प्रियंका गांधींच्या एंट्रीने काय साधणार?

१२ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे.

टीवी मीडियाला काल एकाचवेळेस दोन महत्त्वाचे इवेंट कवर करायचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मथुरेतली सभा आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा रोड शो. अशी कोंडी तयार झाल्यावर मीडियाने गेल्या पाचेक वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसवॅल्यूला महत्त्व देत त्यांचा इवेट कवर केला. पण काल मात्र त्यांनी प्रियंका गांधींच्या रोड शोला खूप महत्त्व दिलं.

टीवीवरचा दुष्काळ संपला?

इतके दिवस टीवीची स्क्रीन मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या, तडफडणाऱ्या काँग्रेसवाल्यांसाठी प्रियंका गांधींच्या येण्याने टीवीवरचा दुष्काळ संपला. मीडियाने रोड शो कवर करण्यासाठी मोठा ताफा लावला. आजतकने तर चक्क एकाचवेळी सहा कॅमेऱ्यांनी हा रोड शो दाखवला. भाजपचे खासदार असलेल्या सुभाष चंद्रा यांच्या मालकीच्या झी न्यूजनेही दिवसभर हा रोड शो कवर केला. प्रियंका गांधींच्या एंट्रीने झालेला हा काँग्रेसचा पहिला फायदा म्हटलं पाहिजे.

टीवीवरच्या कवरेजवरून प्रियंका गांधीच्या राजकारणातल्या एंट्रीचं आणि टायमिंगचं महत्त्व अधोरेखित होतं. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका गांधींना थेट राजकारणात आणून काँग्रेसने आपला हुकमी पत्ता बाहेर काढलाय. हा पत्ता सध्या झाकलेला असल्यामुळे डाव कोण जिंकणार याबद्दल वेगवेगळे कयास लावले जाताहेत.

प्रियंकाच्या एंट्रीमुळे काँग्रेसला आणखी एक फायदा होणार आहे. तो म्हणजे, लोकसभा प्रचारासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधींच्या तोडीचा कॅम्पेनर मिळणार आहे. एकट्या उत्तर प्रदेशमधे लोकसभेच्या ८० जागा आहेत. तिथल्या प्रचाराचा आजूबाजूच्या भागावरही प्रभाव पडतो. अशाच भागात प्रियंकाला उतरवून काँग्रेसने मोठी चाल खेळलीय. या भागात प्रचारासाठी, कॅम्पेनसाठी काँग्रेसला पंतप्रधान मोदींएवढी फेसवॅल्यू असलेला चेहरा मिळालाय. कालच्या मीडियातल्या कवरेजवरूनही ते स्पष्ट झालंय.

स्त्रीदाक्षिण्याचं अस्त्र ट्रोलर्सवरच उलटणार

स्त्रीदाक्षिण्य हा आपल्या भारतीय परंपरेतला महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच लोकांनी इंदिरा गांधीतली दुर्गा, सोनिया गांधीतल्या त्यागमूर्ती बाईला लोकांनी डोक्यावर घेतलं. सोनिया गांधी सध्या आजारी असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरची ही स्पेस सध्या रिकामी आहे. सोशल मीडियाच्या काळात राजकीय भाषा दिवसेंदिवस नीच होतेय. अशावेळी प्रियंका गांधींच्या एंट्रीला खूप महत्त्व येतं. विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्यासाठी प्रियंकाचं बाई असणं काँग्रेसवाले एन्कॅश करू शकतात.

सोशल मीडियातल्या ट्रोलचं पहिलं टार्गेट बाई आहे. मग ती बाई कुठल्याही पक्षाची, जातीची, धर्माची असो तिला ट्रोलकडून टार्गेट केलं जातं. अशावेळी प्रियंकावरची खालच्या पातळीवरची टीका भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. भाजपच्या नेत्यांनी प्रियंका गांधी आपल्या ब्यूटीच्या बळावर मतदारांना वेड बनवू शकत नाहीत, अशी टीका केलीय. ट्रोल्सनी प्रियंकावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलीय. 

हेही वाचाः ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची?

पण ही गोष्ट संबंधित पार्टीच्या, विचाराच्या विरोधात जाणार आहे. आपण ती बाई कुठल्याही जाती, धर्माची असल्याचं सांगून टीकेचं समर्थन करू लागलोत, तरी ते लोकांना पटणार नाही. ट्रोल्स निर्बुद्ध, धर्मांध असतात. त्यामुळे येत्या काळात ते प्रियंका गांधीवर आणखी खालच्या पातळीवर जाऊन शारिरीक हल्ले करण्याची शक्यता त्यांच्या आजवरच्या वर्तनावरून दिसते. मात्र हीच गोष्ट काँग्रेसच्या बाजूने जाऊ शकते.

