प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. आपल्या वेगळ्या ठाकरे शैलीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांच्या प्रबोधन या नियतकालिकाची १६ ऑक्टोबर १९२१ ला स्थापना झाली. आज प्रबोधनकारांचं प्रबोधन ९९ वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करतंय. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्रकारितेचा घेतलेला हा वेध.
प्रबोधनकार कोण? असा प्रश्न माझ्या पिढीला विचारल्यास हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे वडील, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आजोळ हीच प्रबोधनकारांची ओळख सांगितली जाते. खरंच एवढ्यापुरतेच प्रबोधनकार मर्यादीत आहे का? तर नाही. कोण होते प्रबोधनकार?
ते पेंटर, रबर स्टॅम्प मेकर, बाईंडर, पत्रं आणि मनिऑर्डर लेखक, ग्रामोफोनचे प्रचारक, फोटोएन्लार्जर, शिक्षक, भाषा प्राध्यापक, सेल्समन, जाहिरातकार, पॉलिसी एजंट, नाटककार, डेक्कन स्पार्क नाटक कंपनीचे मालक, इलेक्ट्रीशीयन, चित्रकार, हास्यचित्रकार तैलचित्रकार ऑईल कलर पोट्रेट पेंटर, हेडक्लार्क, टंकलेखक, सतारवादक, संगीतज्ञ, चित्रपट पटकथा लेखक, संवाद लेखक आणि अभिनेते, चित्रपट, मुख्य प्रसिद्धी अधिकारी, विमा कंपनीमधे एंजन्सी सुप्रीटेंण्डण्ट, प्रुफरिडर, निवडणूक प्रसिद्धी प्रमुख, निवडणूक जाहिरनामा लेखक, प्रवचनकार, बेलिफ, प्रकाशक, लेखक, साहित्यीक, लग्नविधीमधे पुरोहित, लघुउद्योजक भाषाविद, संशोधक, इतिहासकार, चरित्रकार, वक्ते, नेते, चळवळे, वादविवादपटू, विचारवंत संपादक, पत्रकार अशा विविध भूमिका जगणारे किमयागार होते. आजच्या भाषेत कौशल्य व्यवस्थापनाचं चालतं बोलतं विद्यापिठ.
परतंत्र भारतात सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढणारे भाषाप्रभू म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. (१७ सप्टेंबर १८८५ ते २० नोव्हेंबर १९७३) प्रबोधनकारांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात पत्रकारिता हा महत्त्वाचा पैलू होता. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन ते पत्रकारितेकडे वळाले.
हेही वाचा : पत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर
महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्र संपन्न करणाऱ्यांमधे पत्रकारितेचा वाटा खूप मोठा आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मधे दर्पण या साप्ताहिकाची सुरवात करून मराठी पत्रकारितेची सुरवात केली. त्यानंतर करमणूक, इंदूप्रकाश, सुबोधपत्रिका, केसरी, मराठा ही नियतकालिके निघाली.
सुरवातीला अभिजनांच्या वाड्यामधे कोंडलेली मराठी पत्रकारिता संघर्ष करत चालत चालत बहुजनांच्या उंबरठ्यावर आली आणि पुढे दलितांच्या वस्तीत गेली. हीनबंधू, जागरूक, जागृती, विजयी मराठा कैवारी, हीतमित्र, प्रबोधन, मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता अशी खऱ्या अर्थाने बहरली, फुलली आणि आधुनिक महाराष्ट्राला दिशादर्शक ठरली. या सर्वांमधे ‘प्रबोधन’ची भूमिका आणि वेगळेपण विशेष उठून दिसते.
आपल्या आगळ्या वेगळ्या लेखनशैलीने संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवणाऱ्या प्रबोधनकारांच्या पत्रकारितेचा प्रवास अत्यंत संघर्षमय असून त्यामधे अनेक चढउताराचे टप्पे आहेत. वयाच्या अकराव्या वर्षी १९६६ ला हरिभाऊ आपटे यांच्या 'करमणूक' या साप्ताहिकात ‘दैत्याची उत्पत्ती’ आणि ‘वर्तमानपत्राची उत्पत्ती’ असे त्यांचे दोन लेख प्रसिद्ध झाले. नंतर वयाच्या पंधराव्या वर्षी १९०० मधे इंदूप्रकाश आणि दादा आठल्ये यांच्या ‘केरळकोकीळ’मधे ते अग्रलेख लिहू लागले.
वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त भ्रमंती करत असतानाही जळगाव मुक्कामी काव्यरत्नावलीकार नारायण नरसिंग फडणीस यांच्या सहकार्याने दिनांक १६ ऑक्टोबर १९०७ला वयाच्या बाविसाव्या वर्षी त्यांनी ‘सारथी’ मासिक सुरू केलं. पुढे ते वर्षभर चालवलं. त्यानंतर विविध वक्त्यांची भाषणे ध्वनिलिखित म्हणेजच ट्रान्सक्रिप्ट करून वेगवेगळ्या नियतकालिकांमधे पाठवू लागले.
