नाती तीच असतात. पण परिस्थितीनुसार, आजूबाजूंच्या घटनांनुसार त्यातली लय वेडीवाकडी होत राहते. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांमुळं लय बिघडलेल्या एका नात्याची लयदार कथा.
रोहन इनोवात बसला. सीट बेल्ट लावला. स्टार्टर मारला. आठ वाजून दहा मिनिटं.
‘शिट… झालाच उशीर…’
स्वतःशीच पुटपुटला. आणि घाईनं गाडी पार्किंग लॉटमधून काढून बिल्डिंग बाहेर काढली. वॉचमननी बिल्डिंगचं मेन गेट उघडून त्याला सलाम ठोकला. त्याचं लक्ष नव्हतं.
आठच्या आत घरातून निघाला तर ट्रॅफिक लागत नाही. साडे आठ किंवा नंतर निघाला तर बेकार ट्रॅफिक लागतं हा गेल्या सहा महिन्यांतला अनुभव. आज काठावर होता. ट्रॅफिक लागायच्या आत हायवे क्रॉस करायचा, या उद्देशानं गाडी पिटाळायला लागला.
खरंतर त्याला कंपनीत काही ठरावीक वेळीच कार्ड स्वाईप करायला लागायचं असं नाही. कंपनीची ऑफिशियल वेळ ९ ते ६ अशी असली तरी त्याच्या पोझिशनच्या माणसाला इन आणि आऊट टाईमचं काही बंधन नव्हतं. पंधरा वर्षं तो या कंपनीत होता आणि आता एका प्रॉडक्टचा ओनर. दोनशे जणांची टीम होती त्याच्या हाताखाली. पण तरीही त्याला पावणे नऊला ऑफिसला पोचून शार्प नऊला काम सुरू करायला आवडायचं.
अर्थात आताचं त्याचं काम म्हणजे दिवसभर फक्त मीटिंग्ज, कॉल्स आणि रीव्यूज हेच असायचं. सतत वेगवेगळ्या माणसांशी बोलणं आणि माणसांना हाकणं. इथल्या टीमबरोबरचे आणि परदेशी क्लायंट्सच्या सोबतचे कॉल्स संपवले आणि मग दिवसभरात येऊन पडलेल्या शेकडो मेल्सचा ढीग आवरला की त्याचं काम संपायचं. हे सारं संपायला कधी रात्रीचे आठ तर कधी बाराही वाजायचे.
हे सगळं सगळं करणं गरजेचं होतं. पंधरा वर्षं तो इथं असला तरी, त्याची व्हावी तितकी प्रगती झाली नव्हती. त्याच्यानंतर आलेली कित्येक लोकं त्याच्या वरच्या पोझिशनला होती. त्याला डेस्परेटली काहीही करून प्रमोशन हवं होतं. फक्त एक प्रॉडक्ट ओनर न राहता त्याला डिविजनचा हेड व्हायचं होतं. हे होण्यासाठी धडपड करत होता.
मोबाईल वाजला… श्रेया…
‘हाय… काय रे… बाय ही न करता निघालास आज?’ श्रेया.
‘जरा कामाच्या विचारात होतो…’ रोहननी निर्जीवपणे उत्तर दिलं.
‘त्यात नवीन काय आहे’ श्रेया उपहासानं म्हणाली.
‘बोल…’ तिच्या उपहासाकडे दुर्लक्ष करून रोहन म्हणाला.
‘आज चार वाजताची अपॉइंटमेंट आहे… येणारेस का?’ श्रेयानी विचारलं.
‘माहीत नाही… आय मीन, खूप काम आहे आज… वीकेंडची का नाही घेतलीस अपॉइंटमेंट?’ रोहन.
‘आपल्या सोयीनी सगळं जग चालत नाही… पंधरा दिवस ट्राय करत होते.. आजची मिळाली…’ श्रेया.
‘मग काल का नाही सांगितलंस?’ वैतागून रोहननी विचारलं.
‘कधी? रात्री १२ वाजता?’ श्रेयाचा उपहास.
‘सोड. मला भांडायचा मूड नाहीये आत्ता… ऑफिसला जाऊन काय सीन आहे बघतो आणि तुला मेसेज करतो.’
‘बघ… जमव शक्यतो… महत्त्वाचं आहे हे ही…’ श्रेयानी निर्विकारपणे बोलून फोन ठेवला.
