भारताच्या लसीकरणाचा जगापुढे डंका

०४ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


कधीकाळी साथीच्या रोगांनी पिढ्यानपिढ्यांचा जीव घेतला. वेगवेगळ्या रोगप्रतिकारक लसींमुळे आता साथीच्या रोगांवर पुरेसं नियंत्रण मिळालंय. त्याचा परिणाम म्हणून मातामृत्यू आणि बालमृत्यू दरामधेही चांगलीच घट होतेय. या सगळ्यांचाच भाग म्हणून येत्या १२ आणि १३ डिसेंबरला दिल्लीत मातृत्व आणि बाल आरोग्याविषयी जागतिक परिषद भरतेय.

प्लेग, कॉलरा, पोलिओ, नारू अशा जीवघेण्या साथीच्या रोगांना आता अटकाव बसलाय. आजवरच्या सरकारांच्या लसीकरण मोहिमेला आलेलं हे मोठं यश आहे. साथीचे रोग नियंत्रणात आल्याने तसंच लसीकरणामुळे आता मातामृत्यू, बालमृत्यू दरामधेही घट होतेय. देशाच्या, जगाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा नीट चालण्यासाठी महिलांचं, मुलांचं आरोग्य निकोप असलं पाहिजे. त्यातून आरोग्यपूर्ण समाज घडेल आणि हाच समाज अर्थव्यवस्थेचं चाक म्हणून काम करेल, हे आता अर्थतज्ज्ञांना, जगाला कळून चुकलंय.

सुखी, समृद्ध जगाचं स्वप्न बघणाऱ्या संयुक्त राष्ट्रानेही आपल्या मिलेनियम गोल प्लॅनमधे आरोग्य क्षेत्राचा समावेश केलाय. आरोग्यपूर्ण समाजासाठी मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्याचा हेतू निश्चित केलाय. त्यासाठी संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल निधी अर्थात युनिसेफचं जगभरात वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून काम सुरू आहे. असा एक उपक्रम म्हणजे द पार्टनरशीप फॉर मॅटर्नल, न्यू बॉर्न अॅण्ड चाइल्ड हेल्थ अर्थात पीएमएनसीएच.

पीएमएनसीएच हा युनिसेफचा एक विभाग मातृत्व, नवजात आणि बाल आरोग्याच्या क्षेत्रात अधिकाधिक सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून तयार केलाय. जगभरातल्या संबंधितांमधे समन्वय साधण्याचं काम हा मंच करतोय. मातृत्व, नवजात बालक आणि बाल आरोग्यासाठी झटणाऱ्या जगभरातल्या या सगळ्या पार्टनर्सची एक परिषद दिल्लीत भरणार आहे. बुधवार १२ डिसेंबर आणि गुरुवार १३ डिसेंबरला होणाऱ्या या परिषदेचं यजमानपद यंदा भारताला मिळालंय.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने पीएमएनसीएचसोबत मिळून या जागतिक परिषदेचं आयोजन केलंय. ही परिषद म्हणजे बाल आरोग्याचा बहुआयामी प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कायकाय केलं, हे सांगण्याची वेगवेगळ्या देशांना मिळालेली संधीच आहे. या परिषदेत जगभरातले १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 

पीएमएनसीएच काय आहे?

मातृत्व, नवजात आणि बाल आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या पार्टनर्सचा सहभाग असलेला हा मंच युनिसेफने स्थापन केलाय. हा मंच लोककेंद्रीत जबाबदारीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवतोय. त्यातून महिला, नवजात बालक आणि किशोर यांच्या जगण्याचं वास्तव जगासमोर मांडायचाय.

बालमृत्यू, मातामृत्यू यांचा दर कमी करणं, तसंच आई आणि बाळाला मिळणाऱ्या सुविधांमधे सुधारणा घडवण्याच्या उद्देशाने २००५ मधे ग्लोबल हेल्थ पार्टनरशिपची घोषणा करण्यात आली. या कामाला आर्थिक, बौद्धिक, मनुष्यबळाचं पाठबळ मिळावं म्हणून वेगवेगळ्या १० क्षेत्रांतल्या हजाराहून अधिक लोकांना यात सहभागी करून घेण्यात आलंय. यामधे आरोग्य, संशोधन, दानशूर संस्था संघटना, एनजीओ, खासगी क्षेत्र यासारख्यांची मदत घेण्यात आलीय.

एवरी वूमन एवरी चाइल्ड

प्रत्येक महिला, प्रत्येक मूल अर्थात एवरी वूमन एवरी चाइल्ड हा या दोन दिवसांच्या परिषदेची मुख्य थीम आहे. ही परिषद म्हणजे यूएनच्या महासचिवांनी महिला, मुलं आणि नवजात बालकं यांच्या आरोग्यासाठी ठरवलेल्या जागतिक धोरणाचाच एक भाग आहे. यूएनचे तत्कालीन महासचिव बान की मून यांनी २०१० मधे झालेल्या यूएन मिलेनियम डेवलमेंट गोल्स समिटमधे ‘एवरी वूमन एवरी चाइल्ड’ या जागतिक चळवळीची घोषणा केली होती. 

