जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा

१९ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ८ मिनिटं


लैंगिक भूक भागवण्यासाठी मीडिया हा आत्ताच्या आणि या आधीच्या पिढीचा मुख्य मार्ग आहे. सीडी, कॅसेट पासून आपण डेटिंग अॅपपर्यंत येऊन पोचलो आहोत. पण त्यानं फक्त शरीराची लैंगिक भूक संपेल. मनाची भूक संपवण्यासाठी लैंगिक सुखाच्या खासगी विषयावर सार्वत्रिकपणे बोलायला हवं. जागतिक पुरुष दिनानिमित्त हा लेख.

'व्हॉट इज मोस्ट पर्सनल इज मोस्ट युनिवर्सल' असं कार्ल आर. रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाचं प्रसिद्ध वाक्य आहे. आपल्याकडे वपु काळे याच अर्थाचं एक वाक्य त्यांच्या 'पार्टनर' या कादंबरीत वापरतात. ते लिहितात, 'अॅज यू राईट मोर अँड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर अँड मोर युनिवर्सल.' या दोन्ही वाक्यांचा मतितार्थ असा की एखादी गोष्ट आपल्याला जेवढी जास्त वैयक्तिक वाटते तेवढीच ती वैश्विक असते.

जास्तीत जास्त पर्सनल हे तेवढच युनिवर्सल असतं बऱ्याचदा. प्रत्येकासाठी सर्वात जास्त पर्सनल त्याला त्याच्या लैंगिक भाव भावनाच असतील. कारण तथाकथित संस्कारी समाजात अगदी जवळच्या मित्राला सुद्धा वैयक्तिक लैंगिक गोष्टी सांगताना जड जातं आपल्याला. इतर अनेक रहस्यं 'कुणाला सांगू नको बरं' असं म्हणत आपण स्वतःच गावभर सांगत असतो. पण लैंगिक बाबीची चर्चा मनातल्या मनातच होत राहते.

त्यातल्या त्यात स्वतःच्या इभ्रतीची व्यक्तिपरत्वे फिल्टर्स लावून जो तो आपला लैंगिक आवाज बाहेर काढत असतो. पण सगळ्यांचा आवाज बाहेर निघेलच असं नाही आणि ज्यांचा निघेल तो पूर्ण निघेलच असंही नाही. म्हणूनच तर `बालक-पालक` चित्रपटातला विश्या बालमैफिल भरवून लेक्चर देताना म्हणतो 'सर्वांच्याच मनात ढिंच्याक-ढिच्याकचा बँजो वाजत असतो, पण ज्याचा बाहेर ऐकू येतो तो असभ्य आणि जो आतच लपवून ठेवतो तो सभ्य'.

मनातही असते लैंगिक भूक

समाज लैंगिक जाणीवांसाठी पूरक वातावरण देईल तेव्हा देईल पण मनातल्या लैंगिकतेच्या प्रेशर कुकरची वाफ शिट्टीगणिक का होईना मीडियानं आणि सोशल मीडियानं बाहेर आणलीय. थेट झाकण उघडण्याचा आशावाद ठेऊच आपण, पण शिट्टीही नसे थोडकी.

मीडियानं कसं? तर पेपर, न्यूज चॅनल, टीवी सिरियल्स, जाहिराती आणि सिनेमा ही पारंपरिक माध्यमं लैंगिकतेविषयी खुलेपणानं किंवा छुप्या पद्धतीनं जास्तीत जास्त प्रकट होऊ लागली आहेत. पेपरमधे लैंगिक भावविश्व उलगडून दाखवणारी सदरं छापून येतायत. छापील जाहिरातींमधे असणाऱ्या मॉडेल्स जास्तीत जास्त मादक दिसू लागल्यात.

टीवी सिरियल आणि सिनेमे लव, सेक्स, धोका या वर्तुळात जास्तीत जास्त फिरू लागले आहेत. अगदी पौराणिक मालिकांमधे सुद्धा देव बायसेफ, ट्रायसेफ आणि देव्या फिगर मेंटेन असलेल्या स्लीवलेस ब्लाउज किंवा केवळ ट्यूब टॉप परिधान केलेल्या दिसू लागल्या आहेत. अगदी अंघोळीच्या साबणाच्या जाहिरातीसुद्धा कंडोमच्या जाहिराती वाटाव्यात इतक्या कामुक तयार होऊ लागल्यात. 

