पाच फुटाचा बच्चन : अंतर्मुख करणारा एकपात्री नाट्यप्रयोग

११ मार्च २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यप्रयोगानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. एका अतिशय आगळ्यावेगळ्या आणि फारच संवेदनशील विषयावरचा हा एकपात्री नाट्यप्रयोग, कीर्तनासारख्या पारंपरिक कलाप्रकारातून मनोरंजन करता करता, सद्यस्थितीचं वास्तव मांडतोय. स्त्री-पुरुष समतेच्या महत्त्वाच्या मानवी मूल्याला तथाकथित गौरवशाली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली कसा छेद दिला जातो, हे अनुभवताना प्रेक्षक अंतर्मुख होतो.

अत्यंत गौरवशाली मानल्या गेलेल्या वारकरी संप्रदायामधे महिला कीर्तनकारांची संख्या मागच्या ३० ते ३५ वर्षात नक्कीच वाढू लागलीय. विशेषतः सध्याच्या काळामधे 'सांस्कृतिक' वारशाचा अभिमान बाळगताना, धार्मिक अस्मितेचं पुनरुत्थान घडवण्याचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी एकूणच भक्ती संप्रदायाच्या क्षेत्रात राजकीय शक्तींचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.

अशा बदललेल्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत, आधुनिकतेची सांगड घालत व्यावसायिक कीर्तनात स्वत:चं करिअर करणाऱ्या एका तरुणीच्या आयुष्याची कहाणी केंद्रस्थानी ठेवणाऱ्या 'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यप्रयोगाने समस्त रसिकांचं लक्ष वेधून घेतलंय.

हेही वाचा: गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

परंपरेच्या जोखडात अडकलेली तरुणी

एका अतिशय आगळ्यावेगळ्या आणि फारच संवेदनशील विषयावरचा हा एकपात्री नाट्यप्रयोग, कीर्तनासारख्या पारंपरिक कलाप्रकारातून मनोरंजन करता करता, सद्यस्थितीचं वास्तव मांडण्यात यशस्वी होतो. अध्यात्मिक क्षेत्रातही स्त्री-पुरुष समतेच्या महत्त्वाच्या मानवी मूल्याला तथाकथित गौरवशाली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली कसा छेद दिला जातो, हे अनुभवताना प्रेक्षक नक्कीच अंतर्मुख होतो.

एका लहान खेड्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेली तरुणी, कीर्तनासारख्या लोकप्रिय असलेल्या आणि लोकाश्रय आणि राजाश्रय मिळालेल्या पारंपरिक क्षेत्रात करिअर करते, त्यात ती सुपरस्टार बनते, प्रचंड प्रसिद्धी आणि बख्खळ पैसेही मिळवते. पण मोठं व्यावसायिक यश मिळवूनही पुरुषी अहंकाराचे तिला चटके बसू लागतात आणि ती कौटुंबिक नातेसंबंधांचे पाश आणि सामाजिक रूढी आणि परंपरेच्या जोखडात ती कळत-न-कळत जखडली जाते. अशी या प्रयोगाची मध्यवर्ती कल्पना.

कौस्तुभ रमेश देशपांडे या कोल्हापूरच्या सर्जनशील तरुण लेखकाने आपल्या प्रभावी लेखणीतून या एकपात्री नाट्यप्रयोगाची नाट्यपूर्ण उभारणी केलेली आहे. वर्तमानकाळातलं कौटुंबिक आणि सार्वजनिक वास्तव दाखवत दाखवत हे नाटक सरळ रेषेत पुढे सरकत असल्याचं वाटत असतानाच, लेखकाने या कहाणीला 'जोर का झटका धीरे से' देत एक आकस्मिक पण वास्तवकारी वळण दिलंय.

दीड तासांचं एकपात्री नाट्य

आपल्या कीर्तनातून प्रसिद्धी मिळालेली ही तरुणी अध्यात्मिक संप्रदायात गृहीत धरलेल्या समता, समानता, जाती आणि धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्यांची पेरणी करत असली तरी ती एक स्त्री असल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात पुरुषांच्या वर्चस्वाखाली सहन करायला लागणारी दुय्यम दर्जाची वागणूक तिच्याही वाट्याला येते.

एखादी स्त्री व्यावसायिक जीवनात कितीही यशस्वी असली तरी, समाज तिला स्त्रीपणाची जाणीव अजिबात विसरू देत नाही, हेच खरं. कीर्तनासाठी पुरुष साथीदारांबरोबर गावोगावी फिरावं लागत असल्यामुळे, संशयाची वेगवेगळी भूतं सहजपणे कशी मागे लागतात हे या प्रयोगातून फार तरलपणे मांडलं गेलंय.

चेहऱ्यावरचे अनुरुप हावभाव, शब्दफेक, रंगभूमीवर होणारी सफाईदार हालचाल, तसंच नजरेतून पाझरणारे विविध भावभावनांचे इंद्रधनुष्य, गायनकला अशी अभिनयातली सर्व अंगं अतिशय सहजपणे आणि प्रभावीपणे मांडत त्या अवघ्या पाच फुटांपेक्षाही कमी उंची असलेल्या 'श्रुती मधुदीप' या अभिनेत्रीनं, स्वतःच दिग्दर्शित केलेल्या दीड तासांच्या या एकपात्री नाट्याला अक्षरशः जिवंत केलंय.

