रोगाचं निदान आणि रक्ताची तपासणी याचा जवळचा संबंध आहेच. पण रक्त हे पेशंटला औषध म्हणूनही दिलं जातं. त्यासाठी रक्तातले घटक वेगवेगळे करावे लागतात. हे सगळं सोपं वाटावं असंही एक काम पॅथॉलॉजिस्टला करावं लागतं आणि ते म्हणजे मृतदेहाची तपासणी म्हणजेच पोस्टमॉर्टम करणं. कोरोनाच्या साथरोगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅथॉलॉजी या विभागाबद्दल माहिती देणारं हे फायनल पोस्टमॉर्टम.
डॉ. लँडस्टायनर या शास्त्रज्ञाने १९०० साली ब्लड ग्रुप चा शोध लावला आणि एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला देण्याची सोय झाली. त्यानंतर आरएच फॅक्टरचाही शोध लागला आणि आणखी बऱ्याच प्रकारच्या ब्लड ग्रुपचा शोध लागला. रोजच्या कामात फक्त एबीओ आणि आरएच सिस्टम यांचाच वापर होतो.
पूर्वी रक्त एका बाटलीत जमा करून त्याचा फक्त ग्रुप करायचे. कुणाला हवं असेल तर नातेवाईकांकडून रक्त घेऊन त्या व्यक्तीला द्यायचं. पण हळूहळू रक्तात काही रसायनं मिसळून ते साठवून ठेवणं शक्य झालं आणि ब्लड बँक या कल्पनेचा उदय झाला. मलेरिया, सिफिलीस, एचआयवी, हेपटायटीस बी हे रोग रक्तातून पसरतात हे समजल्यावर डोनरकडून घेतलेल्या रक्तावर या तपासण्या करण्याची सक्ती झाली. आधी ब्लड बँक फक्त सरकारी हॉस्पिटलमधे असायची. नंतर प्रायवेट ब्लड बँक सुरू झाल्या.
रक्त हे पण एक औषध मानण्यात आलंय आणि त्यामुळे ब्लड बँकेला फूड अँड ड्रग अडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एफडीएचे नियम पाळणं बंधनकारक झालं. ते ब्लड बँकेला लायसन्स देतात. त्यानंतर रक्तातले घटक वेगळे करण्याची पद्धत सुरू झाली. एक युनिट रक्तापासून पॅक आरसीबी, फ्रेश फ्रोझन प्लाझमा, प्लेटलेट्स तयार होतात.
यासाठी एकाला एक जोडलेल्या अशा ३ बॅगांचा वापर होतो. त्यापैकी एका बॅगेत रक्त घेऊन ते सेन्ट्रीफ्यूज म्हणजे एका मशीनमधे घालून फिरवलं जातं. त्यामुळे त्यातले घटक वेगळे होतात. त्यापैकी आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी २ ते ६ तापमानात, प्लाझ्मा डीप फ्रीजमधे तर प्लेटलेट्स समान्य तापमानात आणि सतत हलत ठेवाव्या लागतात.
प्रत्येक पेशंटला त्याच्या गरजेप्रमाणे कंपोनंट दिला जातो. रक्त हे औषध मानायला लागल्यापासून या शाखेला ट्रान्सफ्युजन मेडिसिन हे नाव देण्यात आलं. त्यासाठी डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही आहे. १९९२ सालीच टाटा हॉस्पिटलने ब्लड बँक हे नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन असं केलं पण अजूनही बहुतेक ठिकाणी ब्लड बँकच म्हणतात. पॅथोलॉजिस्टला ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर असंही म्हणतात.
आरसीबी साधारण ३० दिवस टिकतात. प्लाझ्मा एक वर्ष टिकतो तर प्लेटलेट ५ दिवसच टिकतात. सर्जरी, अपघात किंवा डिलीवरीमधे खूप रक्तस्राव झाल्यास, रक्त खूप कमी असल्यास किंवा थालसेमियासारख्या आजारात रक्त द्यावं लागतं. यासाठी ब्लड बँकेत रक्त साठवलेलं असलं पाहिजे.
पूर्वी काही लोक पैसे घेऊन रक्त द्यायचे. बरेचदा ते ड्रग ऍडिक्ट वगैरे असायचं. त्यांच्या रक्तात एचआयवी असण्याचीही शक्यता असायची. यासाठी आता फक्त ऐच्छिक रक्तदानाला परवानगी आहे. काही ब्लड बँकना कॅम्प घेण्याची परवानगी असते. कॅम्पमधे साधारण १०० बॅग तरी मिळतात. याचा एक तोटा म्हणजे त्या सगळ्या एकाच दिवशी एक्सपायर होतात.
हेही वाचा : पॅथॉलॉजीविषयी १: पॅथॉलॉजिस्टना थँक्स का म्हणायला हवं?
