कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं आव्हान कशामुळे उभं राहिलंय?

१३ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्यावर्षी डिसेंबरपासून कोरोनाबाधितांचे आकडे कमी व्हायला लागले. तसं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल हलगर्जीपणा दिसून आला. हा हलगर्जीपणा दुसर्‍या लाटेच्या रूपाने आव्हान म्हणून उभा राहिलाय. आज देशात दररोज सापडणार्‍या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६०  हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत.

जगभरात आतापर्यंत आलेल्या वायरस संसर्ग आजारांच्या साथींचा अभ्यास केला तर त्या नेहमीच लाटेच्या स्वरूपात आलेल्या दिसतात. १९१८-१९१९ मधे आलेल्या स्पॅनिश फ्लूबद्दलही हेच दिसून आलं. जवळपास गेल्या वर्षभरापासून थैमान घालत असलेल्या कोरोना वायरसबद्दलही तेच घडताना दिसतंय. या लाटांमधलं अंतर किंवा दिवसांचा अंदाज बांधणं कठीण असतं.

कोरोनाचा विचार केला तर गेल्यावर्षी आलेल्या पहिल्या लाटेनंतर भारतासोबत अनेक देश दुसर्‍या लाटेचा सामना करतायत. त्याचवेळी फ्रान्स, इटली या देशांमधे कोरोनाची तिसरी लाट आलीय. हा धोका लक्षात घेऊन भारतातली दुसरी लाट आटोक्यात आणणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी ‘कोविड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेवीयर’चं काटेकोरपणे पालन होणं आवश्यक आहे.

पेशंटची संख्या वाढायची कारणं

मार्च २०२० मधे कोरोना भारतात आला तेव्हा या वायरसबद्दल समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या भीतीमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात आली. पण मागच्या डिसेंबर महिन्यापासून ही भीती बर्‍याच प्रमाणात कमी होत गेलेली दिसली. संसर्ग झालेल्यांचे आकडे कमी कमी होत गेले.

या आजाराची साथ आता संपलीय, असा लोकांचा समज झाला. पण हा समज किती चुकीचा होता, हे आता आपल्यासमोर आहे. त्याचे गंभीर परिणाम आपण सगळेजण सध्या भोगत आहोत. आपणच केलेल्या चुकांमुळे आज मागच्या वेळेपेक्षा मोठं संकट आपल्यावर ओढावताना दिसतंय.

आज देशात दररोज सापडणार्‍या कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊन पोचलाय. महाराष्ट्रात दिवसात ५५ ते ६०  हजार पेशंटची भर पडतेय. यामागे तीन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमांचं सर्वसामान्यांकडून पालन केलं गेलं नाही. दुसरं कारण म्हणजे, सर्व प्रकारचे वायरस हे म्युटेट होतात.

हेही वाचा : लस असतानाही आपल्याला वायरसवरच्या औषधांची गरज पडेल?

वायरसची नवी म्युटेशन

इन्फ्ल्यूएंझाच्या वायरसमधेही म्युटेशन होतं. तशाच प्रकारे कोरोनाच्या वायरसमधेही असं म्युटेशन झालंय. असे म्युटेट काही वेळा वेगाने पसरतात. सद्यस्थितीत आपल्याला माहीत असलेल्यांपैकी ब्रिटनमधला बी-११७ हा म्युटेट थोडा जास्त वेगाने पसरतोय.

आज महाराष्ट्रातही कोरोनाची काही म्युटेशन्स आढळून आलीत. यातल्या डबल म्युटेटची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. याला एल ४५२ आर आणि ई ४८४ क्यू असं आपण म्हणतो. यातला एल ४५२ आर या डबल म्युटेंटचे काही प्रकार यापूर्वी कॅलिफोर्नियात आढळून आले होते. महाराष्ट्रात १५ ते २० टक्के लोकांमधे हा म्युटेट आढळून आला आहे.

अशा प्रकारच्या म्युटेटचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातल्या दहा वेगवेगळ्या प्रयोगशाळांचा एक गट तयार केला आहे. यात नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे या महाराष्ट्रातल्या दोन प्रयोगशाळांचा समावेश आहे.

जेव्हा असे नवीन वायरस समोर येतील तेव्हा त्यातल्या पाच टक्के वायरसचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येणार आहे. यामुळे वायरसच्या म्युटेशन्सविषयीची माहिती समजू शकणार आहे. तसंच त्यातला एखादा म्युटेट वेगाने पसरत आहे का, हेही समजायला मदत होणार आहे.

आपण गाफील राहिलो

हवेतून पसरणारे रोग बंद खोल्यांमधे, हवा कमी असलेल्या ठिकाणी जास्त लोक असतील तर ते पसरण्याची शक्यता मोठी असते. याउलट मोकळ्या जागी, जिथे कमी लोक आहेत तिथे असे आजार पसरण्याची शक्यता कमी असते. खरं पाहिलं तर ही अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. पण हे आपण विसरलो.

गेल्यावर्षी लॉकडाऊनची प्रक्रिया संपत आल्यानंतर देशात विशेषतः महाराष्ट्रात बर्थडेच्या पार्ट्या, लग्न सोहळे, गेटटुगेदर, गॅदरिंग असे सामूहिक कार्यक्रम आधी सारखेच धूमधडाक्यात साजरे झाले. हॉटेल, रेस्टॉरंट उघडल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसली. याचा परिणाम म्हणून आजच्या वाढलेल्या पेशंटच्या संख्येकडे पाहिलं पाहिजे.

वास्तविक, आपल्याकडे जेव्हा पेशंट संख्या कमी होत होती तेव्हा जगभरात अनेक देशांमधे कोरोनाबाधितांचे आकडे वाढतच होते. तिथे दुसरी लाट आली होती. त्याची भीती दिसून येत होती. पण त्यापासून धडा घेण्याऐवजी आपला समाज मात्र भारतातल्या आकड्यांचा आलेख कमी होत चालल्याचं पाहून गाफील राहिला. हा गाफीलपणा आपल्याला महागात पडला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

हेही वाचा : ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

लॉकडाऊन की अनलॉक?

आज देशपातळीवरची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रातल्या बाधितांची संख्या मोठी आहे. पंजाबमधेही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. दिल्लीमधेही पेशंटची संख्या वाढत चाललीय. विशिष्ट राज्यात पेशंटची संख्या का वाढतेय, याचं नेमकं कारण आजघडीला तरी सांगणं कठीण आहे.

त्यासाठी शास्त्रीय अभ्यासाची गरज आहे. पण ज्या भागात बाधितांची संख्या वाढतेय तिथं पुन्हा कठोर निर्बंध आणले जातायंत. लॉकडाऊन केलं जातंय. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग रोखायला मदत होते. कारण, या काळात लोक घरांमधेच राहतात. त्यामुळे वायरसचा प्रसार झाला, तरी तो कुटुंबातल्या व्यक्तींनाच होतो. बाहेर त्याचा संसर्ग होत नाही.

गेल्यावर्षी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोना वायरसच्या संसर्गाच्या प्रसाराचा वेग कमी राहिलेला दिसून आला. असं असलं तरी लॉकडाऊनच्या दुष्परिणामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः अर्थव्यवस्थेवर याचे अत्यंत नकारात्मक परिणाम होतात. बेरोजगारीचे संकट मोठ्या प्रमाणावर उद्भवतं. त्यामुळे लॉकडाऊन की अनलॉक, यामधे संतुलन साधत आपल्याला पुढं जावं लागणार आहे.

लस घेतल्यानंतरची त्रिसूत्री

इतिहासात जेव्हा समाजापुढे भयंकर संकटं उभी राहिली तेव्हा महाराष्ट्राने संपूर्ण देशाला, जगाला, समाजाला दिशा देण्याचं काम केलंय. आज आपण त्याच उंबरठ्यावर किंवा टप्प्यावर उभे आहोत. आज ती वेळ पुन्हा आलेली आहे.

आपण काय करायचंय? केवळ दोन गोष्टी! एक म्हणजे कसल्याही गैरसमजांवर, अफवांवर जराही विश्वास न ठेवता कोरोनाची लस घेणं आणि दुसरं म्हणजे लस घेतली असेल, नसेल तरीही मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचं पालन करणं.

