शेवटची लाओग्राफिया : एक प्रयोगशील कादंबरी

२० नोव्हेंबर २०२२

वाचन वेळ : ३ मिनिटं


बाळासाहेब लबडे यांची 'शेवटची लाओग्राफिया' ही दुसरी कादंबरी. अंगावर येणाऱ्या प्रतिमा, कथानक आणि व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करत विरुप वास्तव आपल्यासमोर मांडते. मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणारी तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणारी ही भटकंती आहे खरंतर. ती अत्यंत गतिमान शैलीत लेखकाने शब्दबद्ध केलीय.

बाळासाहेब लबडे हे प्रयोगशील कादंबरीकार आहेत हे त्यांच्या 'पिपिलिका मुक्तीधाम' या पहिल्याच कादंबरीतून सिद्ध झालंय. ही प्रयोगशीलता कथन आणि कथ्य व्यक्त करण्याच्या अकृत्रिम शैलीतून साकार होते. त्याचा पुन्हा प्रत्यय देणारी 'शेवटची लाओग्राफिया' ही त्यांची दुसरी नवी कादंबरी आहे.

आगळीवेगळी कथाशैली

जादुई वास्तववाद आणि एबसरडिस्ट फिक्शन- असंगत कथा यांच्या मिश्रणातून साकार झालेली ही कादंबरी लेखनाच्या साऱ्या प्रचलित धारणांना छेद देणारी आणि वाचकांना वाचताना चक्रावून सोडणारी आहे. ती आजच्या विखंडीत जगाचं आणि निरर्थक जगण्याचं विरुप अद्भुत प्रतिमा, चमत्कृतीपूर्ण लोककथा-पुराणकथांच्या आधुनिक परिप्रेक्ष्यातल्या पुर्नवाचनाने प्रभावीपणे व्यक्त करते.

या कादंबरीचं कथानक सांगण्यात फारसा मतलब नाही. कारण निवेदकाचं आजचं जगणं म्हणजे वरकरणी काही न घडता व्यतीत होणारा दिनक्रम आहे. या निरर्थक जगण्यात रंग भरण्याचे त्याचे मार्ग म्हणजे मित्रांसोबत दरमहा एके रात्री भूत-प्रेत-योनीजगत आणि पिशाच्च संमंधाच्या खऱ्या, खोट्या अतिरंजित कथा सांगणं आणि मचूळ आयुष्यात थोडी थरारकता भरणं होय.

कादंबरीत वारंवार येणारा निवेदकाचा आल्टर इगो असलेला आगंतुक आणि त्याद्वारे विविध रुपात चित्रित झालेली व्यक्तिरेखा, सतत स्वप्नात येणारा पंख असलेला घोडा, कचऱ्याच्या निमित्ताने घडणारी स्मशानाची सफर, त्याचं प्रेत जाळायला आली की आनंदी होणं अशा असंगत प्रसंग, किस्से आणि लोककथांच्या कथानातून जीवनातलं तुटलेपण, संवादहिनता, नातेसंबधातली निरर्थकता लेखक एब्सर्ड फिक्शन शैलीत सांगत वाचकांना स्तिमित करतो.

हेही वाचा: ‘जेजुरी’ समजवणाऱ्या एका दुर्लक्षित पुस्तकाची पंचविशी

कादंबरीत ग्रीक मिथककथा

लेखक कादंबरीतल्या असंगत नाट्याला अधिक प्रभावी करण्यासाठी त्याला जादुई वास्तववादाची सुरेख जोड देतो. आणि त्याद्वारे पारंपरिक लोककथा आणि भूत-पिशाच्च योनीच्या कथेसोबत ग्रीक मिथक कथा, त्यातून  मनाच्या नेणिवेचा शोध घेत मानवाच्या आदिम प्रेरणांच्या निबिड अरण्याचे दर्शन घडवतो.

यामधे अवंचित लैंगिक प्रेरणा असतात, तशाच अतृप्त सत्ता प्रेरणा पण असतात. दिग्याचं भूतयोनीतलं स्रीबरोबरचं मैथुन वर्णताना 'भूत मैथुन्या' हा नवा शब्द योजून जादूई वास्तवतेच्याद्वारे लेखक विरुप, खंडित  आणि अतृप्त वासनांचं जे विदारक दर्शन घडवतो, ते वाचताना वाचक सुन्न होऊन जातो.

ग्रीक मिथक कथा या तर्क्य आणि अतर्क्यतेची बेमालूम सांधेजोड करणाऱ्या असतात. जे वास्तव आहे, तसंच जे जाणावल्यासारखं वाटतं तेही वास्तव असतं आणि ते कधी तुकड्या तुकड्याने तर कधी समग्रतेने व्यक्त करण्यासाठी या कादंबरीतल्या आगंतुक ग्रीक मिथककथा सांगतो आणि गडद अंधाराचा पडदा किलकिला करून अबोध मनाची दारे जराशी उघडून दाखवतो. 

लेखक आपल्या प्रभावी शब्दकळेच्या जोरावर नॉनलिनीयर शैलीत कथन करत करड्या वास्तवाचा  स्वैर व अतार्किक भासणाऱ्या जादूई वास्तवतेच्या साहाय्याने मानवी जीवनाचा जो वेध घेतो, तो मराठीत तरी अपूर्व आहे.

जादुई वास्तव, एब्सर्ड फिक्शन

असं हे या कादंबरीचं कथानक आहे. याला कथानक म्हणणं पण तसं अवघडच आहे. मग काय आहे कादंबरीत? मनाची स्वैर, कधी प्रश्न विचारणारी तर कधी अंतरंगाचा तळ ढवळून काढणारी भटकंती आहे. ती अत्यंत गतिमान शैलीत लेखकाने शब्दबद्ध केली आहे.

जादुई वास्तव आणि एब्सर्ड फिक्शन यांच्या अफलातून मिश्रणांनी सिद्ध झालेली आणि अंगावर येणाऱ्या प्रतिमा आणि कथानक आणि व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करत विरुप वास्तव उजागर करते. हा एक मस्त जमून आलेला प्रयोग आहे.

ही कादंबरी वाचकांच्या बौद्धिक क्षमतेची आणि कलात्मक अभिरुचीची परीक्षा पाहणारी झालीय. पण वाचकांना एकदा का वाचताना आपल्या हाती जीवनाचं काही एक महत्वाचं आकलन होतं आहे असं वाटलं की मग ही कादंबरी त्यांना पूर्णपणे आपल्या कह्यात घेते आणि माणसाच्या निरर्थक जगायचं भन्नाट असं तत्वज्ञान उलगडून दाखवते; ते मन आणि विचारांवर गारुड करणारं आहे.

हेही वाचा: 

मराठीला कुणी अभिजात भाषेचा दर्जा देता का दर्जा?

कथागत: अल्पसंख्यांकांच्या अस्वस्थ वर्तमानाच्या कथा

कोरोनाकाळाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटलंय?

गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