तब्बल दोन दशकं सत्ता गाजवल्यानंतर पुन्हा पाच वर्षांसाठी तुर्कस्तानच्या जनतेनं कौल एर्दोगन यांच्या बाजूने कौल दिलाय. एर्दोगन स्वत:ला ओटोमन साम्राज्याच्या सुल्तानाच्या रुपात बघतात. त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची पाश्चिमात्य देशांना घाई झाल्याचं प्रचारयंत्रणेनं मतदारांच्या मनावर ठसवलं होतं. पण मतदारांनी राष्ट्रीय अस्मितेच्या भावनेखाली पुन्हा एकदा एर्दोगन यांना निवडून दिलं.
तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या दुसर्या आणि अंतिम फेरीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या फेरीपुर्वी पाश्चिमात्य माध्यमांनी एर्दोगान यांचा पराभव होत असल्याचं चित्र रंगवलं होतं.
ढासळती अर्थव्यवस्था, अलीकडे झालेल्या भुकंपाने झालेली प्रचंड हानी, मानवाधिकारांचं पाशवी उल्लंघन आणि २००२ पासून तुर्कस्तानच्या राजकारणाच्या आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे एर्दोगन यांच्या विरुद्ध हळुवार शिजलेला असंतोष यामुळे तुर्की जनता राजकीय बदलावर शिक्कामोर्तब करेल ही आशा भाबडी ठरली आहे.
प्रचारादरम्यान ज्या गोष्टी एर्दोगन यांच्या पथ्यावर पडल्यात त्यात पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांच्या अति-उत्साहाचा सुद्धा समावेश आहे. परकीय प्रसारमाध्यमांनी, विशेषत: युरोपीय माध्यमांनी एर्दोगन यांच्या संभावित पराभवात विशेष रुची घेतल्याचा फायदा एर्दोगन यांनाच झाला.
एर्दोगन यांच्या प्रचार यंत्रणेनं पश्चिमात्य माध्यमांतल्या चर्चेला परकीय हस्तक्षेपाचा आणि पाश्चिमात्य देशांना एर्दोगन यांच्या नेतृत्वातील तुर्कस्तान विषयी असलेल्या असुयेचा रंग चढवला होता. एर्दोगन यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार करण्याची पाश्चिमात्य देशांना घाई झाल्याचे त्यांच्या प्रचारयंत्रणेने मतदारांच्या मनावर ठसवलं. परिणामी मतदारांनी राष्ट्रीय अस्मितेच्या भावनेखाली पुन्हा एकदा एर्दोगन यांना निवडून दिलं.
हेही वाचा: युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?
एर्दोगन आरूढ असलेल्या तुर्की राष्ट्रवादाच्या रथाची घोडदौड थांबवणं अवघड असल्याचं लक्षात आल्यावर त्यांचे विरोधक केमाल किलिकदरोग्लु यांनी स्वत: सिरीयातून आलेल्या निर्वासितांच्या मुद्द्याला हात घातला होता. सिरीयातून आलेल्या लाखो निर्वासितांमुळे तुर्कीच्या जनतेच्या हालअपेष्टांमधे वाढ झाल्याची गोष्ट या निवडणुकीत सतत चर्चेत होती.
या निर्वासितांना त्यांच्या मायभुमीत परत पाठवण्याची कडक भुमिका किलिकदरोग्लु आणि एर्दोगन या दोघांनीही घेतली होती. एर्दोगन यांच्या कारकिर्दीत हे निर्वासित तुर्कस्तानात आल्याचं खापर सत्ताधारी पक्षावर फोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न ही त्यांची अखेरची खेळी होती, जी यशस्वी ठरली नाही.
एर्दोगन सरकारच्या धोरणांमुळे सिरीयातून लाखो निर्वासित तुर्कस्तानात आलेत या टिकेऐवजी या निर्वासितांना परत पाठवण्याची किमया एर्दोगनच करू शकतात हे प्रतिमारंजन एर्दोगन समर्थकांना अधिक भावलं. तब्बल दोन दशकं सत्ता गाजवल्यानंतर पुनश्च ५ वर्षांसाठी जनतेचा कौल जिंकण्याची कामगिरी एर्दोगन यांनी साधली ही निश्चितच ऐतिहासिक घटना आहे.
मागच्या दोन दशकात तुर्की राजकारणात पहिल्यांदाच ६ प्रमुख विरोधी पक्षांनी एर्दोगन यांच्याविरुद्ध संयुक्त आघाडी उभारली होती. ‘टेबल ऑफ सिक्स’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या आघाडीचे राष्ट्राध्यक्षीय उमेदवार किलिकदरोग्लु हे यापूर्वी एर्दोगन विरुद्ध अनेकदा पराभूत झाले होते. पण विरोधकांच्या एकीमुळे यावेळी त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
किलिकदरोग्लु यांनी अंतिम फेरीत ४७.८ टक्के मतं मिळवत तुर्कस्तानात एर्दोगन यांना असलेला विरोध ठळकपणे अधोरेखित केला आहे. पण एर्दोगन यांच्या पाठीशी मागच्या किमान १० वर्षांपासून उभ्या असलेल्या ५१ ते ५२ टक्के मतदारांपैकी किमान २ ते ३ टक्के मतदारांना आपल्याकडे वळवण्यात किलिकदरोग्लु यांना यश आलं नाही. एर्दोगन यांचे हे ५२ टक्के भक्कम पाठीराखे कोणत्याही परिस्थितीत त्यांची साथ सोडायला तयार नाहीत.
एर्दोगनवाद्यांच्या मते एर्दोगन यांनी तुर्कस्तानच्या सामाजिक जीवनात इस्लामला प्रतिष्ठा मिळवून दिली, तुर्कस्तानला जागतिक राजकारणात ताठ मानेने उभं केलं, देशातल्या विघटनकारी शक्तींचा ठामपणे सामना केला आणि त्याचबरोबर देशाच्या घायकुतीला आलेल्या अर्थव्यवस्थेला सांभाळण्याचं कसब त्यांच्याकडेच आहे.
एर्दोगन यांच्या प्रतिमेची ही अभेद्य चौकट आहे जी विरोधकांच्या एकत्र येण्याने अधिकच बळकट झाली. असं असलं तरी, किलिकदरोग्लु यांच्या नेतृत्वात विरोधकांनी एर्दोगन यांच्या विरुद्ध एकजूट केलेली ४७.८ टक्के मतं दुर्लक्षित करता येणार नाहीत.
हेही वाचा: तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?
तुर्कस्तानातल्या लोकशाहीवादी, शहरी शिक्षित वर्ग, वांशिक अल्पसंख्यांकांच्या प्रादेशिक स्वायतत्तेची मागणी करणार्या संघटना, समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते या सर्वांनी आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवत एर्दोगन यांना शह देण्याचा प्रयत्न केला. या सर्वांची भावना एकच होती की एर्दोगन यांचं राजकारण तुर्कस्तानला प्रतिगामी करणारं आहे.
एर्दोगन यांनी मागच्या २० वर्षांमधे एकीकडे देशातल्या वाळीत टाकलेल्या प्रतिगामी शक्तींना मुख्य प्रवाहात आणलं तर दुसरीकडे सामान्य जनतेच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्वसमावेशकता आणि इस्लामेतर विचार यांच्याविषयी प्रचंड तिटकारा निर्माण केला. तुर्कस्तानची ही वाटचाल सौदी अरेबियाच्या दिशेने होते आहे अशी एर्दोगन-विरोधकांची भावना आहे.
इथून पुढची ५ वर्ष एर्दोगन राष्ट्राध्यक्षपदी असतांना धर्मनिरपेक्षता व लोकशाहीवाद्यांची एकजूट टिकवणं आणि किमान पाच टक्के एर्दोगन समर्थकांना संभाव्य धोक्याची जाणीव करुन देणं हे मोठं आव्हान तुर्कस्तानातल्या विरोधकांपुढे आहे.
केमाल किलिकदरोग्लु यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा आता पुरेशा स्पष्ट झाल्यामुळे विरोधी गटाला नव्या चेहर्यांचा शोध घेणं अत्यावश्यक झालंय. किलिकदरोग्लु यांच्याच रिपब्लिकन पिपल्स पार्टीचे इस्तंबूल शहराचे ५३ वर्षीय महापौर एक्रेम इमामोग्लु हे विरोधकांचे नवे नेते म्हणून आकाराला येण्याची ठाम शक्यता आहे.
