अशोक नायगावकर हे सुप्रसिद्ध कवी नुकतेच पंच्याहत्तर वर्षांचे झाले. वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे हे त्यांचे कवितासंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. २०२०मधे फलटणला झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा मागोवा घेणारा सत्यशोधक या वेबपोर्टलवरचा लेख.
अशोक नायगावकर यांना पंच्याहत्तर वर्षं झाली, हे सहजासहजी पटणारं नाही. साठी पार केली की साहित्यिक मनुष्य तब्येतीच्या तक्रारी सांगायला लागतो, म्हणजे आता बसचा, ट्रेनचा प्रवास झेपत नाही, असं सांगून स्वतंत्र गाडीचा आग्रह धरू लागतो. आणि नायगावकर अजूनही हिंडते फिरते; बसने, ट्रेनने प्रवास करत महाराष्ट्र पालथा घालत असतात. त्यामुळेच त्यांच्या वयाची जाणीव कधी झाली नाही.
पाच वर्षांपूर्वी रामदास फुटाणे नानांचा अमृतमहोत्सव झाला. ज्येष्ठ सन्मित्र अरुण म्हात्रे यांचाही अमृतमहोत्सव जवळ आलाय. आपल्या डोळ्यासमोर आपले आवडते कवी असे एकेक म्हातारे होत असताना स्वतःच्या वाढत्या वयाचीही तीव्रतेनं जाणीव होत असते. चुकून कुणीतरी आपल्यालाही ज्येष्ठ वगैरे संबोधतं, तेव्हा काळजात धस्स होत असतं.
हेही वाचा: 'मायलेकी बापलेकी' : सुजाण पालकत्वाची जाणीव करून देणारं पुस्तक
नायगावकारांच्या या पंचाहत्तरीतल्या तंदुरुस्तीचं रहस्य कशात आहे? असं विचारलं तर कुणी त्यांच्या शाकाहारी असण्याचा किंवा निर्व्यसनी असण्याचा दाखला देईल. या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, पण ते निर्व्यसनी आहेत याचा अर्थ त्यांना सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही असं म्हणता येणार नाही. त्यांना दारू, तंबाखू, सिगारेटचं व्यसन नाही.
पण रिकाम्या वेळेत किंवा गप्पा मारता मारता त्यांचं अडकित्त्यानं सुपारी कातरणं सुरू असतं. एरव्ही न पिणारा माणूस पिणाऱ्यांची कुचेष्टा करीत असतो, तसला निर्व्यसनी असल्याचा अहंकार ते कधी बाळगताना दिसत नाहीत. ते पिणाऱ्यांच्या बैठकीत जेवढ्या आत्मीयतेने सहभागी होतात, तेवढ्याच तन्मयतेने न पिणाऱ्यांच्या मैफलीतही रंगून जातात.
अशोक नायगावकरांच्या तंदुरुस्तीचं रहस्य मला वाटतं त्यांच्या मनाच्या निर्मळपणात, निरागसतेत आहे. कवितेतून तीव्र उपरोध मांडणारा हा कवी प्रत्यक्षात निर्मळ आणि निरागस आहे. निर्बुद्ध निरागस लोक पावला पावलावर भेटत असतात. पण मी माझ्या आयुष्यात नायगावकरांएवढा निर्मळ मनुष्य पहिला नाही. मग ती निरागसता लिहिण्यातली असेल, बोलण्यातली किंवा सादरीकरणातली!
स्वतः मैफलीचे बादशाह असले तरी त्याच मैफलीतल्या इतरांच्या कविताही ते देहाचे कान करून ऐकत असतात, चांगल्याला दाद देत असतात. त्याअर्थांनं प्रत्येक कवीला ते पुरते ओळखून असतात. नवा जुना कुणीही असला तरी जे आवडलेलं असतं त्याबद्दल मोकळेपणानं सांगत, बोलत असतात.
एरव्ही दोन तीन समानधर्मी माणसं भेटली की, तिथं नसलेल्या चौथ्या माणसाबद्दल बोलत असतात. नायगावकर कधी कुठल्या अशा चर्चेत सहभागी झाले नाहीत, किंवा अशी चर्चा ऐकण्यात त्यांनी कधी रसही दाखवल्याचं आठवत नाही.
मात्र चांगल्या गाष्टींबद्दल बोलताना ते थकत नाहीत. मग तो विलास माळीने गडहिंग्लजला घेतलेला कार्यक्रम असो किंवा चंद्रकुमार नलगे सरांचं ‘रातवा’ हे आत्मचरित्र असो. नायगावकर भरभरून बोलतात. नवभारतपासून समाज प्रबोधन पत्रिकेपर्यंत गंभीर नियतकालिकांतून छापून आलेल्या गंभीर विषयांवरच्या लेखांबद्दलही ते आवर्जून बोलत असतात.
हेही वाचा: पंगतीतलं पान : वेगळ्या प्रयोगातून आलेल्या कादंबरीची काही पानं
नायगावकरांचा माझा व्यक्तिशः परिचय तीसेक वर्षांपासूनचा. अरुण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘कवितांच्या गावा जावे’च्या निमित्ताने झालेला. १९९३ साली आम्ही कोल्हापूरसह परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नंतर नंतर रामदास फुटाणे नानांसोबत एकत्र कविसंमेलने केली. शे-दीडशे कविसंमेलने आम्ही एकत्र केली असतील.
