आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती

१० जानेवारी २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


सध्या सुरू असलेलं सीएए आणि एनआरसी विरोधातलं आंदोलन हे अनेक अंगांनी वेगळं ठरतंय. या आंदोलनात नेहमीच्या घोषणांसोबतच साहित्य, कविता, गाणं आणि कलेच्या अनेक माध्यमांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वापर केला जातोय. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः कलानिर्मिती करतायत. कलेचा हा वापर सत्ताधाऱ्यांच्या तोडचं पाणी पळवणारा आहे.

हुकूमशाही देशांमधे आंदोलनं करणं म्हणजे साक्षात मृत्यू ओढूनं घेण्यासारखं असतं. लोकशाहीमधे लोकांनी आंदोलनं करणं यात काही आश्चर्य नाही. अशा आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्यांसोबत समाजातल्या अनेक नामांकित व्यक्ती भाग घेतात. भारतात गेल्या काही वर्षांमधे अनेक राजकीय आणि सामाजिक आंदोलनं झाली. पण सध्या सुरू असलेलं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधातलं आंदोलन हे विशेषतः वेगळं ठरतं. या आंदोलनात लोकशाही आंदोलनातली नेहमीची शस्त्र म्हणजे निषेधाची पत्रकं, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा, व्यंगचित्रं यांच्यासोबतच कविता,  गाणी आणि संगीताचा नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक वापर केला गेला.

कलेला धर्म नसतो

उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या 'हम देखेंगे' या नज्मचा कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी सीएए विरोधी आंदोलनात वापर केला आणि त्यावरून वादंग माजला. या नज्मचा वापर पाकिस्तानमधे तत्कालीन अध्यक्ष जनरल झिया उल हक यांच्या हुकूमशाहीला विरोध करण्यासाठी झाला होता. त्याचाच वापर भारतामधे सीएए विरोधी आंदोलनामधे केला गेल्याने काही जणांनी ते हिंदू विरोधी आहे असा आक्षेप घेतला. वास्तविक पाहता फैज अहमद फैज यांच्या अनेक नज्म याआधीही सर्वत्र वापरात होत्या. नागरिकांच्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली तेव्हा त्यांच्या 'बोल की लब्ज आजाद है तेरे' या नज्मचा पुरेपूर वापर झाला. कलेला कोणताही धर्म नाही, असं म्हणतात.

हिंदी कवी पाश यांच्या 'सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना' या कवितेचाही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात वापर केला. कवी, गीतकार आणि कॉमेडीयन वरुण ग्रोवर यांची 'हम कागज नही दिखायेंगे' ही रचना सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली. त्याने त्यावर कॉपीराइट हक्क न सांगितल्याने प्रत्येकाने त्यामधे आपल्याला जे काही सुचेल ती भर टाकली.

सफदर हाश्मी हा कम्युनिस्ट नाटककार आणि स्ट्रीट थेटर आर्टिस्ट. त्याच्या 'हल्ला बोल' या पथनाट्याचं सादरीकरण करत असतानाच त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तो नेहमी म्हणायचा, 'काय झाले आम्ही बेसुरे असलो तर, आमचा आवाज तर बुलंद आहे'. त्याच्या नावाने सुरू असलेल्या सफदर हाश्मी मेमोरियल ट्रस्टच्या वतीने अनेक गीते गाऊन आणि कविता वाचन करून सीएएला विरोध दर्शवला गेला.

हेही वाचा : एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?

निषेधाला आलीय संगीताची धार

याआधी जी काही आंदोलनं झाली त्यामधे अनेक नामांकित लोक आणि साहित्यिक भाग घ्यायचे, निषेध नोंदवायचे. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममधल्या पुरस्कार वापसी प्रकरणानंतर बहुतांश साहित्यिक, कलाकार आणि कलेशी संबंधित अनेक लोकांनी देशातल्या असामाजिक घटकांकडून होणाऱ्या हिंसेविरोधात शांतच राहणं पसंत केलं. त्यामागे नेहमीप्रमाणे सत्तेची भिती असेल किंवा सत्तेच्या वळचळणीला जाण्याचा प्रकार असेल.