जगभरात महिला, बालकं आणि नवजात यांच्या आरोग्यासाठी सरकार, वेगवेगळ्या संस्था संघटना, खासगी क्षेत्र आणि नागरी समाज यांना सोबत घेऊन ही जागतिक चळवळ सुरू आहे. महिला, बालकं आणि नवजात शिशू मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने जागतिक धोरण ठरवण्यात आलंय. महिला आणि बालकांचं आरोग्यपूर्ण जीवन साकारण्यासाठी यूएनच्या शाश्वत विकास उद्दीष्टांमधे २०३० ची डेडलाईन निश्चित करण्यात आलीय.

महिला आणि बालकांचं आरोग्य नीट राहिलं तरच समाजाच्या आरोग्याची निगा होईल. आरोग्यपूर्ण समाज हा देशाच्या अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे. यातून येणाऱ्या समृद्धीमुळे राजकीय स्थैर्य आणि समाजातला बंधूभाव वाढीस लागेल. २०३० पर्यंत ही उद्दीष्टं साध्य करायची आहेत.

परिषदेचा सक्सेस फॅक्टर

पीएमएनसीएचच्या या परिषदेत ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. सोबतच संयुक्त कृती कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे. मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग राबवण्यात आले. हे प्रयोग यशस्वी होण्यामागचे सक्सेस फॅक्टर सांगणाऱ्या १२ सक्सेस स्टोरी सांगण्यात येणार आहेत. या सक्सेस स्टोरी वेगवेगळ्या सहा खंडप्राय प्रदेशातल्या आहेत. खंडनिहाय वेगळेपणासोबतच या स्टोरींचे विषयही ६ थीमवर आधारलेले आहेत.

बाल्यावस्थापूर्व विकास, नवजात आरोग्य, सेवांमधली गुणवत्ता, निःपक्षपणा आणि प्रतिष्ठा, लैंगिक आरोग्य, महिला आणि मुलींचं सक्षमीकरण आणि मानवतावादी दृष्टीकोनातून केलेलं काम अशा सहा विषयातल्या केस स्टडीज असणार आहेत. भारतालाही आपली सक्सेस स्टोरी जगाला सांगण्याची संधी या परिषदेच्या निमित्ताने मिळालीय.

भारताचाही डंका वाजणार

युनिसेफच्या आरोग्य शाखेचे प्रमूख गगन गुप्ता यांनी सांगितलं, माता आरोग्य आणि बाल मृत्यूदर निर्देशांकात भारताने चांगलीच झेप घेतलीय. गेल्या पाच वर्षांतली भारताची ही प्रगती इतर देशांच्या तुलनेत खूपच उल्लेखनीय आहे. २०१२ मधे १४ लाख एवढा असलेला बालमृत्यूदर आता ९ लाख ८९ हजारावर येऊन पोचलाय. यात तब्बल ३० टक्क्यांची घट झालीय.

बालमृत्यूदराचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या एका एजन्सीने यासंबंधी नुकताच एक अहवाल सादर केलाय. त्यानुसार, गेल्या पाच वर्षांत २०१७ मधे भारतात पहिल्यांदाच बालमृत्यूदराचा आकडा दहा लाखांहून खाली गेलाय. भारताची ही कामगिरी उल्लेखनीय आहे. भारताला बाल मृत्यूदरातल्या या उल्लेखनीय कामगिरीची आपली सक्सेस स्टोरी जगाला सांगण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून मिळालीय. या परिषदेत अनेक स्टेकहोल्डर्स त्यांच्या सक्सेस आयडिया सांगणार आहेत.

बालमृत्यू कमी करण्यासाठी भारताने गेल्या वर्षभरापासून इंद्रधनुष्य अभियान हाती घेतलंय. यात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या आणि अर्धवट लसीकरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यात येतोय. ‘इंद्रधनुष्य अभियाना’मधे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हेपेटायटीस बी या सात जीवघेण्या रोगांपासून बालकांना वाचवणाऱ्या लसी देण्यात येणार आहेत. देशात सध्या जवळपास ७० टक्के असलेली लसीकरणाची व्याप्ती येत्या पाच वर्षांत ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचं उद्दीष्ट ठरवण्यात आलंय. शासनाचे सगळे विभाग आणि जिल्हा, राज्य पातळीवरील नेत्यांच्या मजबूत पार्टनरशिपमधून या अभियानाला वर्षभरातचं चांगलं यश मिळालंय. भारताची ही सक्सेस स्टोरी इथं सांगितली जाईल.

