आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण!

१४ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप, सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं.

तुमच्या पिढीचं कसं आहे कॉफी आणि बरंच काही! आमच्या वेळी हिंडण फिरणं सोडा साधा चहा घेण्याचं स्वप्न. म्हणजे प्यार किया तो डरना क्या वगैरे फक्त सिनेमातच बरं वाटतं. पण हल्ली 'केलं तर केलं तुमचं काय गेलं' किंवा मग 'आम्ही या पिढीशी जुळवून घेतो किंवा आम्ही पण याच पिढीचे वगैरे' असं म्हटलं जातं.

तरुण पिढी प्रेमाकडे निरनिराळ्या रंगांच्या चष्म्यातून पाहते. अधिक उणे करते. कधी बेरीज फसते. कधी गणित चुकतंही म्हणून प्रेमात पडायचं नाही का? आता कार्यकारणभाव म्हटला तर पोट भरण्यासाठी खायला लागतं तसंच वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक माणसाच्या निरनिराळ्या गरजा आहेत. त्यातलीच एक गरज म्हणजे मैत्री.

हो! कुणाचंही कोणतंही नातं घ्या एकदा त्याला दिलेलं नाव काढून घेतलं तर मैत्री शिवाय दुसरं काही उरत नाही. दोन जिवांचा एकमेकांत जीव गुंतला तर ते मैत्रीपूर्ण प्रेम असू शकतं. पण त्याला सरळ सरळ लफडं म्हटलं जातं.

हेही वाचा : प्रेमाची नाती तोडतंय सोशल मीडिया

आजची पिढी प्रेमात कशी पडते याचं नक्की एक कारण नाही. पण असणं आणि दिसणं हे त्यांना बरोबरीचं वाटतं. पुरातत्व खात्याने एखादी नवीन संस्कृती शोधून काढावी एवढा अभ्यास त्यासाठी लागतो. काळ, वेळ, स्थळ तोंड पाठ. सूत्रांच्या हाती काय लागलंय याचा सखोल विचार करून मगच चाय पे चर्चा करावी लागते.

चर्चेचं उत्तर, निष्कर्ष काही असो पण एखादी गोष्ट मनाप्रमाणे हवी असेल, तर मग आम्ही पुरवणी मागण्यांचा सपाटा लावतो. आम्ही एकतर प्रेमात ओढला तरी जातो किंवा ढकलून तरी दिले जातो. आता वरवर पाहता हा सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडतोय असं वाटेल.

पण यात एक वेगळं म्हणणं पण आहे. ते असं की, माझ्या मित्र, मैत्रिणींच्या ग्रुपमधे नेमकं आमचं सिंगल असणं हा आमच्या जिव्हारी लागणारा काटा आहे. सगळ्यांनाच आहे ना पार्टनर मग मी का एकटा राहू असं आमच्यातल्या अनेकांचा प्रश्न असतो. मग आमची शोध मोहीम सुरू होते.

त्यात आणखी एक गोष्ट आलीय. आम्ही इतकी वर्ष जीव तोडून अभ्यास केलाय. सगळं करिअर सेट केलंय. मग प्रेम आता नाही करायचं तर कधी करायचं? या विचारानेही आम्ही प्रेमात पडतो. असं म्हटलं जातं की, जीवनात सगळ्या प्रकारचे अनुभव असायला हवेत. सुख, दुःखात बरोबर प्रेमात पडणं. त्यामुळेही आमचा पाय घसरतोच की!

हेही वाचा : प्रेमाच्या नावाखाली कागदी फुलांना पाणी घालणं सुरूय

सोशल मीडियाने आम्हाला जगाच्या इतकं जवळ आणलं की, समजा मला प्रेयसीला भेटायचं असेल तर मी कोणत्याही देशाच्या सीमा पार करायला मागेपुढे बघणार नाही. त्यात आमचे कॉमन फ्रेंड तर देव माणसं. त्यांचा हातभार लागल्याशिवाय आमची गाडी पुढे जात नाही. त्यांचा तर जाहीर पाठिंबा असतो. मग जुळतं एकदाचं. आमचं प्रेम असतं तर एकदम गर्द गहिवर. नाहीतर आज पॅच अप, उद्या ब्रेकअप परवा मुव ऑन!

एकदम सगळ्यांना एकाच रांगेत उभं करणं चुकीचं ठरेल पण तरी जितकं प्रेम तितक्याच अपेक्षा हे आमच्या पिढीला चोख लागू होतं. तुला कुणाचा फोन आला, कोण मेसेज करतं, कुणाला लाईक केलं या गोष्टी नाही म्हटलं तरी येतातच. स्वातंत्र्य मान्य करणं, वेगळेपण जपणं, जसंच्या तसं स्वीकारणं या गोष्टी सगळेजण करतात.

साहिर लुधियानवी म्हणतात, 'तेरे रुह का एक कतरा मिल जाये तो जिंदगी को जिंदगी समझेंगे' असं आत्मीयतेने भरलेलं आमचंही प्रेम आहे. पण त्याचं प्रमाण मात्र तोकडं आहे. प्रेमात पडणं आम्ही अफोर्ड करू शकतो की नाही याचा विचार आम्हाला करावा लागतो. म्हणजे प्रेम आंधळं असेल किंवा सेल पण हल्लीच्या काळात व्यवहार्य मात्र आहे.

न्यूटनच्या म्हणण्यानुसार, क्रिया-प्रतिक्रिया सारख्याच तोलामोलाच्या हव्याच ना? प्रेम जितकं हळूहळू होतं तितकं रुजत जातं, खुलत जातं आणि मग उलगडत जातं. आततायीपणामुळे आकाराचा विकार होतो. डेटिंग ॲप सिनेमा आणि एकूणच सभोवतालचं गुलाबी गुलाबी पर्यायी जग आमच्या नजरेत भरत जातं. आम्ही जगाचं अनुकरण करतो. आमच्या प्रेमाचा एक तर सैराट होतो नाहीतर काकण. पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेलं प्रत्येक प्रेम आमच्या लक्षात राहतं एवढं मात्र नक्की.

हेही वाचा : 

लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!

होय, आमच्या प्रेमाचा रंग करडा आहे

आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?

(मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलेला पवन नाशिक इथं राहत असून तो सध्या स्पर्धापरिक्षेची तयारी करतोय)