आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

१० नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल, असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय.

कोरोना काळातल्या संयुक्त अरब अमिरीतीमधे खेळवण्यात आलेल्या आयपीएल पर्वाची समाप्ती जवळ आलीय. हे पर्व जसं बायो सिक्युर बबल, सोशल डिस्टन्सिंग आणि बिना प्रेक्षकांचं स्टेडियम यांच्यासाठी ओळखलं जाईल. तसंच अनेक नवी नेतृत्वं देणारंही ठरेल. या आयपीएलमधे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर, किंग्ज इलेवन पंजाबचा कर्णधार केएल राहुल यांनी आपल्या संघाचं समर्थपणे नेतृत्व केलं.

पंजाबला प्ले ऑफमधे स्थान मिळवता आलं नसलं तरी राहुलने या संघाच्या नेतृत्वाची धुरा चांगल्या प्रकारे वाहिली. दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरने दिल्लीला आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच फायनलची एन्ट्री करुन दिली. या दोघांच्याही गळ्यात कर्णधार पदाची माळ पडून अवघी काही वर्ष झालीयत. राहुलचा तर हा कर्णधार म्हणून पहिलाच हंगाम आहे. तर अय्यरने कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्याचा संघ दुसऱ्याच हंगामात फायनलमधे पोचवलाय.

फ्लॉप नेतृत्व बदलाची मागणी

एका बाजूला हे दोन तरूण कॅप्टन आपल्या नेतृत्व गुणाची चमक दाखवत असताना गेली जवळपास आठ वर्ष रॉयल चॅलेंजर बेंगलोरचं नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने मात्र याही हंगामात निराशा केली. यंदाच्या हंगामात त्याचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असूनही त्याला हे स्थान टिकवून ठेवता आलं नाही. अय्यरच्या दिल्लीने हे स्थान हिसकावून घेतलं.

गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरलेल्या विराटला प्ले ऑफमधेही फाईट करता आली नाही. त्यांनी हैदराबादकडून पराभव स्वीकारत आपला गाशा गुंडाळला. यंदाची आयपीएल युएईत होत असल्याने विराटचा आरसीबी संघ काहीतरी कमाल दाखवेल आणि आपल्या चाहत्यांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाचा जल्लोष करण्याची संधी देईल असं वाटत होतं. पण, विराटच्या आरसीबीने निराशा केली. या सततच्या निराशेनंतर आता आरसीबीने आपला नेताच बदलावा अशी मागणी होऊ लागलीय.

हेही वाचा : आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

तयार संघ मिळाला नसता तर

या मागणीला पहिल्यांदा वाचा फोडली ती केकेआरचा यशस्वी माजी कर्णधार गौतम गंभीरने. या मागणीनंतर विराटच्या कर्णधार पदाबाबत सखोल चिकित्सा करणं गरजेचंय. कारण विराट आरसीबीच्या नेतृत्वीची धुरा थोडी थोडकी नाही तर जवळपास ८ वर्ष वाहतोय.

तुलनाच करायची झाली तर टीम इंडियाचा कर्णधार विराटने आरसीबीची धुरा २०१३ ला आपल्या खांद्यावर घेतली. तर टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मानेही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व २०१३ ला स्वीकारलं. हे दोघेही तेव्हापासून अव्याहतपणे आपापल्या संघाचं नेतृत्व करतायत. पण, आकडेवारी पाहिली तर रोहितने आपल्या कॅप्टन्सीच्या ८ हंगामात ४ विजेतेपदं खिशात टाकलीयत. तर जवळपास ८ हंगाम विराट कोहलीचा खिसा रिकामाच आहे.

भारतीय संघाचे तीनही प्रकारात नेतृत्व करणारा विराट आसीसी क्रमवारीत आपले तीनही संघ पहिल्या तीन क्रमांकात ठेवण्यात यशस्वी ठरलाय. पण, आयपीएलमधे त्याला आपल्या संघाला आतापर्यंत एकही विजेतेपद मिळवून देता आलेले नाही. त्याच्या या दोन कॅप्टन्सीमधे फरक एकच आहे.

