आपली मराठी भाषा जितकी जुनी आहे तितकीच ती व्यापकही आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. पण इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झाली. आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची घेतलेली विशेष मुलाखत.
आज मराठी भाषा गौरव दिन. मराठी साहित्यातले महत्त्वाचे कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना साहित्य क्षेत्रातल्या समग्र योगदानाबद्दल पाच लाख रुपयांचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झालाय. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते, साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी आज होणाऱ्या या खास समारंभात महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
पठारे यांनी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलंय. त्यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरीही खूप गाजलीय. म्हणूनच आजच्या दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेचं प्राचीनत्व, समृद्ध परंपरा, तिच्या पिछेहाटीमागची कारणं यांची चर्चा करण्यासाठी प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी घेतलेली ही खास मुलाखत.
तुम्ही मराठीतले महत्त्वाचे लेखक आहात. महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाच्या वतीने तुम्हाला समग्र योगदानाबद्दल पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झालाय. अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष म्हणूनही तुम्ही काम पाहिलंय. तर तुम्ही या पुरस्काराकडे कसं पाहता?
तशा या दोन घटना एकमेकांशी जोडलेल्या नाहीत. कदाचित साहित्य क्षेत्रातलं थोडंफार काम आणि अभिजात भाषेचं काम मला महत्त्वाचं वाटतं. एरवी मी भाषाशास्त्रज्ञ अथवा भाषेचा अभ्यासक नाही. पण एकूण माझ्या वाचनातून मला असं लक्षात आलं की, मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. त्यामुळे सगळी कामं बाजूला ठेवून समितीतल्या महत्त्वाच्या सदस्यांच्या सोबतीने हे काम आम्ही केलं.
एरवी या कामाला वेळ लागला असता. पण आपल्या पूर्वजांनीच भाषेच्या बाबतीत इतकं काम करून ठेवलंय की, ते पुरावे उचलून एकत्र करून त्यासंदर्भातलं एक आर्ग्युमेंट करणं बाकी होतं. त्यासाठीचा मसुदा बनवून ते काम दीड वर्षात शासनाकडे सादर केलं.
हेही वाचा : जयंत नारळीकर म्हणजे फळांनी लगडलेलं एक सफरचंदाचं झाडच!
मराठीचं प्राचीनत्व सांगताना दिवेआगरचा ताम्रपट, श्रवणबेळगोळचा शिलालेख किंवा फार तर उद्योतनसुरीच्या कुवलयमालाचा उल्लेख केला जातो. त्यापूर्वीचे काही पुरावे सांगता येतील का?
त्यासाठी आपण तेराव्या शतकातल्या म्हाईंभटाच्या लीळाचरित्राचं उदाहरण घेऊ. याच परंपरेत ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्ठी, अनुभवामृत, नामदेवांची अभंगवाणी, तू म्हणतोस ते शिलालेख, ताम्रपट येतात. तर या ग्रंथातली मराठी इतकी प्रगल्भ आणि समृद्ध आहे की, मराठीची ही परंपरा निश्चितच पाच-सहा शतकं मागे नेता येते. हे प्रमेय कोणताही भाषा अभ्यासक नाकारू शकत नाही. कारण, कोणतीही भाषा आज निर्माण झाली आणि उद्या प्रगल्भ झाली असं नसतं.
आपण महाराष्ट्री अथवा महारठी असं म्हणतो, तिला मोठी परंपरा आहे. म्हणजे अत्यंत प्राचीन अशी प्रख्यात कादंबरी समरादित्याची कथा समराईच्च कह, गाथा सत्तसई असे अनेक प्राकृत ग्रंथ आहेत. या रचना मराठीचं प्राचीनत्व सिद्ध करतात. तसंच प्राकृत भाषेचं व्याकरण. संस्कृतमधे रचताना वैयाकरणांनी भाषेचे नियमन देताना शेवटी ‘शेष महाराष्ट्रिवत’ म्हणजे उर्वरित मराठी, असं दरवेळी म्हटलंय. याचा अर्थ मराठी ही दोन हजार वर्षांची प्राचीन भाषा ठरते.
