शरद पाटील: अन्यायाविरुद्ध भूमिका घेणारे प्राच्यविद्यापंडित

१७ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ८ मिनिटं


सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि जातीव्यवस्थेविरुद्ध लढा देणाऱ्या चळवळीतले खंदे विचारवंत शरद पाटील यांची आज जयंती. शरद पाटील हे एक अत्यंत रोखठोक, निर्भीड, प्रामाणिक, हिम्मतवान तत्त्वज्ञ आणि इंडोलॉजिस्ट होते. विद्वानांनी भूमिका घ्यायची नसते, रस्त्यावर उतरायचं नसतं, या प्रतिमाप्रेमावर त्यांनी हातोडा मारला. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा लेख.

शरद पाटील हे महान संस्कृत पंडित होते. फक्त मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालेल्या त्यांच्यावर सत्यशोधक आणि वारकरी विचारांचा प्रभाव होता. पारंपारिक मार्क्सवाद्यांच्या मतभेदानं ते सखोल संस्कृत अध्ययनाकडे वळले. वयाच्या ४२व्या वर्षी बडोद्याला जाऊन त्यांनी संस्कृतवरती प्रभुत्व मिळवलं.

त्यांनी पाणिनी व्याकरण, वेद, महाकाव्यं, पुराण, उपनिषद असं भारतीय संस्कृत साहित्य मुळापासून वाचलं. पाली, हिंदी, इंग्रजी अशा भाषांवर त्यांचं कमालीचं प्रभुत्व होतं. भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञान त्यांनी अभ्यासलं. 

सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना

शरद पाटील हे फक्त पारंपारिक, पुस्तकी, संस्कृत पंडित नव्हते, तर इंडोलॉजी, पुरातत्वशास्त्र, स्त्रीवाद, राज्यशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, भाषाशास्त्र, मानवशास्त्र, मानसशास्त्र अशा ज्ञानशाखांचे महाविद्वान होते. त्याला मार्क्सवादाची जोड असल्यामुळे ऐतिहासिक भौतिकवाद ते मांडू शकले. ते संशोधनशास्त्र विकसित करू शकले, पण ते पारंपारिक मार्क्सवादी नव्हते. मार्क्स कुठं चुकला, हे ते कॉ. बी. टी. रणदिवे यांना सप्रमाण सांगू शकले.

मार्क्सचं चुकलेलं गणित निदर्शनास आणून देणारा जगातला पहिला अभ्यासक म्हणजे शरद पाटील. ते मार्क्सवादी होते, पण ते मार्क्सचे अंधभक्त नव्हते. भारतीय समस्यांचं उत्तर युरोपीय तत्वज्ञानात नाही, तर भारतीय तत्वज्ञानातच त्यांनी शोधलं. ते त्यांना प्राचीन स्त्रीसत्ताक व्यवस्था, महावीर, बुद्ध, महायानी तत्वज्ञानात सापडलं. यामुळे शरद पाटील हे नवमार्क्सवादी ठरतात. ते पारंपरिक किंवा आंधळे मार्क्सवादी नव्हते.

भारतीय परिप्रेक्ष्यात मार्क्सला मर्यादा आहेत, हे ओळखून त्यांनी सांस्कृतिक लढा मांडला. त्यांनी मार्क्सवादाला फुले-आंबेडकरांच्या तत्वज्ञानाची जोड दिली. यालाच ‘माफुआ’ म्हणतात. त्यानंतर त्यांनी मार्क्सला बुद्धाच्या तत्वज्ञानाची जोड दिली. यालाच सौत्रांतीक मार्क्सवाद म्हणतात. भारतीय मार्क्सवादाला सनातनी विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी नवं तत्वज्ञान आणि सत्यशोधक कम्युनिस्ट हा नवा राजकीय पक्षही दिला. 

हेही वाचा: डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक

वैचारिक विरोधकांचा आदर

त्यांचा आवाका अँटोनिओ ग्रामचीपेक्षा मोठा होता. ते प्रतिमाप्रेमात अडकले नाहीत, त्यामुळे ते बुद्ध, शिवाजी महाराज ते डॉ. आंबेडकर मांडू शकले. त्यांना स्वतःला सर, साहेब म्हटलेलं आणि पाया पडलेलं अजिबात आवडत नव्हतं. हे सर्व त्यांनी अहंकाराचा त्याग केल्यामुळे घडलं. त्यांच्या ज्ञानाचा परिप्रेक्ष्य जागतिक स्तरावरचा होता, पण पाय कायम जमिनीवर होते.

