आपल्या मनात लोकशाही मूल्यं आहेत की माणसांबद्दलचे पूर्वग्रह? : रवीश कुमार (भाग १)

०२ मार्च २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


लोकशाहीतल्या नागरिकाची ओळख दोन गोष्टींवरून केली जाते. एक, त्याला मूल्यांची किती जाण आहे आणि दोन, वेगवेगळ्या समुदायांविषयी त्याच्या मनात किती प्रमाणात पूर्वग्रह आहेत? यात आपण भारतीय नागरिक कुठे बसतो हे शोधायला लावणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती सभेत झालेल्या रवीश कुमार यांच्या भाषणाचं कृष्णात स्वाती यांनी केलेलं शब्दांकन.

महाराष्ट्राला ‘शिवाजी कोण होता?’ हे सांगणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांची शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे २० फेब्रुवारी २०१५ ला सनातनी लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या विचारांची आठवण ठेवत दरवर्षी भारतभर त्यांच्या नावाने कार्यक्रम घेतले जातात. यंदाही असे अनेक कार्यक्रम झाले. पण त्यात मुख्य आकर्षणाचा कार्यक्रम ठरला तो कोल्हापूरमधल्या ‘श्रमिक प्रतिष्ठान’चा. 

कॉम्रेड पानसरे स्मृती व्याख्यानासाठी वक्ते होते मॅगसेस अवॉर्ड विजेते पत्रकार रवीश कुमार. विषय होता ‘भारतीय लोकशाहीचं भविष्य.’ रवीश कुमार फेसबुक लाइवच्या माध्यमातून बोलले. पण त्यांच्या या भाषणाचं ऑनलाईन स्क्रिनिंग कोल्हापूरमधल्याच शाहू स्मारक भवनमधे केलं गेलं. जवळपास सगळा भारतच हा कार्यक्रम पाहत होता. या कार्यक्रमात रवीश कुमार यांनी केलेल्या भाषणाचं शब्दांकन तीन भागात देत आहोत.

आजचं औचित्य आणि विषय दोन्ही खूप महत्त्वाचं आहे. दिशा रवी नावाच्या एका मुलीला टूलकिट बनवलं म्हणून अटक केली. दिल्ली पोलिस तर्कावर आधारित नसलेल्या अनेक गोष्टी बोलून, काहीही करून उच्च न्यायालयात तिच्यावरचे आरोप सिद्ध करण्याच्या मागे लागलेत. हॅशटॅग अभियान चालवणं, कुणाला तरी टॅग करणं एखादा मोठा गुन्हा असल्याचं  ते मानतात आणि तो त्यांना सिद्ध करायचाय.

दुसरीकडे न्यायालय विचारतंय की ‘दिशामुळे हिंसा घडली किंवा घडलेल्या हिंसेत ती सहभागी आहे असे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? की ती फक्त शेतकरी आंदोलनाकडे लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतेय?’ अर्थात आपल्याला हे कळतंय की, दिशाला अटक करायला आलेले पोलिस अधिकारी कुणाचा तरी आदेश घेऊन आले होते. एखाद्या झूम कॉलमधे कोण सहभागी होतं हे सांगून त्यांना गुन्हेगार ठरवण्याच्या मागे हे पोलिस अधिकारी आणि गोदी मीडिया लागलेत.

लोकशाही संपवण्याचं ध्येय

बंगालमधे भारतीय जनता युवा मोर्चाची एक सदस्य कोकेनसह सापडलीय पण त्याची मीडियाने दखल घेतलेली नाही. त्याविषयी कुणी काही बोलतही नाही. या देशात अलीकडे दोन प्रकारचे कायदे बनलेत. एक सत्तेसोबत असणाऱ्यांसाठी आणि दुसरा सत्तेच्या विरोधात असणाऱ्यांसाठी. सत्तेसोबत असणाऱ्यांपैकी कुणी कोकेन बाळगत असेल तरी त्यांची फारशी दखल घेतली जाणार नाही. पण सरकारच्या विरोधात, पर्यावरणाविषयी, शेती आणि शेतकऱ्यांविषयी काही प्रश्नांवर बोलणारे, त्याविषयी काही तयारी करणारे मात्र गुन्हेगार ठरतील.

आज तुम्ही आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या संयोजनासाठीही तुम्ही काही लोकांशी बोलला असाल, नियोजन केलं असेल. हे आता गुन्हे ठरणार का? भविष्यातल्या लोकशाहीचा पाया मजबूत होण्याची शक्यता किंवा त्यासाठीचं बीज रुजवू शकेल अशी प्रत्येक शक्यता ते उद्ध्वस्त करू इच्छितात. कारण लोकशाहीला संपवण्याचं त्यांचं ध्येय आता पूर्ण झालंय. 

