढारल्याचे समजू लागला, औद्योगिक विकासाच्या गप्पा आणि भौतिक सुखांचं महत्त्व सांगू लागला तरी, गांधीजींचं हे लहानसं पुस्तक समाजाच्या धारणांबद्दल पुनर्विचार करायला प्रवृत्त करतं.

आजच्या भयाण पार्श्वभूमीवर गांधींचा या पुस्तिकेतील विचार जगासमोर येणं हीच जगाच्या कल्याणासाठीची सर्वात मोठी निकड वाटते.

हेही वाचाः 

बसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

अविनाश धर्माधिकारींनी अशी विकृत पोस्ट का टाकलीय?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?