विराट कोहलीला परिपक्व आणि दर्जेदार खेळाडूंचा तयार भारतीय संघ मिळाला. तयार संघ मिळाल्याने संघाची कामगिरी आपसूकच दर्जेदार होत राहिली. गांगुलीप्रमाणे त्याला आपला संघ तयार करावा लागला असता तर भारतीय संघाची कामगिरीही आरसीबीसारखीच झाली असती. 

संघनिवडीत विराट कच्चा लिंबू

आरसीबीच्या संघाकडे नजर टाकली तर त्यांच्याकडे पहिल्यापासूनच तगड्या नावांचा भरणा होता. संघात मोठमोठी नावं असलेल्या खेळाडूंचा भरणा असणं म्हणजे तो संघ सर्वोत्तम असतो ही बालिश कल्पना आहे. पण हा बालिशपणा विराटने केला. संघ निवडताना बॉलिंग, बॅटिंग, ऑलराऊंडर या विभागात उपयुक्त असा खेळाडू कोण आणि आपल्या होम ग्राऊंडवर कोणता खेळाडू चालेल याचा अभ्यास करुन संघ निवडला पाहिजे. विराटच्या संघावर नजर टाकली तर त्यांच्या प्रत्येक विभागात कोणती कमतरता आपल्याला जाणवते.

बॅटिंगमधे पाहिलं तर विराट, डिविलियर्स, पदार्पण केलेला पडिक्कल आणि फिंच सोडला तर त्यांच्याकडे असा एकही बॅट्समन नाही ज्याच्यावर भरवसा ठेवता येईल. विराटला बॅटिंगमधे सर्वात मोठा फटका फिनिशिंगमधे बसतो. प्रत्येक वेळी विराट आणि एबी डिविलियर्स सामना संपवून देणार ही अपेक्षाच अवास्तव आहे. त्यामुळे संघातल्या अजून काही खेळाडूंना ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल.

पण, विराटकडे डिविलियर्स सोडला तर फिनिशिंसाठी भरवसा ठेवावा असा एकही बॅटिंग नाही. त्याने निवडलेल्या विकेट किपर बॅट्समनचा पिंडच मुळात सलामीवीराचा आहे. पार्थिव पटेल आणि जॉश फिलिपे यांच्याकडून फिनिशरची भुमिकेची कशी अपेक्षा करणार?

राहिला मधल्या फळीतला बॅट्समन गुरकीरत मान. हे नाव आयपीएलमधे अनेक हंगामापासून आपल्या कानावर पडतं. त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर कोणताही सामना जिंकून दिला हे आठवतं का? असं विचारलं तर आपल्याला दोन मिनिटं विचार करावा लागतो.

विराटने हीच बॅटिंगमधली कमतरता भरुन काढण्यासाठी आपल्या ताफ्यात चार चार ऑल राऊंडरचा भरणा करुन घेतला. आरसीबीकडे ख्रिस मॉरिस, मोईन अली, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर असे ऑलराऊंडर आहे. पण, यातल्या एकही ऑलराऊंडरला विराटने म्हणावी तशी संधी दिली नाही.

हेही वाचा : हिरो बदलणारी यंदाची आयपीयल

विराटकडे विश्वासाची कमतरता

चंचल विराटने काही सामन्यात ख्रिस मॉरिस, त्यानंतर शिवम दुबे मधेच मोईल अलीला खेळवले. यामुळे ना त्या खेळाडूला पुरेशी संधी मिळाली ना विराटला त्यांची उपयुक्तता जोखण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. याच आयपीएलमधे संयमाचे फलित काय असतं याचं उदाहरण पहायला मिळतं.

आरसीबीप्रमाणेच सीएसकेचाही हा हंगाम वाईट गेला. पण, कर्णधार धोनीने युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर चांगला विश्वास दाखवला. गायकवाडची आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात म्हणावी तशी झाली नाही. बऱ्याच वेळा त्याला दुहेरी आकडाही पार करता आला नाही. पण, धोनीने धीर धरला. याचा फायदा त्याला हंगाम संपता संपता झाला. त्याला सीएसकेचा भविष्यातील सलामीवीर मिळाला. 

