कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीमागचं नेमकं वास्तव काय?

१७ जून २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतात सगळ्यात जास्त चर्चा चाललीय ती तिसऱ्या लाटेची. याबरोबरच अजून एक भीती सगळ्या भारतीयांमधे आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचं उत्तर ‘हो’ असं असू शकतं. कारण, भारतामधल्या अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे. 

कोरोनाची तिसरी लाट येईल का? हा प्रश्‍न भारतात आज सगळ्यात जास्त चर्चेत आहे. नक्‍की कोरोनाची तिसरी लाट येईल का? या प्रश्‍नाच्या उत्तराआधी आपल्याकडे पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत काय परिस्थिती होती याचा आढावा घेऊया. 

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची गोष्ट

पहिली लाट साधारणपणे एप्रिल २०२० मधे सुरू झाली आणि तिचं टोक १७ सप्टेंबर २०२० ला आलं. त्यादिवशी सर्वाधिक ९६ हजार कोरोना पेशंट आढळले आणि ११७० मृत्यूंची नोंद झाली. साधारणपणे ऑक्टोबर २०२० पासून ही नवीन संसर्गित कोरोना पेशंटची संख्या कमी होत गेली. यालाच लाट ओसरायला सुरवात झाली, असं म्हटलं गेलं.

फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोना रुग्णसंख्या दरदिवशी ९ हजारापर्यंत खाली आली. पण पुन्हा मार्च २०२१ पासून कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढायला सुरवात झाली आणि ६ मे २०२१ ला आजपर्यंतची सर्वाधिक कोरोना पेशंटची संख्या ४ लाख १४ हजार नोंदवली गेली. तर सर्वाधिक मृत्यूची संख्या सुमारे ४५५५ १८ मेला नोंदवली गेली. तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत कोरोना रुग्णसंख्या वेगाने कमी होत चाललीय. 

पहिल्या लाटेत अंदाजे १ कोटी कोरोना रुग्णसंख्या नोंदवली गेली. तर १ लाख २५ हजार मृत्यू नोंदवले गेले. दुसर्‍या लाटेचा आजपर्यंतचा विचार केला तर १.९० कोटी कोरोना रुग्णसंख्या नोंदवली गेली तर २ लाख ३५ हजार एवढ्या मृतांची नोंद झाली. दुसर्‍या लाटेत सलग ६४ दिवस १ लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या दिसून येते. अशा स्थितीत जेव्हा सरासरी दररोजची कोरोना रुग्णसंख्या ५ हजारपर्यंत खाली येईल तेव्हाच खर्‍या अर्थाने दुसरी लाट संपली, असं म्हणता येईल.

हेही वाचा : राजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का?

ब्राझीलची अपवादात्मक परिस्थिती

जगातल्या इतर देशांना म्हणजे मुखत्वेकरून अमेरिका, युरोपातले देश, ब्राझील, तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको इथं कोरोना वायरसचा सर्वाधिक फटका बसलाय. त्यामुळे या दोन लाटांदरम्यान इथं नेमकं काय घडलं ते पाहूया. या सगळ्याच देशांत भारतसारखीच परिस्थिती पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत होती.

याला अपवाद ब्राझीलचा आहे. ब्राझीलमधे पहिली किंवा दुसरी लाट असं काही झालं नाही. तो देश अजूनही पहिल्या लाटेतच आहे. ती लाट अद्यापही ओसरलेली नाही. जुलै २०२० पासून तिथली रोजची कोरोना रुग्णसंख्या फारशी बदललेली नाही. पण मृत्यूचं प्रमाण जानेवारी २०२१पासून वाढतच आहे. 

युरोपमधल्या पोलंड या देशाची परिस्थिती एकदमच वेगळी झाली. सुरुवातीचे ६ महिने अगदीच नगण्य रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी होतं.  पण ऑक्टोबर २०२०पासून परिस्थिती एकदमच बदलली. एप्रिल २०२१पर्यंत तिथं मृत्यूचं थैमान सुरू होतं. असे काही अपवाद वगळता जगभरात सगळीकडे सारखीच परिस्थिती दिसते. साधारणपणे पहिल्या लाटेत अर्थव्यवस्थेचं नुकसान खूप झालं आणि दुसर्‍या लाटेत मनुष्यहानी खूप झाली. जगभरातल्या अनेक देशांत हीच परिस्थिती राहिली. 

