रे कबिरा मान जा...

२४ जून २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज २४ जून. संत कबीर यांची जयंती. वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे.

आज २४ जून. कबीर जयंती. म्हणजे संत कबिरांनी अमुक वर्षांपूर्वी तमुक तिथीला जन्म घेतला होता. असेल घेतला, त्यात काय एवढं! पण कबीर जयंती इतर कुठल्या सणासारखा कॅलेंडरवरचा रकाना असू शकत नाही. त्याचं सेलिब्रेशन तुमच्या माझ्या बाहेर नाहीच होऊ शकत. त्यासाठी कबिरांनी तुमच्या माझ्या हृदयाच्या खोल तळाशी आणि मेंदूच्या असंख्य सुरकुत्यांत हळूहळू जन्म घ्यावा लागतो. ती खरी कबीर जयंती असते.

एका फटाक्याची आग दुसऱ्याला लागून सगळी माळ पेटत जाते, तसं रोज नव्याने कबीर जन्म घेत राहतात. मग सालं अख्खं जगणंच सेलिब्रेशन होऊन जातं. त्यामुळेच कबीर काय आहेत? कबीर असंख्य प्रश्न आहेत. पण ते अस्वस्थ तडफडीने जन्माला आलेले नाहीत. तर शांत, निर्मळ तळ्याला पडलेले प्रश्न आहेत. अथांगतेतून अधिक अथांगतेकडे घेऊन जाणारे प्रश्न.

ताजे टवटवीत कबीर

दीपिका पदुकोण, रणबीर कपूरच्या `ये जवानी हैं दिवानी`तला बन्नी आठवतोय? स्वतःच्या जगण्याविषयी आरपार क्लियर, फुल कॉन्फिडण्ट असणाऱ्या बन्नीला एका टप्प्यावर स्वतःच्या अस्तित्वावरच प्रश्न पडतात. छिनभिन झालेला बन्नी स्वतःच्याच मनात डोकावून प्रश्न विचारत असतो. तेव्हा तो कबीर जयंती साजरी करत असतो. ‘रे कबिरा मान जा...’

कैसी तेरी खुदगरजी, ना धूप चुने ना छांव?
कैसी तेरी खुदगरजी, किसी थौर टिके ना पांव?
बन लिया अपना पैगंबर, तैर लिया सात समंदर,
फिर भी सुखा मन के अंदर, क्यों रह गया?
रे कबिरा मान जा, रे फकिरा मान जा...

कष्टकरांच्या घरात जन्मलेल्या महापुरुषांच्या जन्माविषयी इतिहासकार इमानेइतबारे घोळ घालतातच. जणू त्यांच्या बॉसने केआरएच्या फॉर्ममधे ते टार्गेटच दिलेलं असतं. आता विकिपीडियाला विचारलं तरी ती कबिरांची दोन जन्मवर्षं देते, १३९८ आणि १४४०. म्हणजे कबिरांच्या जन्माला पाचशेच्या वर वर्षं नक्की झाली. या सगळ्या इतिहासाच्या नाकावर टिच्चून कबीर जिवंत राहतात. रोज नवा जन्म घेत राहतात. रोज नव्या कबिरांना जन्म देत राहतात. म्हणून आजही कबीर ताजे टवटवीत राहतात.

हेही वाचा : संत कबीरांची पालखी वाराणशीतून पंढरपूरला वारीत सामील व्हायची

प्रेमीजिवांचा `बुलिया`

सिनेमाच्या रोमँटिक गाण्यांमधेही कबीर येत राहतात. नीरज आर्या आणि त्याचे दोस्त त्यांच्या `कबीर कॅफे` या रॉक बँडमधे गिटार हातात घेऊन कबीर गाऊ शकतात. एखाद्या फाईव स्टार कॅफे, रेस्टॉरंट, लाऊंजमधे ते गातात, तेव्हा ऐकणाऱ्यांच्या हातात आणि टेबलावर काय आहे, याच्याशी त्यांच्या कबिरांना घेणंदेणं नसतं. कबिरांनंतर दोनशे वर्षांनी झालेले त्यांचे जानी दोस्त बुल्ले शाह प्रेमीजिवांचा `बुलिया` बनून कबिरांसारखेच नव्या पिढीच्या गाण्यांत, मनात डोकावत राहतात. 