राज्याने एकजुटीने निर्धार करून या दोन्हींचं पालन केलं, तर पुन्हा एकदा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, या इतिहासाची आपण पुनरावृत्ती करू शकतो.

हेही वाचा : हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

लसीकरणासाठी इस्रायलचा आदर्श

आज महाराष्ट्रात सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी लसीकरण खुलं झालं पाहिजे, अशी मागणी सध्या होत आहे. ती योग्य आहे. पण, काही वयोगट हे वलर्नेेबल असतात. उदाहरणार्थ, ६० वर्षावरच्या व्यक्ती किंवा डायबेटीस, हृदयविकार असणारे पेशंट आरोग्याच्या दृष्टीने तुलनेत अधिक कमकुवत असतात. त्यामुळे लसींच्या उपलब्धतेचा विचार करून या वयोगटातल्या लोकांसाठी आणि आरोग्यकर्मींसाठी पहिल्यांदा लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसर्‍या टप्प्यात ४५ वर्षांवरच्या लसीकरणाला सुरवात झाली आहे. लसींची उपलब्धता वाढेल तेव्हा ४५ पेक्षा कमी वयोगटातल्या व्यक्तींसाठी लसीकरणाची मोहीम सुरू होईल. तोपर्यंत या व्यक्तींनी कोरोना नियमांचं पालन करण्याबरोबरच कोरोनाची लागण झाली, तर तत्काळ गेल्या तीन-चार दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे. कारण, कोरोना वायरस हवेतून पसरतो.

लसीकरणाबद्दल आपण इस्रायलचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. या देशाने मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवली. हॉस्पिटलमधे भरती होणार्‍या पेशंटचं प्रमाणही कमी झालं आणि कोरोनाबाधितांची संख्याही घटली. कोरोना ही वैश्विक साथ आहे. त्यामुळे या संसर्गापासून आपण तेव्हाच सुरक्षित राहू शकू जेव्हा सर्व देश या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील. 

वायरसचा चकवा

येणार्‍या काळात वायरस आपल्या अवतारात बदल करण्याची शक्यता गृहीत धरून त्यावर प्रभावी ठरतील अशा नव्या लसींच्या क्लिनिकल ट्रायल्सचीही आपण तयारी केली पाहिजे.

एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की, वायरस हे चलाख असतात. त्यांना मानवी शरीरात कसा शिरकाव करायचा, हे अचूक माहीत असतं. मानवी शरीर ज्याप्रमाणे या वायरसना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते, त्याचप्रमाणे हे वायरसही जास्तीत जास्त काळ शरीरात राहण्याचा प्रयत्न करत असतात.

जितका जास्त काळ ते शरीरात राहतात तितक्या वेगाने त्यांचा गुणाकार होतो. यासाठी ते आपल्याला सतत चकवा देत असतात. अशावेळी प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून या वायरसच्या चकव्याला बळी न पडणं ही आपली जबाबदारी आहे.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

दोन्ही लसींचा प्रभाव सारखाच

सध्या देशात कोरोना प्रतिबंधासाठी ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ या दोन लसी देण्यात येत आहेत. या दोन्ही लसींच्या परिणामकारकतेमधे फारसा फरक नाही. त्यांच्या विज्ञानामधे फरक आहे. ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राजेनेकाची लस आहे ती स्पाईक प्रोटिनवर अवलंबून आहे. भारत बायोटिकची ‘कोवॅक्सिन’ ही लस वायरसनाच मारून टाकते.

दोन्हींची रचना वेगळी असली, तरी त्यांचा प्रभाव सारखाच आहे. त्यामुळे विशिष्ट लसच चांगली असल्याने तीच हवी, असं म्हणून अडून न बसता लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लस घेतल्यानंतर जवळपास ४५ दिवसांनी शरीरात चांगल्या प्रकारे अँटिबॉडीज तयार होतात.

सध्या वैज्ञानिकांच्या विश्वात नव्या स्ट्रेनवर लसी परिणामकारक ठरतात की नाही, याबाबत मतमतांतरं आहेत, चर्चा-प्रतिचर्चा सुरू आहेत; पण लसीमुळे या आजाराची तीव्रता किंवा घातकपणा कमी होतो, हे निश्चित आहे.

हेही वाचा : 

आपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

( लेखक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक आहेत)