त्यानिमित्तानं एकत्र राहण्याचे, फिरण्याचे प्रसंगही अनेक आले. एका कवितेच्या दौऱ्याच्या निमित्ताने नायगावकर, अरुण म्हात्रे, प्रकाश होळकर ही मित्रमंडळी रत्नागिरीहून कराडकडे जाताना माझ्या गावी चरणला येऊन गेली. गावाकडचं घर बघितल्यानंतर, माझ्या आई-वडिलांना भेटल्यानंतर नायगावकरांची प्रतिक्रिया खूप वेगळी होती. ते म्हणाले,
‘आतापर्यंत तुला ओळखत होतो पण आता तुझी थोडीफार ओळख झाल्यासारखे वाटते. माणूस असतो पण त्याच्या मागं काय असतं ते नीट पाहिलं की ओळख पटते. तुझं घर पाहिलं, तुझ्या आई वडिलांना भेटल्यावर तुझी वेगळी ओळख झाल्यासारखं वाटतंय.’
नायगावकर एकदा कोल्हापूरच्या घरी आले होते. योगायोगाने त्यादिवशी मुलीचा म्हणजेच अक्षराचा वाढदिवस होता. आधी काही कल्पना नव्हती त्यांना, पण कळल्यावर त्यांनी नको नको म्हणत असताना खिशात हात घालून एक मोठी नोट तिच्या मुठीत दिली.
एकदा कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरात दर्शनासाठी त्यांच्यासोबत जाण्याचा योग आला होता. ते पहिल्यांदाच मंदिरात आले होते. तिथल्या वातावरणानं भारावून जाऊन त्यांनी खिशात होते ते सगळे पैसे मंदिराच्या दानपेटीत टाकले.
मी प्रहारमध्ये काम करीत असताना मला नेहमी म्हणायचे, ‘विज्या तुझ्यासारखा मनुष्य मटा किंवा लोकसत्तामध्ये असायला हवा असं मला नेहमी वाटतं.’ त्या काळात त्यांनी स्वतःहून त्यांच्यापरीनं काही प्रयत्नही केले होते. नंतर मटाच्या कोल्हापूर आवृत्तीचा निवासी संपादक झालो, तेव्हा पहिला फोन नायगावकरांना करून ती बातमी दिली.
तेव्हा म्हणाले, ‘आता कोल्हापूरात आल्यावर तुझ्या गाडीतनं फिरणार.’ लवकरच एका साहित्य संमेलनासाठी आल्यावर त्यांना गाडीतून फिरवलंही. त्यावेळचा त्यांचा आनंद काही औरच होता.
हेही वाचा: दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’
माझ्या ‘आतबाहेर सर्वत्र’ या कवितासंग्रहाला राज्य पुरस्कार मिळाला. तेव्हा एकदा भेटल्यावर ते म्हणाले, पुरस्कार वगैरे ठीक आहे, पण मला तुझी कविता मनापासून आवडली. हे जे काही बोलणं होतं ते मनस्वी होतं. अलीकडे माझा ‘स्तंभसूक्त’ कवितासंग्रह प्रकाशित झाला. प्रकाशनादिवशीच मुंबईत कोविडचा विस्फोट झाला होता.
घरोघरी माणसं आजारी होती. नायगावकरांच्या घरीही अडचण होती. त्यांनी फोनवरून भाषण केलं. माझ्या संग्रहाला स्वतःचा आवडी पुरस्कार जाहीर केला. त्यांना अनेकदा कार्यक्रमांसाठी बोलावलं. शक्य तेव्हा म्हणजे अनेकदा आले. कधीही कसलीही अट नाही. विंदा करंदीकर जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी आल्यावर मानधनही घेतले नाही.
नायगावकरांच्या कवितेबद्दल अनेकांनी लिहिलंय. वर्तमानाला थेट भिडणारी आणि तीव्र उपरोधिक कविता त्यांनी लिहिली. अशा कविता ते मंचावरून सादर करतात त्या अनेकांना परिचित आहेत. त्यापालिकडं ‘वाटेवरच्या कविता’ मध्ये त्यांच्या गंभीर आशयाच्या अनेक कविता आहेत. मी व्यक्तिशः त्यांच्या सादरीकरणाचा जेवढा चाहता आहे, तेवढाच या गंभीर कवितांचा चाहता आहे.
ढसाळांच्या काळापासून लिहिणाऱ्या, त्यांच्या सोबत वावरलेल्या नायगावकरांनी आपलं मोठेपण कधी मिरवले नाही. अहंकाराचा वारा त्यांना कधी शिवला नाही. आजघडीचे ते मराठीतले सर्वाधिक लोकप्रिय कवी आहेत. गंभीर लिहिणारे कवी आहेत.
लोकप्रियतेच्या लाटेवर कवितेचा गंभीर आशय विरून जातो की काय, अशी भीती कधी कधी वाटायला लागते. परंतु पुढच्याच क्षणी नायगावकरांची कविता रसिकांच्या खोल काळजावर वार करते आणि त्याला मूळ आशयापाशी घेऊन येते.
मूळचे वाईचे असलेले नायगावकर तर्कतीर्थांचा गंभीर आशय जेवढ्या समर्थपणे पेलतात, तेवढ्याच समर्थपणे रा. ना. चव्हाणांचं बोट धरून प्रबोधन परंपरेला प्रदक्षिणा घालतात. त्यामुळेच आजकालच्या संभ्रमाच्या काळात नायगावकारांची कविता जराही विचलित न होता वाट तुडवत राहते.
हेही वाचा:
तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध
कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा
‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी
‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं