ओप्रा विन्फ्रे  :  सेलिब्रेटी असणारी सामान्य व्यक्ती

१८ मार्च २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिन्स हॅरी आणि त्यांची बायको मेघन मार्कल यांच्यासोबतच्या खास मुलाखतीनंतर ओप्रा विन्फ्रे यांच्या सुपर सोल संडे या कार्यक्रमात प्रियांका चोप्रा येणार आहे. ओप्रा यांच्या कार्यक्रमात असे सेलिब्रेटीच येतात. पण ओप्रा त्यांच्याशी बोलताना त्यांना जोडून घेण्यासाठी स्वतःच्या भूतकाळातले प्रसंग सांगतात. स्वतःचं सामान्य असणं त्या दाखवून देतात. आणि त्यामुळेच त्या अस्सल वाटतात.

मायकल मूर नावाचा अमेरिकेतला मोठा लेखक आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकर. २००३ मधे ‘डूड, व्हेअर इज माय कंट्री’ नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. २००४ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी जॉर्ज बुश यांच्याविरोधात ओप्रा विन्फ्रे यांनी उभं रहायला पाहिजे, असं मूर यांनी पुस्तकात लिहिलं. त्या उभ्या राहिल्या तर बुश यांना हरवून त्या सहज जिंकतील, असं मूर यांनी म्हटलं.

२०२० मधेही ओबामांच्या पक्षातून ओप्रा विन्फ्रे यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात उभं रहावं अशी मागणी केली जात होती. जॉर्ज बुश, डोनाल्ड ट्रम्प हे दोघेही अमेरिकेचे अतिशय ताकदवान राष्ट्राध्यक्ष होते. तरीही ओप्रा विन्फ्रे त्यांना टक्कर देऊ शकतील असं अमेरिकन लोकांना वाटण्यामागचं कारण ओप्रा यांचं टीवी सेलिब्रिटी असणं एवढंच नव्हतं. किंवा त्या अमेरिकेतल्या सगळ्यात श्रीमंत आफ्रिकन वंशाच्या व्यक्ती आहेत हेही नव्हतं. तर त्यांच्या कार्यक्रमादरम्यान दिसणाऱ्या त्यांच्या अस्सलतेमुळे लोकांना त्यांच्याबद्दल इतका विश्वास वाटतो. 

प्रियांका चोप्राही झळकणार

ओप्रा विन्फ्रे अमेरिकेतल्या टीवी प्रोड्यूसर, मुलाखतकार, अभिनेत्री आणि लेखक आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नाव बरंच चर्चेत आलंय. ‘सुपर सोल संडे’ नावाचा एक नवा टॉक शो त्या चालवतात. मोठ्या, प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती ओप्रा या कार्यक्रमात घेत असतात. ७ मार्चला ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी आणि त्यांची बायको मेघन मार्कल यांची सनसनीत मुलाखत प्रसिद्ध झाली होती. मेघन गरोदर असताना मुलाचा रंग कोणता असेल याबाबत राजघराण्यात चिंता व्यक्त केली असल्याचा गौप्यस्फोट या जोडप्याने केला. 

ब्रिटनच्या शाही घराण्यातला वंशवाद समोर आल्यानंतर लगेचच कार्यक्रमाच्या पुढच्या भागात बॉलिवुडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचीही मुलाखत होणार असल्याचं समोर आलं. त्यामुळे भारतीयांनीही या कार्यक्रमात डोकं घातलं. येत्या २० मार्चला ओप्रा विन्फ्रे नेटवर्क या आणि डिक्सवरी प्लस या चॅनेलवर ही मुलाखत प्रसिद्ध होईल. 