पहिलं महायुद्ध संपलं आणि महाराष्ट्रात टिळक युगानंतर गांधी युगास सुरवात झाली. त्यामुळे सत्यशोधक चळवळीचं रुपांतर ब्राम्हणेतर चळवळीमधे झालं. प्रबोधनकार अनेक सामाजिक चळवळींमधे क्रियाशील होते. पण त्यातही ब्राम्हणेतर चळवळ त्यांना जास्त जवळची वाटू लागली. कारण सामाजिक स्वातंत्र्य हा प्रबोधनकारांच्या सर्व चळवळीचा पाया होता. या चळवळीच्या प्रचार आणि प्रसाराकरता, स्वतःची मतं आणि स्वतंत्र विचारांच्या अभिव्यक्तीकरता त्यांनी ‘प्रबोधन’ हे नियतकालिक काढण्याचा निर्णय घेतला.
प्रबोधन काढण्याची प्रेरणा प्रबोधनकारांना कधी आणि का झाली याबद्दल प्रबोधकर म्हणतात, 'माझ्या वडीलांचे मामा कै. राजाराम मामा गडकरी, वकील, देवास यांनी माझ्या हृदयात महाराष्ट्र प्रेमाची न विझणारी ज्योत एका रात्रीत प्रज्वलीत केली. तोच माझ्या सत्यशोधक विचार क्रांतीकारक आणि बंडखोर लेखन व्यवसायचा पाया होय. त्या भव्य रात्रीनेच मला राजाराम शास्त्री भागवत, लोकहितवादी, जोतीराव फुले आणि गोपाळराव आगकर यांच्या विचार श्रीमंतीचा आस्वाद घेण्याचे भाग्य लाभले, प्रबोधनची उत्पत्ती याच महात्मांच्या विचार प्रणालीचे फळ होय.'
दिनांक १६ ऑक्टोबर १९२९ रोजी दादर मुंबई वरून प्रबोधन पाक्षिक सुरू झाले. प्रबोधनाचे ब्रीद वाक्य होते. 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नीबोधन' इंग्रजीमधे 'prabodhan a fortnightly journal devoted to the social religious and moral regeneration of the Hindu society'
प्रबोधनकारांचे ध्येय काय आहे हे सांगताना प्रबोधकनार पहिल्या अंकामधे म्हणतात की,
'समाजकार्यी स्वधर्मतत्त्वीं सदा शिलेदार|
प्रजापक्षनयमतसंवादी राजस सरदार||
विशिष्टपंथप्रवर्तकांची व्यर्थ न करि पूजा|
व्यक्तीचा नच मिंधा, बंदा सत्याच्या काजा||
विश्व निर्मिले जयें दयाळे त्या जगदीशाला|
भिऊनी केवळ, नच अन्याला, लागे कार्याला||'
हेही वाचा : पहिल्या वृत्तपत्रापासूनच मीडियाचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आजही सुरूच
सामाजिक सुधारणांना आणि हिंदू धर्म अधिकाधिक प्रगतीशील आणि आधुनिक व्हावा यालाच ‘प्रबोधन’ने प्राधान्य दिलं. आधुनिक विचाराचा पुरस्कार करून जनजागृती करणं, लोकमत घडवणं हे प्रबोधनचं ध्येय होतं. कसलीही तमा न बाळगता जे पाहिलं, अनुभवलं ते रोखठोक भाषेत निर्भिडपणे मांडणं हा प्रबोधनचा बाणा होता. मार्मिक शीर्षकं, सडेतोड भाषा, आला अंगावर तर घेतला शिंगावर ही वृत्ती, सडेतोडपणा, विचारांची सुस्पष्टता, निस्पृहपणा प्रतिपक्षावर हल्ला चढवताना येणारा तिखटपणा आणि सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर लिहिताना लेखणीचा धारदारपणा, सर्वांना समजेल अशी सोपी भाषा आणि मराठी बाणा हे प्रबोधनचं वैशिष्ट्य.
त्यातील लेख, अग्रलेख, स्फुटलेख, काव्य इतक्या ताकदीचे होतो की नागपूर ते गोवा अशी किर्ती प्रबोधनला अगदी अल्पकाळात मिळाली. खरंतर सुरवातीच्या काही दिवसांत म्हणजे १९२१ ते १०३० पर्यंत बऱ्याच संकटांचा सामना करत प्रबोधन मुंबई सातारा, पुणे अशा तीन शहरात सुरू होतं. प्रबोधनचा काळ हा पत्रकारितेचा सुवर्णकाळ होता. प्रबोधन हे जणू प्रबोधनकार ठाकरेंचं चरित्रच बनलं होतं. प्रबोधनामुळेच तर त्यांना प्रबोधनकार ही उपाधी मिळाली. यातूनच ठाकरे भाषा शैलीचीही निर्मिती झाली. आजही त्यांच्या पुढील पिढ्या ही शैली चालवतायत.