रोहननी फोन बाजूच्या सीटवर फेकला आणि तो पुन्हा विचारांमध्ये हरवला… आठ वर्षं झाली होती त्यांच्या लग्नाला… पण आता काहीच पूर्वीसारखं राहिलं नव्हतं… त्याला भेटली तेंव्हाची अल्लड, अवखळ आणि सतत हसणारी 'हॅपी गो लकी' श्रेया खरी का, आता स्वतःच्याच विश्वात हरवलेली आणि सतत उपहासानं किंवा टोचून बोलणारी श्रेया खरी, हे त्याला कळत नव्हतं.
त्यांच्या नात्याचा विचार करायला लागला की त्रास होतो म्हणून त्यानी तो विचार बंद केला आणि तो आज दिवसभरात काय काय मीटिंग्ज आहेत याचा विचार करायला लागला.
कालच त्याच्या प्रॉडक्टचं एका मोठ्या अमेरिकन क्लायंटकडे फायनल टेस्टिंग होणार होतं, त्याचं काय झालं बघायचं होतं. मॅनेजमेंट कमिटी प्रॉडक्टच्या फ्युचर रोडमॅपसाठी मागे लागली होती. तो काही करून पूर्ण करायचा होता. आणि शुक्ला आज ऑफिसमध्ये असणार होता. त्याची वेळ घ्यायची होती. शुक्ला त्यांचा सिनियर डिरेक्टर होता. रोहनचं प्रॉडक्ट ज्या वर्टिकलमध्ये होतं त्याचा हेड वर्षातले सहा-आठ महिने अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असा हिंडत असायचा आणि भारतात असेल तेव्हा दिल्ली किंवा बंगलोर! क्वचित कधीतरी इथे डेवलपमेंट सेंटरला यायचा. आजचा एकच दिवस तो आहे, पुन्हा कधी येईल माहीत नाही. प्रमोशनसाठी त्याला भेटणं अत्यावश्यक होतं.
‘हे इतकं सगळं असताना कसा काय मी जाऊ शकणार आहे श्रेया बरोबर? व्हाय डोन्ट शी अंडरस्टँड?’ त्याच्या डोक्यात पुन्हा श्रेयाचा विचार आला. झर्रकन त्यांच्या नात्याचा आठ वर्षांचा काळ डोळ्यासमोरून गेला.
ते इथेच याच कंपनीत भेटले होते. श्रेया त्याला ज्युनियर होती. त्यांचं प्रेमप्रकरण कंपनीत गाजलं होतं तेव्हा. दोघं तीन महिन्यांसाठी ऑनसाईट गेले होते तेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले. कंपनीत जोरदार गॉसिप झालं. तो प्रोजेक्ट नेमका फसला. त्याचं खापर या दोघांच्या प्रेमप्रकरणावर फोडलं गेलं. वर त्यांनी घरी सांगितल्यावर श्रेयाच्या वडिलांनी कंपनीत येऊन मोठ्ठा तमाशा केला. इंटरकास्ट मॅरेज होतं आणि तिचं माहेर अत्यंत कर्मठ. दोघांचीही नोकरी जायची वेळ आली होती तेव्हा. श्रेयानं राजीनामा दिला पण रोहननं कशीबशी नोकरी टिकवली. पुढं तिच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केलं.
तिचं माहेर तुटलं.
कायमचंच.
श्रेयानं पुढं दोन-तीन छोटे मोठे जॉब्ज केले. पण त्यात ती रमली नाही.
‘तुझं करियर तू छान कर, मी घर बघते’ असं रोहनला म्हणायची. त्याची त्याला काही हरकत नव्हती. लग्नाला दोन वर्षं झाल्यावर त्यांनी ‘प्लॅनिंग’ थांबवलं. पण त्यानंतर आता सहा वर्षं झाली तरी अजून ‘गोड बातमी’ नाही. आधी मूल होईल होईल अशी वाटत राहणारी आशा… मग ‘अजून का होत नाहीये’ असा पडत राहणारा प्रश्न आणि आता ‘होणारच नाही का’ अशी येणारी शंका यांनी त्या दोघांचं व्यक्तिगत आयुष्य, नातं आणि सेक्स लाइफ पार गढूळलं गेलं होतं.
हे गढूळलेपण दूर करण्यासाठी रोहननी स्वतःला कामात बुडवून टाकलं आणि श्रेयानं स्वतःला दुःखात. रोहनला कामाचं व्यसन लागलं आणि श्रेयाला दुःखात राहण्याचं. रोहनच्या कामाच्या व्यसनामुळं श्रेयाचं दुःखाचं आणि श्रेयाच्या दुःखी राहण्यामुळे रोहनचं कामाचं व्यसन वाढतच चाललं होतं.