ज्या ज्यावेळी सत्तेची दडपशाही वाढते किंवा समाजात असामाजिक घटकं तोंड वर काढतात त्यावेळी या कलाकारांनी वा साहित्यिकांनी सत्तेला चार खडेबोल सुनवावे ही लोकांची अपेक्षा असते. पण कलाकारांच्या आणि साहित्यिकांच्या या दीर्घ शांततेमुळे आता समाजानेही त्यांच्याकडून अशा फारशा काही अपेक्षा करणं सोडून दिल्या असाव्यात असं दिसतं. म्हणूनच दिल्लीसह इतर भागातल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे त्यांना स्वतःचं कोणतंही वलय नाही किंवा त्यांचा कुणीही एक नेता नाही.

काही ठिकाणी ‘हम होंगे कामयाब’, ‘सारे जहासे अच्छा’, ‘रघुपती राघव राजाराम’ ही गीते गाऊन तसेच ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देऊन आपला विरोध प्रकट केला गेला तर काही ठिकाणी सरकार विरोधी घोषणा आणि नारेबाजीसह विरोध प्रकट केला गेला. पण नेहमीच घोषणा आणि नारेबाजीमधेच आंदोलनं व्हावीत असं काही नाही. सध्या या विद्यार्थ्यांनी त्याच्या जोडीला गीतांची, संगीताची साथ घेतलीय.

रंगाचाही होतोय निषेधात वापर

दिल्लीमधे जंतर-मंतर इथं झालेल्या आंदोलनामधे विद्यार्थ्यांच्या समूहातून उस्फूर्तपणे काही गीतं निर्माण झाली. शब्दांना लगेच चाली लावून ते सगळ्यांच्या मोबाइलमधे वितरित करण्यात आले आणि लगेचच त्यांच्या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाले. यामधे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या एका समूहाने गायलेले 'बीम बुम बुम, मेरी बात तो सुनो' हे गीत विशेष दखल घेण्यासारखं आहे. यामधून देशाच्या सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीवरून शासनाला धारेवर धरलंय. आणखी एका समूहाने 'क्रांती का नया कदम बढा' हे गीत तयार करून त्याचं गायन केलं.

पितृसत्ताक व्यवस्थेविरोधात लिहली गेलेली 'आजादी' ही मूळची रचना स्त्रीवादी कार्यकर्त्या कमला भासिन यांनी दक्षिण आशियातल्या स्त्री चळवळीसाठी लिहिली होती. हे गीत पुढे जाऊन जेएनयूमधे कन्हैया कुमारने आपल्या कल्पकतेने सुप्रसिद्ध केलं. आताही या आंदोलनातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या मुखावर प्रामुख्याने हेच गीत आहे.

या गीतांचं गायन करताना विद्यार्थी डफाचा वापर करताहेत. तिरंगा ध्वजासह आंदोलनात उतरलेल्या विद्यार्थ्यांनी शासनाचा निषेध म्हणून अनेक प्रतीकात्मक रंगाचा कलात्मक वापर केलाय. अनेक ठिकाणी पेंटिंग्स, व्यंगचित्रं तर काही ठिकाणी रस्त्यावरच गीतं आणि कवितांचं लेखन केलंय. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या आंदोलनाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या विद्यार्थ्यांनी आपली मतं रचनात्मक पद्धतीनं मांडण्याचा नाविन्यपूर्ण प्रयत्न केलाय.

हेही वाचा : पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

मौन पाळणं हेच धोकादायक

जेएनयूमधे विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईमधे 'ऑक्युपाय गेट वे' या मोहिमेअंतर्गत शांततापूर्ण निदर्शनं करण्यात आली. यात अनेक बॉलिवूड स्टारनी सहभाग घेतला. त्यावेळी संगीतकार विशाल भारद्वाजने त्याने रचलेल्या 'हम मायूस नही है, हम हैरान नही है'  या कवितेचं सादरीकरण केलं. गीतकार स्वानंद किरकिरे यांनी 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटतलं त्यांचे 'बावरा मन' हे गीत गायले. तसंच 'मार लो दंडे, कर लो दमन' ही त्यांनी रचलेली सुंदर कविता सादर केली. गली बॉय फेम संगीतकार अंकुर तिवारीनेही एक गीत सादर केलं. अभिनेता आयुषमान खुरानाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध करत त्याच्या ट्विटर अकाउंटवर 'इंसानियात से बडा कुछ नही' ही त्याने रचलेली कविता प्रकाशित केली.

