झी टीवी मराठीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच सुरू होतोय. तळकोकणातली ही भुताटकी मालिकेच्या निर्मात्यांनी बरोबर हेरलीय. कोकणातल्या प्रत्येक गावात अशा गूढ गोष्टींचा खजिना भरलेलाय. या खजिन्याकडे शहरीच काय, उच्च नागरी मध्यमवर्गीयही आकर्षित होतात. म्हणूनच या मालिकेचा तिसरा सिजनही गाजण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात कुडाळ-घावनळे रस्त्यावर खुटवळवाडीला एक सरकारी स्मशानभूमी आहे. हल्लीच त्या रस्त्यावरुन जाताना मुद्दामहून त्या स्मशानभूमी जवळ थोडा वेळ थांबलो. चंद्रकांत लाड काही त्या स्मशानातून बाहेर येताना दिसले नाहीत. कसे येणार? गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याच स्मशानात त्यांचा अंत झाला.
गेली अठरा वर्ष हा माणूस एकटाच त्या स्मशानात वास्तव्य करून होता. हा माणूस स्मशानात का रहायला गेला? तर त्यांचं म्हणणं असायचं की, ‘घरदार उरलं नसलेल्या, जवळचं कुणी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला राहायला स्मशानासारखी दुसरी कुठली सुरक्षित जागा नाही!’
मग त्यांना भेटायला आलेल्यांपैकी कुणीतरी हमखास विचारायचंच की, 'तुम्हाला भुताखेतांची, अतृप्त आत्म्यांची भीती नाही वाटत?' त्यावर ते हसून म्हणायचे की, 'भूत पिशाच्छ, अतृप्त आत्मे, हडळ बिडळ, करणी जाब हे सगळं थोतांड आहे. प्रेतासोबत आलेली नातेवाईक मंडळी जाताना माझ्या हातावर पैसे ठेवून जातात. मग मी शेवटपर्यंत तो मृतदेह नीट जळतो की नाही त्याच्यावर लक्ष ठेवतो. कुणी काही दिलं तर आणून खातो. पण संध्याकाळ झाली की कुणी इकडे फिरकत नाही!'
जेमतेम शिकलेला, मुंबईत पोस्टरं रंगवून रोजीरोटी कमावणारा हा माणूस मूळ कोकणातलाच. असं असूनही याला चक्क स्मशानात राहायची अजिबात भीती कधीच का वाटली नाही याचं उत्तर शोधल्यावर एकीकडे आपल्या विज्ञानवादी मनात लख्ख उजेड पडतो.
तर दुसरीकडे त्याच कोकणातल्या प्रत्येक गावागावातल्या आणि समाजासमाजामधल्या गूढ वाढवणाऱ्या वेगवेगळ्या चालीरीती, गावऱ्हाटी, अदृष्य शक्तींबद्दलची भीती, त्यामागे जोडलेल्या हजारो आख्यायिका आणि त्या आख्यायिकांना सोबत घेऊन सुरू असलेल्या परंपरा याबद्दल प्रचंड कुतूहलही जागं होतं.
या कुतुहलापोटी अनेकांच्या मनाचे खेळ सुरू होतात. हेच मनाचे खेळ मध्यभागी ठेवून ‘रात्रीस खेळ चाले’ सारखी टीवी मालिका आकाराला येते. बघता बघता दोन सिझन संपवून या मालिकेचा तिसरा सिझनही सुरू होतो.
हेही वाचा : जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा
खरंतर कोकणातल्या या गूढ चालीरीती, परंपरा, गावऱ्हाटी याबद्दलचे उल्लेख कोकणातल्या अनेक साहित्यिक, कलावंत, अभ्यासक यांच्या कलाकृतीत वेळोवेळी आलेत. पण कोकणची भौगोलिक रचना आणि या गावरुढींचा जवळचा संबंध असल्याचं जाणवत राहतं.
आता गावागावात घराघरापर्यंत रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना पोचल्यात. चौपदरी हायवे गावाजवळून जातात. गुगल सर्च करुन हवी ती माहिती मिळवणारी मुलं प्रत्येक घरात वावरतात. तरी आजही कोकणात अशी हजारो छोटी मोठी स्थळं आहेत तिथं रात्रीचंच काय दिवसाचंही कुणी फिरकत नाही.
का? तर अशा ठिकाणांना जोडली गेलेली एखादी गूढ भयकथा परंपरेनं पुढे चालत आलीय. वेगवेगळ्या देवराया, जंगलातले दुर्गम पाणवठे, शेकडो वर्षांपुर्वीचे प्रचंड मोठे पिंपळ, वड, भग्नावस्थेत असणारे जुने वाडे, गावालगतच्या डोंगरकपारीत असणाऱ्या गुहा, वस्तीपासून दूर असलेले मातीतून वर आलेले काळेकभिन्न आणि आकाराने धडकी भरवणारे पाषाण, जंगलाकडे जाणाऱ्या निर्मनुष्य पायवाटा ही सगळी रचना अशा गावोगावच्या रुढींना, समजांना, एक प्रकारचं कोंदण किंवा फ्रेम असल्यासारखी वाटत राहते.
इथल्या प्रत्येक गावाच्या गावऱ्हाटी वेगवेगळ्या आहेत. गावऱ्हाटीच्या कारभारातले शब्दही वेगवेगळे आहेत. संचार, आक्रीत, कलमदारी, अवगत, आळवत, खुनी, देवचार, जाबसाल, निरंकारी तत्व, घरचो आकार, मूळपुरुष, चाळो, निर्वशाची नड, चौकचारी जाब असे अनेक गूढ शब्द आणि त्या प्रत्येक शब्दामागे असलेली एकेक आख्यायिका असं बरंच काही या गावरुढींमधे सामावलंय. खरंतर कोकणातल्या गावऱ्हाटी आणि गावव्यवस्था हा एक खूप मोठा विषय आहे.
त्याबद्दल आत्तापर्यंत अनेकांनी लिहिलंय. ही सगळी माहिती प्रचंड कुतूहल वाढवणारी आहे. इथल्या प्रत्येक गावदेवीच्या देवळात कौल लावताना गुरवाकडून गाऱ्हाणं घातलं जातं. या गाऱ्हाण्यांमधले शब्दही गूढ आहेत. प्रत्येक देवस्थानाच्या आणि त्या त्या देवांच्या कथाही गूढ वाढवणाऱ्या आहेत. या सगळ्याचा इथल्या समाजमनावर आजही पारंपरिक पगडा असल्याचं जाणवत राहतं. हा पगडा या गावव्यवस्थेचा मुख्य आधार आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतल्या गुरवाच्या तोंडी असलेलं नेहमीचं एक वाक्य तुम्हालाही आठवत असेल. 'ह्या कायतरी भयंकर दिसताहा. हेचो बंदोबस्त करूक व्हयो. वेळीच भागवलात नाय तर ह्या भारी पडात तुमका.' हे भयंकर म्हणजे काय असतं? आणि ही भागवणी म्हणजे काय असते? याबाबतच्या अनेक सुरसकथा तुम्हाला कोकणातल्या गावोगावी ऐकायला मिळतील.
हेही वाचा : भानूताई सिनेमाच्या काळाचा अभ्यास करून वेशभूषा ठरवायच्या
गिरो, देवचार, लावसट, खुनी, अळवत, आसरा हे शब्द कानावर पडत राहतील. त्यासाठी तुम्हाला गावातल्या एखाद्या भगताला भेटावं लागेल. हा भगत म्हणजे कोण? तर एखाद्याच्या वाईटावर असलेली अदृष्य शक्ती आणि पिडीत यांच्यामधला त्या गावातल्या लोकांनी स्वीकारलेला दुवा.
तळकोकणात सिंधुदुर्गापेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर, गुहागर, चिपळूण, राजापूर या भागात ही भगतगिरी अद्यापही जोरदार चालते. अनेकजण रात्रीचे या भगतांकडे जातात. भगत मग त्यांना तुमच्याविरोधात कुणी करणी केलीय, कुणी जाब दिलाय आणि त्यातून सुटका कशी करुन घ्यायची ते उपाय सुचवतो.
हे उपाय म्हणजे ही भागवणी. मग ती भागवणी दोन पाच दहा कोंबड्यांपासून ते अगदी बकऱ्यापर्यंतही जाते. हे भयाचं, अदृष्य शक्तींचं पारंपरिक गारुड इथल्या समाजमनावर आहे ते कोकण वगळता इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेही आढळून येत नाही.