एकदा रक्त दिलं की साधारण महिन्यांनी पुन्हा रक्त देता येते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला किंवा जवळच्या नातेवाईकांचा वाढदिवस, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अश्या दिवशी जवळच्या ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करावं. आरएच निगेटिव ग्रुपवाल्यांनी शक्यतो कॅम्पमधे रक्तदान न करता ब्लड बँकेत आपला फोन नंबर देऊन ठेवावा. म्हणजे गरज असेल तेव्हा ते बोलवू शकतात.
ऐच्छिक रक्तदानाबद्दल खूप जागृतीचं काम सुरू आहे. ब्लड देण्याआधी एक फॉर्म भरावा लागतो. यात आपल्याला कावीळ, मलेरिया, एचआयवीची शक्यता वाटेल असे आजार किंवा डायबेटिस, हार्ट किडनीचा आजार नाही, २४ तासापूर्वी दारू घेतली नाही वगैरे प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. हिमोग्लोबिन १२.५च्या वर असावं लागतं. तरच रक्तदान करता येतं. ब्लडप्रेशर १४०/९० पर्यंत चालू शकतं. ऐच्छिक रक्तदान केल्यास आपल्याला एक कार्ड मिळतं. त्यानंतर एक वर्ष आपल्या नातेवाईकांना रक्त हवं असल्यास मिळू शकतं.
रक्तगट सारखाच असला तरी रक्त देण्याआधी पेशंट आणि डोनरचं रक्त एकत्र करुन काही रिऍक्शन येत नाही ना हे बघावं लागतं. याला क्रॉस मॅचिंग म्हणतात. बॅगची किंमत, टेस्टिंग आणि क्रॉस मॅचिंगसाठी सरकारने ठरवून दिलेली किंमत हॉस्पिटल आकारू शकतं.
हेही वाचा : शेतकऱ्यांच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?
प्लेटलेट साधारण २० हजारपेक्षा कमी झाल्यास बाहेरून द्याव्या लागतात. पूर्वी फक्त ब्लड कॅन्सरच्या पेशंटना प्लेटलेट दिल्या जायच्या. हल्ली डेंग्यूच्या रोग्यांनाही देतात. एका वेळी ४ तरी बॅग द्याव्या लागतात. त्या जास्त टिकत नाहीत. त्यामुळे साठवूनही ठेवता येत नाहीत. त्यामुळे हव्या असल्यास डोनर बोलवून तयार कराव्या लागतात. तसंच बऱ्याच वेगवेगळ्या लोकांमधे वेगवेगळी अँटिजेन असू शकतात. यामुळे पेशंटला रिऍक्शन येऊ शकते. यासाठी सिंगल डोनर प्लेटलेट वापरतात.
एका मशीनने रक्तातून प्लेटलेट काढून उरलेले रक्त त्याच्या शरीरात परत सोडले जाते. याला प्लेटलेट अफेरेसिस म्हणतात. यामुळे एकाचवेळी बरेच युनिट प्लेटलेट मिळतात. पण त्याची किंमत खूप असते. हिमोफिलिया नावाच्या रोगात रक्त गोठत नाही. त्यासाठी क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे रक्त गोठायला मदत करणारे घटक द्यावे लागतात. ते सुद्धा आता तयार केले जातात.
हेही वाचा : पॅथॉलॉजीविषयी २ : तपासणी म्हणजे अग्निपरीक्षाच
ब्लड बँकेत काम करण्यासाठी टेक्निशियन बीएससी डीएमएलटी पाहिजे. एफडीएला त्याचे पेपर पाठवावे लागतात. एक वर्ष ट्रेनी म्हणून काम करावं लागतं. त्यानंतर अप्रुव्हल येतं. कंपोनंट तयार करण्यासाठी टेक्निकल सुपरवायझर लागतो. एफडीए प्रमाणित टेक्निशियन साधारण ५ वर्ष काम केल्यावर सुपरवायझर होऊ शकतो. एफडीएने त्याला प्रमाणित करावं लागतं. तसच बीटीओचेही पेपर पाठवावे लागतात आणि अप्रुवल यावं लागतं.
ब्लड बॅग एक्सपायर झाल्यावर डिस्कार्ड कराव्या लागतात. तसेच टेस्टिंग नंतर एचआयवी, एचसीवी वगैरे पॉझिटिव आल्यास त्या डिस्कार्ड कराव्या लागतात. या सर्वांची नोंद ठेवावी लागते. एफडीएचे अधिकारी अचानक येऊन तपासणी करतात. काही चूक सापडली तर लायसन्स जप्त होऊ शकतं. हे सर्वात कठीण क्षेत्र आहे असं मला वाटतं.