खिळखिळ्या पक्ष संघटनेचं काय करणार?

प्रियंकाच्या येण्यामुळे काँग्रेसचा सगळ्यात मोठा फायदा होताना दिसतोय तो म्हणजे पक्ष संघटना बळकट होतेय. होपलेस, झोपलेल्या अवस्थेत असलेल्या कार्यकर्त्यांमधे या एंट्रीमधे जोश बघायला मिळतोय. कालच्या रोड शोमधेही तो दिसला. पण सध्याच्या संघटनेच्या जोरावर काँग्रेस काही यूपीत २०१४ मधे भाजपने मिळवल्यासारखं यश मिळवू शकत नाही, ही गोष्ट कुणीही सांगू शकतो.

सध्याच्या परिस्थितीत एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. गेल्या तीसेक वर्षांपासून काँग्रेसची यूपीत सत्ता नाही. आतापर्यंत काँग्रेससोबत असलेली अप्पर कास्ट वोटबँकही २०१४ मधेच भाजपच्या बाजुला वळलीय. मुस्लिम, दलित समाज तर कधीचाच काँग्रेसपासून दुरावलाय. पक्ष संघटनाही पार खिळखिळी झालीय. असं असलं तरी या संघटनावरच काँग्रेसने २००९ मधे लोकसभेच्या २१ जागा जिंकल्या होत्या.

पण त्यावेळी त्यांच्याकडे केंद्रात सत्ता होती. आणि आता ती नाही. निवडणुकीतल्या विजयाची गणितही बदलीत. ७५ जागा जिंकणाऱ्या भाजप आघाडीविरोधात त्यांना दोन हात करायचेत. २००९ मधे एकमेकांच्या विरोधात लढणारे एसपी, बीएसपी आता एकत्रितपणे निवडणूक लढवताहेत. या दोन्ही आघाडीतल्या बीजेपी आणि बीएसपी या पक्षांकडे स्वतःचं मजबूत केडर आहे. याविरुद्ध काँग्रेस केडरलेस पार्टी आहे. हे असं असलं तरी आपल्याला काँग्रेस २००९ सारखं यश पुन्हा मिळवू शकणार नाही, असं म्हणता येत नाही.

प्रियंका गांधीच्या येण्यामुळे काँग्रेस पक्षाचा फायदाच होणार आहे. कारण सध्या लोकसभेच्या दोन जागा असलेल्या काँग्रेसकडे यूपीत गमावण्यासारखं काही नाही. जे काही गमवावं लागणार आहे ते भाजपलाच.

प्रियंकाला आताच आणण्यामागचं कारण

दुसरी इंदिरा गांधी म्हणून प्रियंकाला लाँच करण्यासाठी काँग्रेसवाले खूप प्रयत्नशील आहेत. कार्यकर्ते तर प्रियंकामुळे काँग्रेसला इंदिरा गांधीसारखं करिश्माई नेतृत्व मिळाल्याच्या मूडमधे वावरत आहेत. पण मतदारांचा तोंडवळा शहरी झालेला असताना गावखेड्यातल्या इंदिराबाईचा, इंदिराअम्माचा करिश्मा महाराष्ट्रासारख्या निमशहरी राज्यात कितपत चालेल, हे सध्यातरी सांगणं कठीण आहे.

काँग्रेसने प्रियंकाकडे पंतप्रधान मोदी आणि यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांचा प्रभाव असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशाचीच जबाबदारी दिलीय. एका अर्थाने काँग्रेसने आपलं सर्वस्व पणाला लावलंय. लोकसभेसाठी महागठबंधनच्या बोलणीत एसपी, बीएसपीने काँग्रेसला हात दाखवला. त्यानंतर निव्वळ लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसची शेवटची खेळी म्हणूनही प्रियंकाच्या एंट्रीकडे बघितलं जातंय. पण कालच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रियंकाकडे लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकीचीही जबाबदारी असल्याचं सांगून आपला इरादा क्लिअर केलाय.

कमजोर पक्षसंघटन, मजबूत सत्ताधारी, मोदींसारखं सर्वशक्तीमान नेतृत्व या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रियंकाचं नेतृत्व जोखल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे प्रियंका गांधींची एंट्री काही लोकसभेपुरती नाही. काँग्रेसने लंबी रेससाठीच प्रियंकाला आता राजकारणात उतरवलंय.