रांझन दे यार बुलिया, सुन ले पुकार बुलिया
तू ही तो यार बुलिया, मुर्शीद मेरा मुर्शीद मेरा...

`ऐ दिल हैं मुश्किल`मधल्या या गाण्यात ऐश्र्वर्या राय आणि रणबीर कपूर कचकचीत रोमान्स करत असतात. तिथं महान संत बुल्ले शाह कुणालाच खटकत नाही. अनुष्का शर्मा, सलमान खानच्या `सुलतान`मधेही खटकत नाही. उलट स्थळकाळाच्या सगळ्या सीमा ओलांडून ते प्रत्येक रसरशीत प्रेमाचा साक्षीदार बनतात. 

कबिरांनी सांगितलेला धर्म

आमचे तुकोबाराय, आमच्या माऊली हेही प्रेमरूपच आहेत. पण आपण त्यांना असं प्रेमाचं आणि तारुण्याचं प्रतीक मानणार आहोत की त्यांना फक्त अध्यात्म, संप्रदायातच अडकवणार आहोत? तरुणांनी मिळून वशाट खाण्यासाठीच्या एका कार्यक्रमात `संत तुकाराम` नाटक होणार म्हटल्यावर आमच्या भावना दुखावतात. पण संतांनी आयुष्यभर धार्मिक भावना दुखावायचंच काम आनंदाने केलं आणि त्यांना त्यातच देव भेटला. म्हणून तथाकथित धार्मिक मंडळींनी ज्ञानेश्वर माऊलींचा छळ केला. तुकोबारायांना गाथा इंद्रायणीत बुडवायला लावला. भावना दुखावल्या की हे सगळं आपण विसरून जातो.
 
धार्मिक भावना दुखावल्याशिवाय सत्याच्या दिशेने पाऊल पुढे सरकतच नाही. धर्माला प्रश्न विचारावेच लागतात. त्याशिवाय खरं जगणं उजळून निघणारच नाही. धर्माला प्रश्न विचारणं हाच खरा धर्म आहे. तो कबिरांनी सांगितलेला धर्म आहे. 

मुल्ला होकर बांग जो देवे, क्या तेरा साहब बहरा हैं।
कीडी के पग नेवर बाजे, सो भी साहब सुनता रे।।
माला फेरी तिलक लगाया, लंबी जटा बढाता हैं। 
अंतर तेरे कुफर कटारी, यो नहीं साहब मिलता रे।।

आजही मशि‍दीवर भोंगे लावण्यावरून वाद होतात. दंगली होतात. कबीर त्यांना सांगतात, छोट्या किडीच्या पायातले घुंगरूही त्याला ऐकू येतात आणि तू इतक्या जोरात बांग देतोस. तुझा देव बहिरा आहे का? गळ्यात माळा, कपाळावर टिळा आणि डोईवर लांब जटा आहेत, म्हणून देव मिळत नाही. तुझ्या मनात कपट असेल, तर देव कसा मिळणार?

हेही वाचा :  मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच

हिंदूही नाही, मुसलमानही नाही

कबिरांच्या ओळीओळीतून दोन्ही धर्मांतल्या दुकानदारांना विचारलेले प्रश्न आहेत. त्यांच्यासारखी धर्मचिकित्सा या देशात क्वचितच झालेली आहे. पण त्यात एका थेंबाचाही द्वेष मत्सर नाही. आहे ती फक्त अपार करुणा. म्हणून कबीर हिंदू होते की मुसलमान हा प्रश्नच उरत नाही. `सब आया एकही घाटसे` या लोकप्रिय भजनात कबीर म्हणतात, 

हिंदू कहूं तो हो नहीं, मुसलमान भी नाही।
गैबी दोनो दीन में, खेलूं दोनो माही।

कबीर सांगतात, `मी तर हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही. मी दोघांच्याही मधे लपलोय आणि दोघांचाही आनंद घेतोय.` ते हिंदू होते आणि नव्हतेही. ते मुसलमान होते आणि नव्हतेही. या दोन्ही धर्मांच्या पलीकडे होते. ते खऱ्या अर्थाने सगळ्यांचे होते. ग्लोबल होते. आजही आहेत.

कबिरांच्या काळात त्यांच्या विरोधातले हिंदू मुस्लिम एकदाच एकत्र आले, ते कबिरांची पाखंडी म्हणून दिल्लीच्या सुलतानाकडे तक्रार करायला. आणि कबिरांनी एकत्र आणलेले हिंदू मुसलमान त्यांच्या निधनानंतर लगेचच एकमेकांशी भांडायला लांगले, ते कबीर आमच्याच धर्माचे म्हणून. रूढ धर्माच्या चौकटीत कबीर नाहीच शोधता येत. कबीरच काय, कोणतंही सत्य नाहीच शोधता येत. खरा धर्म धर्माच्या पलीकडेच सापडतो.

तर हरी सापडणार कसा?

`कबिरा खडा बजार में, लिए लुकाठी हाथ।
जो घर फुके आपना, चलें हमारे साथ।।` 

लुकाठी म्हणजे मशाल. आपलं घर जाळून टाकण्याची तयारी असेल तर आपल्यासोबत चलावं, असं आवाहन कबीर करत आहेत. आता हे काही संसाराची राखरांगोळी करण्याचं सांगणं नाहीय. इथं सत्यापर्यंत जाण्यासाठी आपल्या डोक्यातल्या जुन्या धारणा जाळण्याचा आग्रह आहे. `कटुक वचन कबीर के सुनत आग लग जाए,` अर्थात याला धर्मही अपवाद नाही. मग तुमच्या डोक्यातला जो कुठला धर्म असेल, हिंदू असो वा मुसलमान, तो जाळून टाका. तर तुम्हाला खरा धर्म मिळेल, असं कबीर सांगत होते. शिखांचा धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहेबमधे कबिरांचं एक पद आहे. 

भूखें भगति न कीजै। यह माला अपनी लीजै।।
हउ मांगो संतन रैना। मैं नाही किसी का देना।। 

या पूर्ण पदाचा स्वैर अनुवाद असाय, `भुकेल्या पोटी भक्ती होऊ शकत नाही देवा. ही तुझी माळ ठेव तुझ्याकडेच. माधवा, सांग तरी तुझ्याशी कसं जमवून घेऊ? तू देणार नसशील तर मागू कसं? मला दोन शेर पीठ हवं. त्यासोबत पाव शेर तूप अर्धा शेर डाळ आणि दोन वेळ जेवण. अंथरूण पांघरूण हवं. जास्त काही मागत नाही, पण त्याशिवाय तुझी भक्ती करू शकेन? त्यात माझा लोभ नाही. मी तुझाच आहे पण मन स्थिरावलं नाही, तर हरी सापडणार तरी कसा?`

हेही वाचा : ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

कबिरांच्या जवळ जाणारे नामदेवराय

कबीर पापी पेटका सवाल विचारत राहतात. पोटातली आग ही गोष्टच सेक्युलर आहे. ती धर्म बघत नाही की जात. भक्तीच्या आधी भुकेचं गाणं गाणारे हे कबीर म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. सॉक्रेटिसने फिलॉसॉफीला जमिनीवर आणलं म्हणतात. तेच कबिरांचं आहे. इथे कबीर चार्वाक आणि बुद्धांशी नातं सांगतात. पण त्याचबरोबर त्यांच्या साधारण दोनशे वर्षं आधी झालेल्या वारकरी संतपरंपरेशी स्वतःला बांधून घेतात. 

गुरू गोरखनाथ कबिरांआधी साधारण चारशे वर्षं आधीचे असावेत. गीतगोविंदकार भक्तकवी जयदेव तीनशे वर्षं. पंजाबातले बाबा फरीदही आणि गुजरातचे जैन आचार्य हेमचंद्र सुरीही. त्याच्या पुढच्या शतकात संत नामदेव आणि अमीर खुस्रो. त्यानंतर अर्थातच कबिरांचे गुरू म्हणून प्रसिद्ध असणारे रामानंद येतात.