अमूक एका वाटेने रात्रीचा तू चालत आलास, त्या वाटेवर देवचाराचा त्यावेळी संचार होता त्यामुळे तू त्याच्या तावडीत सापडलास आणि म्हणून तुला असा त्रास होतोय, किंवा ‘ती ज्या नदीवर कपडे धुव्क गेल्ली थय त्या कोंडीत कोन रवता ता तुमका ठाव्क नाय? म्हणून ती अशी करताहा.’
या सगळ्या भगतगिरीच्या सांगण्यात कोकणातल्या कुठल्या ना कुठल्या स्थळाचा उल्लेख येत राहतो. मग ती वाट असो, नदी असो, पडलेलं घर असो, अजस्र वृक्षांनी समृद्ध असलेली शेकडो वर्षांची देवराई असो, काट्याकुट्यांनी वेढलेली पडीक विहिर असो. अशा अनेकविध स्थळांनी साकारलेल्या एका विस्तीर्ण अशा भल्यामोठ्या कॅनवासवर हा सगळा खेळ सुरू असतो.
हेही वाचा : ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?
कोकणातल्या या सगळ्या रुढी आणि परंपरांना आजची तरुण पिढी कवटाळून बसत नाही हे खरंच आहे. पण या सगळ्या रुढी आणि परंपरा इथल्या गावव्यवस्थेशी निगडीत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात त्या टिकून आहेत. निवडणुका आल्या की, या गावव्यवस्थेचा किंवा बारा पाच व्यवस्थेचा आधार म्हणा किंवा फायदा घ्यायला कोकणातले अनेक राजकीय नेतेही मागे नाहीत.
गावदेवीकडे म्हणजे मर्यादेकडे नेहमीचा कौल लावणं, गाऱ्हाणं घालणं, नारळ देणं या कामासाठी आलेल्या गावकऱ्यांकडून अमूक एका उमेदवाराला मत टाकण्याचा शब्द गावदेवीसमोर घेताना काही गावातले गुरव मी पाहिलेत. आजही अनेक राजकारणी, डॉक्टर, वकील, व्यावसायिक अशी मंडळी आपल्यावर कोणतं संकट येऊ नये किंवा आलेलं संकट दूर व्हावं यासाठी रात्रीच्या वेळी एखाद्या भगताकडे जाऊन समस्येवरचा उपाय शोधताना दिसतात.
गुहागरमधल्या एका भगताबद्दल तिथल्या गावककऱ्यांकडून माहिती घेतली तर असं कळालं की गोव्याचे दोन मोठे दिग्गज राजकीय नेते अधूनमधून त्याच्याकडे येत असतात आणि उपाय घेऊन जात असतात. हे असं कोकणात सर्रास सुरू असतं. या सगळ्या गोष्टी अतार्कीक असल्या तरी गूढ वाढवणाऱ्या आहेत.
एक चिकित्सक, विज्ञानवादी तर्कशुद्ध मन या गोष्टी कधीही स्वीकारत नाही किंवा स्वीकारणारही नाही. तरीही कोकणातल्या प्रत्येक गावात गावव्यस्थेशी समांतर पण व्यवस्थेला कनेक्टेड अशा अनेक गूढ व्यवस्थांचा खजिना भरलेलाय. मग त्यात करणी आली, भूत उतरवणं आलं, जाब देणं आलं, भागवणी आली, राखण देणं आलं, चाळा उठवून घालणं आलं.
सध्याच्या आधुनिक, प्रयत्नवादी, तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत असलेल्या आणि तरीही एकमेकांबद्दलच्या वाढत चाललेल्या अविश्वासाच्या वातावरणात कोकणातल्या अशा गूढ रुढी आणि परंपरांबद्दल जाणून घेण्यात शहरीच काय, उच्च नागरी मध्यमवर्गीयांनाही खूप रस आहे हे ‘रात्रीस खेळ चाले’च्या निर्मात्यानी ओळखलं असावं. आणि म्हणूनच या मालिकेचा तिसरा भागही रचला असावा.
हेही वाचा :
फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?
सोनाली बेंद्रेः कॅन्सरशी पंगा घेणारी लढवय्यी
आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!
तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?
(दिनेश केळुसकर हे ज्येष्ठ पत्रकार आणि कवी आहेत)