राज ठाकरेंच्या ‘राज’कीय मास्कद्वेषाचं काय करायचं?

१७ मार्च २०२१

वाचन वेळ : ३ मिनिटं


मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला आपण मास्क घालत नसल्याची बेधडक कबुली राज ठाकरे यांनी दिली. राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना? मग आपण तरी का घालावा?’ असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

एथ वडील जे जे करिती । तया नाम धरमु ठेविती ।

तेची येर अनुस्थीती । सामान्य सकळ ॥

- संत ज्ञानेश्वर

लोकांनी आपली दखल घ्यावी आणि आपण गर्दीत उठून दिसावं ही एक सर्वसामान्य मानवी भावना आहे. प्रसिद्धी हा राजकारण आणि राजकारणी यांचा प्राणवायू असल्यामुळे त्याच्यासाठी नेत्यांनी झटणं हे तसं वावगं नाही. पण देश आणि जगसुद्धा एका अकल्पित अशा संकटातून जात असताना उगाचच बेफामपणे वागून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं आणि त्या माध्यमातून आपण प्रवाहाविरुद्ध जात असल्याचा आव आणणं म्हणजे सवंग प्रसिद्धीसाठी गाठलेला सार्वजनिक जीवनातला एक नवा नीचांकच म्हणावा लागेल.

कोरोनाची सावली देशावर आणि महाराष्ट्रावरही गडद होतेय. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातले तज्ञ या रोगाच्या संभाव्य दुसर्‍या लाटेबद्दल धोक्याच्या सूचना देतायत. असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं वागणं कुठल्याही सुज्ञ नागरिकाला खटकणारं आहे.

एकाधिकारशाहीचा मास्कविरोध

मराठी भाषा दिनाच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात मास्क न घालता आलेल्या राज ठाकरे यांनी आपण मास्कचा वापर करत नसल्याची बेधडक कबुली दिली. त्यानंतर नाशिकमधल्या एका कार्यक्रमात अर्थातच विनामास्क आलेल्या राज यांनी मनसेचे स्थानिक नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांना त्यांनी घातलेला मास्कसुद्धा काढायला लावला.

एकीकडे मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍या लोकांना दंड होत असताना कॅमेर्‍यात कैद झालेल्या या प्रकाराबाबत कुठलीही कारवाई झाली नाही, हे विशेष. मात्र औरंगाबाद इथल्या एका वकिलांनी राज ठाकरे यांच्या या आवाहनामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याची तक्रार पोलिसांकडे केलीय.

एकचालकानुवर्तित्व या तत्त्वावर चालणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे असोत, की स्वत:भोवती एक पर्सनॅलिटी कल्ट निर्माण करायचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असोत. एकाधिकारशाहीकडे कल असणार्‍या या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे त्यांचा कोरोना काळात असलेला मास्कविरोध. हे वर्तन शास्त्रीय कसोटीवर टिकणारे नाही हा भाग आहेच. पण त्याचबरोबर चुकीच्या कारणासाठी का होईना, प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा हा प्रयत्न असावा.

मीडिया डार्लिंग राज ठाकरे

निगेटिव पब्लिसिटीसुद्धा पब्लिसिटीच असते. सवंग प्रसिद्धीसाठी हा ‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना’चा हा अजब स्टण्ट कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे फक्त त्या संबंधित नेत्यासाठी नाही, पण त्यांच्या आसपासच्या लोकांसाठी आणि पर्यायाने समाजासाठीसुद्धा घातक ठरू शकतो.

मागच्या वर्षी कोरोनाची साथ नुकतीच सुरू झाल्यावर तबलिगी जमात या मुस्लिम समाजाच्या संघटनेमुळे आणि त्यांच्या अनुयायांमधे हा रोग पसरला असल्याचे आरोप झाले होते. त्यावेळेस सर्वसामान्यांमधे तबलिगीबाबत असलेला संताप हा मीडिया डार्लिंग असलेल्या राज यांच्याबाबत अपवादानेच दिसतोय.

राजकीय नेत्यांची जबाबदारी

राजकीय नेते हे त्यांच्या अंधभक्तांसाठी, अनुयायांसाठी आणि सर्वसामान्यांसाठीही एक प्रकारचे रोल मॉडेल असतात. आदर्श असतात. नेत्यांचा स्वतःचा एक चाहतावर्ग असतो. तो त्यांचं अनुकरण करतो. त्यामुळे राज ठाकरे यांचं वागणं समाजातल्या एका वर्गासाठी का होईना, सार्वजनिक नैतिकतेचा भाग होऊ शकतं. ‘साहेब मास्क घालत नाहीत ना? मग आपण तरी का घालावा?’, असं वाटून काही मनसैनिकांनी तसंच केलं त्यांचा आणि इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

त्याच बरोबर एक तुलना केल्याशिवाय रहावत नाही. पण राज ठाकरे यांचे सख्खे चुलत भाऊ असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात घेतलेली भूमिका ही अत्यंत समंजसपणाची आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमधे सतत मास्क घालून जाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधन करताना त्यांना नेहमीच कोविड विरोधात योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सांगितलंय.

ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांना हा रोग म्हणजे साधा ताप किंवा सर्दी खोकला नसून शरीराला आतून पोखरून काढणारा प्रकार आहे, हे माहीत आहे. म्हणून राजकीय नेत्यांनी अधिक जबाबदारीनं वागावं, अशी अपेक्षा ठेवणं हे काही वावगं नाही. कारण लोक हे नेत्यांचं अनुकरण करतात हे वर दिलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधलं वास्तव आजही समाजाला लागू पडतं.