पेशंटला ब्लड दिलं जातं तेव्हा ती बॅग आधी रूम टेम्परेचरला आणून मगच ते द्यायचं असते. प्लेटलेट्स लगेच द्याव्या लागतात. पेशंटला अनेक कारणांनी रिएक्शन येऊ शकते. यासाठी जराशी शंका आली तरी रक्त देणं थांबवावं लागतं. हे तंत्रज्ञान जीव वाचवणारं आहे तसंच जीव घेणारंही आहे. अर्थात नीट काळजी घेऊन वापरल्यास उपकारकच आहे.
हेही वाचा : जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी
‘जातस्य हि धृवो मृत्यू:’ म्हणजे जन्माला आला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे हे गीतेतीलं वचन सर्वांनाच माहीत आहे. तरीही मृत्यू कुणालाच नको असतो. आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला की लोक सुन्न होतात. डॉक्टरांना मात्र अनेक मृत्यू बघावे लागतात आणि काहींचं काम त्याच्याशीच निगडित असतं.
कुणाचाही मृत्यू होतो त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावणं. आपापल्या धर्मानुसार लोक दहन, दफन वगैरे करतात. पण हे करण्याआधी डेथ सर्टिफिकेट आवश्यक असतं. जेव्हा एखाद्याचा मृत्यू आजारपणामुळे, वार्धक्यामुळे किंवा नैसर्गिक कारणांनी होतो त्यावेळी जनरल प्रॅक्टिशनर त्याची तपासणी करून मृत्यू झाल्याची खात्री करून घेतो आणि तसं सर्टिफिकेट देतो. त्याने हे दिलंच पाहिजे असा नियम आहे. यात मृत्यूचं कारण आणि ते कारण निर्माण करणारा आजार लिहावा लागतो. म्युनिसिपालिटीकडून मिळणारा मृत्यूचा दाखला वेगळा असतो. त्यासाठी नंतर अर्ज करावा लागतो.
एखाद्याचा मृत्यू अनपेक्षित, अनैसर्गिक कारणांनी किंवा संशयास्पद परिस्थितीत किंवा घराच्या किंवा हॉस्पिटलच्या बाहेर झाला असेल तर डॉक्टर सर्टिफिकेट देऊ शकत नाहीत. मृतदेहावर जखमा असतील, रंग काळानिळा पडला असेल, तोंडाला फेस आला असेल, आत्महत्येची शंका असेल तर डॉक्टरांनी सर्टिफिकेट न देता पोलिस केस केली पाहिजे. एकदा मृतदेहाची विल्हेवाट लागली की सगळे पुरावे नष्ट होतात आणि नंतर कुणी तक्रार केली तर सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरवर त्या गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप होऊ शकतो.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?
कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?
तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?
लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं होतंय जगभर कौतूक
संशयास्पद मृत्यूच्या कारणांच्या तपासाला इंक्वेस्ट असं म्हणतात. पूर्वी मुंबईत कॉरोनर सिस्टीम होती. तेव्हा ही इंक्वेस्ट कॉरोनर करायचा. मुंबईत कॉरोनर कोर्ट फक्त जेजे, राजावाडी आणि कूपर हॉस्पिटलमधे होतं. मुंबई बाहेर सर्वत्र पोलिस इंक्वेस्ट होती. १९९८ मधे कॉरोनर सिस्टिम जाऊन मुंबईत ही पोलिस इंक्वेस्ट सुरू झाली. यानुसार तेव्हा एकूण ८ सेंटरमधे पोस्टमॉर्टम सुरू झालं.
एखाद्या पेशंटचा मृत्यू हॉस्पिटलमधे होतो तेव्हा त्या डिपार्टमेंटचे डॉक्टर डेथ सर्टिफिकेट देतात. पण हॉस्पिटलमधे ऍडमिट करून निदान न होता २४ तासांच्या आत मृत्यू झाला तसंच जळणाच्या, विषप्रयोगाच्या केसेस, अपघात किंवा सर्जरीच्या टेबलवरच मृत्यू अशा अनेक केसमधेसुद्धा पोस्टमॉर्टम होतं. पोस्टमॉर्टम फक्त सरकारी आणि ठराविक म्युनिसिपल हॉस्पिटलमधेच होतं आणि ते विनामूल्य असतं.
पॅथॉलोजी आणि फॉरेन्सिक दोन्ही डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करत असले तरी दोन्हींच्या केसेस, पद्धती आणि हेतू वेगवेगळे असतात. पॅथॉलॉजीमधे मृत्यूचं कारण नैसर्गिक आहे हे माहीत असतं. पण अचानक मृत्यू झाल्यानं निदान झालेलं नसतं. याचा हेतू शिकणं आणि शिकवणं हा असतो.
