प्रजासत्ताक दिनाचं संचलन, शक्ती-प्रगती-संस्कृतीचा उत्सव

२६ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज २६ जानेवारी. भारताच्या लोकशाही प्रजासत्ताकाला ७२ वर्ष होतायत. विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडं पाहिलं जातं. स्वातंत्र्यानंतर भारतानं मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या अभिमानाने जगासमोर मांडणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं.

भारताने लोकशाही प्रजासत्ताकाची चौकट स्वीकारली, त्याला ७२ वर्षं पूर्ण झाली. या प्रदीर्घ कालखंडात आपल्या देशानं प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून प्रगतीचे अनेक टप्पे पार केले. हरितक्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेल्या आपल्या देशानं दुसरीकडे औद्योगिक प्रगतीही सुरूच ठेवली. अवजड उद्योगांपासून सॉफ्टवेअर उद्योगापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी चमक दाखवली.

शिक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे भारतीय प्रतिभावंतांनी जगभरात मानाचं स्थान मिळवलंय. असंख्य बड्या कंपन्यांचे सीईओ मूळ भारतीय वंशाचे आहेत. अंतरिक्ष संशोधनाच्या क्षेत्रात आज आपण प्रगत देशांच्या पंक्तीत उभे आहोत. प्रगत देशांनी सहकार्य नाकारल्यानंतर गप्प न राहता ‘इस्रो’सारख्या संस्थेने जिद्दीने स्वबळावर प्रवास केला. दुसरीकडे ‘डीआरडीओ’सारख्या संस्थेने संरक्षण संशोधनाच्या क्षेत्रात भरारी घेतली.

आज विकसित होत असलेली एक आर्थिक शक्ती म्हणून जशी जगाला आपली दखल घ्यावी लागते, तशीच एक महत्त्वाची लष्करी ताकद म्हणूनही भारताकडे पाहिलं जातं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने मिळवलेली शक्ती, साधलेली प्रगती आणि राखलेली संस्कृती या गोष्टी अभिमानाने जगासमोर मांडणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. 

हेही वाचा: इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा

संचलनाची रुबाबदार सुरवात

प्रजासत्ताक दिनाचं मुख्य आकर्षण असलेल्या या संचलनाची सुरवात १९५०मधेच झाली होती. राजपथावर पहिल्यांदा १९५५ला संचलन झालं. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावला गेल्यानंतर संचलनाला सुरवात होते. राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेट आणि नंतर ऐतिहासिक लाल किल्ला असा या संचलनाचा मार्ग असतो. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या अनेक रेजिमेंटस आपापल्या खास बँडसोबत या संचलनात सहभागी होतात.

त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमधलं सांस्कृतिक संचिताचं दर्शन घडवणारे चित्ररथ असतात. मार्चपास्टबरोबरच फ्लायपास्ट हे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातली वेगवेगळी विमानं आकाशात घरघरू लागतात, तेव्हा सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागतात. तीन रंगांची उधळण करत ही विमानं चित्तथरारक कसरती करतात.

अमर जवान ज्योती हे राजपथावरचं राष्ट्रीय युद्धस्मारक आहे. हुतात्मा जवानांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण केल्यानंतर दोन मिनिटं मौन पाळून आदरांजली वाहिली जाते. स्वातंत्र्य चळवळ, त्यानंतरची युद्धं, शांतता मोहिमा आणि आपत्ती निवारणाच्या कार्यात देशासाठी बलिदान करणार्‍या हुतात्म्यांचं स्मरण केल्यानंतर मान्यवर मुख्य व्यासपीठावर येतात.

नंतर प्रमुख पाहुण्यांसह राष्ट्रपतींचं आगमन होतं. दरवर्षी एखाद्या राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जातं. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्णो हे प्रमुख अतिथी होते. राष्ट्रपतींच्या अंगरक्षक घोडेस्वारांचा रुबाब पाहण्यासारखा असतो.

संरक्षण सिद्धतेची झलक

बीटिंग रिट्रीटची सुरवात १९५२मधे झाली. त्यावेळच्या संचलनात पहिल्यांदाच ट्रॅक्टर सहभागी झाले होते. या ट्रॅक्टरमधे भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारे चित्ररथ होते. शांततेचा संदेश देणारं पांढर्‍या कबूतराचं चिन्हही ट्रॅक्टरवर लावण्यात आलं होतं. राष्ट्रपतींनी राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्रगीत वाजवलं जातं आणि तोफखाना रेजिमेंटकडून २१ तोफांची सलामी दिली जाते.

