दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

२७ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


शेतकऱ्यांनी दिल्लीतल्या लाल किल्यावर शीख धर्माचा भगवा झळकावला आणि आंदोलनाबद्दलच्या फेक न्यूजला परत उधाण आलं. आधीही शेतकाऱ्यांविषयी बरंच काही पसरवलं जात होतं. यातलं तथ्य काय समजून घ्यायचं असेल तर हे सगळं 'याची देही याची डोळा' पाहिलेल्या विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा रिपोर्ट वाचावाच लागेल.

याआधीचा भाग इथं वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

||पाच||

रस्त्यात एक जण पंजाबी पेपर वाटत होता. मी पण बसलो. त्याच्याकडून पेपर घेतले आणि लोकांना आवाज देत वाटायला लागलो. लोकांसोबत तुम्ही साधी साधी कामं करायला लागलात की लोक खुलतात. मनापासून बोलायला लागतात.

हा पोरगा २६ वर्षांचा. क्लास २ च्या सरकारी नोकरीचा अभ्यास करतोय. त्याची एक वेगळीच थेअरी होती. तो म्हणतो आपल्या सरकारने विशेषतः पंतप्रधानांनी खूप कर्ज घेऊन ठेवलंय आणि त्यांना निवडणूक जिंकायला पण मदत केलीय या कॉर्पोरेटवाल्यांनी. त्यामुळे आता ही परतफेड सुरुय.

मी फक्त ऐकत होतो. मी विचारलं हे ‘असं का वाटतं तुला?’ तो म्हणतो, ‘भई हमे सब पता हैं. मैं भी पढाई करता हूं. चार बातें सुनता हूं.’ मी गप्प बसलो. महत्त्वाचा प्रश्न विचारला. म्हटलं, हे पेपर विकत घेऊन लोकांना फ्री वाटतोयस तर एवढं कसं काय परवडतं तुला किंवा तुम्हाला?’

‘इस हफ्ते हमारी फॅमिली पेपर का खर्चा करने वाली हैं. अगले हफ्ते दुसरा कोई होगा.’ पुढे म्हणाला, ‘यह सब हमने पैसे इकठ्ठा कर के शुरू किया हैं. कोई १० रुपये देता हैं तो कोई १० हजार. कोई अनाज दे रहा हैं, कोई टमाटर. कोई देसी घी दे रहा हैं.’ 

‘कुछ काम ना भी करे, तो भी हम पांच साल बैठके खा सकते हैं भैय्या. फिर औरो को नही खिला सकते? ‘खरंच बोलला तो. गुरुनानकांनी सुरू केलेलं आणि प्रत्येक गुरुद्वारांमधे भरणारे २४ तास सुरू असणारं लंघर म्हणजे अन्नछत्र त्याची साक्ष देतात. कुणीही, अगदी कुणीही त्या लंघरमधून उपाशी जात नाही. गावची वर्गणी असते ती फार सढळ असते. अगदी अमेरिका, कॅनडा जिथं जिथं शीख असतील तिथं तिथं लंघर असतातच.

त्यातून शीख लोक आपल्या कमाईचा दहावा भाग या लंघरसाठी देतात. मधे मधे दिल्लीतले श्रीमंत शीख दाते येतात. सुकामेवा, चादरी वाटतात. एकाने कालपरवा ५० गाद्या दिल्या. युनायटेड शीख नावाची संघटना, खालसा ऐड सारख्या अजून बऱ्याच संघटना, संस्था प्रचंड मदत करत असतातच.

त्यामुळे लंघर इथंही आहेतच. गावांनी ठरवून, वर्गणी जमा करून हे सगळं सुरू केलंय. एवढे पैसे का असतात? कारण इथं एक गोष्ट लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे की हरीत क्रांतीचा सर्वात मोठा लाभ पंजाब आणि हरियाणा याच राज्यांना जास्त मिळालाय. त्यामुळे ती श्रीमंती आहेच. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी त्यांची बरोबरी होऊच शकत नाही. 

जेवण, चहा, दूध वाटणं हे सगळं स्वतःच्या खर्चातूनच आहे. एवढं तरी मला दिसलं. कुठल्याही ‘बाह्य’ घटकाचं फंडिंग नाहीय. त्यामुळे क्षणाक्षणाला सगळी गृहितकं, ऐकलेल्या सगळ्या अफवा कोलमडून पडत होत्या.

पेपर्स संपले. मी पुढे निघालो.

हेही वाचा : समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!

||सहा||

जरा चालत अजून लांब गेलो. जिथं पोलीस उभे असतात तिथं. त्यांची आता परेड सुरुय. त्यांनाही थंडी लागत असेलच की!

काही सरदारजी आंघोळी करतायत. मी मधेच चहा घ्यायला थांबलो. आरएएफ दंगाकाबू पथकाचा जवान माझ्यासोबत चहा बिस्किट खातोय. त्याच सरदारजींच्या हातचा चहा. त्याला सहज विचारलं, ‘सरजी आपकी कितने घंटे ड्युटी होती हैं?’

‘अभी हम शिफ्ट में करते हैं. चार दिन में दुसरे आनेवाले हैं’

मला तशी पोलीस वगैरे लोकांची भीती वाटते. कधीही मारायला लागतील असे करडे, कठोर चेहरे असतात त्यांचे. तरीही मी या जवानाला विचारलं की ‘सरजी, आपका खाना, चाय इधर ही होता हैं ना. तो अगर २६ जनवरी को कुछ दिक्कत होगी तो आपण इन्हीपे लाठीचार्ज करेंगे?’

प्रश्न जरा स्पष्ट आणि हिमतीचा होता. पण तो मख्खपणे म्हणाला, ‘सरकारी ऑर्डर आयी तो करना पडेगा. हमे तो बिल्कुल खुशी नही होगी.’  मी काहीच बोललो नाही. चहा संपवला आणि पुढे निघालो.

पहाटेचा अंधार जरा निवळायला लागलाय, असं वाटतंय. पण थंडी बोचरी आहेच.

||सात||

११ वाजता शिखांचे दहावे गुरू, गोविंदसिंगांची पालखी निघाली. हा सोहळा भारी होता. तो मी डोळे भरून बघून घेतला. 

तासाभराने पालखी पुढे गेली. मी सुद्धा चालत निघालो.

सगळी छोटी छोटी कामं हीच लोक करतायत. बूटपॉलिश करणं आणि चपला शिवणं, रस्त्यावरचं पाणी बाजूला करणं, कचरा काढणं, चिखल साफ करणं, बाकीची साफसफाई करणं, रात्री समूहाने मिळून गस्त घालणं वगैरे सगळी कामं त्यांनी वाटून घेतली होती.

काही ठिकाणी कॉमन वॉशिंग मशीन होती. तिथंही स्वयंसेवकांच्या टीम होत्या. ते न थकता कपडे धुवून, पिळून देत होते. त्यांच्या समोरच तीन माणसांची टीम कपड्यांना इस्त्री करून देते होती.

जरा समोर शिलाई काम करणारा स्टॉल होता. काही फाटलं वगैरे तर तिथं जायचं. तो माणूस शिवून देतो आणि हे सगळं फार मस्त शिस्तीत होतं. त्यांची पण शिफ्ट आहे. सगळेच शीख स्वयंसेवक आहेत. आपापली कामं वाटून घेतली होती त्यांनी.

खालसा ऐड नावाची एक शिखांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. युनायटेड शीख नावाचीही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. त्यांनी काही आधुनिक सोयीसुविधांसोबत आणि उपकरणांनी अद्ययावत असलेले मेडिकल कँप लावलेत. त्यात वयस्कर लोकांसाठी खास फूट मसाजर आहेत. त्यांचा फायदा लोक घेतायत. फिजिओथेरपीचेही उपचार केंद्र आहेत. 

‘आंदोलनात चक्क फूट मसाजर आहे, यांची काय ब्वॉ मज्जा!!’ असं मागे एका ट्वीटमधे कुणीतरी म्हणालेलं. असं म्हणणाऱ्या लोकांनी खरंच हे सगळं समजून घेणं गरजेचंय.

हेही वाचा : सरकारचा प्रस्ताव धुडकावणारे शेतकरी अंबानी, अदानीशी लढू शकतील?

||आठ||

‘आप की आंखो पर पर्दा हैं 
गोदी मीडिया, जी यह बिर्याणी नहीं, जर्दा हैं’

असं लिहिलेल्या त्या कापडी पोस्टर जवळ थबकलो. जरा मागच्या गल्लीतून चालत होतो. तिथंच मुबीन फारुकींचा मोफत फूड स्टॉल आहे. आत गेलो. ते भजी तळत होते. दोघे भाऊ आणि एक पोरगा होता सोबत. ओळख सांगितली. त्यांनी खुर्ची दिली बसायला. बोलायला लागलो.

जर्दा नावाची त्यांची एक रेसिपी आहे काहीतरी. हा एक प्रकारचा गोड भात असतो. ज्यात भातामधे लालपिवळसर रंग उतरतो. तो लोकांना फार आवडला. मग यांनी मागच्या महिन्याभरापासून स्वखर्चाने ते द्यायला सुरवात केली. मागे एबीपी न्यूजवाले आले. हा पदार्थ खाल्ला. मुबीन भाईंशी बोलले मस्त. आणि परत गेल्यावर त्यांनी न्यूज केली, ‘क्या बात हैं ! सभी आंदोलन में आजकाल बिर्याणी बट रही हैं!! क्या यह दुसरा शाहीनबाग हैं?’

ते सांगत असताना आम्ही सगळेच हसलो. न्यूज मीडिया काय दाखवतेय यार! अजूनही त्यांच्या चॅनेलवर तो न्यूज वीडियो असेल.

मग मला त्यांनी आवर्जून आग्रह केला आणि खायला दिला तो भात. मस्त लागला. जाता जाता म्हणाले, ‘भाई, इन्हे दो धरम एक होने से डर लगता हैं. मुसलमान दिखा तो शाहीनबाग बोल देते हैं.’
 
मी मनात म्हणालो, ‘भाई, माझ्यापरीने प्रयत्न करीन खरं काय ते लोकांना सांगण्याचा. तुमच्या खाल्ल्या भाताला जागेन नक्की!’

‘एखाद्या माणसाला मोडायचं असेल तर त्याच्या चारित्र्यावर घाव घाला’ हे पुस्तकात वाचलेलं ज्ञान इथं बघत होतो. 

निघालो पुढे.

याआधीचा भाग इथं वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग ३

हेही वाचा : 

शेती विधेयकानं शेतकरी जिंकला की हरला? 

फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील