एकनाथांनी सांगितलेले वृक्षांचे गुण आपल्यात कायम झिरपत रहायला हवेत!

२३ जुलै २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज जागतिक वृक्ष संवर्धन दिवस. झाडं लावणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना तोडण्यापासून वाचवणं या तीनही गोष्टी आपण गांभीर्याने न घेतल्याने जगाचं अस्तित्व धोक्यात आलंय. अशावेळी मध्ययुगातल्या संतांनी झाडांच्या संदर्भात दिलेल्या शिकवणीची आठवण आपण ठेवायला हवी. संत एकनाथांनीही त्यांच्या भागवतातून वेगवेगळ्या संदर्भात झाडाचं असणं आपल्यासमोर उलगडून दाखवलंय.

संत एकनाथांनी भागवताच्या एकादशस्कंदावर प्राकृत्त मराठीत टीका लिहिली. त्यालाच एकनाथी भागवत म्हणतात. एकादशस्कंदातल्या मूळ १३६७ संस्कृत श्लोकावर टीका केलेल्या या ग्रंथात एकूण १८ हजार ८०० इतक्या ओव्या आहेत. श्रीकृष्ण-उद्धव यांच्यातल्या प्रश्नोत्तररुपी संवादातून झालेली तात्त्वीक चर्चा या टीकाग्रंथात गंभीरपणे न येता प्रासादिक बनून आलीय.

संत एकनाथांनी भागवतातून अनेक वृक्षांची वर्णने केलीयत. अनेक संतानी आपल्या निरुपणातून, रचनांमधून वृक्ष, प्राणी, पक्षी यांच्या रुपकांचा लीलया वापर करुन अवघड तत्त्वज्ञान सोपं करून सांगितलं. नाथांच्या भागवतातूनही अनेक ठिकाणी वृक्ष वाचकाच्या भेटीस येतात.

एकनाथी भागवतातले वृक्षांचे उल्लेख

संत एकनाथांनी आपल्या ग्रंथातून आंबा, फणस या फळवृक्षांबरोबरच पिंपळ, खैर, वड, धावडा, चंदन या वृक्षांचेही उल्लेख केलेत. एखादी गोष्ट फलदायी असेपर्यंतच मनुष्य त्या गोष्टीची जबाबदारी घेतो, तिची विशेष काळजी घेतो ही गोष्ट स्पष्ट करताना नाथांनी आंब्याच्या राखणदारीचं उदाहरण दिलंय.

आंबा सफळीत जवा असे।
तवं नेटेंपाटे राखण बैसे।
फळ हाता आल्या आपैसें।
राखण वायसें राहेना।।१३-४७४।।

कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यकतेपेक्षा अधिक केला तर तिचा लाभ होण्याऐवजी ती त्रासदायकच ठरु शकते ही व्यावहारिक गोष्ट स्पष्ट करताना नाथांनी फणसाच्या अतिसेवनाने होणाऱ्या त्रासाचं उदाहरण दिलंय.

फणस खाता लागे गोड।
तें जैं अधिक खाय तोंड।
तै शूळ उठे प्रचंड।
फुटे ब्रम्हांड अतिव्यथा।।२१-१७६।।

फणसाच्या अतिसेवनाने तोंडात मरणांतिक त्रास व्हायला लागतो ही बाब याठिकाणी निदर्शनास आणून दिलीय.

हेही वाचा : इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

ताजा फलाहार उत्तम

वानप्रस्थाश्रमात माणसाने कोणत्याही गोष्टीचा अतिसंग्रह करु नये ही गोष्ट स्पष्ट करताना अठराव्या अध्यायात त्यांनी फळांच्या सेवनासंदर्भात विवेचन केलंय.

पूर्वदिवसीं फळे आणिली।
अपरदिवसीं जरी उरलीं। 
तीं अवश्य पाहिजे त्यागिलीं।
नाहीं बोलिलीं आहारार्थ।।१८-३३।।

प्रत्यहीं आहारार्थ जाण।
फळें आणावीं नूतन।
जीर्ण फळांचे भक्षण।
निषिद्ध जाणं वानप्रस्था।।१८-३४।।

फलाहार घेताना ताजीच फळे खाल्ली पाहीजेत हा नाथांनी पंधराव्या शतकात दिलेला सल्ला आजही वैद्यकशास्त्रात किती मोलाचा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

नाही रे वर्गासाठी तत्त्वज्ञान

आपल्याकडे थोडके संचित असले तरी मनुष्याने भोवतालच्या परिस्थितीचा योग्य वापर करून आपली क्षमता सिद्ध करत उत्तुंग भरारी घेतली पाहिजे ही बाब स्पष्ट करताना एकनाथांनी वडाचा दाखला दिला आहे.

जेवीं सूक्ष्म वटबीज केवळ।
त्यासी मीनल्या भूमिजळ।
वाढोनिया अतिप्रबळ।
वृक्ष विशाळ आभासे।।१२-४०८।।

केवळ छोटं बीज असणारा वड जमीन आणि पाण्याचा योग्य वापर करून विशाल वटवृक्ष बनतो हा नाथ महाराजांनी दिलेला दाखला सामान्यांसाठी, 'नाही रे' वर्गातल्या उपेक्षितांसाठी प्रेरणादायीच म्हणावा लागेल. 

कृष्णकिर्तीचा महिमा वर्णन करताना एकनाथांनी खैर, धावडा या जंगली वृक्षाबरोबर चंदनाची जोड घातली आहे.

लागता चंदनाचा पवन।
खैर धामोडे होती चंदन।
तेवीं कृष्णकीर्तीश्रवण।
दे समाधान समसाम्य।।३०-३४।।

ज्यापद्धतीने श्रीकृष्णाची किर्ती भक्तीभावाने श्रवण केल्यानंतर असंत ही संतपदाला पोहचतात त्याप्रमाणे चंदनाच्या संगतीने खैर,धावडे सुद्धा चंदनच होऊन जातात.                                    

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

पिंपळ म्हणजे साक्षात श्रीकृष्ण

सोळाव्या अध्यायात भगवंताच्या विभूतीचें वर्णन आले आहे. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना सर्व चराचरात मीच भरून उरलोय हे सांगताना श्रीकृष्णाने पिंपळ वृक्षाचा उल्लेख करून वृक्षामधे पिंपळ म्हणजे मीच असे सांगितले.

'वृक्षांमाजी जो अस्वत्थू।
तो मी म्हणे श्रीकृष्णनाथू।
औषधींमाजी अतिविख्यातू।
यव मी अच्युतू म्हणे वेगें।। १६-१९५।।'

संत एकनाथांनी 'पिंपळ म्हणजेच मी' असं कृष्णाच्या तोंडून वदवून घेतलं. त्यातलं मिथक आपण लक्षात घेऊया. केवळ माणसाचंच नाहीत तर एकूणच चराचराचं अस्तित्व वृक्षावर अवलंबून आहे असं म्हटल्यास ते अतिशयोक्त ठरणार नाही. संपूर्ण भूतसृष्टीसाठी असलेली वृक्षाची अपरिहार्यता पाहिली तर कोणताही वृक्ष ईश्वरापेक्षा कमी महत्त्वाचा नाही. त्यादृष्टीने माणसाने खरंतर वृक्षात ईश्वर शोधणं आवश्यक आहे आणि तीच गोष्ट एकनाथांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलीय.

औषधी वनस्पती माहिती

संत एकनाथांनी पंधराव्या अध्यायात औषधी वनस्पती आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांची केलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. जन्म, औषधी, मंत्र, तप इत्यादींनी सिद्धी प्राप्त होते. कित्येकांना जन्मत:च सिद्धी प्राप्त झालेल्या असतात तर काही दिव्यौषधीचे साधन केलं तर सिद्धी प्राप्त होतात. यासंबंधीचे विवेचन करतांना एकनाथांनी केलेले उल्लेख असे,

श्वेतमांदारी गजानन।
अंगारकचतुर्थी साधिल्या जाण।
सकळ विद्यांचे होय ज्ञान।
धनधान्य समृद्धी।।१५-२०४।।

अजानवृक्षाची वोळखण।
त्याचीं फळें श्वानमुखें जाण।
त्याचें घडल्या क्षीरपान।
होय आपण अजरामर।।१५-२०५।।

पिचुमंद नित्य सेविल्या देख।
त्यासी बाधीना कोणी विख।
पाताळगरुडीचे प्राशिल्या मुख।
त्यासी देहदु:ख बाधीना।।१५-२०६।।

पुतिकावृक्षाचे मूळीं।
असे महाशक्तीची पुतळी।
ते साधल्या अप्सरांचे मेळीं।
क्रीडे तत्काळीं साधक।।१५-२०७।।

या ओव्यांमधून उल्लेख केलेल्या श्वेतमांदारी म्हणजे पांढरी रुचकी, अजानवृक्ष, पिचुमंद म्हणजे कडूनिंब, पाताळगरुडी म्हणजे वासनवेल, पूतिकावृक्ष म्हणजे वावळी इत्यादी वनस्पती या औषधी वनस्पती आहेत.

यातील श्वेत मांदाराच्या झाडाखाली बसून गजाननाची पूजा केल्याने सर्व विद्यांचे ज्ञान होते आणि धनधान्याची समृद्धी येते. अजानवृक्षाचे दूध पिल्याने माणूस अजरामर होतो या गोष्टी आजघडीला अतिशयोक्त आणि अनाठायी वाटत असल्या तरी ही झाडे औषधनिर्माणशास्त्राच्या दृष्टीने उपयुक्त आहेत हे कुणालाही नाकारता येणार नाही. वासनवेलाचा रस देहपीडा थांबवण्यासाठी आणि पाताळवृक्षाच्या (वावळी) मूळी ह्या कामुकवृत्ती वाढण्यास मदत करतात हे उल्लेख नाथांचे औषधी वनस्पतींसंबंधीचे ज्ञान प्रकट करतात.

हेही वाचा : वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

वृक्ष हेच गुरू

अवधुताने म्हणजे श्रीदत्ताने यदुराजाला आपण मानलेल्या चोवीस गुरुंची माहिती दिली. अवधुताने कोणाला गुरु मानले आणि त्याच्या पासून कोणता गुण घेतला याचे विस्तृत वर्णन सातव्या अध्यायात आले आहे. वायु, आकाश, अग्नी, जल, चंद्र, सुर्य, कपोत, समुद्र, पतंग, अजगर, मधमाशी, हत्ती, भृंग, हरिण, मासा, पिंगळा नामक वेश्या, टिटवी, मूल, कुमारी, बाण करणारा लोहार, सर्प, कातीन, कुंभारीण माशी इत्यादी चोवीस गुरुंच्या यादीत पृथ्वीचे स्थान पहिल्या क्रमांकावर आहे.

पृथ्वीवरील पर्वत, वृक्ष, भूमी या तिन्हीचे गुण आपण देहामधे धारण केल्यामुळे पृथ्वीकडे गुरुपण आले असल्याचे अवधुत सांगतो. मग वृक्षाचे गुण ते कोणते?

१) पराधिनता :

'सर्वांगे सर्वभावेंसीं।
सर्वकाळ सर्वदेशीं।
पराधीन होआवें सर्वांसी।
हे वृक्षापाशीं शिकलों।।०७-९३।।

वृक्षे जेणें प्रतिपाळीला।
तो त्या आधीन जाहला।
कां जो छेदावया रिघाला।
त्याही झाला स्वाधीनु।।७-९४।।'

वृक्ष ज्याने लावलेला असतो, त्याच्याच अधीन असतो असे नाही तर त्याला तोडायला तयार होतो त्याच्याही तो अधीनच असतो. देहाची अहंता सोडून दिल्यामुळे योग्याच्या ठिकाणी पराधिनता येते तीच पराधिनता वृक्षाच्या ठिकाणी असते.

२) परात्मता :

'प्राप्त जें जें सुखदुःख।
तें तें अदृष्टा आधीन देख।
आत्मा मानुनी सकळ लोक।
पराधीन देख वर्तत।।७-९८।।

सकळ लोकीं निजात्मता।
देखता जाहली पराधीनता।
हें वृक्षापासोनि तत्वतां।
परात्मता शिकलों।।७-९९।।'

सर्व लोकांमधे आपला आत्मा आहे, असं पाहण्याची परात्मता आपण वृक्षापासून शिकल्याचे अवधूताने सांगितलंय.

३) कोणालाच विन्मुख न पाठवण्याचा गुण :

आणिक एक लक्षण।
वृक्षापासोनि शिकलों जाण।
अतिथीचें पूजाविधान।
तें सावधान परियेसीं।।७-४००।।

अतिथी आल्या वृक्षापासीं।
वंचनार्थू न करी त्यासी।
पत्रपुष्पफलमूळच्छायेसीं।
त्वचाकाष्ठांसी देतसे ।।७-४०१।।

अतिथीसी नव्हे पराङमुख।
हा साधूसी गुण अलोकिक।
अन्न धन उदक।
यथासुखें देतुसे।।७-४०४।।

आपल्याकडे येणारा कोणीही विन्मुख होऊन जाणार नाही याची काळजी वृक्ष घेत असतो.

४) समदृष्टी :

'जो वृक्षासी प्रतिपाळी 
कां जो घावो घालूं ये मुळीं। 
दोंहीसीही सममेळीं।
पुष्पीं फळीं संतुष्टी ।।७-४०२।।

सांभाळ करणाऱ्याकडे आणि मुळावर घाव घालून इजा पोहचवणाऱ्याकडे, म्हणजेच मित्र आणि शत्रु यांच्याकडे समदृष्टीने पहाण्याचा वृक्षाचा गुण आपण स्वीकारल्याचं अवधुत सांगतो.

५) परोपकार :

'पत्र पुष्प छाया फळ।
त्वचा काष्ठ समूळ।
वृक्ष सर्वांगे सफळ।
सर्वांसी केवळ उपकारी।।११- ८६९।।
 
मोडूनि फळें आलिया वृक्षे।
वृक्षु एकही स्वयें न चाखे।
तेवीं कर्मफळा जो न टेंके।
तो यथासुखें परब्रम्ह ।।११-८७१।।'

निसर्गातील बहुतेक साऱ्याच घटकांचे माणसांवर अनंत उपकार आहेत. त्यांच्या उपकारातूनच माणसांचं जीवन समृद्ध झालंय. वृक्ष, नदी, पाणी, मेघ इत्यादींच्या उपकारांविषयीची कृतज्ञता बहुतेक सर्वच संतांनी आपल्या लिखाणातून व्यक्त केलीय. आपल्याकडच्या गोष्टींचा स्वतःसाठी कसलाच फायदा न घेता त्या सर्वच गोष्टी लोकांना वाटून देणं हा वृक्षाचा परोपकारी भाव एकनाथांनी सुंदर पद्धतीनं वर्णिलाय. वृक्षाच्या ठिकाणी असलेल्या उपरोक्त सर्वच गुणांचा माणसांनी स्वीकार केला तर माणसाचे जीवन आणखीनच समृद्ध होण्यास मदत होणार आहे.

वृक्ष लागवडीचा आग्रह आपण पुर्ण करुया

अशा अनंत उपकारकर्त्या वृक्षांच्या लागवडीचा संत आग्रह न करतील तर नवल!

'देवालय करावें गहन।
वन उद्यान उपवन।
खेंडकुलिया विश्रामस्थान।
आराम जाण करावे।।११-१२९२।।

नाना जातींचे वृक्ष तें वन।
फळभक्षी वृक्ष तें उपवन।
पुष्पवाटीका तें उद्यान।
कृष्णार्पण पूजेसी।।११-१२९३।।

देवळांची उभारणी करताना परिसरात वन, उपवन, उद्यानांची निर्मीती करावी जेणेकरुन श्रीकृष्णाच्या पूजेसाठी ते उपयोगी येतील. संत एकनाथांनी वृक्षाच्या लागवडीचा आग्रह देवळांच्या संदर्भाने केला असला तरी तो केवळ देवळांपुरता मर्यादित न ठेवता वृक्ष लागवडीचा उपक्रम सार्वजनिक करण्याचा शहाणपणा माणसांनी दाखवायला हवा.

संत एकनाथांनी भागवतातून वेगवेगळ्या संदर्भाने वृक्ष वाचकांच्या भेटीला आणलाय. वर्तमानात वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्षतोड या तिन्ही टप्प्यांवर माणसांनी दाखवलेल्या कमालीच्या आळशी आणि उदासिन वृत्तीने एकूणच जगाला धोक्याच्या वळणावर आणून ठेवलंय. मध्ययुगातल्या संतांनी वृक्षाच्या संदर्भाने दिलेल्या शिकवणीचा वेळीच अंमल करायला हवा. संत एकनाथांनी सांगितलेले वृक्षांचे गुण आपल्यात कायमपणे झिरपत रहावेत यासाठी आपल्या अवतीभवती वृक्षांची गर्दी वाढायला हवी. वृक्षांचा मेळा भरायला हवा!

हेही वाचा : 

वारी चुको नेदी हरी

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय

विठुराय भक्तांना म्हणतात आषाढी, कार्तिकीला माझ्याकडे यायला विसरू नका