कोणत्याही देशात असू नये 'भारताच्या' रॉबर्ट क्लाइवचा पुतळा!

१३ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रचणारा माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. लंडनमधे या क्लाइवचा एक पुतळा आहे. त्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी कोट्यवधी भारतीयांचे प्राण घेणारा क्लाइव कितीही मोठा राष्ट्रभक्त असला तरी आपल्या देशाचं प्रतीक नसावा, असं आता ब्रिटनच्या नागरिकांनाही वाटू लागलंय. म्हणूनच त्याचा पुतळा हटवण्याची मागणी तिथे जोर धरतेय.

‘इंग्लिश शब्दकोशात फक्त इंग्रजी शब्द नसतात. तर अनेक भाषांमधले शब्दही इंग्लिशनं आपले म्हटलेत. असाच इंग्लिशमधला एक शब्द आहे ‘लूट.’ भारतात इंग्रज राज्य करायला आले तेव्हा त्यांनी हा शब्द आत्मसात केला. ऑक्सफर्ड डिक्शनरीत सांगितल्याप्रमाणे १८ व्या शतकाच्या शेवटाच्या आधीपासून हा शब्द उत्तर भारतात वापरला जात होता. तोच इंग्रजांनी उचलला. कारण, ते भारतात येऊन लूटच तर करत होते!’

प्रसिद्ध स्कॉटिश इतिहासकार विलियम डालरिंपल यांचं हे म्हणणं आहे. लूट हा शब्द इंग्लिश डिक्शनरीत असण्याचं सगळं श्रेय ते फक्त आणि फक्त एकाच माणसाला देतात. तो माणूस म्हणजे रॉबर्ट क्लाइव. दुसऱ्या महायुद्धाआधी ब्रिटन जगातला सगळ्यात श्रीमंत देश या क्लाइवमुळे होता. ब्रिटनच्या लंडनमधल्या किंग चार्ल्स स्ट्रिटवर व्हाइट हॉलच्या बाहेर या क्लाइवचा सुबक असा ब्रॉन्झचा पुतळा उभारलाय. १९१२ साली बनवलेला हा पुतळा वसाहतवादाच्या जोरावर ब्रिटनला ग्रेट बनवणाऱ्या राष्ट्रवादाचं प्रतीक आहे.

'ब्लॅक लाइव्ज मॅटर' ही अमेरिकेत सुरू झालेली चळवळ जगभर उसळली. त्याचे वेगवेगळे पडसाद वेगवेगळ्या देशात दिसून आले. ब्रिटनमधे काळ्या माणसांना गुलाम बनवून त्यांची खरेदी विक्री करणाऱ्या एडवर्ड क्लोस्टोन या व्यापाऱ्याचा एक मोठ्ठा पुतळा ब्रिटनमधल्या ब्रिस्टल इथं होता. ब्लॅक लाइव्ज मॅटर चळवळीचा परिणाम म्हणून ब्रिटनच्याच नागरिकांनी हा पुतळा पाडून नदीत फेकून दिला. गुलामी करून पैसे मिळवणारा माणूस कितीही मोठा देशभक्त असला तरी ब्रिटिशांना नकोसा वाटला.

आता अशीच मळमळणारी भावना त्यांना रॉबर्ट क्लाइव याचा पुतळा पाहिल्यावरही येऊ लागलीय. त्यामुळेच या क्लाइवचा व्हाइट हॉल बाहेरचा पुतळाही अगदी शांतपणे तिथून काढून एखाद्या संग्रहालयात ठेवण्यात यावा, अशी मागणी केली जातेय. भारतीय वंशाच्या ब्रिटनच्या नागरिकांनी ही मोहीम पुढे आणलीय. कोरोनाच्या संक्रमणामुळे एकत्र येऊन आंदोलन करणं, सभा घेणं शक्य नसलं तरी सोशल मीडियावर ऑनलाईन ऍप्लिकेशन भरून या मोहिमेची जोरदार पाठराखण केली जातेय. आत्तापर्यंत सुमारे २० हजार लोकांनी ऑनलाईन पिटिशनवर सह्या केल्यात.

हेही वाचा : आशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडींग चक्क झाडाखाली व्हायचं

कोण होता रॉबर्ट क्लाइव?

व्हाईट हॉल बाहेरच्या या पुतळ्याखाली ‘क्लाइव ऑफ इंडिया’ असं लिहिलंय. उरलेल्या तीन बाजुंना त्याने घडवून आणलेल्या तीन अभूतपुर्व घटनांची थोडक्यात माहिती दिलीय - अर्कोटचा वेढा, प्लासीची लढाई आणि अलाहाबादचा तह. या तीन घटनांमुळे आणि म्हणूनच रॉबर्ट क्लाइवमुळे भारतात ब्रिटिश सत्तेचा अगदी भक्कम पाया रचला गेल्याचं इतिहासकार सांगतात. हे क्लाइवला शक्य झालं ते क्लाइव याच्या कुणाच्या बापालाही न घाबरण्याच्या, एक प्रकारच्या विकृत स्वभावामुळे.

हा क्लाइव लहानपणीही कुणाला म्हणजे कुणालाच घाबरत नसे. ब्रिटनमधेच त्याच्या वडलांची लहानशी इस्टेट होती. असा जमीन जुमला असूनही क्लाइव मात्र एखाद्या अनाथासारखा वाढला. त्याच्या आईच्या बहिणीकडे तो राहत असे. आपल्या वयाच्या पोरांना हाताशी धरून, कुणी नसेल तर वेळप्रसंगी एकटाच लोकांच्या खोड्या काढायच्या, मारहाण करायची हे तर त्याचं नेहमीचंच काम होतं. वडलांच्या वळणावर गेलेलं अत्यंत रागीट मूल म्हणून त्याची ओळख होती.

९ मुलांचा बाप

इतिहासकार डारलिंपर यांनी तर त्याला सायकोपाथ म्हणजेच मनोविकारी असं नाव दिलंय. मोठ्या पैशांची, श्रीमंतीची स्वप्न पाहिलेल्या या माणसाचं मन त्या पैशाच्या हव्यासापोटी नैराश्येत गेलेलं होतं. या नैराश्यातूनच त्याने एकदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. हा प्रयत्न फसल्यानंतर त्याला गांजाची सवय लागली. गांजाच्या नशेमुळे तो सटकन कुणावरही ओरडायचा. अत्यंत त्याची इकडची वस्तू जरा तिकडे झाली की आभाळ कोसळल्यासारखा त्याचा राग उफाळून यायचा. त्याचा शेवटही तसाच झाला. भारतातून परत गेल्यावर ब्रिटनमधे त्याच्यावर ईस्ट इंडिया कंपनीचे पैसे खाल्ल्याचा आरोप करण्यात आले. ते सहन न होऊन त्याने गळ्याला सुरी लावून आत्महत्या केली.

त्याची प्रेमकहाणीही अशीच विचित्र म्हणावी. १९३५ मधे एक अगदी बॉलिवूडस्टाईल अमेरिकन सिनेमा त्याच्या या प्रेमकहाणीवर बनवला गेलाय. क्लाइव ऑफ इंडिया हेच त्याचं नाव. भारतात आलेल्या मित्राच्या गळ्यातल्या लॉकेटमधे एका मुलीचा फोटो होता. हा फोटो क्लाइवनं पाहिला आणि त्या मुलीच्या प्रेमात पडला. तिला एकदाही न भेटलेता, तिच्याशी एकदाही न बोलता क्लाइवने तिला प्रेमपत्र लिहिलं आणि थेट लग्नाची मागणीच घातली. याच्या प्रेमाच्या आशेवर ती मुलगीही भारतात आली. त्यांनी लग्न केलं. त्यांच्या संसारवेलीवर एक नाही, दोन नाही तर चक्क ९ फुलं फुलली. या ९ मुलांसाठी क्लाइवनं गडगंज संपत्ती कमवून ठेवली होती.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

१०० जहाजं भरून संपत्ती नेली

त्याच्या या संपत्तीचं अनेक पद्धतीने, अनेक शब्दांनी गुणगान गाता येऊ शकतं. त्यावेळी एकट्या क्लाइवला ३० हजार पाऊंड म्हणजे आजचे ९० लाख पाऊंड वर्षाला मिळत होते. गावागावातून ईस्ट इंडिया कंपनीने लुबाडलेल्या पैशांचा, हिरे, मोत्यांचा एक हिस्सा थेट क्लाइवच्या खिशात जात होता. भारत सोडताना त्याच्याकडे आजचे २ अरब एवढे पैसे होते. त्याचं सगळं सामान घेऊन जायला त्याला १०० जहाज लागलं होती, असंही म्हटलं जातं. त्याच्या बायकोला तो नियमितपणे भेटवस्तू पैसे पाठवत असे. तिला लिहिलेल्या एका पत्रात त्याने हिरे, पाचू पाठवल्याचा उल्लेखही केलाय. 

ही सगळी प्रसिद्धी, पैसा, नाव, मान सन्मान त्याला प्लासीच्या लढाईनं मिळवून दिला. ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रासमधल्या शाखेत क्लार्कचं काम करणाऱ्या क्लाइवनं फ्रेंचांसोबत झालेल्या लढाईत अभूतपुर्व पराक्रम दाखवला. इंग्रज या युद्धात हरले होते. तरी क्लाइवने शत्रुसमोर मान तुकवली नाही. यानं तो वरिष्ठांच्या नजरेत भरला. त्याला बढती मिळाली आणि तो थेट मिलटरीचा लेफ्टनंट झाला.

१७५६ मधे प्लासीच्या लढाईच्या वेळी इंग्रजांना पुन्हा या लेफ्टनंटची आठवण झाली. सिराजुद्दौला हा आपल्या आजोबांनंतर बंगालचा नवाब झाला. कंपनीची इस्टेट, त्याचं फोर्ट बांधणं नव्या नवाबाच्या डोळ्यात खुपू लागलं आणि भर पावसाळ्यात नबावानं कंपनीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इंग्रज हरले आणि कलकत्ता नबावाच्या ताब्यात गेली. ती परत मिळवण्याच्या मोहीमेवर क्लाइवला पाठवलं गेलं.

इंग्लंडमधला सर्वात श्रीमंत माणूस

नवाबाचा सेनापती मीर जाफरला क्लाइवनं हाताशी धरलं. नवाबाला हरवण्यात मदत केली तर मीरला बंगाल, बिहार आणि ओडिशाचा नबाव बनवण्याचं दोघांत नक्की झालं. २३ जूनला नवाब आणि क्लाइवची सेना समोरासमोर आली. क्लाइवकडे १,१०० युरोपियन तर २१०० भारतीय सैनिक होते. नवाबाकडे १८ हजार घोडेस्वार आणि ५० हजार पायदळ सैन्य होतं. नवाबाचं पारडं जड असूनही क्लाइव जिंकला. याचं कारण, विश्वासघात, कटकारस्थान आणि भ्रष्टाचार.

मीर जाफीरला हाताशी धरून क्लाइवनं युद्ध जिंकलं आणि ईस्ट इंडिया कंपनीला बंगालमधे हातपाय पसरायला भरपूर जागा करून दिली. वर इंग्रजांचं झालेलं नुकसान भरून द्यायलाही मीर जाफरला तयार केलं. मिर जाफरकडून स्वतःसाठी आयुष्यभराची जहागिरी घेतली आणि वयाच्या ३० व्या वर्षी इंग्लंडमधला सर्वात श्रीमंत माणूस म्हणून क्लाइव ओळखला जाऊ लागला. सिराजुद्दौलाच्या खजिन्यातून त्याने ईस्ट इंडिया कंपनीसाठी आजचे २४० लाख पाऊंड काढले.

कंपनीनंही त्याची कृतज्ञता म्हणून क्लाइवला ईस्ट इंडिया कंपनीचा बंगालमधला गवर्नर घोषित केलं. १७५८ ते १७६० या दोन वर्षांत त्याने अनेक ठिकाणी लूट केली. त्याचा भरपूर फायदा कंपनीला झाला. मात्र, १७६० मधे त्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून त्याला ब्रिटनला परत बोलावून घेतलं. संसदेत स्वतःची बाजू मांडून क्लाइव त्यातून सुटला.

१७६४ मधे तो पुन्हा भारतात परतला आणि बंगालच्या गवर्नरचा पदाधिकार त्याने पुन्हा एकदा सांभाळला. त्याच्या या दुसऱ्या कारकिर्दीत त्याने बक्सरची लढाई घडवून आणली. या लढाईसाठी केलेल्या शांतता तहात त्याने आलम राजाकडून बंगालच्या जनतेकडून कर गोळा करण्याची परवागनी कंपनीला मिळवून दिली. या अलाहाबादच्या तहानंतर भारतात ब्रिटिश सत्तेचीं पाळमुळं अगदी घट्ट रूतली गेली.

हेही वाचा : केशवानंद भारतीः संविधान रक्षणाला कारण ठरलेले धर्मगुरू

१ कोटी लोकांची हत्या

क्लाइवनं कंपनीला, ब्रिटनला मिळवून दिलेला पैसा मोजताही येणार नाही इतका होता. कंपनीचा ५० टक्के व्यवहार हा एकट्या बंगालमधे होत होता. प्लासीच्या लढाईत एवढा पैसा कमवल्यानंतरही क्लाइव पुन्हा भारतात परतला तेव्हा तो इतका गडगंज श्रीमंत झाला होता की कंपनीच्या आधीन न राहताही स्वतः राजा म्हणून राहू शकला असता. तरीही त्याने पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीचं गवर्नरपद निवडलं. कंपनीला कराचा अधिकार मिळवून दिला. ही गोष्ट त्याच्या देशभक्तीचा सर्वात मोठा दाखला म्हणून वापरली जाते.

कराचा अधिकार मिळाल्यावर क्लाइवनं कर कितीतरी पटीने वाढवले. हे कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांचे हालहाल केले. विणकरांवर अत्याचार केले, त्यांना गुलाम केलं. भरभराटीनं नांदणारा बंगाल क्लाइवमुळे उजाड झाला. यामुळेच १७७०मधे बंगालमधे भयंकर दुष्काळ पसरला. या दुष्काळात जवळपास १ कोटी लोक भुकेने तडफडून मेले. या सगळ्यांच्या मृत्यूचं कारण क्लाइव असल्याचं आधुनिक इतिहासकार सांगतात. 

हे आधुनिक इतिहासकार इतर कुणी नाही तर क्लाइवच्याच मातृभूमीत जन्मलेले आहेत. निक रॉबिन्स यांनी आपल्या पुस्तकात सगळ्यात आधी क्लाइव यांची ही बाजू समोर आणली. त्यांनीच व्हाईट हॉलसमोरचा पुतळा काढून एखाद्या म्युझियममधे ठेवावा, अशी मागणीही केली होती. आता पुन्हा त्यांच्या या मागणीला दुजोरा देणारी ऑनलाईन पत्रं तिथल्या सरकारकडे पाठवली जातायत. त्यात ब्रिटनमधल्या अनेक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्यात. तिथल्या सरकारनं हा पुतळा हटवणार नसल्याचा निर्णय घेतल्याचं मान्य केलं असलं तरी त्या पुतळ्याशेजारी क्लाइवची नकारात्मक बाजू सांगणारा एक फलक लावणार आहेत.

ब्रेक्झिटपासून क्लाइवपर्यंत

आज जग दोन भागात विभागलं गेल्याचं म्हटलं जातं. आक्रमक राष्ट्रवादाकडे आकर्षित होऊन आपल्या देशाभोवती मोठमोठाल्या अदृश्य भिंती उभारणारे देश एकीकडे दिसतायत. ब्रिटनची युरोपियन युनियनमधून घेतलेली एक्झिट - ब्रेक्झिट हे आजवर त्याचंच प्रतीक मानलं जात होतं. मात्र, त्यासोबतच आपल्या देशाच्या इतिहासाकडे, आपल्या देशासाठी हिरो ठरलेल्या महान व्यक्तीकडे इतकं तटस्थपणे पहायची ही वृत्ती ब्रिटनमधे आजही आहे, हे क्लाइवच्या पुतळ्याच्या निमित्ताने पुढे आलंय.

पुतळा हटवण्याच्या मागणीवरून तिथे आंदोलनं होत नाहीत, आमच्या समाजाच्या नेत्याला बदमान केलं म्हणून धमक्यांचे फोन येत नाहीत. कट्टर राष्ट्रभक्तांच्या आदर्शावर टीका केली म्हणून देशद्रोहीही मानलं जात नाही. लाखो लोकांवर अत्याचार करणारा 'क्लाइव ऑफ इंडिया' भारताचा असू शकत नाहीच, पण तो कोणत्याही देशाचा नसतो, हे सांगणारं हे वर्तमान आहे.

हेही वाचा : 

सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

सत्य शोधणारी पॉलिग्राफ टेस्ट स्वतः खरं बोलते?

#NoBra या हॅशटॅगविषयी ब्र का नाही काढायचा?

आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

नागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं?

कोलंबसने नेलेल्या साथरोगांनीच संपवली मूळ अमेरिकी संस्कृती