हेही वाचा: बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

'हार्ट टू हार्ट' संवादातलं आत्मभान

पुण्यात ५ मार्चला झालेल्या दुसऱ्याच प्रयोगात रंगभूमीवर वावरताना तिने सहज अभिनयाचं आणि आत्मविश्वासाचं जे मनोहारी दर्शन घडवलंय, ते नक्कीच काबिले-तारीफ आहे. एक कीर्तनकार म्हणून व्यावसायिक यश लाभल्यामुळे निर्माण झालेला गर्व आणि आत्मकेंद्रीवृत्ती दाखवत असतानाच, आई आणि सख्ख्या बहिणीबरोबरच्या नात्यातले विविध पदर श्रुतीनं चांगल्या प्रकारे उलगडलेत.

स्वतःचं वैवाहिक आयुष्य सुरू होण्याअगोदरच तिला पुरुषी अहंकाराचे चटके बसू लागल्यामुळे हतबल झालेल्या परंतु मूळातच बंडखोरवृत्ती असलेल्या नाटकातल्या पात्राने, आनंद आणि दुःखाच्या प्रसंगाला सामोरं जाताना चेहऱ्यावरचे भाव आणि आवाजातले चढउतार खूपच ताकदीने मांडल्यामुळे, श्रुतीच्या अभिनय आणि संवादलेखनाला प्रेक्षकांची पदोपदी दाद मिळत जाते.

पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या अध्यात्मिक क्षेत्रात व्यावसायिक यश मिळवणाऱ्या या तेजतर्रार तरुणीला, स्वतःच्या व्यक्तिमत्वातल्या उथळपणाची जेव्हां जाणीव होते, तेव्हा तिच्या मनातली घालमेल रसिकांपर्यंत परिणामकारकरित्या पोचते, हे तिच्या अभिनयाचं शक्तीस्थळच म्हणावं लागेल. विशेषतः स्वतःच्या बहिणीबरोबरचा पत्ररुपाने होणाऱ्या 'हार्ट टू हार्ट' संवादातून तिला होत जाणारं आत्मभान, या पत्ररूपी आशयघन संवाद आणि त्याच्या सकस सादरीकरणामुळे नाटकाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. हा सारा प्रसंग प्रेक्षकांना काही क्षण सुन्न करून सोडतो.

अंतर्मुख करणारा नाट्यप्रयोग

मागच्या दोनचार वर्षात 'सापशिडी', 'खिसा', 'साखरेपेक्षा गोड' या सारख्या सिनेमांमधून अभिनय करणा-या श्रुतीने 'पाच फुटाचा बच्चन' या एकपात्री नाट्यानुभवातून आपले अभिनय कौशल्य आणि क्षमता सिद्ध केली आहे; तर 'ऑर्फियस स्टुडियो'च्या माध्यमातून सर्जनशील काम करणाऱ्या कौस्तुभ देशपांडे याने, सामाजिक विषयांवरचं लेखन करताना जी तरलता आणि संवेदनशीलता दाखवली आहे, त्याचंही कौतुक वाटते. एकूणच या प्रयोगाशी विविध अंगाने संबंधित असलेल्या 'रोम रोम रंगमंचा'वरच्या संपूर्ण टीमचंही अभिनंदन! 

वारकरी परंपरेच्या पार्श्वभूमीवरचा हा टवटवीत नाट्यप्रयोग, त्यातलं लेखन आणि संवाद, चतुरस्त्र अभिनय, साधं नेपथ्य, सुबक प्रकाश योजना या वैशिष्ट्यांमुळे प्रेक्षकांना सहजच भावून जातो. कोणताही आक्रस्ताळेपणा आणि कर्कश्शपणा न येऊ देता, तसंच समाजातल्या विविध स्तरापर्यंत संयतपणे पोचण्याची क्षमता असलेल्या या एकपात्री नाट्यप्रयोगाला राज्यभरातल्या विविध शहरं, जिल्हे, तालुके आणि गाव पातळीवरही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो.

या विषयातली आशयसंपन्नता लक्षात घेता, प्रसंगी लहान सभागृह, समाजमंदिर, शाळा आणि महाविद्यालयांमधून प्रयोग व्हावेत म्हणून किमान नेपथ्य आणि प्रकाश योजना वापरून, प्रत्यक्षातल्या कीर्तनाप्रमाणेच प्रेक्षकांना 'इंटिमेट' अनुभव देता येईल का, याचाही विचार व्हावा. 'पाच फुटाचा बच्चन' हा एक चैतन्यदायी पण अंतर्मुख करणारा आगळावेगळा एकपात्री नाट्यप्रयोग नाट्यप्रेमी रसिकांना पहायलाच हवा, असं आवाहन करावंसं वाटतं.

हेही वाचा: 

वारीचं सामर्थ्य समता संगराला लाभावं

वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

वारकरी संप्रदायाची सहिष्णुता आजच्या काळात महत्त्वाची

साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

वारकऱ्यांच्या सहिष्णू परंपरेवर हल्ला करणाऱ्यांना रोखायलाच हवं

(प्रशांत कोठडिया यांची ही फेसबुक पोस्ट आहे)