तिसर्‍या लाटेची चाहूल

जगातल्या इतर देशांचा विचार करता त्यांच्याकडे दुसरी लाट भारताच्या आधी आली आणि आधी ती कमी झाली. युरोपियन देशांचा विचार करता तिथं जी परिस्थिती असते त्यासारखीच परिस्थिती ४५ ते ५० दिवसानंतर भारतात निर्माण होते. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या वेळी हाच पॅटर्न दिसून आलाय. 

सध्या अमेरिका आणि युरोपच्या परिस्थितीचा विचार केला तर दुसरी लाट ओसरून परिस्थिती साधारण होत चाललीय. इंग्लंडमधे मात्र तिसर्‍या लाटेची चाहूल दिसू लागलीय. गेले दोन महिने नव्या कोरोना रुग्णांची संख्या स्थिर असताना अचानक गेल्या दोन आठवड्यांपासून त्यात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ दिसून आलीय. यामागे कोरोना वायरसचा ‘डेल्टा’ हा नवा वेरियंट कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येतंय. तसंच संपूर्ण इंग्लंडमधे कोरोना रुग्णसंख्या वाढत नसून काही भागामधेच तिची वाढ मर्यदित दिसून येतेय.

काही दिवसांपूर्वी फ्रान्समधे पण तिसरी लाट सुरू होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण सध्या तिथली रोजची रुग्णसंख्या कमी होतेय. अमेरिकेत सध्या तरी तिसर्‍या लाटेची कोणतीही चाहूल दिसत नाही. यामागे अमेरिकेत तरुणांचं वेगानं झालेलं लसीकरण कारणीभूत आहे.

हेही वाचा : किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

लसीकरणाचा पर्याय

कोरोना वायरसच्या पहिल्या दोन्ही लाटा सुरू होताना जगापुढे लॉकडाऊन हा एकच पर्याय होता आणि बहुतांश देशांनी तोच पर्याय स्वीकारला. जानेवारी २०२१ मधे मात्र लसीकरणाचा अजून एक पर्याय मिळाला. यामधे अमेरिका, इस्रायल आणि इंग्लंड या देशांनी आघाडी घेतली. या जोडीने माध्यमांत कोणतीही वाच्यता न करता दररोज २ कोटी लोकांना लस देऊन चीननेही यामधे आघाडी घेतलीय. ज्या देशांनी लसीकरण वेगानं केलंय त्या देशांतली रुग्णसंख्या आणि मृत्यूदर कमी झालाय.

इंग्लंडमधे २० वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला आणि ४५ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळूनसुद्धा तिथली रुग्णसंख्या वाढू लागलीय. पण मृत्यूदर कमी होतंय किंवा काही दिवसांपूर्वी शून्य मृत्यू नोंदवला गेलाय. याचा सरळ अर्थ असा होतो की लसींमुळे कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी तो पूर्ण थांबवता येत नाही मात्र कोरोना रुग्णांचा मृत्यू रोखता येतोय. 

तरीही इंग्लंडमधे डिसेंबर २०२१ पर्यंत लसीचा तिसरा डोस देण्याचेही नियोजन चालू आहे. साधारण अशीच परिस्थिती अमेरिकेतही असून युरोप-अमेरिकेत हॉस्पिटलमधे दाखल होणार्‍या कोरोना पेशंटमधे ९९ टक्के असे रुग्ण आहेत ज्यांनी लस घेतलेली नाही. भारतामधील काही मेडिकल रिपोर्टचा अभ्यास केला तर अशीच परिस्थिती दिसून येतेय.

नव्या वेरियंटचा परिणाम

जगातल्या ज्या देशांनी वेगाने लसीकरण केलंय त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून असं दिसून येतंय की, लसीच्या एका किंवा दोन डोसमुळे तिसरी लाट रोखता आली नाही तरी तिची तीव्रता कितीतरी पटीने कमी करता येते. भारत, ब्राझील, मेक्सिको, तुर्की आणि दक्षिण आफ्रिका या देशांतल्या आरोग्यव्यवस्था आणि लसीकरण यांची परिस्थिती एकसारखीच आहे. त्यामुळे या देशांमधे दुसरी लाट कमी होण्यामागे लॉकडाऊन हेच कारण आहे. 

तर युरोपातले काही देश आणि अमेरिकेत दुसरी लाट कमी होण्याला लसीकरण कारणीभूत ठरताना दिसते. या देशांमधे तिसरी लाट येईल का हे सर्वस्वी ज्या देशांमधे लसीकरण झालं नाही त्या देशांवर अवलंबून असेल. उदाहरणच द्यायचं झालं तर भारतामधे दुसरी लाट येण्यासाठी जो कोरोना वायरसचा स्ट्रेन कारणीभूत होता त्याच्यामुळेच इंग्लंडमधे तिसरी लाट येताना दिसतेय. कारण या स्ट्रेनवर लसीसुद्धा कमी प्रमाणात प्रभावी ठरतंय.

अशीच परिस्थिती भारतात निर्माण झाली तर कदाचित इतर देशांच्या मानाने भारतामधली तिसरी लाट लवकर येईल किंवा दुसरी लाट न संपता पुन्हा पेशंटची संख्या वाढून तिसरी लाट सुरू होईल. भारताचं आजचं लसीकरण पाहिलं तर फक्‍त ५ टक्क्यांच्या आसपास लोकांना दोन्ही डोस मिळालेत. तर ज्यांनी दुसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळवलंय त्यांची सरासरी ३० टक्क्यांच्या आसपास आहे.

हेही वाचा : कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

नव्या योजनांची गरज

याबरोबरच अजून एक भीती सगळ्या भारतीयांमधे आहे ती म्हणजे तिसरी लाट लहान मुलांना अधिक घातक असेल का? कदाचित याचं उत्तर ‘हो’ असं असू शकतं. कारण, भारतामधल्या अजून एकाही लहान मुलाला लस मिळाली नाही आणि २०२१ च्या शेवटापर्यंत ती त्यांना मिळेल याची शक्यताही धूसर आहे. याचबरोबर जर एखादा कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आणि तो लस दिलेल्या लोकांनाही वेगाने संसर्गित करत असेल तर तो लहान मुलांना पण नक्‍कीच वेगाने संसर्गित करेल.

तिसरी लाट थांबवण्यासाठी लसीकरण हाच खात्रीशीर उपाय होता. पण तो आपण अमलात आणू शकलो नाही आणि पुढच्या एक-दोन महिन्यांत ७० टक्के भारतीयांना किमान एक तरी डोस मिळेल याची शक्यता नाही. त्यामुळे तिसर्‍या लाटेची तीव्रता कमी ठेवण्यासाठी नवीन योजना राबवाव्या लागतील. महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांनी लस घेतलीय त्यांनी जास्तच खबरदारी घेतली पाहिजे.

कोरोना पेशंटच्या मृत्यूचा विचार केला तर फक्‍त २० ते २५ टक्के असे लोक आहेत ज्यांचा मृत्यू फक्‍त कोरोनामुळे झालाय तर ८० टक्के लोकांना कॅन्सर, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होते. त्यामुळे या लोकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यांना सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळे तिसर्‍या लाटेत आपण मृत्यू दर कमीत कमी ठेऊ शकतो. 

याचं प्रत्यक्ष उदहारण म्हणजे इंग्लंड आणि जर्मनी हे आहेत. याचबरोबर लहान मुलांना इतर पर्यायी लसी देऊन त्यांची प्रतिकारशक्‍ती अजून चांगली करू शकतो. याचबरोबर पुढील एक वर्ष तरी मोठ्या गर्दीचे कार्यक्रम टाळणं फारच गरजेचं आहे. कारण वायरसच्या नवीन स्ट्रेनचे उगमस्थान असे कार्यक्रमच असतात.

हेही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती का खावी वाटते?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

(लेखक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड इथं मेडिकल सायन्स डिविजनमधे मेरी क्युरी वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)