पॅथॉलॉजीमधे पोस्टमॉर्टम सर्वंच शवाचं विच्छेदन करून सर्व अवयवांचा ब्लॉक काढून देतात. तसंच मेंदू बाहेर काढून देतात. नंतर प्रत्येक अवयव सुटा करून त्याचे वजन, आकार बघून स्लाइस करून रोग आहे का ते बघितलं जातं. छोटे तुकडे हिस्टोपॅथॉलॉजीसाठी फॉर्मलिनमधे ठेवले जातात. नंतर मृत्यूचं कारण दिलं जातं.
काही लोकांना एखादा गंभीर रोग असतो. पण त्यांना काहीच लक्षणं दिसत नाहीत. उदाहरणार्थ रक्तवाहिनीचे ऍन्यूरिझम. हे अचानक फुटून मृत्यू होऊ शकतो. अशा फाइंडिंगना इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणतात. फॉरेन्सिक पोस्टमॉर्टमला मेडिकोलीगल पोस्टमॉर्टम असंही म्हणतात. मृतदेहाची ओळख पटवणं, मृत्यू झाल्यापासून किती वेळ झाला आहे ते ठरवणं, मृत्यूचं कारण नैसर्गिक आहे की अनैसर्गिक ते ठरवणं, अनैसर्गिक मृत्यू असल्यास अपघात, आत्महत्या की खून हे ठरवणं, असे अनेक उद्देश त्यामागे असतात.
शरीरावर जखमा असतील तर त्या जखमांची पूर्ण नोंद करून त्यामुळे मृत्यू येईल का ते ठरवलं जातं. तसंच त्या जखमा मृत्यू आधी झाल्या आहेत की नंतर हेही ठरवलं जातं. बरेचदा माणसाला आधी वेगळ्या पद्धतीने मारून नंतर गळफास दिला जातो. अशावेळी त्या फासामुळे गळ्यावर पडणाऱ्या खूणा फासामुळेच मृत्यू झाला असेल तर येणाऱ्या खूणांपेक्षा वेगळा असतो.
कोणी बुडून मेला किंवा आधी मारून पाण्यात प्रेत टाकले तर मिळणारी फाईंडिंग वेगळी असतात. खून करून प्रेत रेल्वे मार्गावर टाकणं किंवा रस्त्यावर टाकणं यातही मिळणारी फाईंडिंग वेगळी असतात. विषप्रयोगाने मृत्यू झाला आहे, अशी शंका असल्यास जठर, लहान आतडं, लिवर, मेंदू यांचे थोडे भाग फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमधे पाठवावे लागतात. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं आहे. तिथं संपूर्ण महाराष्ट्रातून केसेस येतात. त्यामुळे रिपोर्ट यायला वेळ लागतो. अशा वेळी मृत्यूचं कारण केमिकल ऍनालिसिसनंतर असं देऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. नंतर फायनल कारण दिलं जातं.
हेही वाचा : पॅथॉलॉजीविषयी ३ : आपल्याला कॅन्सरचं निदान करून देणारं शास्त्र
विम्याच्या क्लेमसाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट गरजेचा असतो. रस्त्यावर मरून पडलेली अनोळखी व्यक्ती असेल तर टॅटू, जन्मखुणा, धर्म समजू शकेल अशी चिन्ह नोंदवून ठेवावी लागतात. बेवारशी प्रेतांची विल्हेवाट पोलिस त्यांच्या धर्माप्रमाणे लावतात. मृत्यूनंतर शरीरात काही बदल होतात. स्नायू कडक होतात. यावरून तसेच जठरात अन्न आहे की नाही यावरून मृत्यूनंतर किती वेळ झाला आहे हे ठरवता येते.
अमेरिकेत फॉरेन्सिक पॅथॉलोजी हे पॅथॉलोजीचं सुपर स्पेशलायझेशन आहे. आपल्या इथे यासाठी एमडी आणि डिप्लोमा डीएफएम हे कोर्सेस आहेत. फॉरेन्सिक वर्क फक्त पोस्टमॉर्टम पुरतं मर्यादित नसून त्यात माणसाचं वय निश्चित करणं, रेप विक्टिम आणि आरोपीची तपासणी वगैरे अनेक भाग येतात. काही केसेस कोर्टात गेल्यास आपला रिपोर्ट घेऊन जाऊन शपथेवर साक्ष द्यावी लागते. असं हे खूप दुर्लक्षित पण खूप महत्वाचे क्षेत्र. यात काम करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील खूप ज्ञान लागतं.
हेही वाचा :
कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
तबलीगने भारतात कोरोना पसरवण्याचा कट केलाय का?
रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन
भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं
(डॉ. मंजिरी मणेरीकर या गेली २५ वर्ष पॅथॉलॉजीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईच्या टाटा मेमोरिअल कॉलेजमधून एमडी पॅथॉलॉजी केलंय.)