आसामच्या मुख्यमंत्र्यांना इतिहास बदलायचा मोह का होतो?

१९ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे इतिहासातलं मुसलमानांचं योगदान पुसत इतिहासाचं विद्रूपीकरण करायलाही ते मागेपुढे बघणार नाहीत अशी विरोधकांना भीती आहे. या निमित्ताने, इतिहासाला धर्माच्या कोंदणात बसवायचा मोह सर्मांना का होतोय, हे जाणून घ्यायलाच हवं.

तेराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत सध्याच्या आसामच्या ब्रम्हपुत्रा खोऱ्याचा मोठा भाग आहोम राजवटीच्या अधिपत्याखाली होता. १६व्या शतकापर्यंत ब्रम्हपुत्रा खोऱ्यात आपला अंमल प्रस्थापित केल्यानंतर आहोम पश्चिमेकडे वळले. यावेळी मुघल आणि इतर आक्रमकांना त्यांनी यशस्वीपणे झुंज दिली. दुर्दैवाने भारताच्या मध्ययुगीन इतिहास लेखनात ईशान्य भारतातल्या या राजवटीची म्हणावी तितकी दखल घेतली नाही.

आसामी लोक मात्र आहोम राजवटीची आठवण म्हणून आजही वेगवेगळे दिवस साजरे करतात. पण आता हे चित्र बदलतंय. आजवर दुर्लक्षित केला गेलेला आसामचा इतिहास आता मुख्य प्रवाहात येऊ पाहतोय. पण हा इतिहास आता मुख्य प्रवाहात आणताना त्यात आपल्या सोयीचे बदल करण्याची इच्छा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी व्यक्त केलीय.

आहोम राजवटीचा इतिहास

तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात चीनच्या माओ राज्यातला सुकाफा हा ताई राजपुत्र आपल्या ९००० अनुयायांसोबत ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात स्थायिक व्हायच्या उद्देशाने आला. शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच दस्तावेजीकरण आणि राज्यनिर्मितीचा अनुभव गाठीशी घेऊन आलेल्या या ताई लोकांनी हळूहळू आपले हातपाय पसरत ब्रम्हपुत्रा खोऱ्याचा बराचसा मोठा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला.

सुकाफाने लढाया करून आपलं राज्य वाढवण्याऐवजी त्या खोऱ्यातल्या आंतरसांस्कृतिक संबंधांवर भर दिला. ‘आम्ही तुमचे सेवक आणि तुम्ही आमचे मालक’ म्हणत तिथल्या भूधारकांच्या जमिनी कसायचं काम त्याने आणि त्याच्या अनुयायांनी स्वीकारलं. जिथे जिथे तो गेला तिथली संस्कृती आत्मसात करून त्याने लोकांचा विश्वास आणि पर्यायाने जमिनी मिळवत स्वतःच्या राज्याचा विस्तार केला.

सुकाफाने स्वतः इथल्या स्थानिक आदिवासी प्रमुखांच्या मुलींशी लग्न करून आंतरसांस्कृतिक संबंधांचं मोठं उदाहरण आपल्या अनुयायांसमोर उभं केलं होतं. अशा लग्नांसाठी सुकाफाने वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. लढाया आणि जोरजबरदस्ती टाळून केवळ सामाजिक सलोख्यावर आपलं राज्य स्थापन करणारा सुकाफा हा सहा शतकांची राजवट असलेल्या आहोम राज्याचा संस्थापक आणि आधुनिक आसामचा शिल्पकार मानला जातो.

सतराव्या शतकात आहोम राज्याने दिल्लीतल्या मुघल साम्राज्याला तब्बल सतरावेळा नामोहरम केलं होतं. जहांगीरपासून औरंगजेबापर्यंतच्या तीन पिढ्यांशी आहोम राज्याने दिलेली झुंज आसामच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोंदली गेलीय. मुघलांविरुद्ध सुरु झालेल्या सहा दशकांच्या या प्रदीर्घ लढ्यातली १६६२ ते १६७७ अशी दीड दशक चाललेली सराईघाटची लढाई ही ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जाते.

हेही वाचा: राजमाता जिजाऊ म्हणजे स्वराज्याचा आधारवड

सराईघाटची लढाई

१६६१मधे औरंगजेबाच्या आदेशानुसार आसाम आपल्या ताब्यात घेण्यासाठी बंगाल प्रांताचा सुभेदार मीर जुमला दुसरा याने आसामच्या दिशेने कूच केली. त्यावेळी आहोम राजा जयध्वज सिंगचा पराभव करत मीर जुमलाने आहोम राजधानी गढगाववर आपला ताबा मिळवला. पुढे घिलाझरीघाटाच्या तहात आहोमांना आपली राजधानी परत मिळाली पण त्याचबरोबर त्यांना मुघलांच्या जाचक अटींनाही स्वीकारावं लागलं.