ओप्रा यांचा ‘सुपर सोल संडे’ हा शो जवळपास सात आठ वर्षांपासून चालूय. त्याआधी २०११ पर्यंत त्या ‘ओप्रा विन्फ्रे शो’ नावाचा एक कार्यक्रम चालवत होत्या. यातही सेलिब्रेटींच्या मुलाखती व्हायच्या. अमेरिकन टेलिविजनच्या इतिहासात सगळ्यात जास्त पसंती मिळालेला हा कार्यक्रम होता. १९८६ ला सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे २५ सिझन प्रदर्शित झाले. मे २०११ ला या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड अमेरिकेत थेटरमधे दाखवला गेला. भारतात क्रिकेट मॅचदरम्यान असतात तशा पार्ट्या अरेंज करून हा शेवटचा एपिसोड बघितला गेला.

हेही वाचा : महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

शिक्षिका व्हायचं होतं

आपल्या एका लेखात ओप्रा म्हणतात, ‘प्रत्येक माणूस काहीतरी ध्येय घेऊन जगत असतो. मी काय होणार आहे हे मला अगदी पहिल्यापासून माहीत होतं, असं नाहीय खरंतर. पण मी काय होणार नाहीय हे मला अगदी लहानपणापासून स्पष्ट झालं होतं.’

१९५४ ला अमेरिकेच्या मिसिसिपी शहरात जन्मलेल्या काळ्या वंशाच्या मुलीसाठी फारच मर्यादित संधी उपलब्ध होत्या. घरकाम करणारी बाई, नोकर, भांडी घासणारी किंवा फार फार तर शाळेमधे साधी शिक्षिका एवढंच. 

ओप्रा यांची आजी आणि आई दोघीही घरकाम करायच्या. ओप्रा जन्मल्या तेव्हा त्यांची आई १७ वर्षांची बिनलग्नाची मुलगी होती. ओप्रा यांना आजीकडे सोडून त्या दुसऱ्या शहरात निघून गेल्या. ‘मला शिक्षिका बनायचं होतं. माझ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायची होती. पण हेच काम मी टीवीवरून करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं,’ असं त्यांनी एका लेखात लिहिलंय.

‘मला पुसटसं आठवतं. आजी मागच्या अंगणात कपडे वाळत घालत होती तेव्हा ती जे काही करतेय त्याचं नीट निरीक्षण करायला तिनं मला सांगितलं. पुढे जाऊन मला तेच करायचंय, असं तिचं म्हणणं होतं. मीही ते नीटपणे पाहिलं. पण फार फार आतून एक आवाज आला की, हे माझं आयुष्य नसणार आहे. दोरीवर कपडे वाळत घालण्यापेक्षाही बरंच काही तुझ्या आयुष्यात असेल,’ ओप्रा सांगतात.

रंगामुळे घरात घेतलं नाही

ओप्रा ३ वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांच्या आजीनं त्यांना वाचायला शिकवलं. बटाट्याची रिकामी पोती हेच त्यांचे कपडे होते. असे कपडे पाहून सगळी पोरं हसायची. आजी भरपूर मार द्यायची. आणि मारल्यावर रडलं की रडायचं नाही म्हणून आणखी मारायची. ‘एखादी भावना व्यक्त न करण्याची सक्ती आपल्यावर केली जाते, तेव्हा काय वाटतं हे मी अनुभवलं,’ ओप्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं. 

६ वर्षानंतर त्यांची आई त्यांना आजी आपल्या कामाच्या ठिकाणी घेऊन आली. त्या घरात राहण्याची परवानगी ओप्रा यांना नव्हती. घराच्या वऱ्हांड्यात त्या एकट्या झोपायच्या. आणि त्यामागचं कारण होतं त्यांचा रंग. ‘मला माहीत नाही कसं पण माझ्या रंगामुळे मला त्या घरात रहायची परवानगी नव्हती हे मला उमगलं होतं. आयुष्यात पहिल्यांदा मला फार एकटं आणि वाळीत टाकल्यासारखं वाटलं,’ ओप्रा सांगतात. 

त्या ९ वर्षांच्या असल्यापासून त्यांचे काका आणि भावंडांनी त्यांचा लैंगिक छळ करायला सुरवात केली. कित्येक वर्ष हा छळ सुरू होता. शेवटी १४ वर्षांच्या असताना त्या गरोदर राहिल्या तेव्हा हे प्रकरण उघडकीला आलं. ९ महिने पूर्ण होण्याच्या आतच त्यांनी एका मुलाला जन्म दिला. ते बाळ जगू शकलं नाही.

तिथून पुढं ओप्रा यांना वडलांकडे पाठवून देण्यात आलं. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी आपल्या वडलांना पाहिलं. वडील फारच कडक होते. पण त्यांच्या सानिध्यात ओप्रा यांना सुरक्षित वाटायचं. त्यांनी ओप्रा यांना चांगलं शिक्षण दिलं. शाळेच्या नाटकात, गॅदरिंगमधे काम करायला प्रोत्साहन दिलं.

हेही वाचा : स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?

५ पुस्तकांचं सह लेखन

मास मीडिया अँड कम्युनिकेशनमधे पदवी घेतल्यानंतर अनेक वर्ष ओप्रा यांनी डब्लूजेझेड या स्थानिक न्यूज चॅनेलमधे सात वर्ष काम केलं. त्यानंतर एका राष्ट्रीय दर्जावरच्या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी त्यांची निवड झाली. ओप्रा यांनी संधीचं सोनं केलं. त्यांच्या कौशल्यामुळे, प्रश्न विचारण्याच्या, उत्तर मिळवण्याच्या स्टाईलमुळे दोन वर्षात कार्यक्रम भलताच लोकप्रिय झाला आणि मग त्यांचंच नामकरण ‘ओप्रा विन्फ्रे शो’ असं करण्यात आलं.

ओप्रा विन्फ्रे शो करत असातानाच ओप्रा यांनी अनेक गोष्टी केल्या. अगदी काही हॉलिवुड सिनेमांमधे कामही केलं. ५ पुस्तकाचं सह लेखन केलं. ओप्रा डॉट कॉम नावाची वेबसाईट आणि ओप्रा रेडिओ नावानं रेडिओ चॅनेलही सुरू केलं. गरिबीत जन्मलेल्या ओप्रा वयाच्या ३२ व्या वर्षी जगातल्या पहिल्या आफ्रिकन वंशाच्या श्रीमंत व्यक्ती होत्या. २०१४ ला फोर्ब्स मासिकाने दिलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे २ हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे.

मीडियाची राणी

’लैंगिक अत्याचार आणि १४ व्या वर्षी जन्माला आलेलं मुल हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुपित होतं. ते बाहेर येईल या भीतीत मी जगत होते. ते बाहेर आलं तर लोक माझ्याविषयी काय विचार करतील असं मला वाटत रहायचं,’ ओप्रा विन्फ्री शो या कार्यक्रमात स्वतः ओप्रा यांनी ही कबुली दिली होती. ‘माझ्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीनं मला त्रास देण्यासाठी हे गुपित फोडलं. आणि ते फुटणं फार दिलासादायक ठरलं. माझ्यावर जे प्रेम करत होते ते हे कळाल्यावर सुद्धा प्रेम करत राहिले,’ असंही त्या पुढे म्हणाल्या.

ओप्रा यांची मुलाखत घेण्याची हीच पद्धत होती. अगदी प्रोफेशनल पद्धतीने त्या कधीच मुलाखत घेत नाहीत. तर पारावर गप्पा मारतो तशा आणि त्या विषयांवरच्या या गप्पा असतात. मुलाखतीसाठी आलेल्या पाहुण्याशी त्या स्वतःला जोडून घेतात. स्वतःच्या आयुष्यातल्या अगदी खाजगी घटनाही मुलाखतीदरम्यान सांगतात. मुलाखत देणाऱ्याला हुरूप येतो आणि तोही आपलं सत्य कबुल करतो. म्हणूनच, ओप्रा यांना ‘मीडियाची राणी’ असं म्हटलं जातं.

हेही वाचा : फक्त प्रेम पुरेसं आहे का हो, सर?

ओप्राफिकेशन आणि ओप्रा इफेक्ट

‘वॉल स्ट्रीट जनरल’ या पेपरनं तर त्यांच्या या पद्धतीला ओप्राफिकेशन असं नाव दिलं होतं. हा एक प्रकारची थेरपीच आहे, असं ते म्हणाले होते. स्वतःचं वजन, प्रेमप्रकरणं, लैंगिक अत्याचार अशा खाजगी विषयांवर बोलत शेजारी बसलेल्या पाहुण्यासमोर रडून सहानुभूतीचं बोलणं करण्याला टाईम मासिकानं ‘रॅपोर्ट टॉक’ असं म्हटलंय. ओप्रा यांचे प्रतिस्पर्धी घेतात फिल डॅनहू यांच्या ‘रिपोर्ट टॉक’ पेक्षा हे जास्त वेगळं, जास्त आपुलकीचं आहे.

त्यांच्या याच स्वभावामुळे त्या इतक्या आपल्या वाटतात की त्यांनी एखादी गोष्ट करायला सांगितली की सगळ्या अमेरिकेत ती पसरते. उदाहरणच द्यायचं झालं तर, ओप्रा ‘ओप्राज् बुक कॅफे’ नावाचा एक कार्यक्रम चालवायच्या. वेगवेगळ्या पुस्तकांविषयीची चर्चा यात व्हायची. या कार्यक्रमात ओप्रा यांनी एखाद्या नवीन पुस्तकाची ओळख करून दिली की लगेचच ते पुस्तक बेस्ट सेलर म्हणवलं जायचं. त्यांचा हा ‘ओप्रा इफेक्ट’ अनेक बाबतीत लागू पडतो.

भारत भेटीतून बदलले

ओप्रा २०१२ ला भारतातही आल्या होत्या. ताजमहाल त्या फिरल्या. तशा विधवांच्या गावात, वृंदावनलाही जाऊन आल्या. मुंबईला एका जैन कुटुंबात शाही जेवणही केलं. पण त्याचसोबत मुंबईच्या धारावीत झोपडपट्टीत राहणाऱ्या एका साध्याशा घराचंही आदरातिथ्य स्वीकारलं. तिथलं सार्वजनिक टॉयलेट, बाथरूम आणि एका खोलीत राहणारे ५ लोक पाहुन आतून हेलावून गेल्या. ‘ते पाहून मी आतून खूप बदलले,’ असं ओप्रा म्हणतात.

ओप्रा यांनी ठरवून आपलं व्यक्तिमत्व बदललं. आपल्या भूतकाळातल्या ड्रग्स घेण्याच्या, गरोदरपणाच्या बातम्यांची पहिले त्यांना भीती वाटली. पण नंतर आपली चूक म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. कधीही आपल्या स्पर्धकांचा द्वेष केला नाही. विशेषतः त्यांचं क्षेत्र नाही त्या राजकारण आणि वैचारिक गोष्टींबाबत मुलाखती घेणाऱ्यांना त्यांनी नेहमीच मान दिला. लोकांच्या प्रश्नांबाबत, त्यांच्या आयुष्यातल्या दुःखाबाबत त्यांना फक्त आत्मीयता होती असं नाही. तर आपणही त्यातलेच एक असल्याचं त्यांनी नेहमीच दाखवून दिलं.

ओप्रा यांच्या कार्यक्रमात सेलिब्रेटी येतात. पण ते ज्या विषयावर बोलतात ते विषय सामान्य असतात. कधीतरी तर अगदीच सामान्य – रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतात. त्या प्रसंगांशी, माणसांशी जोडून घेण्यासाठी त्या स्वतःच्या भूतकाळातले प्रसंग सांगतात. स्वतःचं सामान्य असणं त्या दाखवून देतात. आणि त्यामुळेच त्या अस्सल वाटतात.

हेही वाचा : 

चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?