न्याययंत्रणेच्या काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित होतायत. माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई अलीकडच्या मुलाखतीत म्हटले की आपली न्यायव्यवस्था जीर्ण झालीय. एखादा सामान्य माणूस न्यायालयात जाऊन सहजपणे न्याय मिळवू शकत नाही.

हेही वाचा : देशद्रोहाचा खटला दाखल करणारं टूलकिट प्रकरण आहे काय?

पुराव्याशिवाय तुरुंगांत सडतायत लोक

पोलीस यंत्रणेवर कुणालाही दंग्यांच्या आरोपाखाली तुरुंगात डांबून ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित होतायत. आजचीच हिंदुस्थान टाईम्समधली बातमी आहे की, दिल्ली दंगलीमधे समोरून गोळ्या चालवल्या जातायत आणि त्याचा वीडियो इतका स्पष्ट आहे की सगळे चेहरे सहजपणे ओळखता येतात. पण त्यापैकी कुणालाही अटक न करता ज्या छतावर गोळ्या चालवल्या गेल्या आणि त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाल्या त्यांच्यापैकीच दोन, तीन जणांना पोलिसांनी अटक केली. 

आज उच्च न्यायालय विचारत आहे की, तुम्ही कोत्याही पुराव्याशिवाय कुणाला तुरुंगात असं कसं ठेऊ शकता? प्रत्येक तुरुंगात कुणास ठाऊक पुराव्याशिवाय पकडलेले किती लोक असेच सडत आहेत. पण अलीकडे पोलिस काही ‘खास’ विचारधारेच्या किंवा ओळखीच्या लोकांना ठरवून टार्गेट करतायत. त्यावरून हे लक्षात येतं की भारताच्या लोकशाहीच्या पायाभूत रचनेचं स्वरूप, यंत्रणांचं उत्तरदायित्व आता संपलंय.

मुलं देशाच्या सीमेवर, तर बाप दिल्लीच्या

शेतकरी दिल्लीला येतात तेव्हा सरकारची कार्ययंत्रणा असणाऱ्या गोदी मीडियाला पुढे करून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की हे शेतकरी दहशतवादी आहेत. खरंतर या शेतकऱ्यांमधे असे अनेक बाप आहेत ज्यांची मुलं सैन्यात आहेत. त्यांच्यात असे लोक आहेत ज्यांच्या आईवडलांची खलिस्तान्यांनी हत्या केली. पण त्या शेतकऱ्यांनाही, जे देशाच्या लोकसंख्येच्या ४० टक्के आहेत, उघडपणे दहशतवादी म्हटलं गेलं.

आपल्या देशात अशी एक परिस्थिती तयार केली गेलीय की गोदी मीडियाच्या या खोट्या प्रचारावर विश्वास ठेवणारे लोकही मोठ्या प्रमाणात तयार आहेत. त्यांना तुम्ही अंधभक्त किंवा मोदी समर्थक म्हणता. या सगळ्याचा प्रतिकार व्हायलाच हवा. त्यांना प्रश्नही विचारायलाच हवा की, सीमेवर लढणाऱ्या मुलांचे बाप दिल्लीला शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करण्यासाठी आले आहेत त्यांना सीमेवर का अडवण्यात आलं?

ते दिल्लीच्या सीमेवर आले तेव्हा हे आंदोलन दोन महिने, चार महिने चालेल असं कुणाला वाटलंही नव्हलं. ते फक्त दिल्ली सरकार समोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी आले होते. या शेतकऱ्यांना दहशतवादी का म्हणलं जाऊ लागलंय? या देशाच्या सरकारने आपल्याला मिळालेल्या बहुमताला गँगमधे बदलून टाकलंय. देशातल्या लोकांमधे सतत असुरक्षित असल्याची भावना निर्माण केली जातेय. वेगवेगळ्या समूहांविषयीचे त्यांच्या मनातले पूर्वग्रह जाणीवपूर्वक वाढवले जातायत. त्यांना खतपाणी घातलं जातंय. या सगळ्यातून लोकांना असुरक्षित वाटू लागल्यावर स्वतःलाच त्यांचे रक्षक म्हणून पुढे केलं जाऊ लागलंय.

या संपूर्ण प्रक्रियेमधे जे विचार करू शकणारे लोक आहेत. त्यात अनेक उच्च शिक्षित आणि स्वतःला शहाणे समजणारे लोकही आहेत. तेही लोकशाही विरोधी वागू लागलेत. हे लोक कोणत्याही घटना किंवा प्रक्रियेबद्दल असहनशील होऊ लागलेत. त्यांना या गोष्टी सहन होत नाही की कुणी आंदोलन का करतं? त्यांना सहन होत नाही की कुणी प्रश्न का विचारतं? लोकशाहीवर होणारे हल्ले लोकांचा मोठा समुदाय स्वीकारत आहेत, मान्य करत आहे ते फक्त एका नेत्यासाठी.