या अपमानकारक तहाला उलटवून लावण्यासाठी आहोम राजा चक्रध्वज सिंगने मुघलांविरुद्ध बंड पुकारलं. मुघलांच्या विशाल सैन्याला टक्कर देण्यासाठी आहोम सैनिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. चौक्या, किल्ले बांधले गेले. युद्धोपयोगी साहित्याची उत्पादनक्षमता वाढवली गेली. अतिरिक्त पाठबळासाठी जैंतिया आणि कचरी राज्यांसोबत नव्याने युती केली गेली. १६६७मधे या नव्या दमाच्या सैन्याने गुवाहाटीवर ताबा मिळवला.

चवताळलेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगांच्या मुलाला म्हणजेच राम सिंगला १६६९मधे आसामच्या स्वारीवर पाठवलं. पुढची दोन वर्षं आहोमांच्या ‘दगा युद्धा’ने बेजार झालेल्या मुघल सैन्याला १६७१च्या ब्रम्हपुत्रेच्या पात्रात झालेल्या सराईघाटच्या लढाईत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. हा पराभव ईशान्य भारतातल्या मुघल आक्रमणाचा पुरता बिमोड करून गेला. १६८२मधे राजा गदाधर सिंगच्या कारकीर्दीत उरलंसुरलं मुघल आक्रमणही आहोमांनी पिटाळून लावलं.

‘आसामचा शिवाजी’ लचित बोरफुकन

सराईघाटच्या या ऐतिहासिक लढाईचा नायक होता लचित बोरफुकन. बोरफुकन म्हणजे आहोम राज्याचा सेनापती. लचितने आहोम राज्याच्या लष्करी सामर्थ्यात लक्षणीय भर घातली. युद्धाच्या शेवटच्या दिवसात आपल्या आजारपणामुळे बिछान्यावर खिळलेला असूनही लचित आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी बिछान्यासकट एका नावेत स्वार झाला. त्याच्या या लढाऊ बाण्याने प्रेरित होऊन आहोम सैन्याने मुघलांची ब्रम्हपुत्रेच्या पाण्यातच समाधी बांधली.

लचित बोरफुकन हा फक्त एक साधारण सेनापती नव्हता. आहोम राजा जयध्वजाने स्वीकारलेल्या तहानंतर दुबळ्या झालेल्या आहोम सैन्याचं पुन्हा बळकटीकरण घडवून आणण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. किल्ले आणि चौक्या बांधून त्याने राज्य सुरक्षित केलं. शेजारच्या राज्यांशी नव्याने युती केली. मुघलांविरुद्ध त्याने केलेल्या दगा युद्धाची तुलना स्वराज्यातल्या गनिमी काव्याशी केली जात असल्याने त्याला ‘आसामचा शिवाजी’ म्हणूनही ओळखलं जातं.

आपल्या युद्धकौशल्याच्या आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर मुघल आक्रमण परतवून लावणारा लचित बोरफुकन हा आसामी जनतेच्या अस्मितेचं प्रतिक आहे. आसामी लोकसंस्कृतीमधे परकीय शक्तींविरोधात लढणारी स्थानिक शक्ती म्हणून लचितला मान दिला जातो. लचितच्या युद्धकुशलतेचा सन्मान म्हणून दरवर्षी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या सर्वोत्तम विद्यार्थ्याला लचित बोरफुकन पुरस्कार दिला जातो. सध्या मात्र राजकीय फायद्यासाठी इतर ऐतिहासिक विभूतींसारखंच लचितलाही वापरलं जातंय.

हेही वाचा: लोकशाही मुल्यांमुळेच रयतेला शिवशाही हवीहवीशी

लचित बोरफुकन हवा, बाघ हजारिका नको!

आधी काँग्रेसमधे असलेले आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा सध्या भाजपमधे आहेत. आपल्या पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना आहोम राजवटीच्या इतिहासाचं, विशेषतः मुघलांविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढाईचं गौरवीकरण करायचंय. त्यासाठी त्यांच्याकडून लचित बोरफुकनला एक हिंदू योद्धा म्हणून वारंवार रंगवण्यात येतंय. हा रंग लावताना सोयीचं व्हावं म्हणूनच ते लचितच्या एका मुसलमान सहकाऱ्याचं योगदान नाकारू पाहतायत.

हा मुसलमान सहकारी म्हणजेच बाघ हजारिका. त्याचं मूळ नाव इस्माईल सिद्दिकी. धेकेरीगावचा रहिवासी असलेल्या इस्माईलने गावात शिरलेल्या एका वाघाला कोणत्याही हत्याराशिवाय मारलं होतं. त्याचं हे शौर्य बघून राजा चक्रध्वज सिंग यांनी त्याला १००० आहोम शिपायांचा म्हणजे पाईकांचा नायक म्हणजेच ‘हजारिका’ म्हणून नियुक्त केलं. वाघ मारणारा ‘हजारिका’ म्हणून लोक त्याला बाघ हजारिका या नावाने ओळखू लागले.

सराईघाटच्या लढाईत मुघल युद्धनौकांवर असलेल्या तोफा निकामी करण्याची योजना बाघने मांडली होती. त्याला लचितने होकार देताच तो निवडक पाईकांना घेऊन मुघल युद्धनौकांवर चढला. बेसावध मुघल सैनिकांना चकवा देत त्याने तोफांमधे पाणी भरून त्या निकामी केल्या. या तोफा निकामी झाल्यामुळे आहोम सैन्याला फायदा झाला आणि मुघल हरले. बाघचा हा पराक्रम मौखिक साहित्याच्या रुपाने जिवंत ठेवला गेला.

याचाच फायदा घेत मुख्यमंत्री सर्मा बाघचं योगदान नाकारत आहेत. आसाममधल्या स्थानिक मुसलमानांची अस्मिता असलेला बाघ हजारिका लचितच्या हिंदुत्वीकरणामुळे दुर्लक्षित केला जातोय. मुख्यमंत्र्यांच्या मते, आहोम राजवटीचं दस्तावेजीकरण मानल्या जाणाऱ्या बुरांजी साहित्यात बाघचा उल्लेख नाही. त्यामुळे फक्त डाव्या बुद्धीजीवींच्या हितासाठी हे काल्पनिक पात्र निर्माण केलं गेलंय.

इतिहासाचं विद्रूपीकरण कुणाच्या फायद्याचं?

आसाममधे जे होतंय, तेच सध्या भारतभरही होतंय. स्वराज्यात मुसलमान सैनिक नव्हते असं सांगून परकीय आक्रमणाविरोधात स्थानिक मुसलमानांनी दिलेलं योगदान नाकारलं जातंय. छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्यरक्षक अशी व्यापक प्रतिमा टाळून त्यांना धर्मवीर म्हणत एकाच धर्मापुरतं मर्यादित केलं जातंय. कर्नाटकमधे इंग्रजांविरुद्ध लढलेल्या कित्तूरच्या राणी चेन्नम्माचं उदाहरण देताना त्याच राज्यातल्या टिपू सुलतानला मात्र सतत हिंदूविरोधी रंगवण्यात येतंय.

मुघल प्रशासक मुसलमान असल्याने सध्याच्या काळात भाजप त्यांना हिंदुत्वाचे शत्रू म्हणून रंगवतोय. त्यामुळे मुघलांशी लढा देणाऱ्यांना हिंदुत्ववादी राजकारणाचा चेहरा बनवणं भाजपला सोपं जातंय. त्यामुळेच लचित हा हिंदू तर बाघ हा मुसलमान नायक नसून ते दोघेही आसामी नायक आहेत हे सांगू पाहणाऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करतंय. त्यासाठी थेट इतिहासच बदलायचा घाट सर्मा सरकारने घातलाय.

चीनच्या ताई आहोमांनी आपली राजवट प्रस्थापित करताना आंतरसांस्कृतिक संबंधांवर भर दिला होता. आपली संस्कृती स्थानिकांवर न लादता त्यांची संस्कृती आत्मसात करून एक नवी सांस्कृतिक चळवळ आहोमांनी उभारली. आहोमांची ही आंतरसांस्कृतिक संबंधांवर आधारित चळवळ भाजपच्या सांस्कृतिक दहशतवादाच्या चौकटीच्या अगदीच विरुद्ध आहे. असं असलं तरी केवळ सराईघाटच्या लढाईच्या जोरावर सर्मांना आहोम राजवटीला हिंदुत्ववादी ठरवणं सोपं जातं.

सत्तेच्या चाव्या हातात असल्याने आपल्या राजकीय फायद्यासाठी इतिहासात हवा तसा बदल करणं हा प्रत्येक सत्ताधीशाचा स्थायीभाव असतो आणि सध्या भाजपही हेच करतोय. सत्ताकारणाला पूरक ठरणाऱ्या सांस्कृतिक दहशतवादाचा भाग म्हणून प्रादेशिक अस्मितेच्या नायकांना धार्मिक कोंदणात बसवलं जातंय. त्यांचं महत्त्व जाणीवपूर्वक खुजं केलं जातंय. लचित बोरफुकन आणि बाघ हजारिका हेही याच विद्रूपीकरणाचे बळी ठरलेत.

हेही वाचा: 

शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

या शिवजयंतीला प्रबोधनकारांचा `दगलबाज शिवाजी` वाचायलाच हवा

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

अफजलखानाचा कोथळा काढला यात दगलबाज शिवरायाचं काय चुकलं?