प्राचार्य राम शेवाळकर: विपुल लेखनाआड दडलेलं संवेदनशील कवीमन

०३ मे २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज प्राचार्य राम शेवाळकर यांचा स्मृतिदिन. प्राचार्य राम शेवाळकरांच्या वाणी आणि लेखणीनं साऱ्या जगातल्या मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सार्‍या लेखनातून त्यांच्या संवेदनशील कवीमनाचाही प्रत्यय येतो. या लेखातून शेवाळकरांच्या कवितेच्या एका सामर्थ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेलाय.

प्राचार्य राम शेवाळकरांच्या वाणी आणि लेखणीनं साऱ्या जगातल्या मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या वाणीनं इतिहास घडवला. त्यांनी विपुल लेखन केलं.

कविता, आत्मकथनपर लेख, व्यक्तिवेध घेणारं लेखन, चरित्रात्मक लेखन, अनुभवपर लेखन, संस्कृत साहित्यकृतींचा आस्वाद घेणारं लेखन, शिक्षणविषयक लेखन, अलक्षित इतिहासासंदर्भात नवं आकलन मांडणारं लेखन, चिंतनात्मक लेखन, समीक्षणात्मक लेखन असं विपुल लेखन त्यांनी केलं. त्याशिवाय महत्त्वाचे अनुवाद, वैशिष्ट्यपूर्ण संपादन आणि काही नियतकालिकांचं संपादनही केलं.

संवेदनशील कवीमनाचे शेवाळकर

प्राचार्य शेवाळकरांच्या या सार्‍या लेखनातून त्यांच्या प्रसन्न, सकारात्मक जीवनदृष्टीचा प्रत्यय येतो तसंच त्यांच्या संवेदनशील कवीमनाचाही प्रत्यय येतो. हे सारं लेखन नवे संदर्भ, नवी दृष्टी, नवा विचार देणारं आहे. या विपुल लेखनामधे त्यांनी सुरवातीच्या काळात लिहिलेले तीन कवितासंग्रहही आहेत. ‘असोशी’, ‘रेघा’ आणि ‘अंगारा’ हे तीन कवितासंग्रह शेवाळकरांच्या संवेदनशील कवीमनाची साक्ष देणारे आहेत.

या लेखातून शेवाळकरांच्या कवितेच्या एका सामर्थ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. खरं तर प्राचार्य राम शेवाळकरांच्या संपूर्ण कवितांचं संपादन करण्याची गरज आहे. त्यांचे तीन कवितासंग्रह, या संग्रहातल्या कवी मंगेश पाडगावकर आणि समीक्षक नरहर कुरुंदकर यांच्या प्रस्तावनांसहित या कवितेचं जतन करण्याची गरज आहे. 

‘असोशी’च्या अर्पणपत्रिकेतलं मातृप्रेम 

प्राचार्य राम शेवाळकरांचा ‘असोशी’ हा पहिला कवितासंग्रह डिसेंबर १९५६मधे नागपूरच्या पराग प्रकाशनानं प्रकाशित केला. या संग्रहात साधारणपणे १९४९-१९५०पासून लिहिलेल्या कवितांचा समावेश आहे. हा संग्रह ‘कै.बाईच्या आठवणीप्रमाणेच विषण्णरम्य असणाऱ्या सायंकालीन अंतराळास’ अर्पण केलाय. कै. बाई म्हणजे राम शेवाळकरांची आई.

शेवाळकर अवघे अडीच वर्षांचे असताना बाईंचा मृत्यू झाला. आईच्या चेहऱ्याची, स्पर्शाची इवल्याशा बालमनानं पुढं आयुष्यभर जपलेली हळवी स्मृती या कवितासंग्रहाच्या पहिल्या पानावर शब्दरूप झालीय. आईविषयी ‘पाणियावरी मकरी’ मधे शेवाळकर लिहितात,

‘आज मनामधे बाईची मूर्ती आहे ती रोजच्या फोटोपुढच्या नमस्कारामुळे. अनेकांकडून अनेकदा, नि आजीकडून पुनःपुन्हा ऐकलेल्या आख्यायिकांनी नि आठवणींनी या मूर्तीचे काही तपशील ठळक केले आहेत. एरव्ही ती आहे तशीच आहे : पाहाता पाहाता विरलेल्या स्वप्नासारखी. जिवाला चटका लावून गेलेली, नि अखंड हुरहूर शिल्लक ठेवणारी. अजून ती तशीच आहे. आई असावी, तर अशीच - असे वाटायला लावणारी. आणि अशी - एवढीशी आई कुणालाही असू नये, असेही कळवळून वाटायला लावणारी!’

या शब्दांत आईविषयीची तीव्र ओढ आणि तिच्या वियोगाचं शब्दातीत दुःख साकळलंय. सायंकालीन अंतराळ रम्य आहे पण विषण्ण करणारं आहे. हे शब्दांत न मावणारं मातृवियोगाचं दुःख आहे. ‘असोशी’ या शब्दांत न संपणारी तीव्रतम तृष्णा असा अर्थ दडलाय. मातृप्रेमाची, मातृसहवासाची अनावर तृष्णा शेवाळकरांच्या मनात आयुष्यभर मंद जळणाऱ्या दिव्याप्रमाणे तेवत होती. ‘असोशी’ या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेतून मातृप्रेमाची ही अनावर तृष्णा उजागर झालीय.

हेही वाचा: गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र

मातृगौरव गाणारी ‘पाहुणा’

जानेवारी १९६७मधे पुण्याच्या विनस प्रकाशनानं शेवाळकरांचा ‘रेघा’ हा दुसरा कवितासंग्रह 
प्रकाशित केला. या संग्रहातली ‘पाहुणा’ ही कविता लक्षणीय आहे. 