यजमानपदाची दुसऱ्यांदा संधी

बालमृत्यूच्या या समस्येला भिडण्यासाठीच युनिसेफने मातामृत्यू, नवजात आणि बाल आरोग्य अशा तिन्ही मुद्यांची सांगड घातलीय. दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं होणाऱ्या या परिषदेत वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रप्रमूख, मंत्री, सेलिब्रेटी यांच्यासोबत १०० हून अधिक देशांतले १२०० पार्टनर्स सहभागी होणार आहेत. भारताने २०१० मधे या परिषदेचे यजमानपद भूषवलं होतं. याआधी २०१४ मधे दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं आणि २००७ मधे टांझानियाच्या सालाम इथं ही परिषद झाली होती.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, चिलीच्या माजी राष्ट्राध्यक्ष मिशेल बॅचेलेट आणि पीएमएनसीएचचे अध्यक्ष यांच्या प्रमूख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. २०१० नंतर दुसऱ्यांदा भारतात यूनिसेफने या जागतिक बैठकीचं आयोजन केलंय. यूनिसेफच्या मते, भारताने आईचं आरोग्य आणि बाल मृत्यूदर निर्देशांकात सुधारणेच्या दृष्टीने मोठी झेप घेतलीय. त्यामुळेही भारताला दुसऱ्यांदा या परिषदेचं यजमानपद मिळालंय.

सहा महिन्यांपासून तयारी

दोन दिवसीय परिषदेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून १० आणि ११ डिसेंबरला वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. सिनेमा, म्युझिक, अनिमेशन आणि इतर क्रिएटिव आर्ट्सच्या माध्यमातून महिला आणि मुली आपलं म्हणणं मांडणार आहेत. मूल जन्माला घालणं आणि मातृत्वाविषयी स्वतःला काय वाटतं, हे त्या सांगतील.

पूर्वतयारीचा इवेंट आता होणार असला तरी या परिषदेची तयारी गेल्या ११ एप्रिललाच सुरू झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएमएनसीएचचं शिष्टमंडळ भेटायला गेलं तेव्हाच या सगळ्या तयारीचं उद्घाटन झालं. या शिष्टमंडळात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, पीएमएनसीएचच्या बॅचेलेट आणि युनीसेफची गुडविल अॅम्बॅसिडर अॅक्ट्रेस प्रियांका चोप्रा यांचा समावेश होता. 

माता, बाल आरोग्याच्या क्षेत्रात वेगवेगळ्या देशांनी कुठकुठले उपाय अमलात आणले त्यांची स्टोरी इथं सांगितली जाणार आहे. उद्दीष्ट साध्य करण्यासाठी धोरण अंमलबजावणीविषयीच्या सुधारणांवर परिषदेत चर्चा होईल. सक्सेस फॅक्टर सांगणाऱ्या जवळपास ३०० प्रस्तावांमधून १२ केस स्टडी या समिटमधे मांडण्यात येतील. या केस स्टडी ब्रिटीश मेडीकल जर्नलच्या विशेषांकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. 

आता फक्त १२ वर्ष हातात

जगभरात दरवर्षी २६ लाख नवजात बालकांचा जन्मल्यानंतर महिनाभरातच मृत्यू होतो. दरवर्षी दोन कोटी ६० लाख मुलं जन्माला घालणाऱ्या भारतातही ६ लाख ४० हजार मुलांचा जन्मतःच जीव जातो. मात्र, यात भारताने गेल्या दोन तीन दशकांमधे चांगलीच प्रगती केलीय. पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांचा मृत्यूदर कमी करण्यात भारताला इतरांच्या तुलनेत बरं यश आलंय, असं यूएनची आकडेवारी सांगते.

१९९० मधे ६६ टक्के असलेला हा मृत्यूदर २०१५ मधे ५५ टक्क्यांवर आलाय. मात्र जन्मतःच मृत्यूच प्रमाण कमी करण्याच्या बाबतीत भारताची कामगिरी खूपच संथ आहे. येत्या १२ वर्षांत नवजात बालकांच्या मृत्यूचा दर वार्षीक प्रति १००० मागे १२ म्हणजेच जवळपास अर्ध्यावर आणण्याचं उद्दीष्ट भारताला गाठायचंय. हे उद्दीष्ट गाठण्याची २०३०ची मुदत जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने घालून  दिलंय. यासोबतच पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूचं प्रमाणही प्रतिवर्ष जास्तीत जास्त २५ हजारापर्यंत आणण्याचं लक्ष्य आहे.

दिल्लीत होणारी ही परिषद येत्या १२ वर्षांसाठीचा संयुक्त कृती कार्यक्रम ठरवण्यासाठी महत्त्वाची आहे. १२ सक्सेस स्टोरीतून आपल्यासाठीची योग्य स्टोरी कोणती किंवा आपली नवी स्टोरी काय असू शकते हे शोधण्याची, ठरवण्याची संधी या परिषदेतून वेगवेगळ्या देशांना मिळालीय.