सेल्फी विथ कुंभः अकाली प्रौढ करणारं 'अध्यात्म'

२२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!

पहाटे पौष पौर्णिमेचं शाही स्नान अनुभवण्यासाठी संगमाला जाऊन वापस येत होते. मागून एक कोवळा आवाज आला. 'दीदी चाय पिलादो!' मी वळून बघितलं तर भगव्या वस्त्रात लपेटलेला एक हसऱ्या चेहऱ्याचा पोरगा होता. डोक्याला भगवं मुंडासं, अंगात आतून स्वेटर आणि वर भगवी वस्त्रं. कपाळाला चंदनाचे पट्टे, मध्ये कुंकवाचा टीळा, गळ्यात एक जुनीशी माळ, बोटात अंगठ्या आणि पाय अनवाणी.

मी म्हणलं, 'चाय तो पियेंगे हम साथ, पर आप क्या हमसे बात करोगे?' त्यावर पोरगा थोडासा लाजला. मग म्हणाला, 'हां करेंगे, क्या हैं?' मी विचारलं, 'आपतो छोटे साधू हो. आपका नाम?' 'चैतन्य गिरी' तो हसत हसत बोलला. मी पुन्हा विचारलं, 'यहीं के हो?' चैतन्य म्हणला, 'नहीं, चित्रकूटसे आये है.' चित्रकूट प्रयागहून साडेतीन तासांच्या अंतरावर आहे. रामानं वनवासाच्या चौदा वर्षांपैकी बहुतांश काळ इथं घालवला असं मानलं जातं.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

मी विचारलं, 'तो क्या पहली बार आये हो कुंभमें?' चैतन्य म्हणाला, 'नाही. हरसाल यहां माघ मेला लगता है. उसमेंभी हम आते है.' चैतन्य साधू लोकांच्या एका आखाड्यासोबत आलाय. आता आम्ही एका चहाच्या ठेल्यावर थांबून चहा घेतो. चैतन्यला बिस्कीट दिल्यावर लगेच घेतो. चहात बुडवून खायला लागतो.

मी विचारलं, 'आप उनके साथ कब से हो? क्या करते हो उधर?' तो म्हणाला, 'मै तो तीन साल से वही हूं. साधू लोगों की सेवा करता हूं.' मी विचारलं, 'सेवा याने?' तो म्हणाला, 'पानी भरना, झाडू लगाना, खाना बनाने में मदत करना, बाबाओं के पैर दबा देना' सेवा या शब्दांमागे केवढं मोठं शोषण होत होतं या पोराचं! आईवडिलांनीच इथं आणून सोडल्याचं चैतन्य सांगत होता.

हेही वाचाः सेल्फी विथ कुंभः रिक्षावाल्या सज्जनजींचा कष्टकुंभ

घरी गरीबी आहे. अजून एक भाऊ, एक बहीण. आईवडील दुसऱ्यांच्या शेतावर मजूरी आणि इतर लहानमोठी कामं करतात. इथं राहून चांगले संस्कार होतील असं सांगून आईवडील चित्रकूटला सोडून गेले. ते जवळच्याच एका खेड्यात राहतात. सहा महिन्यांतून एकदा भेटायला येतात. कधीकधी घरी घेऊन जातात.

विचारायला नको वाटत असतानाच मी विचारते, 'तो घर जानेका मन नही करता?' चैतन्य निर्विकार चेहऱ्यानं म्हणतो, 'करता है. पर वहां जाकर खायेंगे क्या? यहां जो चल रहा हैं वहीं अच्छा हैं!' केवढा कोवळा पोरगा, पण बोलत होता एखाद्या हिशेबी प्रौढ माणसासारखा.

जाता जाता शेवटचा प्रश्न विचारला, 'तो बडे होके क्या करना हैं?' चैतन्य म्हणाला, 'साधू बनना हैं.' मी म्हणलं, 'उससे क्या होगा?' चैतन्य म्हणाला, 'दीदी, जिंदगी अच्छी बनेगी. माँबाप को और भाईबहन को भी संभाल सकेंगे. अब मुझे आखाडे को जाना है. बाबा लोग गुस्सा करेंगे.' चैतन्य निघून गेला. अध्यात्माच्या वर्खाखाली लपलेले इतके सगळे पदर भराभर दाखवून, अस्वस्थ करून गेला.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

 

हेही वाचाः

सेल्फी विथ कुंभः पोळपाट लाटणं घेऊन विमल, उषा कुंभमेळा गाठतात तेव्हा!

सेल्फी विथ कुंभः संसारात रमलेल्या साध्वीची गोष्ट

सेल्फी विथ कुंभ: इथे ४१ सेकंदाच्या डुबकीने स्वर्ग मिळतो

सेल्फी विथ कुंभः कुंभमेळ्यात रात्री मुर्दाबादची नारेबाजी का झाली