जी धरसोड वृत्ती त्याने बॅटिंगमधे दाखवली तीच धरसोड वृत्ती त्याने बॉलिंगमधेही दाखवली. आरसीबीचा गोलंदाजीतील हुकमी एक्का म्हटलं की एकच नाव समोर येत ते म्हणजे यझुवेंद्र चहल. पण, टी - २० मधे २० षटकं असतात ४ नाही. चहल जास्तीजास्त ४ षटकं टाकू शकेल. पुढची लढाई इतर गोलंदाजांनाच लढायची असते. फिरकी विभागात चहल सोडला तर त्यांच्याकडे हाडाचा स्पिनर नाही. सध्या टी - २० मधे रिस्ट स्पिनरची चलती आहे. विराटकडे चहल सोडून झाम्पा हा लेगस्पिनरही आहे. पण, विराटने त्याचाही पुरेपूर वापर करुन घेतला नाही.

वेगाचं वेड येतंय अंगलट

विराट कोहली आपल्या फास्ट बॉलिंग विभागात निवड करताना एकच निकष ठेवतो तो म्हणजे तो बॉलर तेजतर्रार असला पाहिजे. त्याची लाईन लेंथ, टप्पा या सगळ्या दुय्यम गोष्टी. पण, टी - २० सामन्यात गोलंदाजाचा स्वैर वेग हाच फलंदाजांच्या चांगलाच पथ्यावर पडत असतो.

विराटच्या तोफखान्यात विविधता नाही. नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि डेल स्टेन यांच्याकडे भन्नाट वेग आहे पण, टप्पा आणि व्हेरिएशनचे काय? नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज हे अजून नवखे बॉलर आहेत. त्यांना अनुभव मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण, विराटने डेल स्टेन सारख्या थकलेल्या घोड्यावर पैसे लावणं परवडणारं नाही. विराटला एकही सध्या चांगल्या फॉर्ममधे असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॉलर न मिळणं ही शोकांतिकाच आहे.

हेही वाचा : महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

संयम सुटलेल्या नेतृत्वाने केला आरसीबीचा घात

विराट कोहली हा आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. त्याची ही आक्रमकता त्याला बॅटिंगमधे उपयोगी पडत असेलही. पण, कॅप्टन्सी करताना आपला वरचा मजला शांत असणं अत्यंत गरजेचं असतं. आधीच आपल्या संघाचा डोलारा दोन - चार लोकांच्या खांद्यावर असताना त्यांचा वापर कल्पकतेनं, परिस्थिती पाहून करण्याकडे आपला कल हवा. पण विराटचा कल अजूनही स्लेजिंगकडेच असतो.

त्याने मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला खुन्नस दिली. त्याने सामना जिंकून देणारी खेळी केली. यातून कोणताही धडा न घेणाऱ्या विराटने पुन्हा मनिष पांडेला स्लेजिंग केलं. त्याने पुढच्याच चेंडूवर षटकार मारत कर्णधाराला प्रत्युत्तर दिलं. या दोन घटनांची चर्चा सध्या जोरावर आहे. त्यामुळे विराटच्या इमेजला तडे जातायत.

विराटने गोलंदाजीतील कल्पक बदल, प्रतिस्पर्धी फलंदाजाचा कच्चा दुवा शोधून बाद करणं यासारख्या रणनितींकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. स्लेजिंग करून विकेट काढण्याचे दिवस गेले. आपली नेतृत्वाची क्षमता स्लेजिंगमधे सिद्ध करुन दाखवण्याऐवजी बॉलरला चांगले इनपुट्स देत प्रतिस्पर्धी फलंदाजाला आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी आपलं डोकं खर्च करावं.

आता सुधारणा झाली नाही तर टीम इंडियाच्या कर्णधाराला आरसीबीचं कर्णधारपद गमवावं लागेल हे नक्की. शेवटी आयपीएलमधे स्टारडम नाही तर प्रॉफिट आणि रिझल्ट पाहिला जातो. विराटची आरसीबीचा कर्णधार म्हणून कामगिरी ही उथळ पाण्याला खळखळाट फार अशीच राहिली आहे. आरसीबीच्या व्यवस्थापनाला आता 'विराट' प्रेमातून बाहेर येत वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे. दिल्लीने ते धाडस दाखवलं आणि ते फायनलमधे पोचले. आरसीबी असं धाडस करणार का? 

हेही वाचा : 

थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!

समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्गुणाविरुद्ध क्रिकेटनं एका हत्यारासारखं काम केलं