या सगळ्यांचं कमी जास्त साहित्य उपलब्ध आहे. त्यांची तुलना करता कबिरांच्या सगळ्यात जवळ असणारे आपले नामदेवरायच आहेत. चौदाव्या शतकात नामदेव दीर्घकाळ उत्तर भारत ढवळून काढत होते. त्यांच्या साधारण साडेतीनशे हिंदी रचना आज आपल्याला माहीत आहेत. कबिरांनी आपल्या कवितेत संत नामदेवांचा उल्लेख केलाय आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचाही.

हिंदु अंधा तुरकू काणा, दुहांते गिआनी सिआणा। 
हिंदु पूजै देहुरा, मुसलमाणु मसीत,
नामे सोई सेविआ, जह देहुरा न मसीत ।।

हे आपल्या नामदेवरायांचं गुरुग्रंथसाहेबामधलं प्रसिद्ध पद आहे. `हिंदू आंधळा आहे, मुसलमान चकणा आहे. दोघांपेक्षा ज्ञानी शहाणा आहे. कारण हिंदू देवळात पूजतो, मुसलमान मशिदीत. नामदेव पूजा करतो, तिथे देऊळही नाही आणि मशीदही नाही.` कबिरांनी सांगितलेलं धर्माचं तत्त्वज्ञान यापेक्षा काय वेगळं होतं! 

खरी कबीर जयंती

वारकरी परंपरा तर कबिरांना वारकरीच मानते. अस्सल पारंपरिक वारकरी कीर्तनात फक्त वारकरी संतांच्या वचनांचा दाखला देता येतो. महाराष्ट्रातल्या रामदास स्वामींच्या रचना वारकरी कीर्तनात दाखला म्हणून वापरता येत नाहीत, मात्र हजारो किलोमीटर अंतरावरच्या हिंदीत लिहिणाऱ्या कबिरांची वाणी मात्र सांगता येते. 

संत तुकारामांनी तर कबिरांचं ऋण मान्य करून त्यांना आपलं पूर्वसुरीच मानलंय. आश्चर्य वाटेल पण पंढरपुरात दत्तघाटाशेजारी कबीर मठात कबीर आणि त्यांचा मुलगा कमाल यांच्या समाध्याही आहेत. कबिरांनंतर कमाल पंढरपुरातच राहिले अशी महाराष्ट्रातल्या कबीरपंथीयांची श्रद्धाही आहे. 

न्या. महादेव गोविंद रानडे यांनी त्यांच्या विसाव्या शतकाच्या सुरवातीला पालखी सोहळ्याचं पहिलं डॉक्युमेंटेशन केलंय. ते त्यांच्या धर्मपर व्याख्यानांच्या पुस्तकात आलंय. त्यात आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते, तशीच वाराणसीहून कबिरांची पालखी पंढरपूरला येत असल्याचं नोंदवून ठेवलंय. `ज्ञानाचा एका, नामाचा तुका, कबिराचा शेखा` असं म्हणत वारकरी परंपरा आजही संतपरंपरेत कबिरांना गुंफून घेते. इथे शेखा म्हणजे श्रीगोंद्याचे संत शेख महंमद. 

ही धर्माच्या पलीकडे जाऊन धर्माचं मर्म शोधण्याची महाराष्ट्रीय परंपरा आहे. त्याचा कबीर अविभाज्य भाग आहेत. त्यासाठीच पुन्हा एकदा कबिरांच्या विचारांची पालखी घेऊन वाराणसीहून पंढरपूरला यावं लागणार आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कबिरांचा अभीर पुन्हा एकदा कोलसवावा लागणार आहे. त्यात कदाचित सह्याद्रीला नव्याने क्रांतीचे डोहाळे लागतील. आणि देशाला मोदींच्या वाराणसीहून कबिरांच्या वाराणसीकडे जाणारा रस्ताही दिसू लागेल. ती खरी कबीर जयंती असेल.

हेही वाचा : 

वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

बुद्धप्रिय कबीरः 'जिंदाबाद मुर्दाबाद'चं तत्वज्ञान जगलेला अस्वस्थ कबीर