‘गाथा सत्तसई’ या ग्रंथाच्या हस्तलिखित पोथ्या फक्त संपूर्ण भारतातच नाही, तर अफगाणिस्तानातही मिळाल्यात. तर हे मराठीच्या वेगळेपणाचे निदर्शक आहे. हे सगळं वर्णन गोदावरीच्या काठच्या खेड्याचं आहे. ज्या नदीचा संबंध फक्त महाराष्ट्राशी आहे. यालाच जोडून आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे सातवाहनांचं राज्य संपूर्ण भारताच्या भूखंडावर इसवीसन पूर्व २३० ते इसवीसन २०० असं जवळपास साडेचारशे वर्षं होतं. त्यामुळे मराठीचं प्राचीनत्व महत्त्वाचं आहे, तितकं तिचं व्यापकत्वही महत्त्वाचंय.
‘सातपाटील कुलवृत्तांत’ कादंबरी लिहून तिच्या शेवटी राजारामशास्त्री भागवतांचा संदर्भ देऊन मराठी ही संपूर्ण भारत खंडाची भाषा असल्याचं तुम्ही म्हटलंय. याबद्दल काय सांगाल?
राजारामशास्त्री भागवत हे अत्यंत प्रतिभावान अभ्यासक होते. त्यांनी ‘मर्हाटीसंबंधी चार उद्गार’ असं मांडताना संपूर्ण देशच मराठी माणसाने उभा केलाय आणि ती भाषा राजव्यवहाराचीही होती, असं सांगितलंय. मराठीचा संबंध पश्तू या पठाण भाषेशी कसा आहे, हेही स्पष्ट केलंय. सिंधीमधे आईला आईच म्हणतात किंवा मेघालय, मिझोराम, आसाममधेही आईला आईच म्हटलं जातं. त्यामुळे मराठीचा संबंध देशभर असल्याचं लक्षात येतं.
हे फक्त एका शब्दाचं आहे असं नाही. तर असे शेकडो शब्द आणि लकबी मराठी सिंधीमधे समान आहेत आणि सिंधी ही सिंधू प्रदेशातली प्राचीन भाषा आहे. भाषेच्या अंगाने भाषा अभ्यासकांनी काम करायला हवं. तिचं हे प्राचीनत्व आजही जपलं गेलंय.
हेही वाचा : महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून
मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मी असं विचारतो की, इतकी प्राचीन परंपरा असलेली मराठी मरणपंथाला लागलीय अशा भ्रमातून लोक इंग्रजीकडे वळलेत. याबद्दल आपण काय सांगाल?
इंग्रजांच्या आगमनानंतर मराठी भाषा बिघडायला आणि तिचा दर्जा खालावायला सुरवात झालीय. विष्णुशास्त्री चिपळूणकर या ज्ञानपुरुषाने मराठी ही मशागत न केलेल्या पडीक जमिनीसारखी भाषा असून, तिला एकीकडून संस्कृत आणि दुसरीकडून इंग्रजी अशा दोन भाषांचा बळकट आधार द्यावा लागेल, असं सांगून मराठीचं खूप मोठं नुकसान केलंय. ज्या भाषेत लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी लिहिली किंवा नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी लिहिलेले होते ती नूतन भूमिकेप्रमाणे कशी? पण हे प्रमेय मधल्या काळात आपल्यासारख्या लिहिण्याऱ्या वाचणार्या लोकांनी प्रमाण मानलं.
मधल्या शंभर वर्षांत पेशव्यांचे ब्राह्मणी नेतृत्व मध्यवर्ती असल्याने मराठीकडे बघण्याचा द़ृष्टिकोन बदलला. अरुण साधू यांनी एकेठिकाणी असं म्हटलंय की, महाराष्ट्राचं नेतृत्व ब्राह्मण लोकांनी केल्यामुळे महाराष्ट्री धर्माचं मोठं नुकसान झालंय, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कारण, बृहत मराठी यांच्या आस्थेच्या ठिकाणी कधी आलं नाही. इंग्रजांनी आपल्या कारकुनीसाठी इंग्रजी शिकवलं. या सगळ्या प्रक्रियेपासून बहुजन दूरच होता.
तिथूनच खर्या अर्थाने इंग्रजीचा शिरकाव झाला आणि मराठीची पिछेहाट सुरू झालीय. स्वभाषेला कमी लेखण्याची प्रवृत्ती बळवायला सुरुवात झाली. खरंतर महात्मा फुले यांनी खर्या अर्थाने मराठी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, अलीकडे अठरापगड जातीतले लोक लिहायला लागल्यावर तिला जरा बरे दिवस आले असले, तरी मात्र आजच्या मध्यमवर्गीय माणसाला ब्राह्मणी परंपरेचं जे आकर्षण आहे, त्याचाही एक परिणाम आजच्या मराठीच्या पिछेहाटेवर झालेला दिसतो.
आता हा प्रश्न जागतिक असला, तरी मराठीबाबत बोलायचं झालं, तर याला आपण काऊंटर करू शकू. तेरा कोटी जनतेची भाषा अशी मरेल असं वाटत नाही. पण त्यासाठी जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतील. मराठी ही ज्ञान-विज्ञानाची आणि रोजगाराची भाषा बनवायला हवी.
यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी सातत्यपूर्ण आणि नवीन उपक्रम राबवले होते. ते समजून नीट लक्षात घ्यायला हवेत. त्यांनी जी पायाभरणी केली त्यावर आपण काही काळ तगून राहिलो. पण आता असा कुणी दूरद़ृष्टीने विचार करणारा राजकारणी राहिला नाही. त्यामुळे परिस्थिती विचार करण्यासारखी आहे. कारण, भाषा मरते म्हणजे एक पूर्ण संस्कृती मरत असते. असं काही घडणं धोकादायक आहे.
तुम्ही विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केलं. तुमचा इंग्रजीचा अभ्यास असूनही आपण मराठीत लेखन केलंय. भाषेला ऊर्जितावस्था येण्यासाठी काही करता येईल का?
मराठीला दिमाखाने उभं करायचं असेल तर तिला ज्ञान-विज्ञानाची भाषा बनवायला हवं. साहित्य संस्कृती मंडळाने अनेक खंड प्रकाशित केलेत. ते काम पुढे गेलं पाहिजे. त्याला गती मिळायला हवी. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळामार्फत खूप महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित केले होते. ते काम आता बंद पडलंय. ते पुन्हा नव्याने सुरू करायला हरकत नाही, ते फार खर्चिकही नाही.
जगातल्या इतर भाषेतलं उत्तम ज्ञान अनुवादित करायला हरकत नाही. असे काही उपक्रम विद्यापीठाने अग्रक्रमाने करायला हवेत. त्या त्या ज्ञानशाखेतलं साहित्य सहजपणे उपलब्ध व्हायला हवं.
कोरियासारख्या अत्यंत छोट्या देशाने आपल्या कोरियन भाषेत जगातले सर्वोत्तम ज्ञान उपलब्ध करून दिलंय. त्यांना इंग्रजी येत नसूनही तो देश आज पुढे आहे. मात्र, इकडे आपणच आपल्या भाषेला दुय्यम मानत आलो आहोत. ती प्रगल्भ बनवण्यासाठी छोटे-मोठे उपक्रम ठोसपणे राबवण्यात आले पाहिजेत. तसा एक भाषाविषयक आराखडा मी शासनाला देऊ शकतो.
हेही वाचा : गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ
अभिजात भाषाविषयक आजची स्थिती काय आहे?
समितीने म्हणून जे काम करायला हवं ते आपण दीड वर्षात करून २०१५ मधेच शासनाकडे सादर केलंय. शासनाकडून तो प्रस्ताव केंद्राच्या सांस्कृतिक विभागाकडे गेलाय. माझ्या समजुतीनुसार त्याला मनुष्यबळ मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांची मंजुरी घेऊन तो संसदेत मांडला गेला पाहिजे.
पण मला असं समजतं की, कुणी तरी मद्रास हायकोर्टात मल्याळमच्या संदर्भाने केस दाखल केलीय. त्या केसचं कारण पुढे करून दिरंगाई केली. आता आणखी कारण उरलेलं नाहीय. मंत्री म्हणतात, प्रपोजल ऑफ मराठी इज अंडर अॅक्टिव्ह कन्सिडरेशन. आता तो प्रस्ताव साहित्य अकादमीकडे आला आहे. याला काय म्हणावं! यांच्यासाठी आपल्या मुख्यमंत्री आणि खासदारांनी आवाज उठवायला हवा, तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
हेही वाचा :
वाचकानं सजगपणे वाचन संस्कृती कशी घडवावी?
कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?
आपली आजीही बावन्नला पन्नासवर दोन म्हणते, मग वादाचं कारण काय?