विचारांच्या नादात रोहन ऑफिसला पोचला. गाडी पार्क केली. बरोबर पावणे नऊ. मोबाईलवर मेसेजची नोटिफिकेशन्स वाजली. दोन मेसेजेस
पहिला, शुक्लाचा, ‘इम्पॉर्टंन्ट डिस्कशन रिगार्डिंग न्यू रोल. मीट मी ॲट फोर.’
दुसरा, श्रेयाचा, ‘आज चार वाजता जमव ना रे, डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे. महत्त्वाच्या टेस्ट्स आहेत.’
रोहन काही क्षण सुन्न बसून राहिला. काहीतरी विचार केला आणि मग लॅपटॉपची बॅग उचलून, गाडी लॉक करून ऑफिसकडे निघाला.
तो चालत असतानाच फोन वाजला. मेधा होती. त्याची टीम लीड.
‘रोहन मेल्स पाहिल्यास का?’ मेधा.
‘नाही. जस्ट शिरतोय ऑफिसमध्ये’
‘मी सुद्धा ड्राईवच करतीये. सतत मोबाईलवर नोटिफिकेशन्स येत होती म्हणून गाडी थांबवून मेल्स पाहिल्या आणि लगेच कॉल केला.’
‘काय झालं?’
‘ऍलिसनच्या प्रोजेक्टवर काहीतरी राडा झालाय. कालच्या टेस्टिंगमध्ये एकही सिक्युरिटी फीचर चाललं नाही.’
‘इम्पॉसिबल’
‘या आय नो. पण बेक्कार पेटलंय. त्यांच्या सीईओंपर्यंत एस्कॅलेट केलं त्यांनी आणि त्या सीईओंनी शुक्लांकडे एस्कॅलेट केलंय.’
‘आयचा घो… तुला किती वेळ आहे अजून?’
‘ट्रॅफिक मध्ये अडकलीये आत्ता.. अर्धा, पाऊण तास लागेल अजून’
‘ ओके. अर्जंट कॉल सेट अप कर. ऑन साईट गेलेली सगळी टीम हवी कॉलमध्ये आणि तुझी इथलीही’
‘अरे पण तिकडे आत्ता रात्रीचे साडे दहा….’
‘आय डोन्ट केअर. तिकडे रात्रीचे दोन असतील तरी मला सगळे कॉलवर हवेत… शार्प साडे नऊ वाजता...’
रोहन त्याच्या केबिनकडे झपाझप चालायला लागला.
‘डिस्कशन रिगार्डिंग यूअर न्यू रोल’
या शुक्लाच्या मेसेजचा काही वेगळाच अर्थ आहे का, याच्या विचारात पडला. प्रॉडक्टमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आला असावा आणि तो कसा सोडवावा याच्या विचारात पडला. ऍलिसनमध्ये झालेला राडा कसा निस्तरायचा, याच्या विचारात पडला. शुक्लाशी दुपारी नक्की काय बोलावं लागेल, याच्या विचारात पडला. आपलं प्रमोशन पुन्हा एकदा लांबणीवर पडेल का काय याच्याही विचारात पडला.
एकामागून एक येऊन किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांसारखे विचार त्याच्या मनात येत होते.
आणि आता त्या लाटांमध्ये श्रेयाच्या नावची एकही लाट नव्हती.
***
रोहननी घड्याळात बघितलं. दुपारचे साडेतीन. साडे नऊ ते साडे तीन सलग सहा तास ऍलिसन प्रोजेक्टला लागलेली आग विझवण्याचं काम सुरू होतं. कॉल्स झाले. नक्की कुठे प्रॉब्लेम आला ते सापडलं. कोणीतरी घाईघाईनं शेवटच्या क्षणी केलेली एक कोड कमिट होती फक्त. मग ती रिव्हर्स करणं, सगळं पुन्हा नीट आपल्या डोळ्यासमोर टेस्ट करून घेणं, क्लायंटला सावरासावरीच्या मेल्स लिहिणं. सगळं झालं. तो, मेधा आणि इथली टीम सगळे त्याच्या केबिनमध्येच होते सहा तास. मेधानंच दोन-अडीच वाजता सगळ्यांसाठी काहीतरी खायला मागवलं, पण ते खाणंही अर्धवटच पडून होतं. साडेतीनला शेवटची टेस्ट पॉझिटिव आली. क्लायंटला शेवटची मेल लिहून झाली आणि रोहननी निश्वास सोडला.
त्याची मेल गेल्याच्या दुसऱ्या मिनिटाला शुक्लाचा रिप्लाय आला.
‘वेल डन! आर यू मीटिंग ॲट फोर?’