राष्ट्रपती मंचावर विराजमान झाल्यानंतर अशोक चक्र, कीर्ती चक्र असे शौर्य पुरस्कार प्रदान केले जातात. सशस्त्र सैन्य दलातल्या जवानांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल हे सन्मान दिले जातात. ज्यांनी बलिदान केलं, त्यांच्या कुटुंबीयांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. त्याचवेळी आपत्ती आणि आणीबाणीच्या वेळी कर्तव्याची जाण ठेवून लोकांना मदत करणार्‍यांचा विशेषतः बालवीरांचा गौरव करण्यात येतो.

त्यानंतर सुरू होणार्‍या संचलनाचं नेतृत्व परेड कमांडर आणि त्यांचे सेकंड इन कमांड करतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारी मुलं संचलनात सजवलेल्या गाड्यांवर किंवा हत्तीवर स्वार होतात. तोफखाना दलातले रणगाडे, मोठी शस्त्रास्त्रं, क्षेपणास्त्रं, लष्करी वाहनं, चिलखती वाहनं आणि इतर आयुधांचं प्रदर्शन संचलनात केलं जातं. देशाच्या संरक्षण सिद्धतेची ही झलक असते.

हेही वाचा: तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांचं आकर्षण

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे रंगीत चित्ररथ आणि वेगवेगळ्या राज्यांची सांस्कृतिक ओळख सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम. महाराष्ट्राचा चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच लक्षवेधी ठरतात. महाराष्ट्राच्या अनेक चित्ररथांना पुरस्कारही मिळाले आहेत. महाराष्ट्राने आजवर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमापासून संतांनी दिलेल्या विवेकाच्या शिकवणुकीपर्यंत अनेक विषय चित्ररथांमधे अत्यंत कलात्मकतेने हाताळले.

महाराष्ट्रासह एकंदर १२ राज्यांचे चित्ररथ यावर्षी संचलनात सहभागी होणार आहेत. यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ खूपच वेगळा आणि लक्षवेधी असेल, याची खात्री आहे. कारण यावर्षीचा विषय आहे ‘महाराष्ट्राची जैवविविधता’! दिल्लीच्या राष्ट्रीय रंगशाळेत या चित्ररथाची उभारणी उत्साहात सुरू आहे.

जैवविविधता हा मुळातच खूप मोठा विस्तार असलेला विषय आहे. जैवविविधतेत वृक्षसंपदा, प्राणी, जलचर, उभयचर, पक्षी आणि संबंधित भागातल्या कृमी-कीटक आणि सूक्ष्मजीवांचाही समावेश होतो. यात निसर्गाची संपूर्ण जैवसाखळी असते. महाराष्ट्रात पश्चिम घाटासह इतर ठिकाणीही प्रचंड जैववैविध्य आढळून येतं.

चित्ररथांचा इतिहास

चित्ररथांनाही मोठा इतिहास आहे. १९५२मधे पाच चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते आणि ते सगळे केंद्र सरकारनेच तयार केले होते. हळूहळू राज्यं या संचलनात आपापल्या चित्ररथासह सहभागी होऊ लागली. महाराष्ट्राचा चित्ररथ १९७१पासून संचलनात सहभागी होत आहे.

पंढरपूरची वारी, औद्योगिक प्रगती, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य चळवळ आणि त्यातल्या महाराष्ट्राचे योगदान, महाराष्ट्रातल्या विविध लोककला, सण-उत्सव, इथला गणेशोत्सव, कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, दहीहंडी, महिलांचा विकास, देशाची आर्थिक राजधानी, अजंठा-वेरूळची लेणी अशा वेगवेगळ्या विषयांवरचे चित्ररथ महाराष्ट्राने साकारले आणि ते गाजले.

दरवर्षी सामान्यतः १६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना चित्ररथ साकारण्याची संधी मिळते. मोठ्या प्रक्रियेनंतर साकारलेले चित्ररथ संचलन पाहायला आलेल्यांना भुरळ घालतात. संचलनाचा हा सोहळा दिमाखदार असतो.

हेही वाचा : 

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न 

शिवरायांच्या डच चित्राच्या दंतकथांचा पर्दाफाश

चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना सोयीसुविधा कधी देणार?

केंद्राच्या कायद्याला राज्य सरकार आव्हान देऊ शकतं का?