त्यांना भेटायला येणाऱ्याशी ते कधीही झोपून बोलले नाहीत, ते अगदी नव्वद वर्षाचे झाले तरी उठून बसायचे आणि नंतर बोलायला सुरवात करायचे. ते परखड होते, पण त्यांनी वैचारिक विरोधकांचाही कधी अनादर केला नाही. ते कर्मठ नव्हते, त्यामुळेच ते बहुप्रवाही अन्वेषण करू शकले. पण ते आपल्या मतांशी ठाम होते.

त्यांना प्रतिवाद आवडायचा. पण तो अभ्यासू, दर्जेदार, सुसंस्कृत आणि निकोप असायला हवा, हे त्यांचं मत होतं. सुसंस्कृत, विद्वान व्यक्तीशी त्यांनी आनंदानं प्रदीर्घ वैचारिक वादविवाद केले पण फालतू, दर्जाहीन विरोधकांकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. त्यांनी आजन्म खूप अनमोल कार्य केलंय. त्यांनी कोणाचा द्वेष केला नाही.

वैचारिक मतभेद असणाऱ्यांशी त्यांनी कधीही वैरभाव ठेवला नाही. त्यांनी गटबाजी केली नाही. आपले हितचिंतक आपल्या वैचारिक विरोधकांच्या अंगावर सोडले नाहीत. त्यांना वैचारिक वाद आवडायचा. आक्षेप घेणारांना त्यांनी कधीही टार्गेट केलं नाही, तर त्यांच्या मताचा आदर केला. वैचारिक विरोधकांशीही आकस न ठेवता वैचारिक सुसंवाद ठेवला पाहिजे, अशी प्रगल्भ विचारधारा त्यांच्याकडे होती. 

दिवसा क्रांती, रात्री लेखणी

त्यांच्या संशोधनाची पद्धत एकप्रवाही नव्हती, तर ती बहुप्रवाही असल्यामुळे ते मूलभूत संशोधन करून दडपल्या गेलेल्या इतिहासाची उकल करू शकले. ते जाणीवनेणीव अन्वेषण पद्धतीचे जनक आहेत. त्यांनी सिग्मन फ्राईडच्या पुढचा टप्पा गाठला. ते इंडोलॉजीबरोबर मानसशास्त्र, तर्कशास्त्र अशा ज्ञानाशाखांचे अभ्यासक होते. गणिताची मदत घेण्यासाठी त्यांनी कुलगुरू डॉ. नानासाहेब ठाकरे, डॉ. के. बी. पाटील या गणितज्ञांची मदत घेतली.

त्यांचा आवाका जागतिक स्तरावरचा असल्यामुळे ते जागतिक तज्ञ ठरतात. ते दिवसा आदिवासी, कामगार, शेतकरी, महिलांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे होते आणि रात्री त्यांचा इतिहास लिहणारे क्रांतिकारक इंडोलॉजिस्ट होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात ते अग्रभागी होते. त्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला.

विद्वानांनी भूमिका घ्यायची नसते, रस्त्यावर उतरायचं नसतं, या प्रतिमाप्रेमावर त्यांनी हातोडा मारला. २००४ला धुळ्यात पुरंदरेंच्या विरोधातल्या मोर्चाचं त्यांनी नेतृत्व केलं. शुगर, बीपी असताना उन्हात चालून त्यांनी पुरंदरेला विरोध केला. आपण जागतिक स्तरावरचं असताना पुरंदरेला विरोध करायला रस्त्यावर कसं यायचं? हा स्वार्थी विचार त्यांनी केला नाही. जेम्स लेन प्रकाराचं मूळ हे भांडारकरी भटात कसे आहे, हा प्रदीर्घ लेख त्यांनी लिहिला. 

हेही वाचा: महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

प्रतिमाप्रेमाला कठोर विरोध

ते आपल्या जागतिक स्तरावरच्या पांडित्याला कुरवाळत बसणारे नव्हते, तर भूमिका घेणारे होते. अनेक आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला, पण ते मागे हटले नाहीत. संकटसमयी ते लढणारे होते, रडणारे नव्हते. प्रतिमा प्रेमात ते अडकले नाहीत. त्यांना कुणाचाही भक्त झालेलं आवडत नव्हतं. भक्त झालात तर विचार करायची क्षमता संपते. निःपक्षपाती भूमिका घेताना मर्यादा येतात, त्यामुळे नवनिर्मितीला अडथळा निर्माण होतो, असं त्यांचं ठाम मत होतं.

त्यामुळेच त्यांनी मेंडकाची कथा मांडली आणि बुद्ध कोणी ईश्वरी अवतार नव्हता, तर तोही मानवच होता, हे सिद्ध केलं. एखाद्या व्यक्तिप्रेमात अडकलात की तो व्यक्ती चुकला तर त्याच्यामागे फरफटत जावं लागतं, त्यामुळे ते स्वतःला सर, साहेब म्हणून घेत नसत. ते स्पष्ट सांगत ‘मला शरद पाटील किंवा कॉम्रेड म्हणजेच भाऊ म्हणा.’ पाया पडून घेणं हे आज्ञाधारकतेपेक्षा वर्चस्ववादाचं लक्षण आहे, असं ते मानायचे.

मेहंदळेंचा वैचारिक पराभव

शरद पाटील त्यांच्या मार्क्सवादी, सौत्रांतीक मार्क्सवादी, अब्राह्मणी, बहुप्रवाही, जाणीवनेणिव दृष्टिकोनामुळे निऋती, आंबपाली, शूर्पणखा यांचा दडपलेला इतिहास मांडू शकले. जगात सुरवातीला स्त्रीराज्ये होती. निऋती ही सप्तसिंधु खोऱ्यातली आद्य महाराणी होती, हे त्यांनी ‘दासशूद्राची गुलामगिरी’ या जगप्रसिद्ध ग्रंथात मांडलं. हा त्यांचा अभिजात ग्रंथ आहे.

याबद्दल झालेल्या वादात ते संस्कृत पंडित डॉ. एम. ए. मेहंदळेंना पुरून उरले. मेहंदळे हे महान संस्कृत पंडित आणि वेदाचे अभ्यासक होते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारनं पद्मश्री आणि डेक्कन कॉलेजनं डी. लिट. दिलीय. अशा मेहंदळेंना त्यांनी वैचारिक वादात पराभूत केलं, पण त्यांच्याशी वैरभाव ठेवला नाही. डॉ. मेहंदळेंशी त्यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते. डॉ. मेहंदळेंबद्दल ते नेहमी आदरानं बोलायचे.

हेही वाचा: नागनाथअण्णा जिवंतपणी दंतकथा बनले, त्याची गोष्ट

जागतिक स्तरावरचे प्राच्यविद्यापंडित

आंबपाली ही वेश्या नसून ती वैशालीच्या म्हणजेच बिहारच्या स्त्रीराज्याची महाराणी होती, हे मांडून त्यांनी महापंडित राहुल सांस्कृत्यायन यांचं खंडन केलं. शूर्पणखा म्हणजे हाताच्या बोटाच्या सुंदर नखावरती लीलया सूप धरून धान्य पकडणारी जनस्थान म्हणजेच नाशिक आणि गोदावरी खोऱ्याची महाराणी होती. तिचं स्त्रीराज्य आर्यराज्यविस्तारक रामानं संपवलं, असं शरद पाटील ‘रामायण महाभारतातला वर्णसंघर्ष’ या ग्रंथात मांडतात. यासाठी ते अभिजात संदर्भ देतात.

महान प्राच्यविद्यापंडित डी. डी. कोसंबी, आर. एस. शर्मा, राहुल सांस्कृत्यायन, भांडारकर, रोमिला थापर जिथं थांबतात तिथून शरद पाटील सुरु होतात. दडपल्या गेलेल्या इतिहासाची त्यांनी उकल केली. ते म्हणायचे ‘सत्य लपवता येतं, पण संपवता येत नाही, सत्य इतिहास असत्य इतिहासाबरोबर सावलीसारखा सोबत येत असतो.’

त्याची उकल त्यांनी बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीनं अनेक ज्ञानशाखांच्या आधारे केली. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातलं अशक्य काम त्यांनी शक्य करून दाखवलं, म्हणूनच शरद पाटील हे जागतिक स्तरावरचे प्राच्यविद्यापंडित ठरतात. पण तशी ओळख सांगायची गरज त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना कधीही भासली नाही. ते जागतिक स्तरावरचे प्राच्यविद्यापंडित असूनही त्यांनी त्याचा कधी गर्व केला नाही किंवा तशी जाहिरात केली नाही.

समतावादी समाजरचनेचे पुरस्कर्ते

त्यांनी अनेक नामवंत पुरस्कार नाकारले. पैसा, प्रसिद्धी, प्रमोशन, प्रतिष्ठा, पुरस्कार याचा हव्यास न धरता त्यांनी हयातभर संशोधन, लेखन आणि प्रबोधन केलं. त्यांचं साहित्य सामान्य कार्यकर्त्याला कळतं, पण विद्वानांना का समजत नाही, याचं त्यांना आश्चर्य वाटायचं. प्रामाणिकपणे वाचलं तर त्यांचं साहित्य समजायला खूप सोपं आहे.

त्यांचं साहित्य खूप कठीण आहे, हा विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे. न वाचता समजणारं तंत्र अजून विकसित झालेलं नाही. त्यांनी इतिहासपूर्व काळापासून ते प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिक इतिहासकाळापर्यंतचं विपुल आणि मूलभूत लेखन केलंय.

त्यांच्या संशोधनाबद्धल संत तुकाराम महाराज चरित्राचे गाढे अभ्यासक, नामवंत विचारवंत, इतिहास, धर्मशास्त्र, संस्कृत, तत्वज्ञान आणि संतसाहित्याचे महान भाष्यकार डॉ. सदानंद मोरे म्हणतात, ‘गेल्या पाच हजार वर्षांचा बहुजनांच्या ज्ञानाचा बॅकलॉग एकट्या शरद पाटील यांनी भरून काढला. शरद पवार यांनी राजकीय क्षेत्रात, शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेत आणि शरद पाटील यांनी संशोधन क्षेत्रात देदिप्यमान कार्य केले. ते समतावादी समाजरचनेचे पुरस्कर्ते होते.’

हेही वाचा: गोविंद पानसरे: डोंगराला भिडणारा म्हातारा

अब्राम्हणी दृष्टीकोनातून केली मांडणी

त्यांनी निऋतीचा शोध लावला. त्यांनी तथागत गौतम बुद्धाचं, शिवरायांचं, संभाजीराजांचं क्रांतिकारक चरित्र लिहलंय. संभाजीराजांच्या सल्ल्यावरून शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक केला, इतकी मोठी योग्यता आणि विद्वता संभाजीराजांची होती.

संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले. त्यामुळे त्यांचा प्राण वाचला नाहीतर ब्राह्मण मंत्र्यानी त्यांना त्यावेळीच ठार मारलं असतं, हे अन्वेषण शरद पाटील करू शकले, हे त्यांच्या अब्राह्मणी दृष्टिकोनामुळे.

मंत्र्यांनी संभाजीराजांना तीन वेळा ठार मारायचा प्रयत्न केला होता, ही त्यांची प्रतिकात्मक हत्या होती, ती पुढे प्रत्यक्ष औरंगजेबानं केली. औरंगजेब मुस्लिमांमधला सनातनी होता, हे अन्वेषण त्यांनी केलं. 

जगभरातल्या अभ्यासकांचा विषय

शिवाजीराजांवरच्या पुस्तकाचा प्रतिवाद करण्याचं आव्हान त्यांनी १९९२ला मुंबईच्या प्रकाशन सभेत केलं होतं. त्याप्रसंगी ते म्हणाले, ‘या आणि शिवाजीवरील या पुस्तकाबाबत डिबेट करा.’ त्यानंतर ते २१ वर्षं जिवंत होते. त्यांचा प्रतिवाद करण्याची हिंमत त्यांच्या हयातीत कोणत्याही विद्वानांनी दाखवली नाही.

त्यांच्या हयातीत कोणी प्रतिवाद केला असता तर त्यांना त्याचा आनंदच झाला असता आणि नवीन मांडणी समोर आली असती. त्यांना अतीव ज्ञानाचा गर्व किंवा अहंकार नव्हता. इतिहास संशोधक डॉ. य. दि. फडके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी त्याच वेळेस उत्तरे दिलेली आहेत, ती मावळाई प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या शिवाजी महाराजांवरच्या सुधारितग्रंथात आहेत.

त्यांच्या संशोधनावरही डिबेट होऊ शकतो. पण तो त्यांचा द्वेष करून, त्यांना अनुल्लेखानं मारून, त्यांच्या साहित्यावर बहिष्कार टाकून, त्यांचा अवमान करून होऊ शकत नाही. कारण शरद पाटील ही व्यक्ती नाही तर ती आता एक जगविख्यात शाळा झालीय. त्यांच्या साहित्यावर आज जगभरातले अभ्यासक अभ्यास करतायत. 

हेही वाचा: महाराष्ट्राचा महानायक : निळू फुले

भारतीय सौंदर्यशास्त्राची मांडणी

भारतीय तत्वज्ञानाच्या क्षेत्रात झालेला ब्राम्हणी-अब्राह्मणी संघर्ष त्यांनी ‘जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व’ या ग्रंथात मांडला. महायान पंथातल्या अश्वघोष, असंग, वसुबंधू, दिग्नाग, धर्मकीर्ती अशा तत्ववेत्यांनी ब्राह्मणी छावणीविरोधात दिलेला वैचारिक लढा त्यांनी या ग्रंथात मांडलाय. दिग्नागानं वैचारिक वादात महाकवी कालिदासाला पराभूत केलं.

दिग्नाग धर्मकिर्ती यांनी निर्माण केलेल्या सौंदर्यशास्त्राचं विस्तृत विवेचन त्यांनी केलंय. भारतातही सौंदर्यशास्त्र होतं. त्याचा उगम स्त्रीराज्यात होता. त्याविरुद्ध भरतमुनीनं ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र आणलं. त्याचा प्रतिवाद अश्वघोष ते दिग्नाग यांनी केला. हे भारतात प्रथमतः त्यांनी मांडलं. भारतीय कला, साहित्य आणि तत्वज्ञानाचं सौंदर्यशास्त्र मांडणारा पहिला दार्शनिक म्हणजे शरद पाटील आहेत. 

वैचारिक गुलामगिरी नाकारणारं साहित्य

शरद पाटील यांचं मोठेपण जेवढं त्यांच्या विद्वतेत आहे, तेवढंच त्यांच्या रोखठोक भूमिकेत आहे. आत एक, बाहेर दुसरं असा ढोंगीपणा त्यांच्याजवळ नव्हता. त्यांनी वेळच्या वेळी भूमिका घेतली. रिडल्स प्रकरणात त्यांनी भूमिका घेऊन डॉ. आंबेडकरांच्या बाजूने वाल्मिकी रामायणातले पुरावे देऊन विरोधकांना पराभूत केलं आणि राम कसा मांसाहारी होता, हे वाल्मिकी रामायणाचा आधार देऊन स्पष्ट केलं.

त्यांनी नामांतराच्या लढ्यात भूमिका घेतली. जेम्स लेन प्रकरणात त्यांनी भूमिका घेतली. विद्वानांनी संशोधनाबरोबरच रस्त्यावरची लढाई लढायची असते, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. ते एक अत्यंत रोखठोक, निर्भीड, प्रामाणिक, हिम्मतवान तत्त्वज्ञ आणि इंडोलॉजिस्ट होते. स्वतःची आणि मानव समूहाची उंची वाढवण्यासाठी त्यांची ग्रंथसंपदा आवर्जून वाचा.

त्यांचं साहित्य अंधभक्त तयार करत नाही, तर विचारशील, सृजनशील, बंडखोर, निर्भीड, कृतिशील अभ्यासक तयार करतं. त्यांचे ग्रंथ वाचणारा कधीही कोणाचा गुलाम होऊ शकत नाही, इतकी ताकद त्यांच्या साहित्यात आहे. त्यांना समजून घेण्यासाठी त्यांचं तत्वज्ञान मुळापासून वाचायलाच हवं.

हेही वाचा: 

समर्पणाचं दुसरं नाव मेधा पाटकर!

र धों. कर्वेंचा बुद्धिवाद अस्सल आणि आरपार होता

आप्पासाहेब सा. रे. पाटील: असाही असतो 'साखर कारखान्याचा चेअरमन'

रानडे-फुले यांच्यात मतभेद असूनही दोघांची समाजसुधारणा तत्त्वं एक होती!