शुक्लाचा रिप्लाय आल्याच्या दुसऱ्या मिनिटाला श्रेयाचा मेसेज आला,
‘काहीच कळवलं नाही. साडेतीन वाजलेत. येणारेस का?’
***
रात्रीचे अकरा. कंपनीच्या पार्किंग लॉटमधून रोहननी गाडी बाहेर काढली. शक्य असतं तर अजून तास दोन तासही ऑफिसमध्येच थांबला असता. घरी जायची ओढच नसायची त्याला हल्ली. ‘घरी जाऊन करायचं काय?’ हा प्रश्न असायचा. क्वचित कधी लवकर गेलाच तर ‘आज काय हाफ डे का?’ असा कुत्सित प्रश्न विचारून मग त्याच्याकडे दुर्लक्ष करून श्रेया तिचे ठरलेले टीवी प्रोग्रॅम्स बघत बसायची. आणि उशिरा गेला तर सुन्न अबोला किंवा भीषण कडकड. त्यामुळं शक्यतो श्रेया झोपायला जाते त्याच वेळी आपण घरी पोचू, अशा बेतानंच रोहन ऑफिसमधून निघायचा.
अत्यंत रोमॅंटिक नोटवर सुरू झालेल्या त्यांच्या आयुष्यातला रोमान्सही आता संपला होता. कधीतरी त्याची इच्छा अनावर व्हायची तेव्हा किंवा तिने मोजून मापून ‘ओव्यूलेशन’चे दिवस आहेत, असं सांगितलं असेल तेव्हा ओढून ताणून केलेला सेक्स हीच आता रोमान्सची व्याख्या होती.
आपल्या तुटत आणि विखुरत चाललेल्या नात्याचं काय करावं, हे त्यांना काही केल्या समजत नव्हतं.
‘आज तिच्या बरोबर डॉक्टरकडे गेलो असतो तर या सगळ्यात काही फरक पडला असता का?’
रोहननी स्वतःला विचारलं.
‘काही नाही… दर पंधरा दिवसांनी तिचे काहीतरी नवे नखरे असतात हल्ली… सारखे काय नवे डॉक्टर आणि नव्या ट्रीटमेंट्स करायच्या… व्हायचं तेव्हा होईल ना मूल… एवढं काय डेस्परेट व्हायचंय… तिचं डेस्परेशन हा तिचा प्रॉब्लेम आहे आणि तो मी काहीही करून सोडवू शकत नाही’
रोहनच्या दुसऱ्या मनानं लगेच उत्तर दिलं.
‘मी तिला वेळ द्यायला हवा आहे का अजून?’ रोहनच्या पहिल्या मनानी पुन्हा प्रश्न विचारला.
‘काही नाही… काय करणारे अजून जास्त वेळ देऊन… तिला कुठे इंटरेस्ट आहे माझ्यात… आणि आणू कुठून अजून जास्त वेळ…? मी जास्त काम नाही केलं तर माझ्या मागून आलेले लोक पुढे निघून जातील… आय हॅव ह्यूज ड्रिम्स. आय नीड टू वर्क टुवर्ड्स अचिव्हिंग दोज’ आणि हे सगळं मी आमच्याच संसारासाठी करतोय ना? मोठा फ्लॅट, लॅव्हीश कार, फॉरीनमधली वेकेशन्स हे सगळं तिलाही हवं आहे ना?’
रोहनच्या दुसऱ्या मनानी ताबडतोब उत्तर दिलं.
स्वतःशीच घातलेल्या या वादामध्ये रोहनची दुसरं मन जिंकलं. नेहमीच ते जिंकायचं. जसं आज दुपारी शुक्लासोबतच्या मीटिंगमध्येही जिंकलं होतं. चार वाजता शुक्लासोबत मीटिंग झाली. शुक्लानी त्याला प्रमोशन ऑफर केलं. आता डिव्हिजनल हेड होणार होता तो. ‘काम वाढेल, जबाबदारी वाढेल आणि ट्रॅव्हल करावं लागेल. जमेल ना?’ शुक्लानी विचारलं. एका झटक्यात त्यानी ‘हो’ असं तोंडी सांगितलं होतं. आपल्या नव्या कामाच्या विचारात असतानाच घर आलं. वॉचमननी बिल्डिंगचं मेन गेट उघडून त्याला सलाम ठोकला. त्याचं लक्ष नव्हतं. गाडी पार्क करून फ्लॅटमध्ये गेला.