पाश्चात्त्य संगीतामधे बंडखोर समजले जाणारे रॉकस्टार हे त्यांच्या संगीतातल्या नवनवीन रचनांमधुन व्यवस्थेवर हल्ला चढवतात. अमेरिकेत व्हिएतनाम युद्धाच्यावेळी त्याविरोधात संगीतकारांनी त्यांच्या संगीतातून असंच रान उठवलं होतं. नुकतंच चीनच्या दडपशाही विरोधात हाँगकाँगमधे 'हाँगकाँग गीत' तयार करण्यात आलं आणि ते अनेक ठिकाणी गायलं गेलं. भारतातही व्यवस्थेविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारांचा वापर सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही.

केरळमधलं हिपॉप बँड स्ट्रीट अँकॅडमिक्सने 'हारा हारा' हे गीत तयार केलंय. त्यामधून निर्माता हरीस सलीमने सीएए कायदा हा भारतीय राज्यघटना कलम १४ चं उल्लंघन करतो आणि आम्ही भारतीय नागरिक देशात लोकशाहीच्या माध्यमातून केलेल्या या आंदोलनाला विनाअट पाठींबा देत आहोत असं जाहीर केलं. हे गीत संपताच मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअरचे एक वाक्य पडद्यावर झळकतं. 'मानवतेची अंतिम शोकांतिका म्हणजे वाईट लोकांकडून होणारा अत्याचार वा क्रूरता नव्हे तर सभ्य लोकांनी त्यावर मौन बाळगणे ही होय'. यातून या कायद्यावर कोणतीही भूमिका न घेणाऱ्या तटस्थ लोकांवर टीका केली गेली आहे.

शांततापूर्ण आंदोलनं लोकशाही बळकट करतात

केरळ संगीत बँडने इंग्रजी आणि मल्याळम भाषेत सद्यपरिस्थितीवर भाष्य करणारं गीत तयार केलंय. यातून त्यांनी देशवासीयांना 'लढा, प्रतिक्रिया द्या आणि बदलाचा भाग व्हा' असं आवाहन केलंय. 'द डाऊन ट्रोडेंस' गीताच्या माध्यमातून गायक मुंझ यांनी राजकीय भाष्य केलं. यातून त्यांचा लोकांना देशात काय चाललंय यावर किमान विचार तरी करण्यास प्रवृत्त करण्याचा उद्देश आहे.

अशा इतर अनेक गीतांमधे संगीतातला रॅप या प्रकाराचा वापर करून गीतातली आकर्षकता वाढवलीय. कॅशलेस कलेक्टिव बँडनेही लोकसंगीत आणि रॅपचा एकत्रित वापर करून गीत बनवलंय. नकाब आणि शोयेल्स यांनी 'आंदोलन' नावाच्या विडिओच्या माध्यमातून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा आढावा घेतलाय. या विडिओला 'हाल तो बुरे है, फिर भी दिल है हिंदुस्तानी' या गीताची जोड आहे.

आंदोलन म्हणजे शब्द वा कृतीतून व्यक्त होणारी विरोधाची अभिवृत्ती. भारतीय राज्यघटनेत कलम १९ मधे विनाशस्त्रं एकत्र जमण्याचं आणि निषेध व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नमूद आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यातही त्याला मान्यता आहे. लोकशाही देशांत शांततापूर्ण होणारी आंदोलनं ही लोकशाहीला बळकट आणि समृद्ध करतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा अंदाज येऊ शकतो.

आता या आंदोलनात विद्यार्थी आणि तरुणांचा सहभाग वाढलाय. प्रस्थापितांच्या साहित्याची, कलेची मदत घेतानाच स्वतःच्याही उस्फुर्त आणि नाविन्यपूर्ण कलेचा कल्पकतेने वापर करण्यात ही तरुणाई चलाख आहे. त्याला शांततेची आणि अहिंसेची जोड आहेच. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला विरोध म्हणून हे विद्यार्थी आता कला आणि संगीत या नव्या आयुधांसह आंदोलनात सहभागी झालेत. त्यामुळे कोणत्याही शासकांनी विद्यार्थ्यांची अशी आंदोलनं ही सत्तेला धोका निर्माण करणारा घटक म्हणून न पाहता समाजातल्या असंतोषाचा एक 'सेफ्टी वॉल्व' म्हणून त्याची दखल घेणं आवश्यक आहे. अन्यथा सत्तेला विद्यार्थ्यांची या देशी 'आर्ट अटॅक' ची धास्ती भविष्यात कायम राहणार हे नक्की!

हेही वाचा :

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकातील उणे-अधिक

आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे

घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया

सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय?