सेल्फी विथ कुंभः स्वच्छाग्रही मिशनचा ग्राऊंड रिपोर्ट सांगणारी पुजा

२५ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!

पहाटे तीन साडेतीनला सुरू झालेली शाही स्नानाची लगबग संध्याकाळी चारपर्यंत अखंड चालू असते. गर्दीचा ओघ अखंड वाहत असतो. त्या प्रवाहाला सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस, जवान, सफाई कामगार तहानभूक विसरून राबत राहतात. त्यात 'स्वच्छाग्रही' लेबलचं जर्कीन घातलेले काही महिला-पुरुषही सतत दिसत राहतात.

बहुतेकांचा पोशाख म्हणजे शर्ट-पॅन्ट किंवा साडी-सलवार आणि त्यावर स्वच्छाग्रहीचं जर्कीन. गळ्यात आयकार्ड, डोक्यावर टोपी, बूट, टॉर्च आणि हातात शिट्टी असते. अतिशय नम्रपणे गर्दीला स्वच्छता पाळण्याबाबत हे स्वच्छाग्रही हरप्रकारे बजावत राहतात. त्यातलीच एक आहे पूजा निषाद. कमालीची बोलकी, चुणचुणीत, हसरी. इलाहाबादजवळच्या जसरा गावात राहते.

'खूप थकवणारं काम असंल न हे तुझं?' मी तिला विचारते. ती म्हणते, 'हो. कितीही सांगा, बरेच लोक ऐकतच नाहीत. प्लास्टिकची बॉटल, चहाचे कप असंच कुठंतरी टाकू पाहतात. मग आम्ही त्यांना नम्रपणे रोखतो. स्वच्छता का कशी गरजेची आहे ते सांगतो. आपल्या लोकांना अजून स्वच्छतेच्या सवयी नीट लागलेल्या नाहीत.' गर्दीच्या दिवसांमधे ओरडून, शिट्ट्या वाजवून घसा दुखण्याची वेळ येते, पूजाची मैत्रीण शिवकुमारी म्हणाली.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः स्वयंघोषित शंकराचार्य त्रिकाल- स्टंटबाज की क्रांतिकारक?

स्नान केल्यावर गंगापूजा करून निर्माल्य सर्रास नदीतच टाकणारे अनेकानेक भाविक सतत अनुभवायला मिळाले. आणि हे स्वच्छाग्रही तितक्याच श्रद्धेनं लगोलग एका काठीला लावलेली जाळी वापरून अलगद ते निर्माल्य काढून बाहेर किनाऱ्यावरच्या कचऱ्यात टाकत होते. 'निर्माल्य नदीत टाकू नका, गंगेला स्वच्छ ठेवा'च्या अखंड घोषणाही लाऊडस्पीकरवर सुरूच असतात.

पूजाचं सध्या इलाहाबाद युनिवर्सिटीत हिंदी विषयात एमए सुरू आहे. तिला वडील नाहीत. आई घर सांभाळते. तो आणि तिचा एक मोठा भाऊ कमावते आहेत. एक लहान बहीण सध्या बारावीला आहे. कुंभमेळ्यात आठ नऊ तासांची उभी राहण्याची ड्युटी असते. शाही स्नानाच्या तारखांना तर २२ २३ तास अखंड ड्युटी असते. अगदी जेवायलाही वेळ मिळत नाही असं चित्र असतं, पूजा आणि तिच्या मैत्रिणी सांगतात.

पूजा म्हणते, 'कुंभमेळ्यात आम्ही जे काम करतोय तेच स्वच्छ भारत अभियानअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून आम्ही अनेकजण करतोय. त्यासाठी आम्हाला स्वच्छ भारतच्या अधिकाऱ्यांनी ट्रेनिंगही दिलंय. मी इलाहाबादजवळच्याजगदीशपूर, छतारा, कसरा अशा गावांमधे ड्युटीसाठी जाते. ही गावं १०-१५ किलोमीटर दूर आहेत. आणि वाईट काय, प्रवासखर्च आमचीच पदरमोड करून करावा लागतो. तिथे जाऊन गावकऱ्यांना स्वच्छतेचे, शौचालय बांधण्याचे धडे द्यायचे, जनजागृतीच्या मीटिंग्स घ्यायच्या. अनेकदा रात्र होते घरी परतायला. दिवसाचे दोनशे-तीनशे रुपये मानधन मिळतं. पण मीच काय, माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांना गेल्या दोन वर्षात दहा हजाराहून जास्त पैसे मिळालेले नाहीत. लवकरच पैसे खात्यात जमा होतील असं म्हणतात वरिष्ठ. पण पुढं काहीच होत नाही.'

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः साधुंना कशाला पाहिजे लक्झरी, फिरंगी बाबाचा सवाल

जाला पुढं हिंदीत पीएचडीपण करायचीय. शिकायची खूप इच्छा आहे. घरचेही प्रोत्साहन देतात. पण पैशाचं गणित जुळवताना तिची दमछाक होते. 'तू या सगळ्याबद्दल पेपरात लिहिशील तर आमचं अडकलेलं मानधन जमा व्हायला मदत होईल' असं पूजा म्हणते.

मेला परिसरात 'स्वच्छ भारत, स्वच्छ कुंभ'चे नारे वाचताना आलेल्या जनसमूहाला अभिमानाचं वाटत असणार. पण किती केवढ्या हतबल, पिचलेल्या हातांची बिनमोल मेहनत त्यामागे आहे हे क्वचितच असं कधी तरी पुढं येतं. सगळे स्वच्छाग्रही मेळ्यात सर्वसामान्य लोकांसाठी बनवलेल्या सार्वजनिक यात्री निवासमधे राहतात. नागरिकांना दिवसाला १०० रुपये भाडं असतं. स्वच्छाग्रहींना मात्र राहणं आणि चहा-जेवण्याचा खर्च करावा लागत नाही.

पूजा म्हणते, 'भारतीय संस्कृती क्षती हैं और मोदीजीने भी बताया की स्वच्छता तो ईश्वर से जोडती हैं हमें. फिर हम स्वच्छाग्रही लोगों को हमारा मेहनताना, हमारा सन्मान क्यो नहीं मिलता?' आताच्या कुंभमेळ्यात तब्बल १५०० स्वच्छाग्रही कार्यरत आहेत. कुंभाच्या पवित्र पर्वात पूजाला आणि तिच्या हजारो सहकाऱ्यांना उत्तर मिळेल का?

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

हेही वाचाः

सेल्फी विथ कुंभः संसारात रमलेल्या साध्वीची गोष्ट

सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

सेल्फी विथ कुंभः कुंभमेळ्यात रात्री मुर्दाबादची नारेबाजी का झाली