त्याच्या अपेक्षेप्रमाणे श्रेया झोपली होती. डायनिंग टेबलवर त्याचं जेवण काढून ताट झाकून ठेवलेलं होतं. ताटावर एक ‘पेस्ट इट’ची चिठ्ठी होती. त्यानी चिठ्ठी उचलून बघितली.
‘रिपोर्ट्स आर निगेटिव्ह. आय कॅन नेव्हर बी अ मदर. आय ॲम सॉरी.’
रोहन मटकन खुर्चीवर बसला. पुन्हा पुन्हा चिठ्ठी वाचून अर्थ लावायला लागला. अचानक खूप दाटून आलं आणि धाय मोकलून रडायला लागला.
***
दुसऱ्या दिवशीची सकाळ. रोहन - श्रेयाची बेडरुम. श्रेयाला जाग आली. अंगावरचं पांघरून बाजूला करताना लक्षात आलं की रोहनही शेजारीच आहे. तिनी घड्याळात बघितलं. नऊ. रोहनला हलवलं आणि निर्जीव स्वरात म्हणाली,
‘नऊ वाजलेत. ऑफिस नाहीये का?’
रोहन दचकून जागा झाला… घड्याळ बघितलं… श्रेयाकडे बघितलं… तिचे रडून सुजलेले डोळे बघून त्याला भरून आलं… ‘नाहीये’ असं म्हणाला आणि तिला जवळ घेतलं… श्रेयाला हुंदका फुटला… मग रोहनलाही… दोघांनीही मनसोक्त रडून घेतलं…
हुंदके आवरल्यावर रोहन म्हणाला,
‘आज ऑफिसला दांडी आहे… काहीतरी छान ब्रेकफास्ट बनवतेस का?.. मग गाडी काढून भटकायला जाऊया… पिच्चर टाकू या… शॉपिंग करू या… व्हॉट सेज यू?’
‘जमेल तुला? आणि तुझी कंपनी?’ श्रेयानं विचारलं.
‘कंपनी गेली खड्ड्यात… तू येणारेस पिच्चरला की मी एकटा जाऊ?’
‘काय करू ब्रेकफास्टला?’
‘काहीही कर… नाहीतर मागव उडप्याकडून… पण लवकर… भूक लागलीये…’
‘ओके सर…!’ श्रेया नाटकीपणे, त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत म्हणायची तसं म्हणाली.
‘श्रेयू… पण दुपारी लवकर परत यायचं आहे…’ रोहन जरा गंभीरपणे म्हणाला.
‘का? ऑफिसला जाणारेस…?’ श्रेया नाराज होऊन म्हणाली.
‘नाही… पॅकिंग करायचंय… उद्या सकाळी लवकर निघायचंय…’
‘ओ, म्हणून ही लाडीगोडी लावणं चालू होतं तर… कुठे चालला आहेस तू? किती दिवसांसाठी’ श्रेयानी उपहासानी विचारलं.
‘मी नाही… आपण दोघं… तुझी खूप दिवसांची इच्छा होती ना? ते प्लॅन केलं आहे… ड्राईव करत लडाखला चाललो आहोत.. आपण दोघंच… उद्या सकाळी लवकर निघायचंय… १५ दिवसांची ट्रिप प्लॅन केलीये मी!’
‘आणि तुझं काम?’
‘ते होईल मॅनेज… आणि नाहीच झालं तर पुढे काय करायचं ते आल्यावर बघू… लेट्स स्टार्ट ऑन अ कम्प्लिटली क्लीन स्लेट. आपण आधी जसे इम्पल्सिव जगायचो तसं जरा जगून बघू या पुन्हा एकदा. फक्त एकमेकांसाठी एक्सक्लुजिव वेळ देऊन बघू या पुन्हा एकदा.’
श्रेया काहीच न बोलता कुठेतरी हरवून गेली.
‘ए वेडा बाई… खरं बोलतोय मी… चल आता आधी ब्रेकफास्टचं बघ बरं!’
‘आय लव यू’ श्रेया
‘आय लव यू टू... चल, आवर पटपट!’ रोहन.
दोघं ब्रेकफास्ट करून आवरून घराबाहेर पडले. गाडीत बसून जाताना वॉचमननी बिल्डिंगचं मेन गेट उघडून त्याला सलाम ठोकला. रोहन एक क्षण थांबला, वॉचमन कडे बघून हसला आणि त्याला विचारलं, ‘कैसे हो बहादुर?’
वॉचमन नुसताच हसला.
रोहननी श्रेयाकडे बघितलं. ती कुठल्याशा स्वप्नात हरवून गेली होती. रोहननी गाडीचा गियर टाकला आणि नव्या प्रवासाला निघाला.