हेही वाचा : पेट्रोलची शंभरी पार, जबाबदार आधीचं सरकार?

पूर्वग्रहांमुळे वाढतायत लोकशाहीवरचे हल्ले

लोकशाहीतल्या नागरिकांची ओळख प्रामुख्याने दोन गोष्टींवरून केली जाते. एक तो संविधानिक मूल्यांनी किती संपन्न आहे आणि दोन तो पुर्वाग्रहांपासून किती दूर आहे. या पूर्वग्रहांपासून पूर्णपणे मुक्त तर होऊ शकत नाही. पण धर्माविषयीचे, भाषेविषयीचे, जातीविषयीचे किंवा प्रांताविषयीचे विविध पूर्वग्रह हे कमीतकमी असतील असं पहायला हवं. 

संविधानाने अशाच एका नागरिकाची कल्पना केली होती. यासाठीच त्यामधे नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांचा समावेश केला होता. असा संविधानिक मुल्यांची जाण असणारा नागरिक स्वतःच्या अधिकारांविषयीही बोलेल आणि इतरांच्या अधिकारांविषयीही बोलेल. त्यांचं संरक्षण करण्यासाठी पुढे येईल. पण पूर्वग्रहांची आणि पूर्वग्रह असणाऱ्या नागरिकांची संख्या जसजशी वाढेल तसे लोकशाहीकरणाच्या प्रश्नांवरचे हल्लेही वाढतील.

पूर्वग्रह असलेले नागरिक असे जमाव निर्माण करतील ज्यात लोकशाहीची कोणतीच शक्यता असणार नाही. ते यावर विश्वास ठेवतील की शेतकरी दहशतवादी आहेत. आज असे खूप लोक आहेत की ज्यांनी शेतकरी दहशतवादी आहेत हे मीडियाने पसरवलेलं असत्य मान्य केलं. शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना प्रत्येक मंचावरून आम्ही देशद्रोही नाही, आम्ही या देशाला खाऊपिऊ घालतो आणि देशाला वाचवण्यासाठी आमच्या मुलांना सीमेवर पाठवतो म्हणून स्पष्टीकरण देत फिरावं लागतंय.

शेतकऱ्यांना होतोय पश्चाताप

आज आपल्या देशात शेतकऱ्यांची ही अवस्था झालीय. खरंतर यांच्यापैकी अनेक शेतकरीही कधीतरी या इतरांवर शिक्के मारणाऱ्या समूहांत सहभागी होते. आज ते आपल्या महापंचायतीमधे सांगतायत की गेली काही वर्ष आम्हीही या लोकशाहीविरोधी समूहांचा भाग होतो. आमची चूक झाली. त्यांना त्यांची चूक कळायला सात वर्ष लागली. ते म्हणतायत आम्ही मनात परस्परांविषयी द्वेष पाळला आणि त्यातून आम्हीच कमकुवत झालो. 

शेतकऱ्यांना आज लक्षात आलंय की मुझफ्फरनगरसारख्या दंगलीमधून मजूबत झालेल्या पक्षाला त्या त्या भागात खूप जास्त आमदार, खासदार मिळाले. पण त्या पक्षाला आणि आमदार खासदारांना निवडून देणारे शेतकरी कमकुवत बनले. इतके कमकुवत झाले की ते दहशतवादी म्हणवले जाऊ लागले.

शेतकरी दिल्लीला येऊ नयेत म्हणून रस्त्यावर खिळे ठोकले गेले. या शेतकऱ्यांना तेव्हा याची जाणीव नव्हती की त्यांनी जोपासलेली धार्मिक कट्टरता एक दिवस त्यांची ही अवस्था करेल की ज्यामधे त्यांच्या नागरिक असण्याला काहीच अर्थ असणार नाही. आपल्याला या निकषावर तपासून पाहिलं पाहिजे की देशाच्या लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या आपल्या देशातल्या लोकांना संविधानिक मूल्यांची किती जाण आहे? ते या मूल्यांनी किती संपन्न आहेत आणि पुर्वाग्रहांनी किती ग्रस्त आहेत?

यानंतरचा भाग इथं वाचा : लोकशाहीतून गायब झालाय विरोधी पक्ष

हेही वाचा : 

मोदींच्या गुगलीवर फसले आहेत ‘आंदोलनजीवी’

मोदी शहांना तरुण कार्यकर्त्यांची इतकी भीती का वाटते?

स्वस्तात सर्वात मस्त असणार भारतीय रेल्वेचा थ्रीई डब्बा

सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण