दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

२६ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज २६ जानेवारी. एकीकडे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन चाललेलं असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर अश्रूधुराचा मारा केला जातोय. गेली ६२ दिवस हे आंदोलन चालूय. नेमकं काय आहे हे आंदोलन? काय म्हणतायत शेतकरी? कसे राहतायत? या सगळ्याची उत्तरं देणारा विशाल राठोड या तरुण विद्यार्थ्याचा हा ऑन द स्पॉट रिपोर्ट.

।।एक।।

नवी दिल्लीला पोचलो तेव्हा रात्रीचे साडेनऊ झाले होते. मेट्रो स्टेशनला आलो. तिथून जहांगीरपुरीपर्यंत आलो. मग रिक्षेत बसलो. रिक्षावाले काका सरदारजी निघाले. मग काय, तिथूनच माझा ‘आंदोलन समजून घेण्याचा’ प्रवास सुरू झाला.

‘कहांसे आये हो?’

‘मुंबई से’

‘इतनी दूर से! सिर्फ देखने की लिये? रिपोर्टर हो?’

'नही पाजी. स्टूडंट हूँ. हमारे यहां किसानो के बारे में कुछ ज्यादा न्यूज नही मिल रही हैं. इसलिये मैं खुद ही देखने आ गया.' मेरा मोडका तोडका हिंदी.

अशा गप्पा सुरू झाल्या. मी पुढचा अर्धा तास फक्त ऐकत होतो आणि हसत होतो. कारण सरदारजी फारच भडकलेले दिसले. सुरवातच माननीय पंतप्रधानांना दिलेल्या शेलक्या शिव्यांनी झाली.

‘सब ठीके भई, लेकीन अंबानी अदानी के घर भर रहा हैं यह बंदा. सब कुछ बेचते जा रहा हैं. कल हमारी, आपकी जमीन भी बेचेगा. इसलिये सब इकठ्ठा हो रहे हैं. २६ जनवरी को तो मै भी रिक्शा लेके जाने वाला हूं.’

‘मोदीने अगर सुना नहीं तो सरकार गिरनी हैं भई. वो तो सुन ही नही रहा है हमारी,’ असं ते बरंच काय काय बोलत होते. काही गोष्टी उथळ होत्याही. पण तो राग मात्र सच्चा होता. अचानक अंधारात रिक्षा थांबली आणि मला म्हणाले, ‘उतरो जी. यहां से आगे चलकर जाना पडेगा.’ मी निमूटपणे उतरलो. वाटेला लागलो.

हेही वाचा : विशीतला तरुण सांगतोय, ग्रामपंचायत निवडणुकीचा जांगडगुत्ता

।।दोन।।

तिथं अक्षरशः भीती वाटेल एवढे पोलिस आणि सशस्त्र दलाचे शिपाई, अधिकारी उभे होते. त्यांच्या मोठ्या छावण्या त्या अंधारात हिंस्र वाटत होत्या. मला कुणी अडवलं नाही. चालत पुढे आलो. फिरतं स्वच्छतागृह, बाजूला लावलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमधे झोपलेले, जागी असणारे, गप्पा मारणारे शेतकरी दिसले.

एका शेकोटीभोवती तीन शेतकरी आणि दोन पोलीस सोबत शेकत होते. गप्पाही सुरू होत्या. गंमत वाटली जरा. मी पण शेकायला लागलो. थंडी प्रचंडच होती. त्यातून मी रिक्षातून आलेलो. अंगात फक्त एक स्वेटर. 

थोड्या वेळाने निघालो. परत चालायला लागलो. पुढे आलो आणि मग अचानक एक लंघर दिसलं. सगळीकडे सामसूम. नाही म्हटलं तरी आता ११ वाजले असणारच. आतमधे चार लोक हातात शस्त्र घेतलेले, चहा घेत गप्पा मारत होते. मला पाहिलं आणि मोठ्या आवाजात काहीतरी विचारलं. मी जरा पुढे आलो. 

मग मला तोंडावरचा मफलर काढायला लावला. काय काम आहे, विचारलं. मी सांगितलं. ‘जेवण मिळेल का सरजी? मुंबईहून आलोय आणि जरा उशीर झालाय बघा.’ एकजण उठला. दोन रोटी आणि एक कसलीशी भाजी आणून ठेवली. परत गप्पा मारत बसले सगळे. मी एकटाच खात बसलो.

जेवण झालं. त्यांनी मला आवाज दिला. आतमधे बोलावलं. चौकशी सुरू झाली. आवाजात संशय होता. वातावरणात तणाव. मी सविस्तर उत्तरं दिली.  महाराष्ट्रातून आलोय म्हटल्यावर विचारलं, ‘मराठी येते का?’

‘हो येते.’ माझं उत्तर. मग बोलून दाखव असा आदेश झाला. मी बोलून दाखवली. 

'नांदेडला गेलायेस का?;'

‘हो’

‘आमचं गुरुद्वारा आहे तिथे’

‘हो, माहितेय.’

असं सगळं बोलणं झालं आणि मग ते जरा निवांत झाले. खुलले. चहा दिला. 

मी म्हणालो, मी विद्यार्थी आहे. हे समजून घ्यायला आलोय. काय उलटसुलट चर्चा आहेत म्हटलं. तेव्हा हसले सगळे. म्हणाले सब मीडिया बिकी हुई है भाई. अर्णब के बारे में नही सुना? परत हसले. मला नवल वाटलं. अरे! यांच्यापर्यंतही वॉट्सअप चॅट पोचलंय वाटतं. मनातल्या मनात हसलो जरा. 

म्हणाले की, ‘अभी २६ जनवरी को लेके माहोल थोडा तंग है. इसलीये पूछना पडता है भाई. सरकार कुछ भी कर सकती है.’

मी मनात म्हणालो, ‘ये भी ठीक है.’

मग विषय नामदेवांवर आला. पंजाब आणि महाराष्ट्राचं नातं वगैरे. मी भरभरून बोललो. त्यांनी शांतपणे ऐकलं. तेवढंच मला बरं वाटलं. मधेच मी विचारलं उद्या गुरु गोबिंदसिंगांची जयंती आहे नं?

‘हा, कल तो नामकीर्तन निकलेगा अकाली का. बढिया प्रोग्राम होगा कल. तुम कल रहोगे ना यहा पे?’

‘होय.’

‘ठीके, झोपायची काय व्यवस्था? ‘

मी, ‘काहीच नाही.’

ठीके, मागे जा. स्टेजजवळ. आयडी दाखव. गद्दा देंगे. कंबल लाये हो? 

'हां, एक ब्लँकेट हैं.'

मग गेलो मागे. परत एकदा सगळी चौकशी. एक वयस्कर सरदारजी आले. ‘बंबई से आया हूं.’ ऐकल्यावर त्यांनी मला एक जाड रग आणि ती पातळ गादी दिली. सोबत इतरांना पंजाबीमधे सूचना केली की लांबून आलेल्या लोकांना त्रास न देता लगेच सोडा. मला त्यातले डिस्टन्स आणि तकलीफ एवढेच शब्द समजले.

मोठं मंडप आणि शंभरेक लोक झोपलेले तिथे. मी पण गादी टाकली. आवरलं आणि पडलो. बोटं आखडल्याने डायरीही लिहिता येत नव्हती. खरंच भयानक थंडी. सवय नसल्याने अजूनच जास्त वाटत होती.

थकलो होतोच. झोपलो.

हेही वाचा : संविधानाच्या जागरासाठी विचारांची यात्रा करावीच लागेल

||तीन||

पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत सव्वापाचला उठलो. जाग कशी आली माहितेय? वरच्या प्लास्टिक की ताडपत्रीच्या छतामधून दवबिंदू टपकायला सुरवात झाली. शेवटी ओलसरपणामुळे जाग आली. भयानक थंडी. मोबाईलवर तापमान पाहिलं. ५° सेल्सियस. आधी पुशअप्स मारले. जरा गरमी आली. आवरलं आणि बाहेर आलो. शेकोटीजवळ चार पाच जण बसलेले. मी पण बसलो. गप्पा सुरू झाल्या.

अमनदीप सिंग. वय साठीपार. जिला मोगा, पंजाब. १० एकर शेती असणारे शेतकरी. नाशिककडची जिमीन बहोत अच्छी है, असं म्हणाले. मनमाडच्या आणि नांदेडच्या गुरुद्वाराला ते आलेले मागच्या वर्षी. गुरुग्रंथसाहिबामधले नामदेवांचे अभंग त्यांना बऱ्यापैकी माहितीत. 

मग मी त्यांना बॅगेतून  खुशवंतसिंगांचं ‘शीख’ पुस्तक काढून दाखवलं. त्यांनीही ते चाळलं. 'ट्रेन टू पाकिस्तान’ त्यांनी वाचलंय. अमृता प्रीतम त्यांना माहिती आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना फारच मज्जा आली. स्वयंसेवक म्हणून रात्रीभरच त्यांची ड्युटी होती. आत्ता पहाटे संपली.

मग त्यांच्यासोबत पुढे चालत आलो. 

चालता चालता कळलं त्यांचा थोरला मुलगा सैनिक आहे. तोसुद्धा मागे काही दिवस सुट्टी मिळाली तेव्हा इथे येऊन गेला. या बाबाजीबद्दल मग गप्पकन आदर वाढला.

पुढे पंधरा किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो ट्रॉली आणि त्यात चारा टाकून, त्यावर जाड रगी, चादरी, गोधड्या टाकून लोक झोपलेत. जागोजागी चहा सुरू झालाय. काही ठिकाणी ‘सरसो दा साग’ आणि रोटी मिळतेय नाश्त्यात. पंजाबीत ‘सरसो’ला ‘सरों’ म्हणतात.

बाजूला चालतं फिरतं वाचनालय लावलंय काही लोकांनी. तिथे सामूहिक पेपरवाचन सुरुय. पंजाबीमधे असल्याने काय फारसं कळालं नाही. लोक गांभिर्याने ऐकतायेत.

बाबाजी मला ट्रॉलींच्या एका छोट्या गल्लीत नेतात आणि त्यांची ट्रॉली दाखवतात. मिश्किल हसून मला म्हणतात, ‘ये देखलो हमारा महल.’

त्यांचं ते हसणं ऐकून मला कसंतरी झालं. मीडिया म्हणतेय की शेतकरी लोक बघा तिकडे किती ऐषोरामात राहतायेत. आणि ही यांच्या ऐषोरामाची कल्पना.

त्यांनी मला फोन नंबर देऊन ठेवला. काही लागलं तर कॉल कर म्हणाले. ते जागरणामुळे दिवसभर झोपणार होते. मग मी निरोप घेतला आणि पुढे निघालो.

।।चार।।

शेतकरी आंदोलनाला बसले तेव्हा सुरवातीला काही नाही वाटलं. पण एका शेतकऱ्याला मारहाण करतानाचा पोलिसाचा तो फोटो गाजला. त्यानंतर अजून एका जखमी शेतकऱ्याचा फोटो सोशल मीडियावर खूप फिरला. 

त्यांच्या मागण्या बरोबर किंवा चूक असतील तो प्रश्न नाही. पण सरकारने शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर एवढ्या भयंकर थंडीत पाण्याचा मारा केला. त्यांनी येऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवले. जणू काही दहशतवादी राजधानीवर चालून येतायत अशी वागणूक त्यांना दिली.

दिल्लीच्या बॉर्डर्सवर दैनंदिन तापमान 3°-7° आहे. कधीकधी तर दुपारी दोन दोन वाजेपर्यंत सूर्य दिसत नाही, एवढं धुकं असतं. साडेतीन वाजता परत सूर्य गायब होतो. मधे तीन-चार दिवस तर मुसळधार पाऊस सुरू होता. मग मला प्रश्न पडला की एवढ्या सगळ्या वाईट परिस्थितीतही हे शेतकरी आपलं घरदार सोडून तिथे का आलेत!

का आले असतील ते इथे?

हेही वाचा : ग्रामपंचायत निवडणुकांचा नवीन अर्थ इतिहासातच नोंदवला जाईल

।।पाच।।

आठ वाजता आलेले. मधेच शेकोटीजवळ हरप्रीत सिंग भेटले. ते दिल्लीतच वकीली करतात. मूळ गाव पंजाबमधे. इथं गावच्या शेतकऱ्यांसोबत कायदेशीर मदतीला म्हणून आलेत. पस्तीशीचे असतील. त्यांनी विधेयकांच्या तांत्रिक बाजूंवर बोलायला सुरुवात केली.

म्हणाले, या कायद्यान्वये प्रायवेट एजंट वाढतील. ओपन मार्केट वगैरे सगळं ठीक आहे तर मग हे सरकार आम्हाला एमएसपीची गॅरंटी का देत नाहीय? 

‘हमारा ठीक है, लेकीन जिनके पास कम जिमिन है, उनको इसका क्या फायदा? सारी छोटी हाट मतलब मंडी, बाजार जाके मॉल्स आ जायेंगे. छोटे किसान और सबको महंगाई का सामना करना पडेगा.’ आमच्या पंजाब आणि हरयाणामधे सुबत्ता आहे. हे कायदे जर झाले तर यूपी-बिहार मधल्या सारखं दारिद्र्य येईल आणि मग दरबदर भटकना पडेगा. 

मी फार क्रॉस न करता सरळ विचारलं, काय प्लॅन आहे २६ जानेवारीला? ट्रॅक्टर परेड करणार का राजपथवर? ते म्हणाले १०० टक्के जाणार. काहीही होवो!

म्हटलं, अगर सरकारने सुना नहीं तो क्या करेंगे? 

ते म्हणाले, ‘चाहे दो साल क्यों न रुकना पडे| पीछे नहीं हटेंगे. अगर यहाँ पीछे हट गये तो बादमे बच्चो को क्या खिलायेंगे? 

वैसे भी घर के बाहर इतने महिने रुककर किसे अच्छा लगता है सर!’ पंजाबमधे दोन महिने आणि नंतर इकडे २ महिने झालेत या आंदोलनाला.

मी पुढे निघालो.

या पुढचा भाग इथं वाचा : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग २

हेही वाचा : 

कोकणी मुसलमानांचे पूर्वज होते तरी कोण?

संविधानासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त का ठरला?

‘केम छो’ची साद, गुजराती मतदार देईल का दाद?

तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित

राष्ट्रीय कन्या दिन :  तारा मनाच्या का मूक होऊ लागल्या?