कळा झाल्या कळ्या
आणि उणावल्या वेणा
देहातून गेही बाई
आला इवला पाहुणा

इवल्याशा पाहुण्याचे
साय माखले कौतुक
बोबड्या स्मिताने पटे
उभ्या जन्माचे सार्थक

जन्माचे सार्थक,तशी
धन्य कुशीची पुण्याई
सारे अंग मांडी झाले
फुटे स्पर्शाला अंगाई

मूल जन्माला येण्याचा आनंद या कवितेत अभिव्यक्त झालाय. या आनंदातच मातृगौरव, मातृवंदन आहे. कवीनं इथं स्त्रीच्या सृजनशीलतेचा गौरव केलाय. मातृत्वाचा अनुभव विलक्षण असतो.

प्रसूती वेदनांचं समर्पक वर्णन

इवला पाहुणा देहातून येतानाच्या कळा साक्षात कळ्या व्हाव्यात, ही कल्पनाच मनाला भुरळ पाडणारी आहे. कळ्या या सृजनशीलतेचं प्रतीक असतात. आनंदभावनेचं त्या प्रतिनिधित्व करतात. गर्भारपणातल्या कळा आणि प्रसूतिवेदना मुलाच्या जन्माबरोबर आनंदाच्या कळ्या व्हाव्यात, सार्‍या वेदना, अगदी जीव नकोसा करणार्‍या कळ्या अगदी क्षणार्धात कळ्या व्हाव्यात आणि मूल पाहण्यासाठी पाणीभरले डोळे आतुर व्हावे, असं प्रसुतीच्या प्रसंगाचं वर्णन पहिल्या चार ओळीत आलंय.

स्त्रीदेहातून या जगात आलेल्या इवल्या पाहुण्याच्या आगमनासाठी माऊलीला ज्या अग्निदिव्यातून बाहेर पडावं लागतं, त्याचं सारं वर्णन पहिल्या कडव्यातून व्यक्त झालंय. दुसऱ्या कडव्यात या इवल्या पाहुण्याचं कौतुक केलंय. मुलाला नजर येणं, त्याचं इवलंसं स्मित या साऱ्या गोष्टी मातेला सुखावणाऱ्या असतात.

प्रसूती म्हणजे साक्षात मृत्यूची अनुभूती. जन्मवेणा म्हणजे साक्षात मृत्यूची हाक. नव्या जन्मासाठी मातेनं साक्षात मृत्यूची अनुभूती घेण्याचा व्यथासोहळा म्हणजे प्रसूती. इवल्या मुलाच्या स्मितानं आपल्या जन्माच्या सार्थकतेची पावतीच गवसल्याचा आनंद मातेच्या चेहर्‍यावर व्यक्त होत असतो. इवल्याशा मुलांचं इवलंसं स्मित मातेला प्रसूतीच्या साऱ्या वेदनांचा विसर पाडणारं असतं.

हेही वाचा: आर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर

स्त्रीच्या सृजनशीलतेचा गौरव

पण हे सार्थक कशामुळे? तर अंगी असलेल्या सृजनशीलतेमुळे! ‘धन्य कुशीची पुण्याई’ या शब्दांत स्त्रीच्या मातृत्वाचा गौरव केलाय. इथं कवी मातृत्वापुढे आणि स्त्रीच्या अंगी असणाऱ्या सृजनशीलतेपुढे नतमस्तक झालाय. शेवटच्या दोन ओळीतलं आशयसौंदर्य साऱ्या कवितेचं वैभव ठरलंय.

‘सारे अंग मांडी झाले, फुटे स्पर्शाला अंगाई!’

मूल मातेच्या अंगाखांद्यावरून खेळतं. नजर आली नसली तरी आईचा स्पर्श मूल अचूक ओळखतं. आईचा केवळ स्पर्श मुलासाठी अंगाई ठरत असतो. मूल घडवण्याचं असाधारण कसब, सामर्थ्य स्पर्शात असतं. निसर्गाच्या ठायी जी नवनिर्माणक्षमता आहे तीच स्त्रीच्या ठायी आहे, म्हणूनच निसर्गाप्रमाणेच स्त्रीही निर्मिक आहे. निर्मिकापुढे माणूस नतमस्तक होणं साहजिक आहे. इथं कवीनं साक्षात निर्मितीशीलतेचा गौरव करून स्त्रीत्वाची आणि मातृत्वाची महती कथन केलीय. 

दुःखात सकारात्मकता शोधणारी कविता

‘असोशी’च्या अर्पणपत्रिकेतलं आईचं हळवं, व्यथामग्न स्मरण, आई नसल्याचं शब्दातीत दुःख ‘रेघा’तल्या ‘पाहुणा’ या कवितेतल्या मातृगौरवामधे सहज विलीन झालंय. केवळ शब्दांनी न भागणाऱ्या मातृतृष्णेची पूर्तता हे कवीमन मातृगौरवात शोधतं ही सकारात्मकता वैशिष्ट्यपूर्ण आहे.

शेवाळकरांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य असं की विलक्षण दुःखानुभूतीपाशी ही कविता सकारात्मकता, संस्कारशीलता आणि समर्पणशीलतेचा उच्चार आणि स्वीकार करते. दुःखानुभूतीतली ही संवेदनशील सकारात्मकता, समर्पपणशीलता आणि जगण्यावर अविचल निष्ठा म्हणजेच शेवाळकरांच्या मातृगौरवाचं आणि त्यांच्या एकूणच कवितेचं सौंदर्य आहे, सामर्थ्यही आहे.

हेही वाचा: 

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

राजन गवसः जगण्यातूनच आली लिहण्याची भूमिका

 

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

(लेखक समीक्षक असून ‘सर्वधारा’ या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत.)