जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड

०४ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


लॉकडाऊनमुळे जगाचा काळ थांबला असला तरी आपण आपले भूतकाळ उकरून काढतोय. टीवीवर लोकांच्या आग्रहास्तव चालवलेलं रामायण असो किंवा फेसबुकवर चाललेला मित्रांच्या जुन्या फोटोवर कविता कमेंट करण्याचा ट्रेंड असो. दोन वेगळ्या जनरेशनची मंडळी आपापल्या पद्धतीने नॉस्टॅल्जिक होतायत. सध्याचे दिन अच्छे नाहीत. पण या अवघड काळात एंटरटेन करणारे हे असे ट्रेंड ‘अच्छे’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

जगभर गोंधळ घातलेल्या कोरोनाचं जाळं हळूहळू भारतातही पसरलं आणि भारतात कोरोनाच्या भीतीची सावली मोठी मोठी होत गेली. प्रादुर्भाव वाढतोय हे लक्षात आल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशभर पसरत गेली ती अस्थिरता.

सतत पोटापाण्यासाठी धावणाऱ्यांनी सलग २१ दिवस घरात थांबायचं. वर शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स आणि हॉटेल सगळं बंद. मग मेट्रोसिटीतल्या पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या लोकांना करायचं काय, हा मोठाच प्रश्न पडला. दुसरीकडे शहरात शिक्षण, रोजगारासाठी आलेल्यांची परवड झाली. काम बंद झालं. मजुरांनी गावची वाट धरली खरी, पण प्रवासाची साधनं बंद असल्याने ते मैलोमैल अंतर पायी चालत सर करत राहिले.

त्यांच्या लेकरांच्या भुकेला गावच्या वेशीचं अमिष दाखवलं गेलं. तर शहरातून आलेल्यांना गावकऱ्यांनी भीतीपायी वेशीवर थांबवलं. हे आहे एकाच वेळी एकाच देशातल्या इंडिया आणि भारतातलं चित्र. हे खरं असलं तरी एक गंमत आहे या दोघात एकाच वेळी राहत असलेल्यांना एंटरटेनमेंट मात्र हवीच असते! 

हेही वाचा : प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

रामायणाचा लोकाग्रह नेमका कुणाचा?

पर डे च्या हिशोबाने चालणारी एंटरटेन्मेट इंडस्ट्री २१ दिवसाच्या लॉकडाऊनला अपवाद थोडंच ठरणार. ती ही थांबली. मालिकांचं शूटिंग बंद झालं, सेट ओस पडले, फेस वॅल्यू असणाऱ्या कलाकारांनी सोशल मीडियाकडे मोर्चा वळवला. टीवीवर सिरियलचे नवे एपिसोड टेलिकास्ट होणं थांबलं आणि काही चॅनलची एपिसोड बँक पण संपली. रिपीट टेलिकास्टशिवाय दुसरा कुठलाच पर्याय खासगी चॅनलकडे उरला नाही. मग रिपीट टेलिकास्ट सुरू झाले. त्यातही महिना पंधरा दिवस आधीपासूनचे एपिसोड पाहण्यात कुणाला काय इंटरेस्ट असणार? 

त्याचाच परिणाम डेलीसोपच्या चक्रात अडकलेल्या सामान्य प्रेक्षकाला चुकल्या चुकल्यासारखं वाटत राहिलं. वीडिओ प्रोडक्शन पूर्ण थांबलेलं असताना लोकांना चघळत रहायला काहीतरी दिलंच पाहिजे. मग आलं लोक आग्रहास्तव रामायण! आता हा आग्रह कुणी, कुठे आणि कसा केला हे समजून घेणं जरा अवघड आहे. ज्यांना दोनवेळच्या जेवणासाठी वणवण करावी लागते अशांना रामायण, महाभारत दाखवा, अशी मागणी करण्याची सवड तरी असेल का? 

आजचा सामान्य प्रेक्षक खरंच टीवीवर रामायण, महाभारत दाखवा अशी मागणी करेल का? जो वर्ग अशी मागणी करू शकतो त्याच्याकडे ती करण्याचं संख्याबळ असलं तरी मागण्या मांडण्यासाठी माध्यम उपलब्ध आहे का? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा मागण्या मांडता येतात, ट्विटर वर हॅशटॅग चालवता येतात ही समज ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते चालवले होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही अशी आली तरी रामायण, महाभारत दाखवलं जातंय ते कल्पनेतल्या लोकाग्रहास्तवच!

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशंट बरे कसे होतात?

कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

डेलीसोपला आदर्श रामायणाचा

१९८७ मधे साकारलेली रामायण नावाची कलाकृती पाहत असताना कितीतरी गोष्टी आपल्याला आज खटकतात. पण १९८७ च्या काळात झालेलं काम तेव्हाच्या आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक बाबींच्या कसोट्यांवर तपासून पाहिलं तर क्लासच होतं. टेक्नॉलॉजी आणि ऍक्टिंगच्या बाबतीत त्याच्या दर्जा कमी आहे. पण पटकथा आणि संवादासाठी आजच्या लांबत जाणाऱ्या डेलीसोप्सनी आदर्श घ्यावा, अशा या मालिका आहेत. 

