'मन की बात'मधे झळकलेल्या टांझानियाच्या बॉलिवूडप्रेमी भावंडांची गोष्ट

०७ मार्च २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


भारतीय सिनेगीतांवर थिरकणाऱ्या किली आणि नेमा या टांझानियातल्या भावंडांचे वीडियो सोशल मीडियावर वायरल होतायत. बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकणाऱ्या या जोडगोळीचं सध्या देशभरातून कौतुक केलं जातंय. रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’मधेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं कौतुक केलंय.

२१ फेब्रुवारी रोजी देशभरात मोठ्या उत्साहात जागतिक मातृभाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ शोमधून देशवासियांशी संवादही साधला. या कार्यक्रमात भाषेचं महत्त्व पटवून देताना त्यांनी टांझानियातल्या किली आणि नेमा या भावंडांचा उल्लेख केला. ही भावंडं प्रचंड वायरल होतायत.

कोण आहेत ही भावंडं?

टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतला एक लहानसा देश. इथल्या मिंडू टुलेनी या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या गावातली किली आणि नेमा पॉल ही भावंडांची जोडी सध्या जगभर धुमाकूळ घालतेय. ही भावंडं टिकटॉक या सोशल मीडिया अॅपवर वेगवेगळे वीडियो बनवतात. त्यांनी बॉलिवूडच्याही काही गाण्यांवर वीडियो बनवले आणि ते रातोरात वायरल झाले.

मिंडू टुलेनीमधे मसाई नावाच्या आदिवासी जमातीचे लोक राहतात. शेती आणि पशुपालन हा यांचा प्रमुख व्यवसाय. पोटापाण्यासाठी शेतीवर विसंबून असलेल्या किलीच्या मनोरंजनाची भूक बॉलिवूडचे सिनेमे भागवतात. दिवसभर गायींच्या पाठीमागे फिरणाऱ्या आणि मातीत घाम गाळणाऱ्या किलीला फावल्या वेळेत गाणी ऐकायची सवय आहे. त्याची लहान बहीण नेमाही त्याच्यासारखीच हिंदी गाण्यांची मोठी चाहती आहे.

‘बेंगो टीवी’ला दिलेल्या मुलाखतीत किलीने आपलं खरं नाव युसूफ असल्याचं सांगितलं होतं. पण टांझानियाची ओळख असलेल्या किलीमांजारो पर्वतावरून त्याच्या वडलांनी त्याला किली असं नाव दिलं. घरच्या परिस्थितीमुळे किलीने सातवीपर्यंतच शिक्षण घेतलं असलं तरी त्याचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे.

गावात नेटवर्क चांगलं आहे. थ्रीजी इंटरनेट स्पीडमुळे नवनवीन गाणी ऐकणं, सोशल मीडिया वापरणं आणि वीडियो बनवणं-अपलोड करणं सोपं झाल्याचं किली सांगतो. पण गावात लाईट नसल्यामुळे त्याला दहा किलोमीटरवर असलेल्या शेजारच्या गावात जाऊन त्याचा फोन चार्ज करावा लागतो. त्याच्याकडे बाईक असल्याने यात वेळ जात नसल्याचं त्याने ‘बीबीसी आफ्रिका’शी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : आपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं

वायरल होण्याची गोष्ट

किलीने जानेवारी २०२१पासून टिकटॉक वापरायला सुरवात केली. सुरवातीला तो एकटाच डान्स करत वीडियो बनवत होता. एक दिवस त्याने अचानक नेमाला त्याच्यासोबत वीडियो बनवण्याबद्दल विचारलं. मुळातच हुशार असलेल्या नेमाला त्याला जास्त काही शिकवावं लागलं नाही. त्या दोघांनी मिळून एक वीडियो बनवला ज्याला टिकटॉकवर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर किली आणि नेमा मिळून वीडियो बनवू लागले.

किलीचे बरेच टिकटॉक वीडियो हिंदी गाण्यांवर होते. पण नेमकं भारतात टिकटॉक नसल्यामुळे त्या वीडियोंना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अशावेळी इंस्टाग्राम रील त्याच्या मदतीला धावून आले. त्याने आणि नेमाने ‘शेरशाह’मधल्या ‘राता लंबिया’ गाण्यावर लिपसिंक केलेला वीडियो रातोरात वायरल झाला आणि भारतातल्या नेटकऱ्यांनी या जोडीला अक्षरशः डोक्यावर घेतलं.

किली आणि नेमाचे वीडियो तर भारतीयांना आवडलेच, पण त्यांच्या साध्या, रंगीत पण आकर्षक अशा पारंपारिक मसाई पेहरावाने भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं. हिंदी भाषिक नसूनही गाण्यातल्या प्रत्येक शब्दासोबत तंतोतंत जुळणारं त्यांचं लिपसिंक आणि त्यानुसार बदलणाऱ्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रांनी भारतीयांच्या मनात घर केलं.

बॉलिवूडप्रेमी भावंडं

किली आणि नेमाला लहानपणापासूनच हिंदी सिनेमे बघायला आवडत असल्याचं त्याने विविध मुलाखतींमधे सांगितलं होतं. बऱ्याचदा हिंदी सिनेमातल्या प्रेमगीतांवर वीडियो बनवणाऱ्या किलीला प्रत्यक्षात मात्र अॅक्शन जॉनरचे सिनेमे आवडतात. अगदी धर्मेंद्रपासून ते आत्ताच्या टायगर श्रॉफपर्यंतच्या सर्व अभिनेत्यांचे अॅक्शन सिनेमे तो आवर्जून बघत असल्याचं सांगतो. ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना ‘तुमचा आवडता अभिनेता कोण?’ असं विचारल्यावर किली आणि नेमाने हृतिक रोशनचं नाव घेतलं. नेमा अभिनेत्री माधुरी दीक्षितचीही मोठी फॅन आहे. 

तनिष्क बागचीने लिहलेलं आणि संगीत दिलेलं ‘राता लंबियां’ गाणारा जुबीन नौटियाल हा किली आणि नेमाचा आवडता गायक आहे. मागच्या डिसेंबरमधे रेड एफएमच्या आरजे रोहन आणि किसनाशी वीडियो कॉलवर बोलत असताना जुबीनने अचानक कॉल करत त्यांना सरप्राईज दिलं. त्याच्याशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आम्ही जुबीनच्याच गाण्यांवर जास्तीत जास्त वीडियो बनवणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने  आपल्याला विकायला काढलंय

जाणीव भारतीय अस्मितेची

किमी आणि नेमा टांझानियात जरी राहत असले, तरी त्यांचा सर्वात मोठा चाहतावर्ग भारतीय असल्याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे भारतात कोणत्या विषयांवर जास्त चर्चा होते यावर किमीची बारीक नजर असते. ‘पुष्पा’ या तेलुगू सिनेमाची देशभरात चर्चा असताना किमीने त्यातल्या गाजलेल्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर वीडियो बनवला होता. त्याचबरोबर पुष्पाची भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनच्या एका डायलॉगवरही त्याने एक वीडियो बनवला होता.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारा एक वीडियो बनवत पॉल भावंडांनी भारतीयांच्या मनातलं आपलं स्थान आणखी पक्कं केलं. इतकंच नाही, तर प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून किली आणि नेमाने भारताचं राष्ट्रगीत गातानाही एक वीडियो बनवला होता, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला.

भारत सरकारने घेतली दखल

अगदी कमी वेळात इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या किलीचे वीडियो कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, अन्वेषी जैन, जुबीन नौटियाल अशा बॉलिवूडच्या असंख्य कलाकारांनी शेअर केले. इतकंच नाही, तर टांझानियामधल्या भारतीय उच्चायुक्तालयानेही किलीला बोलावून त्याचा सत्कार केला. भारतीय उच्चायुक्त बिनया प्रधान यांनी किलीची भेट घेतल्याचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत त्याचं कौतुक केलं होतं.

नुकत्याच झालेल्या ‘जागतिक मातृभाषा दिना’च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मधे किली आणि नेमाच्या क्रिएटीविटी आणि बॉलिवूड प्रेमाचं भरभरून कौतुक केलं. त्याचबरोबर देशातल्या युवा पिढीनेही किली आणि नेमाकडून प्रेरणा घेत असे वीडियो बनवण्याचं आवाहन केलं. तरुणाईने आपल्या बोलीभाषेतल्या, मातृभाषेतल्या गाण्यांवर असे वीडियो बनवून भाषेची लोकप्रियता वाढावी हाच यामागचा उद्देश आहे.

हेही वाचा :

ज्ञानदा कदमः वायरल होणारी मराठी न्यूज अँकर

फेसबुकचं व्यसन लावणाऱ्या मार्क झुकेरबर्गची प्रेरणादायी गोष्ट

सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?

सामान्य माणसांना स्वप्न दाखवणाऱ्या टिकटॉकची जागा टँगी घेणार?