हे चूक की बरोबर, स्त्रियांच्या शरीराचं बाजारीकरण होतंय की नाही होत, हे स्त्रीवादात बसतं की नाही बसत, हे संस्कारी आहे की असंस्कारी आहे हे तूर्तास बाजूल ठेवा. पण या सर्व उठाठेवींमधेसुद्धा प्रेक्षक म्हणून आपली लैंगिक भूक यातून शमत नाहीये. आता लैंगिक भूक असं म्हणताच कान टवकारले असतील. लगेच कमरेखाली का जाताय? मनातसुद्धा एक लैंगिक भूक असते हो, ती या पारंपरिक माध्यमांतून शमत नाही हे नक्की.

हेही वाचा : आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

२०१९ मधेही सेन्सॉर प्रगल्भ नाही

आठवी-नववीत असताना माझ्याकडे टायटॅनिक फिल्म होती. देवाणघेवाणीत माझ्याजवळची टायटॅनिक एका मित्राकडे गेली. त्या नंतर तिची मौखिक जाहिरात आपोआप झाली कारण त्यात काही दृश्यं अशी होती की त्या किशोरवयीन अवस्थेला पूरक आहार त्यातून मिळत होता. तब्बल महिन्याभरानं अनेक चाहत्यांकडून परस्पर फिरून टायटॅनिकची कॅसेट माझ्यापर्यंत पोहचली. मला वाटलेलं एवढ्या लोकांनी वापरली म्हणजे प्रिंट नक्कीच खराब झाली असणार. पण संपूर्ण फिल्म आहे तशीच चांगली होती फक्त ज्या ठिकाणी ती नग्न चित्र काढण्याची दृश्यं होती त्या ठिकाणी ती कॅसेट येऊन अडकायची.

हे असं का होतंय हे एका अनुभवी मित्राला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं. तिथपर्यंत फिल्म पळवत नेत असतील आणि तेवढाच भाग पुन्हा पुन्हा पहात असतील म्हणून कॅसेटचा तेवढाच पार्ट फक्त घासला गेलाय. बाकी सर्व चांगलं राहिलंय. अर्ध नग्न केट विन्स्लेट पाहण्याचा मनसोक्त आनंद पोरांनी लुटला होता. त्या काळातही सुद्धा लैंगिक इच्छांना पाश्चात्य कलेचाच आधार घ्यावा लागला. कारण आपलं सेन्सॉर आजही प्रगल्भ नाहीये तर एक दशकापूर्वीच काय घेऊन बसलात!

वेबसिरिजनं तरूणांचं आयुष्य पडद्यावर आणलं

पारंपरिक माध्यमं हारली तेव्हा वी-लॉग म्हणजेच वीडिओ लॉग उदयाला आलं. इंटरनेटवर लिहिणं म्हणजे ब्लॉग. तसं इंटरनेटवर वीडिओ दाखवणे म्हणजे व्लॉग. इंटरनेटच्या सहाय्यानं वीडिओंची निर्मिती होऊ लागली. युट्युबचा वापर करत वेगवेगळे वेब चॅनल्स लोकप्रिय होऊ लागले. लिव इन रिलेशनशिपच्या गमती जमती सांगणाऱ्या 'पर्मनंट रूममेट्स', 'फोमो', 'लिटल थिंग्स' अशा वेब सिरीज नेटीझन्समधे चांगल्याच लोकप्रिय झाल्या. 'सेक्स चॅट विथ पप्पू अँड पापा' नावाची वेब सिरीज मनोरंजनातून लैंगिक शिक्षण देऊ लागली. मराठी मधली 'कास्टिंग काउच विथ अमेय अँड निपुण' ही वेब सिरीज नेटीझन्सने चांगलीच उचलून धरली.

या आणि अशा प्रकारच्या अनेक वेब सिरीजने सेन्सॉर बोर्डचं भय नसल्यानं पारंपरिक माध्यमांत ज्या मर्यादा येतात त्या सर्व मर्यादा तोडल्या आणि दर्शकांच्या विविध भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला. बाकी प्रेम, वात्सल्य, करुणा, ममता, शौर्य इत्यादी इत्यादी भाव भावनांसाठी पारंपरिक माध्यमे पुरेशी आहेत, याचा विचार करून वेब सिरीजनं लैंगिकतेवर जरा जास्त भर दिला. अगदी शिव्या देणं हे लैंगिक सुखद कार्य सुद्धा वेबसिरीजनं आपलंसं केलं आणि तरुणाईच्या दैनंदिन आयुष्याला पडद्यावर आणलं.

वी-लॉगच्या दुनियेत युट्युबनं क्रांती घडवून आणली. त्याच्या बरोबरीला इंटरनेटनं विविध मनोरंजनाची दारं उघडी केली होतीच. टीवी शोज मोबाईल लॅपटॉपवर पाहण्याची सोय झाली. परदेशातल्या मालिका भारतात आवडीनं पाहिल्या जाऊ लागल्या. तिकडे संस्कारी सेन्सॉर नसल्यानं बरंच छान छान निर्मिलं जातं. पण ते आपल्या पर्यंत पोहचण्याची माध्यमं तोकडी होती. पण आता इंटरनेटमुळे 'नेटफ्लिक्स' सारखी अॅप्लीकेशन्स स्मार्टफोन मधे आलंय. टोरंट मुळे पायरसी वाढली आणि सर्व काही ऐवज फुकटात उपलब्ध होऊ लागला. 

सोशल मीडियामुळे लैंगिक भावविश्वात झाली क्रांती

ही सर्व माध्यमं सार्वजनिकरीत्या लैंगिकतेला सुखावणारी ठरली. पण अजूनही ती भूक काही मिटलेली नाही. सर्व काही डोळ्याला दिसतंय पण आपण त्याला हात लाऊ शकत नाही, अशी काहीशी भावना निर्माण होऊ लागलीय. त्याच वेळी सोशल मीडियाचा अनेकांनी आधार घेतलाय.

आम्ही शाळेत होतो तेव्हा आणि आजही ग्रामीण भागांत शाळा कॉलेजांत मुलगा मुलगी एकमेकांशी खुलेपणाने बोलूच शकत नाही. अगदी एखादी वस्तू द्यायची म्हटलं तरी तिला अशा पद्धतीनं पकडायचं की एकमेकांना स्पर्शही न होवो. ही अस्पृश्यता समाजानेच दिलेली. अकरावी बारावी पूर्ण झाली आणि कॉलेज लाईफमधे प्रवेश करता करता फेसबुक हाती आलं तेव्हा लैंगिक भावविश्वात खूप मोठी क्रांती झाल्यासारखी वाटली.

कारण आता त्या शाळेतल्या मुलींशी आभासी जगात का होईना मैत्री करू शकलो. घाबरत चाचरत ‘हाय! हॅलो!’ व्हायला लागलं. प्रत्यक्ष जगात मुला मुलीने बोलणं समाजाला मान्य नाही ना? ठीक आहे मग आम्ही आमचं विश्व आभासी जगात निर्माण करू अशी सोय फेसबुकनं करून दिली.

हेही वाचा : लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट

आदर्शवत डेटिंग अॅप

लैंगिकतेची पहिली इयत्ता फेसबुकनं पार करून दिली. मग व्हॉट्सअॅप आलं आणि आभासी जगातल्या चव्हाट्यावर होत असलेला संवाद आभासी जगातच पण खाजगीमधे होणं सुरु झालं. फेसबुक वॉट्सअॅपने वेगळी क्रांती आणली खरी पण यांच्याद्वारे लैंगिक भावनांचं कुतूहल पूर्णपणे शमवलं जाण्याची अपेक्षा काहीशी अर्धवटच पूर्ण झाली. म्हणूनच मागणी तसा पुरवठा म्हणत 'ऑनलाईन डेटिंग' अॅपची निर्मिती झाली. 

ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींसोबत ऑनलाईन गप्पा करत करत खऱ्या आयुष्यात त्यांच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करण्याचा मार्ग या अॅपने दिला. यात टिंडर, ट्रुली-मॅडली, वू, बम्बल असे काही अॅप्स भारतात सर्वात जास्त लोकप्रिय झाले. हे अॅप चालू केलं की आपण सांगू तेवढ्या अंतराची मर्यादा पाळत त्यावर असणाऱ्या लोकांचे फोटो दिसतात. तुम्ही स्त्री असाल आणि केवळ पुरुषांच्याच, त्या ही ठराविक वयोगटातीलच प्रोफाइल्स तुमच्या समोर याव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर त्या प्रमाणे तुम्ही तसे फिल्टर्स लावू शकता.

या अॅप मधली प्रोसेस आदर्शवत आहे. या प्रोसेसच्या पहिल्याच टप्प्यात मराठी माणूस तोंडावर पडतो. कारण हे असे अॅप मेट्रो सिटीमधे, त्यातही कॉन्वेंट स्कूलचं बाळकडू असणाऱ्या पिढीमधे जास्त प्रचलित आहे. आपली जिल्हा परिषद प्राथमिक तिथं जरा कच खाते. कारण हे असलं काही आहे हेच माहीत नसतं आणि ज्यांना कुणाला माहिती आहे त्यांना त्यांच्या जवळच्या भागात हे असे अॅप वापरणारे भिन्नलिंगी लोक मिळणं अवघड होतं. मराठवाडा, विदर्भ तर सोडाच पुण्यातसुद्धा या ऑनलाईन डेटिंग अॅप बद्दल खूपच मोजक्या लोकांना माहिती आहे.

डेटिंग अॅपवर असलेली मुलगी ‘अवेलेबल’ असते

मनोज असाच एक ऑनलाईन डेटिंग अॅप नवखा वापरकर्ता, त्याचा अनुभव फारच वेगळा आहे. डेटिंग अॅपवर एका मुलीशी बोलताना तिनं तिचं रेट कार्ड पाठवलं. तेव्हा त्या चॅट वर बोलताना तोच चाट पडला. हा असा अनुभव मनोजचा पर्सनल असला तरी मी ज्या ज्या ऑनलाईन डेटिंग अॅप वापरणाऱ्यांसोबत बोललोय त्यांच्या अनुभवांतून हा किस्सा बराच युनिवर्सल असल्याचं जाणवलं.

मुलींमधे तर याहून वेगळ्या गमतीजमती पहायला मिळतात. नीता नावाच्या मुलीनं उत्सुकता म्हणून हे असलं एक अॅप डाउनलोड केलं. अकाऊंट बनवलं, एक दोन फोटोज टाकले. पण दोन तीन दिवसातच लेफ्ट राईटला कंटाळून तिनं ते अॅप डिलीट केलं. या सर्वात एक चूक अशी झाली की ते अॅप डिअॅक्टिवेट करण्याऐवजी तिनं ते डिलीट केलं. त्यामुळं तिच्या नावाचं अकाऊंट तिथं तसंच चालू राहिलं. त्यानंतर एक दोन तोंडओळख असणाऱ्या मुलांनी तिला थेट फेसबूकवरून मेसेज केला की तू त्या अमुक अमुक अॅपवर दिसलीस. म्हणून म्हटलं थेट मेसेज करावा आणि फ्रेंडशिप साठी विचारवं. नीताला हे ऐकून धक्काच बसला. अशा कुठल्या अॅपवर या मुलीचं अकाऊंट आहे याचा अर्थ लोकांनी ती सर्वांसाठी अवेलेबल आहे असाच काढलेला असतो. 

हे दोन्ही अनुभव नकारात्मकतेकडे झुकलेले आहेत कारण या दोन्ही वापरकर्त्यांत लैंगिक भावभावनांबद्दल आभासी जगातून संतुष्टी मिळवण्यायापेक्षा या सर्व जगाचं कुतूहल जास्त होतं. बहुतेकदा कुतुहलात समजुतदारपणाचा अभाव असतो. कारण कुतुहलामधे आपण बऱ्याचदा वाहवत जातो. कुठलीही क्रिया करताना पंचेंद्रियांसोबत सहावं इंद्रिय म्हणजे प्रत्येक गोष्टीला साशंकतेने पाहण्याची नजर असणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर यात कोण कधी तुम्हाला आर्थिक किंवा भावनिक गंडा घालून जाईल समजणारही नाही.

हेही वाचा : वाफाळलेले दिवसः वयात येणाऱ्या पाल्यांसोबत पालकांनी बघावा असा अभिवाचनाचा प्रयोग

निनावी पत्रांचं अॅप

आता फेसबुकवर 'साराहाह' नावाच्या एका अॅपनं चांगलाच धुमाकूळ घातला होता. या अॅपवर स्वतःचं अकाऊंट ओपन करायचं आणि त्याची लिंक तुमच्या ओळखीच्या लोकांत फिरवायची. त्या लिंकवर क्लिक करून समोरची व्यक्ती तुमच्या विषयी त्याच्या मनात जे काही असेल ते लिहू शकते. ते ही निनावी. 

खरंतर या अॅपच्या निर्मात्यांनी असं डोक्यात ठेऊन ते अॅप बनवलेलं की कामाच्या ठिकाणी आपल्याला इतरांच्या चुका थेट दाखवता येत नाहीत मग या अॅपचा वापर करून आपल्याला एकमेकांना निनावी चुका दाखवता येतील आणि त्या व्यक्तीच्या कामात त्याचा मोठा फरक पडू शकेल.

हे अॅप आपल्याकडे आलं आणि एका रात्रीत वायरल झालं. लोक ते अॅप आवर्जून डाउनलोड करू लागले, त्यावर अकाऊंट बनवू लागले आणि त्याची लिंक फेसबूकवर टाकू लागले. या मागे उद्देश कुणी आपल्या चुका दाखवून द्याव्यात जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्वात त्याचा फायदा होईल असा नसून कुणी तरी तो किंवा ती स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करायला जर घाबरत असेल तर यावर व्यक्त करू शकेल असा होता. आलं की नाही सर्व फिरून फिरून त्याच ठिकाणी? मानसिक लैंगिकता कुठून कशी वाट काढून बाहेर येईल सांगता येत नाही.  

लैंगिकतेची चर्चा करण्याची गरज आहे

माध्यमांची रूपं दिवसागणिक बदलत चालली आहेत पण अजूनही आपल्या सर्वात पर्सनल गोष्टींना बाहेर निघण्यासाठी नीटशी वाट मिळेनाशी झालीय. सध्याच्या भारतीय सत्तापटलावर असणारी विचारधारा ज्या हिंदू संस्कृतीचा उदोउदो करते तिच्यात अनेक पौराणिक दाखले आहेत. या दाखल्यात लैंगिक सुखद क्रियांना महत्वाचं स्थान दिलंय.

पण स्वयंघोषित संस्कृतीरक्षक त्यांच्या तथाकथित सभ्यतेच्या अजेंड्याखाली सर्वच भावभावनांचं दमन करण्यामागे लागलेत. या लोकांना राजकीय चौकटीतून पोषक वातावरण मिळतंय. ते असेच टिकून राहिले तर हळूहळू 'वयात येऊ' पहणारी माध्यमं पुन्हा बुरसट होण्याचं भय सतावत आहे. 

प्रत्येकाच्या मनात चाललेल्या लैंगिकतेच्या पर्सनल घुटमळीला जोपर्यंत आपण युनिवर्सली चर्चेत आणणार नाही तोपर्यंत सगळीच माध्यमं तोकडी राहणार. माध्यम कल्लोळात पुरुष काय आणि स्त्री काय दोघेही अतृप्तच राहणार. नैतिक अनैतिकतेच्या चौकटी भरताना न-नैतिक काही असू शकतं याचा विचार सुद्धा कुणी करणार नाही. पुन्हा त्या पर्सनल गोष्टी अधिकाधिक पर्सनल राहणार आणि हेच युनिवर्सल सत्य ठरणार.

हेही वाचा : 

महाराष्ट्राला सेक्स शिकवणाऱ्या पुस्तकाची गोष्ट

वाचकाचा लेख: माझ्या न्यूड मॉडेलिंगची खरीखुरी गोष्ट

‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा

(पुरुष उवाच या २०१७च्या दिवाळी अंकातून साभार)