आज ते दाखवण्याची काय गरज वगैरे वादात न पडता आनंद, मनोरंजन आणि वयानुसार कमी जास्त होणारी श्रद्धा या बाबींवर लक्ष दिलं तर आपण एका सहअनुभूतीने पुन्हा एकदा दूरदर्शनच्या सुवर्ण काळाचे साक्षीदार होऊ शकतोय. मग रोजच्या रोज त्यावर टीका करण्यात आणि ‘रामायणात हे मात्र फार विनोदी पद्धतीने दाखवलंय हो’ असं फेसबुक वॉलवर गळे काढण्यात काय अर्थय? 

जुने फोटो आणि रामायण, दोन्ही भूतकाळ

खरंतर, जो वर्ग फेसबुकवर असे गळे काढतोय त्यानं स्वतःच्या मनोरंजनासाठी स्वतःचं एंटरटेन्मेंट आणि एंगेजमेंट फॅक्टरही शोधून काढलेलाच आहे. यात लॉकडाऊन डे अमुक तमुक पासून ते 'ते २१ दिवस' वगैरे हॅशटॅग आणि त्याचे सतराशेसाठ उलट उलट वेरिएशन करत चालवले जातायत. एकमेकांना चॅलेंजेस दिले जातायत. यात अगदी गेल्या चार दिवसापूर्वींचा फेसबुक ट्रेंड सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवणारा आहे. 

हा ट्रेंड म्हणजे आपल्या फेसबुकी मित्रांचे जुने जुने फोटोज शोधून काढायचे आणि त्यावर आठवले स्टाईल कविता कमेंटमधे टाकायच्या. यमक जुळवून चार दोन मित्र मैत्रिणींना टॅग करून गंमत जंमत करायची. महाराष्ट्राचा हा ट्रेंड अगदी फेसबुकचे सर्वे-सर्वा असणाऱ्या मार्क झुकेरबर्ग यांच्या जुन्या फोटोंवर कमेंट करण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय.
 
जुनं रामायण आणि महाभारत नव्यानं पाहणं असो किंवा हे जुने फोटो कमेंट करून न्यूजफीडमधे आणणं असो. जुने फोटो आणि रामायण दोघेही आजचे नाहीत. काळाच्या जरा मागे घेऊन जाणाऱ्या या दोन्ही गोष्टी आज वेगवेगळ्या वर्गाचं वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करतायत. त्यांना आनंद देतायत.

हेही वाचा : अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

काळ थांबलाय, आपण मागे जातोय

यातला फेसबुकवर या ट्रेंडची मजा घेणारा वर्ग हा रामायण पाहणाराही असू शकतो. पण नुसतंच रामायण पाहणारा वर्ग हा फेसबुकवर असेलच असं नाही. जुन्या फोटोतल्या पोज, फॅशन या गोष्टी कालसापेक्ष बदलत गेल्या आणि म्हणूनच त्या आजच्या घडीला जरा आऊटडेटेड, गमतीशीर वाटतायत. अगदी तसंच रामायण चित्रित करण्यात आलं तेव्हाची त्याची प्रोडक्शन वॅल्यू, तेव्हाचे ट्रेंड, कॉस्च्युम, मेकअप, सेट या सगळ्याच गोष्टी तेव्हाच्या काळात ट्रेंडी आणि आदर्श अशाच होत्या.

तंत्रज्ञान अद्यावत होत राहतं त्यामुळे या सगळ्याच बाबतीत रामायण आजच्या पठडीतलं वाटत नसेल. पण ते एखाद्या वर्गाला आनंद देत असेल तर तो आनंद आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. कारण फेसबुक ट्रेंडमुळे जसा नॉस्टॅल्जिया आपण अनुभवतोय तसाच नॉस्टॅल्जिया पहिल्यांदा रामायण पाहिलेली कितीतरी मंडळी आज पुन्हा अनुभवतायत.

एकूणच काय प्रत्येकजण असा काळ थांबलेला असताना स्वतःचा वेगळा एंटरटेन्मेंट फॅक्टर शोधून काढतोय. प्रत्येक पिढी दोन वेगळ्या काळांमधे एकाच वेळी वावरू शकतेय. माणसाला स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहायला जास्त आवडतं, त्यातल्या आठवणीत रमायला जास्त आवडत हेच सारखं सिद्ध होतंय. माध्यम कुठलंही असो या अवघड काळात एंटरटेन करणारे असे ट्रेंड अच्छे आहेतं, असं म्हणायला काही हरकत नाही.

हेही वाचा : 

आपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया

महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

भारतीय मुसलमानांना बदलवण्याचं तबलिगचं पॉलिटिक्स काय?

१९४७ मधेच कोरोनासारख्या रोगाचं तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी