थँक यू रसना, आय लव यू रसना!

२२ नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


देशभर थंडी पडलीय. गरमागरम चहाकॉफी किंवा सूप प्यायचे दिवस असताना, अचानक थंडगार रसनाची आठवण कशाला आली, असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. पण रसना आज आठवण्याचं कारण, म्हणजे 'रसना'चे मालक अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचं निधन झालंय. आपल्या आयुष्यातले अनेक उन्हाळे थंड करत 'आय लव यू रसना' म्हणायला शिकवणाऱ्या, या माणसाला 'थँक यू रसना' म्हणायला हवं.

एक काळ असा होता, की प्रत्येक लग्नात, साखरपुड्याला किंवा वाढदिवसाला रसना पाजलं जायचं. एवढंच काय तर अनंत चतुर्दशीची मिरवणूक असो की मोहर्रमसाठीचं जलवाटप असो… रसनाच्या अक्षरशः मोठमोठ्या टाक्या रिकाम्या व्हायच्या. एवढी मोठी जादू केलेल्या या पेयाची ही गोष्ट आणि ही संकल्पना सूचणारा माणूस नोंद घ्यावी एवढा मोठा नक्कीच आहे. त्यासाठीच अरीज फिरोजशॉ खंबाटा यांना 'थँक यू रसना' असं म्हणावंच लागेल.

हेही वाचा: आग विझवण्यात मुंबईतला रोबोट अपयशी, मग जगभरात काय होतंय?

सर्वसामान्यांचा विचार करणारं उत्पादन

रसना जेव्हा बाजारात आलं तेव्हा त्या काळात घरामधे फ्रीज असणं ही चैनीची गोष्ट होती. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या बैलगाडीवर बर्फ विकला जायचा. कधी गाडीवरून किंवा कुणा फ्रीजवाल्याच्या घरातून बर्फ आणून किंवा अगदीच नाही तर माठातल्या पाण्याचीही गंमत वाढवणारा 'रसना' पोरांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडता होता. 

तो काळ काचेच्या बाटलीबंद शीतपेयांचा आणि लोखंडी बिल्ल्यांच्या ढाकणांचा होता. त्यावेळी ही बाटलीबंद पेयं, ही श्रीमंतांच्या लग्नातला थाट ठरायची. या बाटलीबंद पेयांना सर्वसामान्यांचा परवडणारा पर्याय म्हणजे रसना असं समीकरण तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरलं. एका खोक्यामधे असणारी पावडर आणि त्यातल्या छोट्या बाटलीत असणारं काँन्सट्रेट एकत्र केलं, त्यात पाऊण किलो साखर आणि पाणी टाकलं की ३२ ग्लास सरबत तयार व्हायचं. 

साधारणतः बाजारात जेव्हा कोणतंही उत्पादन आणलं जातं ते कोणत्या वर्गासाठी असं ठरवलं जातं. रसना बाजारात आलं ते मध्यमवर्गासाठी. पण ते एवढं लोकप्रिय झालं की सर्वच वर्गात रसना हा ब्रँड बनला. क्लासपासून मासपर्यंतची मन जिंकणारं हे पेय, म्हणूनच महत्त्वाचं ठरलं आहे. आज रसनाची ही क्रेझ तेवढी उरली नसली, तरीही देशभरातल्या मॉल्सच्या रॅकवर आजही रसना दिमाखात दिसते.

ग्लोबलायझेशनचा फायदा, फटकाही

१९८० मधे देशात रेडिओ जाऊन टीवी येऊ लागला होता. १९८२ च्या एशियन गेम्ससोबत फार रंगीत टीवी आला. या रंगीत टीवीवरच्या जाहिराती अनेकांच्या नॉस्टेल्जियाचा भाग आहेत. त्यात रसनाची ती गोड मुलगी मोठा रसनाचा जार घेऊन ज्या प्रेमानं 'आय लव यू रसना' म्हणते ते कोणी विसरूच शकत नाही. या जाहिरातीनं रसना देशातल्या गावागावात आणि प्रत्येक घराघरात पोचलं.

ग्लोबलायझेशनच्या या पहिल्या लाटेचा प्रचंड फायदा रसनाला झाला. फक्त देशातच नाही तर जगभरात गेलेल्या भारतीयांनी रसना तिकडेही लोकप्रिय केलं. आजही भारतासह अनेक देशांमधे 'रसना'ला मागणी आहे. सध्या देशात १८ लाख किरकोळ दुकानांवर रसनाची विक्री केली जाते. तर, जगभरात रसना ब्रॅण्डची सरबतं ६० देशांमधे विकली जातात. 

हे सगळं जरी खरं असलं तरी, रसना या सरबताची जी क्रेझ ८०-९० मधे होती ती आज उरलेली नाही, हे वास्तव स्वीकारायलाच हवं. नव्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधे मिळणाऱ्या फसफसत्या कोल्डड्रिंक्सनी हे गणित बदललं. तसंच सरबत बनवून पिण्यापेक्षाही रेडीमेड बाटली उघडली की लाव तोंडाला, या इन्स्टंट सवयीनंही रसनाचा बाजार बदलला. त्यामुळे ग्लोबलायझेशचा जसा फायदा रसनाला मिळाला तसाच त्याचा फटकाही त्यांना बसला.

हेही वाचा: पाकिस्तानात जन्मलेल्या कलाकारांच्या आठवणींचा सन्मान तिथे होतो का?

पारशी, गुजरात आणि साखर

अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला होता. पारशी उद्योगपतींनी भारतात फार मोठं उद्योगविश्व उभं केलं आहे. टाटा, गोदरेज, वाडिया यांच्यासह अनेक छोट्यामोठ्या उद्योगातही पारसी समुदायाचं मोठं योगदान राहिलंय. या सर्व उद्योगपतींमधे अरीज फिरोजशॉ खंबाटा यांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर इरणाहून आलेल्या पारशी समूहाबद्दल एक किस्सा सांगितला जातो. असं म्हणतात की, साधारणतः आठव्या शतकात इराणमधे झालेल्या इस्लामी आक्रमणांनी हैराण होऊन झोराष्ट्रियन वंशाच्या या पारशी समुदायानं देश सोडला. ते गुजरात किनारपट्टीवर उतरले आणि संजानच्या राजाच्या आश्रयाला आले. 

संजानच्या राजानं या पारशी समुदायाला सांगितलं की माझ्या राज्यात खूप माणसं आहेत, तिथं तुम्हाला कसा आश्रय देऊ. त्यावेळी त्या राजानं समोर दुधाचा पेला ठेवला होता. त्यात त्या पारशी टोळीच्या नेत्यानं स्वतःकडली साखर टाकली आणि सांगितली. तुमच्या भरलेल्या राज्यात आम्ही साखरेसारखे विरघळून राहू. त्याच गुजरातमधे साखरेसारख्या राहणाऱ्या खंबाटा कुटुंबानं 'रसना' भारताला देत, अनेकांचा उन्हाळा गोड केला, हे विसरून चालणार नाही.

लोकमान्यतेसोबत सरबतला पुरस्कारही

एकेकाळी अवघ्या पाच रुपयात ३२ ग्लास सरबत देणारं रसना त्यावेळी लोकप्रिय होतंच. पण जगभरातल्या बाजारात या उत्पादनाला विविध पुरस्कारही मिळाले. २००९ पर्यंत देशातल्या थंड पेयांच्या बाजारात तब्बल ९३ टक्के वाटा हा फक्त 'रसना'चा होता. त्यामुळेच इंटरनॅशल टेस्ट अँड क्वालिटी इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा २००८ चा पुरस्कार 'रसना'ला मिळाला होता. त्यानंतरही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रसना'ला गौरवलं गेलंय.

स्वतः अरीज खंबाटा हे बेनेवोलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. ते वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्तीचे अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे अध्यक्षही राहिले होते. त्यांना वाणिज्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी नॅशनल सिटीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याशिवाय, सिविल डिफेन्स मेडल, पश्चिमी स्टार, समरसेवा, संग्राम मेडल्स पुरस्कार देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला होता. 

लोकमान्यतेसोबत व्यावसायिक क्षेत्रातही उत्तुंग यश मिळवलेल्या या सरबतानं अनेकांना सुखावलंय. देशातल्या आणि परदेशातल्या अनेक भारतीयांच्या आठवणी रसनाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे आज खंबाटा यांच्या निधनानंतर, या आठवणी निघणं अपरिहार्य होतं. म्हणूनच भारतातल्या तळपत्या उन्हाळ्यातही आम्हाला थंडगार अनुभव देणाऱ्या खंबाटांना शेवटचं 'थँक यू रसना' म्हणायलाच हवं.

हेही वाचा:

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे 

रमजान ईद दिवशी अमर हबीब यांची वाचायला हवी अशी कथा

पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

जनजागृतीमुळे कंडोम स्वीकारला, तशीच जातही संपवता येऊ शकेल