किलिकदरोग्लु यांच्या पराभवानंतर एक्रेम इमामोग्लु यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. इमामोग्लु यांनी म्हटलंय की ‘जुन्या पद्धतीनंच कार्य करत नव्या प्रकारच्या निकालाची अपेक्षा करता येणार नाही’. भविष्यात इमामोग्लु हेच आपले प्रतिस्पर्धी असण्याची चाहुल एर्दोगन यांना सुद्धा लागली आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतला विजय साजरा करताना केलेल्या भाषणात पुढचं लक्ष्य इस्तंबुल महानगरपालिका असेल हे जाहीर केले आहे.
हेही वाचा: ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात?
२१ व्या शतकात जगात सर्वत्र वाढलेल्या बहुसंख्यांकवादाचं अगदी सुरवातीचं फळ रेसेप एर्दोगन हे आहेत. धार्मिक किंवा वांशिक भावनांना राष्ट्रवादाची झालर चढवत देशातल्या बहुसंख्यांकांना संकुचित्वाची साद घालणार्या राजकारणाचे २१ व्या शतकातले उद्गाते एर्दोगन आहेत असं म्हटल्यास ती अतिशोयक्ती ठरू नये.
हे एर्दोगन स्वत:ला ओटोमन साम्राज्याच्या सुल्तानाच्या रुपात बघतात. युरोपमधे औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी ओटोमन साम्राज्याचा जो दरारा होता तो एर्दोगन तुर्कस्तानला पुन्हा प्राप्त करून देत आहेत असा त्यांच्या समर्थकांचा ठाम विश्वास आहे. पूर्वाश्रमीचं ते वैभव इस्लामिक राहणीमान आणि नितीमुल्यांमुळे होतं असा एर्दोगन यांच्यासह त्यांच्या असंख्य चाहत्यांचा समज आहे.
ते वैभव आणि दरारा पुन्हा निर्माण करण्यासाठी संपूर्ण तुर्की समाजाने इस्लामिक जीवनपद्धती अंगिकारली पाहिजे या मतप्रवाहावर एर्दोगन आरूढ आहेत. नेमक्या याच विचारप्रणाली विरुद्ध संघर्ष करत पहिल्या महायुद्धानंतर मुस्तफा केमाल अतातुर्क यांनी आधुनिकतावादाच्या पायावर तुर्कस्तानची रचना केली होती.
राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एर्दोगन यांनी केलेला ‘बाय बाय केमाल’ चा उद्घोष हा केवळ किलिकदरोग्लु यांची राजकिय कारकीर्द संपल्याचं सांगण्यासाठी नव्हता, तर आधुनिक तुर्कस्तानचा पाया रचणार्या मुस्तफा अतातुर्कच्या आधुनिकता आणि धर्मनिरपेक्षता यांवर आधारीत वैचारिक चौकटीला तिलांजली देत असल्याची ती घोषणा होती.
तुर्की समाजाने काळाप्रमाणे स्वत:त बदल न केल्यामुळे धर्म आणि राजसत्तेची फारकत घेतलेल्या आणि सार्वजनिक जीवनात धर्मापेक्षा व्यक्तीस्वातंत्र्याला महत्व देणार्या युरोपीय देशांपुढे एकेकाळी बलाढ्य असलेल्या ओटोमन साम्राज्याची शकलं उडालीत असं अतातुर्कवाद्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे तुर्कस्तानला प्रतिस्थापित करायचं असल्यास जुन्याला तिलांजली देत नव्याची साथ जोडण्यावर अतातुर्क आणि त्यांच्या समर्थकांनी कमालीचा भर दिला होता.
आता इतिहासाची चक्र उलटी फिरायला लागली आहेत आणि धार्मिक जोखडातून बाहेर न आलेल्या तुर्की कुटुंबांना एर्दोगनच्या रुपात त्यांचा सुल्तान प्राप्त झाला आहे.
हेही वाचा:
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?
अर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद
लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?