प्रबोधनच्या कार्याबद्द्ल नागपूरमधील 'जनता' पाक्षिकाचे संपादक म्हणतात की, 'प्रबोधनाने आपल्या निर्भिड आणि कल्पतारम्य लिखाणाने महाराष्ट्रामधे सामाजिक, राजकीय, आणि धार्मिक क्षेत्रामधे खळबळ उडवून दिली. प्रबोधनातील मेख म्हणजे त्रस्त जीवांचे दुःख पाहून भडभडून आलेल्या अंतःकरणाचा पडसाद होय. त्यांच्या लेखाच्या प्रत्येक ओळीमधे स्वार्थी लोकांचा निषेध दर्शविणारा संताप दिसून येतो. त्यांचे लिखाण भटशाही, भाटशाही आणि भांडवलशाही यांच्या अभेद्य ठरलेल्या स्वार्थी तटांना आपल्या लेखणीद्वारे सुरुंगाने पार उडून देते.'
प्रबोधकरांनी १९२६ मधे ‘लोकहितवादी’ नावाचं साप्ताहिक सुरू केलं. ते वर्षभर चाललं. त्यानंतर त्यांनी स्वतःचं असं कोणतंही नियतकालीक काढलं नाही. ‘प्रबोधन’ही काही अपरिहार्य कारणामुळे बंद करावं लागलं. पण प्रबोधनकारांच्या पत्रकारितेचा विस्तार खूप मोठा होता. पत्रकारितेचा वसा प्रबोधनाकारांनी शेवटपर्यंत कायम ठेवला.
प्रबोधननंतर कामगार समाचार, जगतसमाचार, बॉम्बे क्रॉनिकल, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश, राष्ट्रवीर, स्वराज्य, प्रमोद, प्रभात, निर्भिड, सत्यवादी, आत्मोद्धार, समाजसेवा, लोकमान्य, अग्रणी, जनता जनार्दन, चित्रमय जगत, महाराष्ट्र साहित्य, स्वयंसेवक, भगिनी, मराठा जागृती, दीप ज्योत, शिक्षक, महाराष्ट्र शारदा, ज्योतीप्रकाश, संदेश, वार्ताविहार, ज्ञानमंदिर, मंदिर या नियतकालिकात लिहित राहिले.
नवामनू या साप्ताहिकामधे तात्या पंतोजीच्या छड्या हे सदर लिहिले. नवाकाळ मधे घाव घाली निशाणी हे सदर चावले. बातमीदार या साप्ताहिकात दिर्घ काळ लेखन केले. त्यामधे वाचकाचे पार्लमेंट हे सदर चालवले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधे ‘नवयुग’ आणि ‘मराण’मधे लेखणीने महाराष्ट्र पुन्हा जागवला. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी काढलेल्या मार्मिक साप्ताहिकात मराठी अस्मिता जागृत करणारं लिखाण केले.
हेही वाचा : नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?
प्रबोधनकारांचा जीवनप्रवास अनेक खाच खळग्यांनी, संकटांनी भरलेला होता. तरीही प्रबोधनकार लिहित राहिले. पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्यातसुद्धा जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष प्रदीर्घ पत्रकारिता करणारे प्रबोधनकार महाराष्ट्रामधील एकमेव व्यक्तिमत्व होते.
प्रबोधनपासून सुरू झालेला त्यांचा पत्रकारितेचा प्रवास हा एकट्याचा होता. तो काही काळ आक्रोशला गेला. विस्मृतीचा पडदा पडत गेला परंतु महाराष्ट्राला तिचा विसर कधी पडला नाही. कधी पडणार नाही. कारण त्यांची पत्रकारिता ही स्वयंनिर्मित तशीच स्वयंभू होती. अशा या पत्रपंडिताच्या पत्रकारितेचा आज १६ ऑक्टोबर २०२० शंभराव्या वर्षात पदार्पण करताना प्रबोधन नावाचे ते वैचारिक स्मारक त्यांनी महाराष्ट्राला दिले. त्याबद्दल महाराष्ट्र त्यांचा नेहमी ऋणी राहिल.
हेही वाचा :
रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार
एप्रिल फूलच्या निमित्ताने फेक न्यूज समजून घेऊया
पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन
भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी
बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा,
(लेखक हे शिक्षक असून त्यांनी प्रबोधनकारांवर डॉक्टरेट केली आहे.)